Enquire Now

Request A Quote

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

गेल्या आठवड्यात 'चिन्ह'च्या ग्रुपवर गोव्याच्या चित्रकार शिक्षक मित्राने एअर इंडियाच्या संग्रहातल्या चित्रांविषयीची वरील बातमी फॉर्वड केली होती. ती बातमी वाचल्यावर असं लक्षात आलं की कोणातरी शोधक पत्रकाराला ही बातमी पाठवून त्याच्यावर सविस्तर वृतांत देण्यास प्रवृत्त करायला पाहिजे. म्हणून मग त्या मित्राला मेसेज पाठवून विचारलं देखील की ही बातमी कुठल्या वृत्तपत्रात आली होती. ही बातमी एवढीच छोटी आली होती की मोठा वृतांत होता वगैरे. पण त्याच्या कडून काही उत्तर आलंच नाही आणि मग इतर व्यापांमध्ये त्याचा पुढचा शोध घेणं राहूनच गेलं. 

आज सकाळी नेटवर 'एअर इंडिया' बाजारात : मोदी सरकारनं मागवले प्रस्ताव' या शीर्षकाची बातमी वाचली आणि त्या बातमीची आठवण झाली. आणि जुन्या आठवणी देखील जाग्या झाल्या. वर्ष १९८१ - ८२.  जेजेमधून नुकताच बाहेर पडलो होतो. चित्रकार व्हायचं ठरवलं होतं. म्हणूनच ठरवलं की पास आउट झाल्यावर लगेचच शो करायचा आणि तो केला देखील. जहांगीरमधल्या त्या शोच्या एके दिवशी सकाळी एक अत्यंत उंचपुरे धिप्पाड आणि रुबाबदार गृहस्थ जहांगीरमध्ये प्रवेश करते झाले. जहांगीरचा शिपाई दाजी धावत धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला दाभोळकर साहेब आलेत, दाभोळकर साहेब आलेत मला काही कळेचना. तेव्हा सोबतचा सिनिअर चित्रकार मित्र म्हणाला अरे दाभोळकर म्हणजे सच्चिदानंद दाभोळकर एअर इंडियाचे आर्ट डायरेक्टर तुझं प्रदर्शन चालू असताना ते गॅलरीत आले आहेत म्हणजे तू भलताच लकी आहेस. मला तरीही काही कळेना मी प्रश्नार्थक नजरेनं पहात राहिलो. तर तो म्हणाला एअर इंडियाच्या संग्रहासाठी ते चित्रकारांची चित्र विकत घेतात. आणि एक दोन नाही अख्खा शो देखील ते विकत घेतात. मला ही माहिती नवीन होती मी त्याच्याकडे आ वासून पहातच राहिलो . तितक्यात दाभोळकरांनी माझ्या दालनात प्रवेश केला. 

उंचपुरं व्यक्तिमत्व, टिपटॉप कपडे, गळ्यात छानसा बो वगैरे. दाभोळकर टॉकटॉक बुट वाजवत गॅलरीभर फिरले. मग टेबलाजवळ आले स्वतःची ओळख करून दिली कार्ड देखील दिलं. म्हणाले कुठला रे तू गोव्याचा ? म्हटलं नाही गोव्याच्या जरा जवळचा. म्हणजे कुठला म्हटलं मालवणचा.  तर ते हसले . म्हणाले छान काम आहे तुझं.  वॉटर कलरमध्ये आता कुणी फारसं काम करत नाही. मला आवडलं ! 'गाय'ला फॉलो करतोस काय ? मी काही उत्तर द्यायला आणि तितक्यात दारातून प्रफुल्ला डहाणूकर आणि कला समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी आत यायला एकच गाठ पडली. प्रफुल्ला डहाणूकरांचं येणं म्हणजे वादळच. 'दाभोळकर कस्सा आहेस' असं म्हणत त्या आत आल्या आणि आमचं संभाषणच हवेत विरलं. नाडकर्णीसुद्धा गोव्याविषयी प्रेम असणारे सहाजिकच नंतरचं सारं संभाषणं कोंकणीतच चालू झालं. 

बराच वेळाने दाभोळकरांना आठवण झाली की आपल्याला कुठल्या तरी मिटींगला अर्जंट जायचंय. तसे ते मोठ्या गडबडीने उठले आणि बाहेर जाऊ लागले. पण जाता जाता त्यांनी मला कागदाचा चिठोरा हातात दिला आणि म्हणाले यात लिहिलेल्या नंबरची पेंटींग्ज मला आवडली आहेत. एअर इंडियाच्या कलेक्शनसाठी ती मला हवी आहेत. इथून गेली नाहीत तर ती सगळी माझ्याकडे घेऊन ये. कुठली हवी ती मी निवडेन. एक्सप्रेस टॉवरपासून एअर इंडिया काही फार लांब नाही आहे. कधी ही ये. आणि लांब लांब ढेंगा टाकत आपली हातातली बॅग सावरत ते निघालेसुद्धा. 

त्या माझ्या पहिल्या प्रदर्शनातून जेमतेम एकच चित्र विकलं गेलं होतं. पण मला नंतर येणाऱ्या स्पर्धात्मक प्रदर्शनासाठी त्यातली काही चित्रं पाठवायची होती. त्यामुळे म्हणा किंवा आणखीन कशामुळे म्हणा मी काही दाभोळकरांकडे गेलो नाही की चित्रं देखील पाठवली नाहीत. तिचं दाभोळकरांची पहिली भेट त्या नंतर आम्ही भेटलो ते खूप वर्षानंतर चित्रकार मनोहर म्हात्रे यांच्या सोबत. तो पर्यंत ते एअर इंडियातून बाहेर पडले होते. ज्या माणसानं एअर इंडियाचा कलासंग्रह वाढवला, जोपासला, मोठा केला त्या दाभोळकरांना एअर इंडियामधून अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं. ज्यांनी असंख्य भारतीय चित्रकारांना नाव मिळवून दिलं. एअर इंडियाच्या संग्रहात स्थान मिळवून दिलं काहींना तर आर्थिक स्थैर्य आणि मानमरातब देखील मिळवून दिला त्या दाभोळकरांना चित्रकला क्षेत्रातल्या एका व्यक्तीच्या उपद्व्यापामुळेच जावं लागलं याचं साऱ्यांच चित्रकला वर्तुळाला मनस्वी दुःख झालं. पण करता येण्यासारखं कुणाच्याच हातात काही नव्हतं. दाभोळकर हे नावं नंतर जवळ जवळ कला क्षेत्रातून नाहीसंच झालं. 

त्यांची आठवण मला झाली ती २००१ साली 'गायतोंडे' गेले तेव्हा. दाभोळकर हे देखील म्हात्रे, पाळंदे, डहाणूकरांसारखेच ' गायतोंडे ' यांचे जेजेतले विद्यार्थी त्यामुळे त्यांना बोलतं करणं क्रमप्राप्त होतंच आणि आम्ही ते केलंच अगदी मनापासून केलं. 'गायतोंडे' हे नाव काढल्या नंतर त्यांनी देखील आपुलकीने ते सारं केलं. परिणामी त्या सर्वच मुलाखती किंवा त्यांची शब्दांकनं एका वेगळ्याच पातळीवर गेली. या ही गोष्टीला आज २० वर्ष झाली. पण आजची तरुण पिढी देखील 'गायतोंडे' यांना जाणून घेण्यासाठी त्याच लेखनाची पारायणच्या पारायणं करत असतात. दाभोळकर मुळचेच गर्भश्रीमंत. एअर इंडियाचं पद गेल्यानंतर त्यांचं काही फारसं आर्थिक नुकसान झालं नाही. पण एअर इंडियाच्या कलासंग्रहाची मात्र नंतर अधोगतीच होतं गेली. सरकारीकरणं झाल्यामुळे त्या कलासंग्रहाचं महत्वच कुणाला जाणवलं नाही. पण जाणवलं तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. चांगली चांगली दुर्मिळ पेंटींग्ज त्या संग्रहातून पसार झाली होती. कोणे एके काळी १०००, १५००, २००० रु घेतलेली ती चित्रं आज कोटयावधी रुपयांना विकली जातात. 

एअर इंडियाच्या कॅलेंडरवर जी चित्रं प्रसिद्ध झाली ती चित्रं एअर इंडियाची आहेत म्हणून छातीठोकपणे सांगता येईल. पण जी चित्रं कॅलेंडरवर आली नाहीत किंवा त्यांचं एअर इंडियाकडून नीटसं डाक्युमेंटेशन देखील होऊ शकलं नाही त्यांचं काय ? 'गायतोंडे', रझा, सुझा, तय्यब हुसेन इत्यादी चित्रकारांच्या त्या काळात दीड दोन हजार रुपयांना घेतलेल्या एकेका चित्रांची किंमत आज अक्षरशः दहा ते वीस कोटीच्या वर गणली जाते. या वरून एअर इंडियाचं पर्यायाने सरकारचं किंवा जे कोणी आता ती एअर इंडिया विकत घेणार आहे त्यांचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना करता येणं सहज शक्य आहे. त्या साठी अर्थशास्त्री असण्याची गरज नाही. 

आज दाभोळकर स्वतः छान कार्यरत आहेत. त्यांची स्मरणशक्ती देखील अद्याप शाबूत आहे. एअर इंडियासाठी त्यांनी विकत घेतलेल्या चित्रांची त्यांना पूर्णपणे माहिती असणार सहाजिकच त्यांची मदत घेऊन एअर इंडियाला या अब्जावधी किंमतीच्या घोटाळ्यांचा शोध लावता येणं सहज शक्य आहे.  नाही का ? ही चित्रं जाणार आहेत कुठं ? कोणाच्या तरी दिवाणखान्यात असणार आहेत किंवा लिलाव कंपन्यांच्या गोडाऊनमध्ये तरी. त्यामुळे त्यांचा शोध घेणं फारसं अवघड काम नसेल. हे लिहिण्या मागे कुणाचाही व्यक्तिगत व्देष असण्याचं कारणच नाही. एकमेव हेतू आहे तो म्हणजे एअर इंडियाकडे असलेला हा बहुमोल खजिना पुनर्स्थापित व्हावा. तो उभारण्या मागे टाटांचा देखील खूप मोठा सिंव्हाचा वाटा होता आणि त्यात दाभोळकरांचा खूप मोठा सहभाग होता. हे समाजासमोर यावं. कुणी सांगावं ही सर्व चित्रं सापडली आणि त्यांचा लिलाव झाला तर त्यातून एअर इंडिया वाचवता देखील येईल. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...