Enquire Now

Request A Quote

मुक्काम सुंदरबन !

भाग - ७
पुण्यातील चित्रकार शरद तारडे यांनी अलीकडेच सुंदरबनला भेट दिली होती. या भेटी विषयी त्यांनी फेसबुकवर लेखन केले आहे. या लेखनाचा सातवा भाग त्यांच्याच अनुमतीने इथं प्रसिद्ध करीत आहोत. 
  

"सुंदरबन" विषयी माहिती मिळवताना खूप लोकांच्या मनात त्या विषयी वेगळ्याच कल्पना होत्या असे लक्षात आले .

ज्या वेळेस मी संदर्भात शांतिनिकेतनच्या प्रोफेसर यांना विचारले तेव्हा त्यांनी " अरे आप मत जाना वो जगह! बहोत खराब एरिया है वह! बाघ रहते है जो आदमी को खा सकता है ! मत जाना !" असे सांगितले वर आम्ही कधी गेलो नाही असे आवर्जून सांगितले.

ट्रीप ॲडव्हायझर वर सुंदरबनचे अनुभव वाचता ते खूप सुंदर आहे, जरूर दोन-तीन दिवस तिथे जाऊन राहिले पाहिजे .आयुष्यात एकदा तरी जाऊन पाहाच! असे देश-परदेशातील लोकांचे म्हणणे होते ,त्यांनी सुंदर फोटो टाकले ते चांगले वाटले त्या मुळे त्या ट्रिप कंपनीबरोबर जायचे निश्चित केले. मनात म्हणालो जास्तीत जास्त त्रास होईल पण इथे नक्की जायचेच! दोन-चार वेळा त्या ट्रिप कंपनीला फोन करून वेगवेगळ्या पद्धतीने माहिती घेत होतो, ते लोकही फोटो पाठवीत होते शेवटी थोडे पैसे भरून दोन दिवसाची ट्रिप फायनल केली.

शांतिनिकेतन वरून ट्रेनने कलकत्ता येथे आलो आणि १६ तारखेला सकाळी ७.३० वाजता त्या कंपनीच्या इंडियन म्युझियम जवळच्या लेनमधील ऑफिसमध्ये पोहोचलो.
ऑफिस तर खूपच वेगळ्या रीतीने सजवले होते. आमच्याबरोबर जर्मनीतील दोन मुली आणि एक मोठा माणूस होता आणखी दहा-बारा जण होते पण ते दुसऱ्या जागेवर आम्हाला भेटणार होते .

सगळेजण टेम्पो ट्रॅव्हलर मधून सुंदरबन च्या दिशेने निघालो.

एक एक गाव मागे टाकत होतो त्यावेळेस लक्षात आले गावातील प्रत्येक घराच्या पुढे मोठे तळे तयार केले आहे आणि प्रत्येक घराच्या मागे किंवा पुढे ते आहेच! गाईडला विचारल्यावर ते तळ्यातील मासे उत्पादन करतात आणि ते एक त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे असे सांगितले.
हि रचना इतकी छान दिसत होती हे प्रत्येक घरांची ,झाडांची प्रतिबिंब पाण्यात पडून सर्व दृश्य " निसर्गचित्र" आहे असेच भासत होते.

तीन तासांचा असा निसर्गरम्य प्रवास करून आम्ही एका नदीच्या पात्राजवळ थांबलो आणि बोटीत बसून दुसऱ्या किनार्‍यावर गेलो तिथून रिक्षा आणि पुन्हा वेगळ्या नदीच्या पात्राजवळ जाऊन बोटीत बसून त्यांच्या हॉलिडे रिसॉर्ट जवळ पोहोचलो .

त्या स्वप्नवत जागा दिसू लागली आणि सर्वजण थबकले !
सुंदर , आदिवासी पद्धतीच्या झोपडीवजा घरांनी तो भाग सजवला होता . मधून मधून तळी दिसत होती . बांबूचे पुल उभारले होते.

जागेच्या मध्यभागी आलो तर डाव्या बाजूला मोठा परिसर बघून खूप खुश झालो . जेवणासाठी गवताच्या छप्परांचा हॉल मोकळ्या जागेत उभारला होता .
त्याच्या भिंतीवर सुंदर गोल कोनाड्यात सर्व स्वयंपाक घरामध्ये लागणारे वस्तू नीट रीतीने मांडले होत्या, त्याच्यापुढे एका बोटीमध्ये सर्व खाद्यपदार्थ ठेवले होते. पाच-सात ठिकाणी भव्य लाकडी टेबले, खुर्च्या मांडल्या होत्या, झोपाळे होते.
तेथे बसून मस्त ब्लॅक टी घेतला.

आता आमचे सर्वांचे लक्ष आजूबाजूला घरांकडे लागले होते जी आदिवासी पद्धतीने सजवली गेली होती .

आमच्या रूम जवळ गेल्यावर तर आणखीनच खुश झालो ! पुढे सुंदर अंगण आणि लागून खोली, त्यामध्ये लाकडी बेड , स्वच्छ अंथरूण-पांघरूण, मच्छरदाणी!
आत मध्ये चित्रांनी सजलेली बाथरूम !
अक्षरशः स्वर्गात असल्यासारखा अनुभव होता !
सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते.

हा सर्व परिसर आदिवासी लोकांच्या हाताने सजवला गेल्याने सगळं वातावरण तसेच वाटत होते.हवेत गारठा जाणवत होता.

दोन वाजता चविष्ट, भरपूर भाज्या असलेले जेवण जेवलो आणि लगेचच तासाभरात गावांमध्ये चक्कर मारायला बाहेर पडलो.

रस्त्यावर प्रत्येक घराच्या समोर तांदुळाचा लोंब्या काढून ठेवल्या होत्या. एके ठिकाणी तर पायाने चालवायच्या यंत्रावर तांदूळ पाखडले जात होते .उमाताई , सुचिता, मंजुषा यांनी तेथे जाऊन ते यंत्र चालवून बघितले, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता.

पुढे नदीच्या किनाऱ्यावर लागल्यावर गर्द झाडी , पहुडलेल्या होड्या आणि सूर्यास्त! अंधार पडायला लागला होता, मग भराभर त्या सुरेख संधीप्रकाशात फोटो निघाले आणि तासाभरात पुन्हा परतलो.

पाच वाजता पुन्हा चार-पाच जणांना होडीतुन घेऊन नावाडी निघाला, जरा दूर गेल्यावर जी शांतता अनुभवली ती अविस्मरणीय होते .
दादांनी (विरुपाक्ष कुलकर्णी) यांनी छान गझल गायली आणि आम्ही हिंदी गाणी म्हंटली. नावाड्याला खूप आग्रह केल्यावर त्यांनी दोन बंगाली गाणे अप्रतिम आवाजात गायली !
शांतपणे आजूबाजूच्या झाडातून हळुवार वळणारे नदीचे पात्र आणि
नावाड्याचा अप्रतिम खडा आवाज !

संध्याकाळी पुन्हा परतल्यावर "बाऊल" गीतांचा कार्यक्रम आदिवासी लोकांनी सादर केला. खूप वेगळ्या प्रकारची गाणी ऐकून मस्त वाटले .त्या प्रत्येक गाण्याचा थोडक्यात अनुवाद करून मंजुषा आम्हाला सांगत होती त्यामुळे त्यातील भावही कळला.

पुन्हा चमचमीत जेवण करून झोपडीकडे परतलो ते तृप्त होऊनच.!

  
शरद तारडे 

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...