Enquire Now

Request A Quote

पुनर्जन्म !

चित्रकार संजय यमगर वाईचे.  पण त्यांचं कला शिक्षण मात्र आधी पुण्यात आणि नंतर फ्रान्समध्ये झालं. शिक्षणानंतर त्यांनी मुंबई पुण्यात बराच काळ वास्तव्य केलं आता मात्र ते वाईतच स्थिरावले आहेत. खूप मोठी स्वप्न उराशी बाळगून ते काम करतायत. पण सुमारे वीस वर्षापूर्वी ते एका जीवघेण्या अनुभवातून गेले होते. तो साराच अनुभव त्यांनी फेसबुकवर शब्दांकित केला आहे. तो त्यांच्याच परवानगीने येथे पुन्हा प्रकाशित करीत आहोत.    


डिसेंबर १९९९. y2k ची सगळीकडे चर्चा चालू होती. नवीन वर्षाचे मित्रांचे प्लॅन्स सुरु होते. मी, हर्षदा माडगूळकर ,उटगीकर  आणि गिरीश कुलकर्णी  तिघेही एका गव्हर्नमेंटच्या पोस्टर कॅम्पेनवर काम करत होतो. मी सलग तीन दिवस न विश्रांती घेता काम करत होतो. त्यात काही दिवसापासून बरे वाटत नव्हते. खूप अशक्त होतो. ३१ च्या दुपारी गिरीशच्या घरी(सर्वदर्शन सोसायटी नळ स्टॉप, पुणे) काम चालू होते. अस्वस्थ व्हायला लागले होते. वॉशरूमला जाऊन येताना चक्कर यायला लागली. चेहरा, हात-पाय वाकडे व्हायला लागले. अजूनही आठवतंय, बेसिनच्या वरच्या आरशात तोंड वेडेवाकडे झालेले दिसले पिळलेल्या टॉवेलसारखे. तोंडातून एक शब्द फुटेना. गिरीशला हाक मारता येईना. कसाबसा हॉलमध्ये पोचलो. खरं तर डोळ्यासमोर पांढरा प्रकाश दिसला - एक फ्लॅश, कॅमेऱ्याला असतो तसा. आणि बेशुद्ध होऊन कोसळलो. 


(गिरीश-अभि-हर्षाने सांगितले तसे)> माझ्या तोंडातून फेस येत होता, दातखिळी बसली होती. गिरीश जोरजोरात ओरडत होता. कदाचित मला या अवस्थेत बघून त्याला सुचत नव्हते. तसा तो हळवा आणि प्रेमळ. हर्षाने त्याला शांत केला. ती खूप संयमी आणि धीराची. दोन  बिल्डिंग सोडून संजय दमगे  (आण्णा) यांचे बार्स न टोन्सचे ऑफिस होते तिथं पर्यंत गिरीशचा आवाज गेला आणि ते पळत आले. सगळ्यांनी मला जवळच्या नचिकेत हॉस्पिटल मध्ये हालवला. तो पर्यंत सुहृद चिंबलकर, सायली होनप शेंडे आणि अजून काही मित्र आले. प्राथमिक उपचार चालू झाले. अभिजित चौधरी  माझ्या जवळच हॉस्पिटलमध्ये बसून होता. मी अजून शुद्धीवर नव्हतो. मध्यरात्र झाली आणि मी अचानक झोपेत 'ग्यानबा तुकाराम-ग्यानबा तुकाराम' म्हणू लागलो. अभ्याला काही कळेना. त्याने मला कसे तरी शांत केले. पण हे रात्रभर चालू होते म्हणे. त्याने रात्र जागून घालवली. घरी फक्त पप्पाना कळवा सांगितले. ते ताबडतोब पोचले. मला असा बघून पार गळाले.


दुसऱ्या दिवशी भांडारकर रोडवर एका क्लिनिक  मध्ये माझा EEG झाला. डॉक्टरांनी सांगितले याच्या मांसाहारी(Red Meat ) खाण्यातून कधीतरी पॅरासाईट -विषाणू मेंदूत गेले आहेत. तसेच मेंदूला रक्तस्त्राव न झाल्यामुळे असे झाले असावे. (माझ्या अगदी कमी झोपेमुळे पण असावे असे त्या म्हणाल्या) नंतर पुना हॉस्पिटलमध्ये CT स्कॅनसाठी घेऊन गेले. दुसऱ्यादिवशी दुपारी CT Scan रिपोर्ट्स आले. नचिकेतच्या डॉक्टरांनी सगळ्यांच्या देखत तो CT scan चे इन्व्हलप उघडून रिपोर्ट बघताच ओरडले- 'अरे याला तर Brain Tumor झाला आहे. झाले.... सगळे गप्प-गार. पप्पा तर खुर्चीत कोसळलेच. मी सुन्न होतो. काहीच कळत नव्हते. तेवढ्यात गिरीश म्हणाला रिपोर्ट बघू आणि त्याने नाव आणि वय बघितले तर त्यावर एम.गाडगीळ वय: ७२ होते. काहींनी निःश्वास सोडला तर काही मित्र चिडले आणि ते सगळे पुना हॉस्पिटलला गेले तर अगदी फिल्मी स्टाइल मध्ये माझ्या रिपोर्टची अदलाबदली झाली होती. पण माझा रिपोर्ट पण काही आनंदी नव्हता. मेंदूत घोटाळा झाला होता. आधीच गुंतागुंतीच्या मेंदूला १२ mm सूज आली होती. पॅरासाइट विषाणूमुळे. हॉस्टेलला माझ्याकडे खूप मित्र रूम वर पॅरासइट म्हणून राहायचे. त्यात आता यांची भर आणि तीही मेंदूत. चांगलंच घर शोधलं होतं त्यांनी. 

माझी त्यावेळची शरीर अवस्था बघता हा जीवघेणा आजार होता -Neurocysticercosis.


आठवडाभर हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर वाईला घरी आणले. आई-पपा दोघेही अगदी गळपाटून गेले होते. दुसऱ्यादिवसापासून रोज इंजेक्षन्स सुरु झाली. डॉ.लोखंडे (नाना) एक दिवसाआड आयर्नचे इंजेक्षन द्यायचे. महिनाभर हे चालू होते. बुडाची अगदी चाळणी झाली होती. बाकी ट्रीटमेंटसाठी मी डॉ सायगावकर यांच्याकडे जायचो. फॅमिली डॉक्टर होते. माझ्याशी विशेष मैत्री होती त्यांची. ते कलाप्रेमी असल्यामुळे बऱ्याच गप्पा व्हायच्या रात्री पेशंट कमी झाले की. माझ्या परदेशी शिक्षणाला जाण्याच्या स्वप्नाबद्दल त्याना कौतुक वाटायचे. ते म्हणायचे जाशील तू - तब्बेत सांभाळ. त्यांनी पुण्याला एका nurosurgon ला भेटायला सांगितले. अतिशय निराशाजनक अनुभव तो. मी आणि अभ्या पुण्यातल्या क्लिनिकमध्ये संध्याकाळी गेलो. मला झापत ते म्हणाले तू कधीच पूर्ण बारा नाही होऊ शकत, कधीच पेंटिंग  नाही करू शकणार. काही तरी दुसरे काम बघ. मी तडक उठलो आणि पळत बाहेर आलो. म्हणालो जरी बरा नाही झालो तरी चालेल पण असा डॉक्टर मला नको. अभ्या आणि मी शनिवारवाड्यासमोर थोडा वेळ बसलो त्याला म्हणालो i m a sportsman. मी कधीही हार मानणार नाही. 


मी एक वर्ष वाईला राहून आराम करणार सगळे सोडून, कॉलेज-काम. पण बरा होणार. सायगावकर डॉक्टरना हा सगळा किस्सा सांगितला. म्हणाले तू काळजी करू नकोस मी तुला बरा करतो. फक्त दोन वर्षे नियमितपणे औषधे घे. मग जीवात जीव आला. मग रोज सकाळी योगा, ४ वेळा खाणे आणि झोपणे. बास.. थोड्या दिवसांनी पागा तालमीत व्यायाम सुरु केला. बरे वाटायला लागले. ४० वरुन वजन ५० ला पोचले. याच दरम्यान खूप वाचणं झालं. टिळक लायब्ररीत जाऊन वाचत बसायचो. विवेकानंद, संत तुकाराम, कार्व्हर, टिळक, नेपोलियन वाचले. बरीच आत्मचरित्रे वाचली. खरंतर जे हाती येईल ते वाचायचो. विश्वकोशमध्ये जायचो. micro-organism, fungus, microbes वर वाचायचो, चित्रे बघायचो. my fevt topic- ‘microbes in human welfare’ डोक्यातल्या जीवाणू-विषाणू बद्दल कमालीचे कुतूहल होते. साला एवढेशे सूक्ष्म ते पण माणसाला पार घाईला आणतात, गुढघे टेकायला लावतात. निसर्ग नियमापुढे झुकावेच लागते.

पुढे २००८ मध्ये 'Micro-Life' आणि २०१२ मध्ये 'Germotopia' नावाची पेंटिंग सिरीज सुरु केली. त्याचा रेफ्रन्स इथेच असावा.
जवळजवळ एक वर्षाच्या विश्रांती नंतर खूपच बरं वाटायला लागलं होतं. दर ६ महिन्याला CT स्कॅन करावे लागायचे. ४ वेळा केले. सायगावकर डॉक्टर, सगळे मित्र यांच्या मदतीने पुन्हा उभा राहत होतो. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आई आणि पप्पा यांनी घेतलेली मेहनत. हॉस्टेलला असताना अवेळी, अपौष्टीक जेवण, १८-२० तास काम आणि वेडेपणा म्हणजे दिवसातून २५-३० बिडी-सिगरेट ओढणे. मग ती कुठलीही असो, चालायची- चारमिनार, ब्रिस्टॉल, नेव्हीकट, संभाजी बिडी आणि आठवड्यातून ३-४ वेळा दारू. या सगळ्याने शरीराचे वाटोळे झाले होते. हॉस्पिटलच्या बाकावर जेव्हा पपांना बसलेले बघितले. तेंव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर तरुण मुलगा मरणाच्या दारात उभा राहिलेला बघवत नव्हता. ते बोलत नव्हते पण त्यांच्या डोळ्यात ते दिसत होते. त्यांनी आतापर्यंत दिलेल्या freedom चा मी दुरुपयोग केला होता. तेंव्हाच मी ठरवले आज पासून सिगरेटला हात नाही लावणार. पुढे १० वर्ष मी मटण (Red Meat) खाल्ले नाही. कदाचित भीतीपोटी असेल. मला जर जास्त काळ कलाकार म्हणून काम करायचे असेल तर हे करावे लागणार होते. तब्बेत सांभाळावी लागणार होती. कदाचित हे माझ्याबरोबर घडावे ही गरजच होती. पुढची २० वर्षे नीट काम करण्यासाठी. एक मोकळा धूरविरहित श्वास घेण्यासाठी.
डॉ सायगावकर (miss U Doc), सगळे मित्र आणि आई-पप्पा,
सर्वांचे मनापासून आभार. 
i m happy n proud i kept that promise till today.
आज ३१ डिसेंबर २०१९ माझ्या सगळ्या फुकणाऱ्या आणि न फुकणाऱ्या मित्र- मैत्रिणींना
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  
संजय यमगर 

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...