Enquire Now

Request A Quote

सफर अभी बाकी है मेरे दोस्त!


प्रतीक जाधवच्या अनोख्या सायकल प्रवासाबद्दल याच जागेवर अगदी सुरवातीला आम्ही खूप काही लिहिलं होतं. वाचकांचा देखील त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. इतकंच नाही तर अनेक वाचक आणि कलावंतांनी त्याला आर्थिक साहाय्य देखील केलं. प्रतिकच्या त्या लेखाला मिळालेल्या हिट्स 'चिन्ह'ला देखील अभिमानास्पद वाटल्या होत्या नव्हे आजही वाटतात. प्रतीकला त्याच वेळी सुचवलं होतं की तुझ्या प्रवासातल्या अनुभवाबद्दल 'चिन्ह' साठी नियमितपणे लिही. पण नंतर असं लक्षात आलं की तो प्रवास करणार की लिहिणार ?  शेवटी ते सारं आम्ही त्याच्यावरच सोपवलं. आता तब्बल चार महिन्यानंतर त्यानं 'चिन्ह' साठी लिहिलेला लेख आमच्या हाती आला आहे. तोच हा लेख ... 

"भारत हे जर एक शरीर असेल तर त्याच्या प्रत्येक रोमारोमात कला आहे, आणि रक्त बनून त्याच्या प्रत्येक अंगात वाहण्याची माझी इच्छा आहे."
माहितीये हे एवढं सोपं नाही पण छोटासा प्रयत्न तर करू पाहतोय. जेजे मध्ये असताना पाश्चात्य कला आणि भारतीय कला यांचा इतिहास अभ्यासाला होता. पण तेवढ्यावरच समाधानी न होता कदाचित भारतीय कलेचे इतरही अनेक पैलू असतील, जे दूर कुठे तरी डोंगरापलीकडे, जंगल वनात दडलेले असतील, ज्यांचा ठिकाणा अजूनही इंटरनेट किंवा पुस्तकांना लागला नसेल, तो इतिहास आणि वर्तमान जाणण्यासाठी मी भारत भ्रमणाचा निर्णय घेतला होता. आणि त्या साठी माध्यम निवडलं सायकल. त्याला बरीच कारणं होती. एक आर्थिक कारण होतंच पण महत्वाचं कारण म्हणजे सायकलने प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत प्रवास करता येतो. क्वचितच एखादी गोष्ट नजरेतून सुटते. जेव्हा दोन लोक पायी चालताना समोरासमोर येतात किंवा  गाडीवर पाहतात तेव्हा एकमेकांबद्दल काही वाटत नाही पण सायकलमध्ये एक चुंबकीय शक्ती असते बरं का ! 

जसं कोणी सायकल स्वार दुसऱ्याला पाहतो तेव्हा तो आवर्जून विचारपूस ,चहापाणी वगैरे करतो. राहायची खायची सोय करतो. या सगळ्यासाठी काही ओळख वगैरे लागत नाही बरं का. फक्त बुडाखाली सायकल हवी असते बस्स.

असो. प्रवास सुरू करण्या आधी मी लोकांना मदतीचे आवाहन केले होते. माझे आवाहन लोकांपर्यंत पोहचण्यासाठी 'चिन्ह'ने केलेले प्रयत्न माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत. अनेक अनोळखी किंवा ओळखीचे हात पुढे आले होते .जमा झालेल्या रकमेत सायकल आणि महत्वाचं साहित्य खरेदी करून सहा महिने निघतील एवढी रक्कम जमा झाली. बऱ्याच वेळा अडचणीमुळे प्रवासाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अजून आठवतंय एकदा गमतीने सतीश नाईक सर आणि स्नेहल बाळापुरे फोनवर बोलताना म्हणाले होते की तू निघतोस प्रवासाला आता की आम्ही धक्के देऊन भाग पाडू. 
          
अखेर 2 ऑगस्टला जेजेच्या प्रांगणातून हा 'कला प्रवास' सुरू झाला.  भर पावसात मुंबईचा निरोप घेतला तो हे ठरवून की आता दीड वर्ष प्रवास झाल्याशिवाय परत यायचं नाही. आता जवळपास चार महिने होतील प्रवासाला. दरम्यान मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि आता जम्मू मध्ये आलो आहे. आता पर्यंत 5000 km चं अंतर कापून झालं आहे. मागे वळून पाहतो तर मलाच नवल वाटतं. आता पर्यंत जे पाहिलं, अनुभवलं, शिकलो ते एवढं थोडक्यात लिहिणं शक्य नाही. त्याचं कदाचित वेगळं पुस्तकच होईल. कित्येक मोठमोठ्या पर्वतरांगा, नद्या, वाळवंटं, मैदानं,जंगलं ओलांडून इथपर्यंत आलोय. वाटेत नाना प्रकारचे लोक, साधू, सन्यासी, विचारवंत,कलाकार भेटत गेले त्यांच्या कलांचा आस्वाद घेत समृद्ध होत गेलो.
           
मध्यप्रदेशच्या दुर्गम जंगली भागामध्ये काही आदिवासी लोकं 'पिठुरा' करतात. हा चित्र प्रकार काय आहे, हे पाहण्यासाठी कट्टीवाड़ा, अलिराजपुर, नानपूर, झाबुआच्या काही भागात फिरलो. बऱ्याचदा पूल नसल्याने नद्या पाण्यात उतरून ओलांडाव्या लागायच्या. इथली लोकं मधासारखी गोड. एका वस्तीत जाता जाता अंधार झाला होता. आणि तिथे लाईट पण नव्हती. तरीही या बिन बुलाया मेहमानाला त्यांनी चिमणीच्या उजेडात चांगलं जेवू घातलं. भाषा तर कळायची नाही एकमेकांना, पण त्यांचा 'दिवासा' नावाचा सण असल्याने रात्रभर बडवे घुमवले (एक चर्मवाद्य वाजवत फिरतात, त्यांच्या देवतांना आमंत्रित करण्यासाठी)आणि त्यांची लोक गीतं ऐकायला मिळाली.
हे असले अनुभव येत गेले जणू खऱ्या आयुष्याची दोरी सापडली आहे असे वाटते. प्रवास केल्यावर आतून प्रश्न यायला लागतात आणि त्याची उत्तरं सगळ्या प्रवासाचं फलित असतात.
    
पिठुरा चित्र म्हणजे घरात मोठ्या भिंतीवर काही चित्र काढलेली असतात. अवती भोवतीच्या निसर्गातील घटक, दैनंदिन जीवनातील दृश्य, मैथुन युगल , पशु पक्षी, दोन तोंडाचा घोडा आणि बारा डोक्याचा 'बारा माथा धनी' हे खास आकर्षक घटक रेखाटले जातात. अतिशय साधी सरळ पण प्रभावी शैली असते ही. मग यांच्या पुढे गाणी गायिली जातात. कितीतरी मोठी कला भक्ती म्हणावी लागेल, नाहीतर हल्ली मोठमोठ्या बंगल्यातसुद्धा चित्रं पाहायला मिळत नाहीत.
     
मग पुढे गुजरातच्या कच्छ भागातील खेड्यापाड्यामध्ये  हस्तकलेचे भरपूर अनदेखे प्रकार पाहिले. भुज, निरोना, झुरा, खवाडा, होडको या गावांमध्ये हस्त कलेची भरभराट दिसते. सारा सपाट पांढऱ्या जमिनीचा प्रदेश, निसर्गाने भलेही इथे रंग भरले नसतील पण या लोकांनी आपल्या कलेतून संपूर्ण कच्छ रंगीत केलं आहे. फक्त एम्ब्रॉयडरीचे सोळाहून अधिक प्रकार पाहिले, अजूनही  असतील. नष्ट होत आलेली रोगन कला पाहिली. मातीची घरं सजवण्यासाठी चिखलाने  रिलीफ मध्ये आकर्षक डिझाइन केली जाते ,मध्ये मध्ये काचेचे तुकडे चिटकवून घराला सजवलं जातं. सगळं काही डोळ्याचं पारणं फेडणारं आहे.
       
प्रत्येकानं कधीतरी मोठ्या प्रवासाला जावं. जगण्याच्या पद्धतीत उलथापालथ करण्याची क्षमता असते त्यात.आयुष्यभर बऱ्याच गोष्टींचं ओझं घेऊन फिरत असतो आपण आणि प्रवासात कळतं की किती तुच्छ गोष्टींना घेऊन आपण फिरत आहोत.

अगदी हळुहळु मग एक एक गोष्ट गळून मागे पडू लागते. आपण हलके होत जातो. इतके हलके की कुठेही, केव्हाही,कोनामध्येही मिसळण्याची क्षमता येते आणि जाणवायला लागतं की किती विनाकारण नको त्या बेड्याचं ओझं घेऊन मी आयुष्य ढकलत होतो. कला प्रवासातही असाच ओझं विरहित होत चाललो आहे.याच विषयावर दिल्ली मध्ये JNU संस्थे मध्ये परफॉर्मन्स आर्ट- 'बर्डन ' या शीर्षकाखाली सादरीकरण केलं. रेखाटने, लिहिणेही सुरूच आहे.
      
कला प्रवासात खूप संवेदनशील क्षणसुद्धा अनुभवायला मिळतात. वाटेत असे अगम्य लोकं भेटतात की त्यांची उंची पाहून आपण ठेंगणे वाटतो. पंजाब मध्ये 'पिंगलवारा ' हे पुरण भगत सिंग यांनी सुरू केलेला एक आश्रम आहे ,जिथे निराधारांची सेवा केली जाते.तिथे एक चित्रकार राहतात , त्यांचं नाव राज सिंग पाल. यांनी वयाची पन्नास वर्ष या आश्रमाच्या सेवेत घालवली. सर्व मानवतावादी विषयांवर या आश्रमाच्या भिंतीवर चित्र काढली आहेत . तेही नि:शुल्क.  मी भेटायला गेलो तर हा माणूस ढसाढसा रडायला लागला. त्यांच्या पांढऱ्या दाढी वरून ओघळणारी आसवे पाहून मीही भांबावलो. रडू यासाठी आलं की उभ्या हयातीत पहिल्यांदा कोणी एवढं लांबून सायकलने भेटायला आलंय. कुठल्या पातळीवरील संवेदनशीलता म्हणायची ही ?
       
आज पर्यंत एकदाही हॉटेल मध्ये पैसे देऊन राहिलो नाही. स्थानिक लोकांकडे, मंदिर, गुरुद्वारा कोठेही थांबलो. त्यामुळे मला लोकांचं, त्यांच्या संस्कृतीचं खरं स्वरूप न्याहाळता आलं.
       
कलाकार,कला विद्यार्थी, कला रसिक यांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्या आहेत.कला क्षेत्रातील स्थानिक अडचणी लक्षात येत आहेत. असा सगळा खजिना जमा होत आहे. आता जम्मूच्या पहाडी गावांमध्ये लघुचित्र शैलीच्या शोधात बसोली आणि कांग्रा या गावांमध्ये आलो आहे. खूप मोजकी लोकं उरली आहेत हे चित्र काढणारी पण त्यांना जवळून काम करताना पाहणे आणि माहिती घेणे वेगळाच अनुभव आहे. आता कुठे खऱ्या अर्थाने कला प्रवास सुरू झाला आहे.
        
'कला प्रवास' या फेसबुक पेज वर जमेल तसे अनुभव टाकत आहे. पुढे आसाम पर्यंत आणि दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत जाण्याचा मानस आहे. आपली साथ असेल तर काहीच अशक्य नाही. क्योंकी...
        
सफर अभी बाकी है मेरे दोस्त!
प्रतिक जाधव

Top Features

 

Feature 1

भोला पागला

अधिक वाचा

Feature 2

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

अधिक वाचा

Feature 3

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

अधिक वाचा

Feature 4

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

अधिक वाचा

Feature 5

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

अधिक वाचा
12345678910...