Enquire Now

Request A Quote

" शरम नाही वाटत ?"

जेजेतल्या न्यूड क्लासचे असंख्य किस्से आहेत ते पिढ्या दर पिढ्या सांगितले जातात. त्यातले अनेक बहुळकरांनी त्यांच्या 'न्यूडल्स' या लेखात अगदी रंगवून रंगवून सांगितले आहेत. जेजेचे डीन 'रापण'कार प्र. अ. धोंड यांनी सांगितलेला किस्सा तर अफलातून आहे. बहुळकर सांगतात ..." सॉलोमन साहेबाच्या काळातले विद्यार्थी व पुढे जेजेचे डीन झालेले प्र. अ. धोंड यांनी १९७६ च्या दरम्यान गप्पांच्या ओघात सांगितलेली आठवण आणि केलेली नक्कल आज ३५/३६ वर्षांनंतरही माझ्या चांगलीच लक्षात राहिली आहे.

१९३४ च्या दरम्यान धोंड चौथ्या वर्षाचे विद्यार्थी होते. त्या वर्षी त्यांना ' न्यूड क्लास 'ची संधी मिळणार होती. पण त्यापूर्वीही त्यांनी न्यूड क्लासमध्ये जायची परवानगी नसूनही न्यूड मॉडेल बघितलं होतं. धोंड सांगत होते, " वरच्या विद्यार्थ्यांसाठी न्यूड क्लास असायचा. आम्हांला अजिबात परवानगी नसे. पण उत्सुकताच अशी असे की, आम्ही मॉडेल म्हणून ज्या बाया कपडे घालून बघत होतो, रंगवीत होतो; त्या कपडे काढून दिसतात तरी कशा, हे बघावंसं वाटे. चुडेकर मास्तर आमच्या वर्गावर होते आणि पलीकडच्या वर्गात न्यूड मॉडेल बसलं होत. दरवाजा अर्धवट उघड ठेवून त्यावर पडदा सोडला होता, आमची नजर वारंवार त्या पडद्याकडे जात असे. कारण त्या पडद्याआडचं दृश्य बघायची उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. रीतसर परवानगी मिळणं शक्यच नव्हतं. तेव्हा काहीतरी यक्ती करून ते मॉडेल बघायचंच, असं मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं.


एवढ्यात चुडेकर मास्तर वर्गाबाहेर गेले आणि आमच्या डोक्यात एक कल्पना चमकली. लगोलग आम्ही दोघे त्या अर्धवट उघड्या दरवाज्याजवळ गेलो आणि पडदा बाजूला करून समोरच दृश्य डोळे भरून पाहू लागलो. पाठमोरे बसलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्यांच्या समोरचं इझल किंवा डॉकीवरचे बोर्ड, त्यावर असलेली न्यूड चित्रं, या सर्वांमधून आमचा डोळा कपडे काढून बसलेल्या 'जीजी'पर्यंत अर्जुनाच्या बाणासारखा पोचला. एका उंच टेबलावर ती एक पाय पुढे व एक पाय मागे घेऊन बसली होती. ती कंबरेतून थोडीशी वळली होती आणि तिचा एक हात एका मांडीवर तर दुसरा ती बसली होती त्या स्टुलाच्या कडेवर टेकला होता. कंबरेतून वळल्यामुळे तिची भरगच्च उभार पण किंचित ओघळलेली छाती, त्याखालचा ओटीपोटाचा आकार, त्यावरची बेंबी व बाकदार कंबर ... आम्ही पाहतच राहिलो ... एवढ्यात माझ्या डोक्यावर कुणीतरी टप्पल मारली आणि मला व माझ्यासोबत उभ्या असलेल्या मित्राला खस्सकन मागं खेचलं. कानावर शब्द आदळले. 'शरम नाही वाटत ? पुढच्या वर्षी मिळेलच की न्यूड मॉडेल, काय घाई झालीय ? आधी समोरची कपडे घातलेली नीट काढा' पगडी, कोट घातलेले चुडेकर मास्तर संतप्त मुद्रेनं आमच्याकडे पाहत होते. "


[ 'नग्नता' अंक हवा असल्यास 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर Chinha 3 हा मेसेज आपल्या नाव पत्यासह पाठवा आणि 'नग्नता' अंकावर ( रु. ७५० + टपाल खर्च रु. ५० = ८०० रुपये ) ५०० रुपयांची 'गायतोंडे' जनावृत्ती आणि चित्रकलाविषयक ५०० टिप्स असलेलं १०० रुपयांचं ' चित्रसूत्र ' पुस्तक भेट मिळवा. ]

सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

भोला पागला

अधिक वाचा

Feature 2

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

अधिक वाचा

Feature 3

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

अधिक वाचा

Feature 4

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

अधिक वाचा

Feature 5

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

अधिक वाचा
12345678910...