Enquire Now

Request A Quote

गायतोंडे : दि सायलेंट ऑब्झर्वर : डोळ्यांनी ऐकलेला मोझार्ट !


तरुण चित्रकार आणि गायक सुनील विनायक बोरगांवकर यांनी गेल्या आठवड्यात 'गायतोंडे' प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन पाहिल्यावर त्यांना काहीतरी लिहिल्याशिवाय, काहीतरी सांगितल्याशिवाय राहवेना. तेच त्यांनी शब्दांत व्यक्त केलं आहे. अगदी ते गातात तशाच सुंदर पद्धतीने. या प्रदर्शनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. 'गायतोंडे' यांच्या चाहत्यांनी उद्या वाट वाकडी करून म्युझियमकडे चक्कर टाकायलाच पाहिजे, याचीच आठवण करून देण्यासाठी हा लेख... 


माझ्या प्रिय मोझार्ट,
खूप खूप वर्षांपासून... 
आपण एकमेकांना सापडल्यापासून...
उपनिषदात सांगितल्याप्रमाणे, मी तुझ्या पायाशी बसून तू दाखवलेलं, स्वरबद्ध केलेलं दैवस्पर्शी संगीत डोळे मिटून ऐकत ऐकत ऐकत राहिलो आहे.
तू अडीचशे वर्षांपूर्वी बांधलेल्या शेकडो स्वराकृती, आजही मला मोहवतात, विस्मयात टाकतात, बांधून ठेवतात ! या स्वरसाक्षात्कारचं श्रवण - मनन - निदिध्यासन करायला प्रवृत्त करतात ! हे करताना, या संगीत रचना तू कशा काय केल्या असशील,  हे तू कसं केलंस, ते तुला कसं काय साधलं, असं वाटत राहतं.. नंतर असं वाटणं ही गळून पडतं. मी स्वतःला विसरून जातो ! मी तुझ्या रम्य स्वर-रचनांत विरघळून जातो.
डोळे मिटतो आणि ऐकत राहतो !

तुझं संगीत अगदी संपूर्ण आहे. त्या संगीत रचनांमध्ये काही बदल करणे अशक्य आहे. एकही स्वर इकडचा तिकडे करता येणं शक्य नाही. त्यातून काहीही काढता येणार नाही आणि त्यात काहीही घालता येणार नाही, त्यातला एकही स्वर काढला किंवा हलवला जरी, तर ते संपूर्ण स्वरशिल्प ढासळून जाईल, इतकं ते संपूर्ण आहे. परफेक्ट आहे !
तू ही तेच बारा स्वर वापरलेस, जे आम्ही सर्व जण वापरतो, फक्त त्या स्वरांना जोडणारा तू वापरलेला धागा मात्र दैवी स्पर्शाचा आहे. त्यामुळे तू आजही, अडीचशे वर्षांनंतरही नित्य-नवीन, ताजा टवटवीत, कालातीत, साक्षात्कारी आहेस.
          
वैश्विक सौंदर्यतत्वाचे नैसर्गिक नियम तुझ्या संगीतात स्वच्छपणे ऐकू येतात. चित्रमयता, भूमिती, गुणाकार भागाकार,भौतिक-रसायन-जीवशास्त्र, गुरुत्वाकर्षण, बेरीज वजाबाकी, वाऱ्यानं एका लयीत हलणाऱ्या झाडाच्या फांद्या... उमलणारी फुलं...गळून पडणारी पानं, नाचणाऱ्या चिमण्या,..नाट्यमयता...इत्यादी इत्यादी सगळं सगळं तुझ्या संगीतात ऐकू येतं ! निसर्गातली अदृश्य,अंतस्थ रिलेटीविटी... सूत्रबद्ध, नियमबद्ध हार्मनी तुझ्या संगीतातून अभिव्यक्त होत राहते, म्हणूनच तुझं संगीत अगदी निसर्गानंच बांधल्यासारखं ताजं टवटवीत, मोहक, सुंदर वाटतं. म्हणूनच कदाचित चित्रकार पॉल क्लीही तुझ्या प्रेमात होता. मी असं वाचलंय की पॉल क्ली तासन् तास तू संगीतबद्ध केलेले व्हायलिन सोनाटा वाजवत बसायचा आणि शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनही.पॉल क्लीच्या चित्ररचनेत मला नेहमीच तुझ्या स्वर रचनेतील नैसर्गिक तोल, ताल, प्रमाणबद्धतेचा, सूत्रबद्धतेचा आभास होतो.

तसंच काहीसं आजही झालंय.

आज तुझी तीव्रतेने आठवण येते आहे, कारण आज माझ्या आयुष्यात गायतोंडे सरांची दुर्मिळ चित्र बघायला मिळण्याचा दुर्मिळ योग आलाय. मी त्यांच्या कॅनव्हाससमोर उभा आहे आणि आणि त्यांच्या चित्रातून माझ्या डोळ्यांना, तू स्पष्ट ऐकू येतो आहेस. त्याच वैश्विक सौंदर्यसूत्राचं स्वच्छ स्पष्ट दर्शन होतंय !

रंग, गंध, स्पर्श, चव वगैरे वगैरेंच्या पलीकडच्या अदृश्य वैश्विक सौंदर्यतत्वाच्या स्पर्शाने सिद्ध, असा हा शुद्ध दृश्य अनुभव आहे ! 
गायतोंडे सरांचं चित्र बघताना, आधी "संपूर्ण चित्र" दिसतं...“साक्षात्कारी दर्शन" ! हे दर्शन इतकं गुंतवून टाकतं की आपण नकळत चित्राच्या जवळ, जवळ, अजून जवळ कधी गेलो, चित्रानंच हळूहळू जवळ कसं खेचून घेतलं, खिळवून ठेवलं, हे लक्षात येत नाही... अपरिमित शांतता… या साक्षात्कारी अनुभवानंतर भानावर आल्यावर साहजिकपणे मनात सुरु होणारी चल-बिचल ...त्यांनी हे कसं केलं असेल, त्यांना हे कसं साधलं असेल, हे सगळं कसं काय जमलं असेल, असं वाटत राहतं आणि पुन्हा ते वाटणंही गळून पडतं, मी त्या दैवी दृश्य अनुभवात दंग होऊन जातो. आज मी एकत्रपणे... बघतोय आणि ऐकतोयही.
डोळे उघडे ठेवायचे आणि फक्त बघत, ऐकत राहायच !
नव नवल नयनोत्सव !

आपण सगळेजण वापरतो तेच रंग त्यांनी वापरलेत, पण त्या रंगांना कसला तरी अज्ञाताचा स्पर्श झालाय ! प्रत्येक आकार मला बांधून ठेवतोय ! जवळ जाऊन बघितलं तर वेगळाच अनुभव, पुन्हा लांबून पाहिलं तर वेगळाच ! एकावर एक चढणारे रंगांचे तलम पदर, त्यातून दिसणारे मागचे पुढचे... पुढचे मागचे... त्यामागचे रंग… आधी कुठला लेअर केलाय... त्यावर दुसरा लेअर केलाय का... की दुसरा आधी आणि आधीचा नंतर केलाय... आकाराच्या कट आऊट वर रोलर ... नाही… रोलर आधी फिरवलाय की नंतर... नाही… रोलर नाहीच... आधी हे करून मग त्यावर ते केलंय... नाही… आधी ते करून घेतलंय… तसंही नाहीये… अरे हो, कॅनव्हासच फाईन ग्रेनचा वापरलाय… आणि हे इतकं तरल कसं काय वाटतंय?... तानपुऱ्यावर स्थिर शांत षडज् लावून अलगद तरंगत पडून राहावं, असं भासणारं उर्जामय, तरल, अंतस्थ शांत, ध्यानस्थ अवकाश ! काळ सतत पुढे सरकत असतो वगैरे भ्रम, आभास आता विरून गेलाय…! ...निशब्द, खोल, अतिप्राचीन… शाश्वत स्थिरतत्व ! व्हायोलिन्सना पियानो टेकओवर करतोय की क्लारनेटला व्हायोलिन्स... त्याला बासरीची नाजूक शुभ्र किनार…निसर्गाचं नक्षीकाम... व्हायोलिनवर वेगळी, स्वतंत्र धून वाजत आहे, त्याच क्षणाला क्लारनेट वरही स्वतंत्र धून वाजत आहे... दोघांचं एकमेकांशी सुसंवादी पण स्वतंत्र अस्तित्व… व्हायोलिनचा वेगळा लेअर..लालसर, क्लारनेटचा वेगळा लेअर..पिवळसर, आणि दोन्ही जेव्हा एकमेकांना ओवरलॅप करतात तेव्हा तिसराच प्रकाशमय केशरी पदर तयार होतो... आणि त्यावर पियानो आपला चौथा रंग घेऊन येतो... असा सगळा जादूमय मोहक खेळ… नाईफने काळपट, तरल अंधारमय ग्रे वर लावलेला अखंड शुभ्र पॅच…. विलोभनीय काॅर्डस् प्रोग्रेशन… अस्सल शुद्धतम हार्मनी…परस्परानुबंध... रिलेटीविटीचा सिध्दांत... नीट बघितलं तर मागून स्वच्छ तेजस्वी पिवळा आपलं अस्तित्व दाखवू लागतो आणि तो पिवळा दिसेपर्यंत त्याच्यावरचे पिठूर काळसर ठिपके...हा तर हिरवट आभासतोय... चित्र अगदी नेमक्या क्षणी कसं काय थांबवलंय... प्रत्येक इंचन् इंच, कोपरान् कोपरा उपभोगावा, प्रत्येक आकार साक्षात्कारी भासावा... इतकं ते संपूर्ण आहे... दिसणारा प्रत्येक आकार स्वतःचं वैयक्तिक दृश्य अस्तित्व संभाळून दुसऱ्या आकाराशी सुसंवाद साधतोय…! एकदम गुंतून जायला होतं... आणि नंतर लक्षात येतं की हे कसं केलंय, ते कसं काय जमलंय, वगैरे तांत्रिक प्रश्न आपल्या नकळत कधी गळून पडले, हे लक्षातही आलं नाही.. त्या चित्रानं मला पूर्णपणे कवेत घेतलंय ! उरतो तो फक्त निशब्द करणारा दैवी सौंदर्यतत्त्वाने भरलेला सूत्रबद्ध दृश्य अनुभव.. आणि केवळ दृश्य अनुभव ! 
गप्प होऊन बघत राहायचं...!
ते चित्रच आपल्याला गप्प करतं !

परिवर्तन हा निसर्गनियम असला तरी हे परिवर्तन ज्या स्थिर, शाश्वत पार्श्वभूमीवर होत राहतं, त्या शाश्वताचा एकदा स्पर्श झाला की मग थोडंसं जास्ती स्वच्छ दिसू लागतं, जास्ती स्वच्छ ऐकू येऊ लागतं. सेंन्सर थोडा जास्त सेन्सिटिव्ह होतो. आपल्या नकळत काही जास्तीचं रिसीव्ह होऊ लागतं. 

ओल्या वाळूत बोटाने निर्हेतुकपणे  मारलेल्या रेघोट्या, ही शुद्ध दृष्यभाषेच्या जाणिवेची सुरुवात असू शकते. 
नकळतपणे, निरर्थकपणे गुणगुणलेल्या सुरावटीची पुढे सुंदर सिंफनी होऊ शकते. 
कारागिरीची 'कला' होते 
आणि त्या शाश्वताच्या स्पर्शाने, कलेची 'विद्या' होते ! 
…आणि "सा विद्या या विमुक्तये" प्रमाणे या विद्येनं गायतोंडे सरांना सगळ्यापासून,संपूर्णपणे मुक्त करून टाकलंय, हे जाणवतं !  
संस्कारक्षम असलेल्या, संस्कारात बांधल्या गेलेल्या मनाला, कुंपणापलीकडचं, यापूर्वी कधीही न पाहिलेलं, न अनुभवलेलं काहीतरी दिसलं, जाणवलं, पलीकडची मोकळी स्वच्छ हवा लागली की कसं एकदम ताजं, मोकळं झाल्यासारखं वाटतं. 

गायतोंडे सरांनी स्वतःलाच शांततेच्या रंगात विरघळवून घेतलंय आणि तोच रंग चित्रात वापरलाय !
ही चित्रे गायतोंडे सरांच्या सहवासाची साक्षीदार आहेत. कोऱ्या कॅनव्हास पासून, त्यांच्या पहिल्या स्पर्शापासून, ते चित्र पूर्ण होईपर्यंतचा, क्षणाक्षणाचा, संपूर्ण प्रवास या चित्रांनी अनुभवलाय. या प्रक्रियेत गायतोंडे सरांनी तासंतास- महिनोन् महिने या चित्रांकडे पाहिलं आहे, त्याचप्रमाणे, तितकाच वेळ या चित्रांनीही गायतोंडे सरांना पाहिलंय, त्यांना अनुभवलंय. एकदम काटा आला अंगावर...

ही चित्रेही गायतोंडे सरांप्रमाणेच तटस्थपणे, अलिप्तपणे शाश्वत सौंदर्यतत्वाविषयी मौनपणे वक्तव्य करत राहतात. उथळपणाचा खळखळाट पाहून ऐकून किटलेल्या डोळ्यांना शांत, स्वच्छ, अतिशय खोल, तृप्त, तरल, आतून समृद्ध करणारा साक्षात्कारी अनुभव देत राहतात !
अल्बर्ट आईन्स्टाईन मोझार्टबद्दल म्हणतो की "बहुतेक संगीतकार फक्त सुरांचं जोडकाम करतात, पण मोझार्टचं संगीत इतकं शुद्धतम आहे की ते निसर्गात आधीपासूनच अव्यक्त अवस्थेत अस्तित्वात होतं आणि ते अव्यक्त संगीत अभिव्यक्त होण्यासाठी मोझार्टला शोधत होतं, मोझार्ट मधून अभिव्यक्त होण्यासाठी वाट बघत होतं."
याप्रमाणेच निसर्गातल्या अमूर्त, अव्यक्त वैश्विक सौंदर्यतत्त्वानं, मूर्त स्वरूपात अभिव्यक्त होण्यासाठी गायतोंडे सरांना शोधून काढलंय, असं मला वाटतं !

माझ्या लिखाणात एकसंधता नाही याची मला कल्पना आहे. 
पण निशब्द करणारा अनुभव शब्दात कसा उतरवायचा असतो, हे मला नाही समजलंय.. आणि समजायला ही नकोय !  
चित्रातला 'हा आकार बघून मला याची आठवण झाली' आणि 'तो आकार बघून मला त्याची आठवण झाली', अशाप्रकारे मला चित्र नाही बघता येत ! 
पावसाचा शिडकावा, मोगर्‍याचा सुगंध, मोझार्टचं संगीत, गायतोंडे सरांचं चित्र, हे शब्दात कसं उतरवायचं ?
त्यापेक्षा ज्याचे त्यानं आपापले डोळे घेऊन गायतोंडे सरांचं चित्र बघावं, आपापले कान देऊन ऐकावं. जेवढं आतमध्ये स्पर्श करेल… जेवढं पदरात पडेल ते आपलं !
समजलं तर ठीक... नाही तर सोडून द्या्वं. आपल्या आवडत्या उशीत डोकं खुपसून मस्त पडून राहावं !
कुणाला कळलंय आणि कुणाला नाही कळलंय, हे कोण, कसं ठरवणार?  हे ठरवायच्या बिरवायच्या भानगडीत पडू नये !

जेवढ डोळ्यांना दिसलय, जेवढं कानाला ऐकू आलंय, तेवढंच ज्याचं त्याला कळलेलं असतं !

या गायतोंडे सरांच्या चित्र प्रदर्शनातून, माझ्या डोळ्यांना 
जेवढं  दिसलं आणि कानांना जेवढं  ऐकू आलं, तेवढं माझ्या माझ्या वाट्याचं मी भरभरून घेऊन आलो.

नतमस्तक आणि धन्यवाद !

( छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, मुंबई, येथील Gaitonde - The Silent Observer. या प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. )

सुनील विनायक बोरगांवकर

Top Features

 

Feature 1

भोला पागला

अधिक वाचा

Feature 2

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

अधिक वाचा

Feature 3

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

अधिक वाचा

Feature 4

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

अधिक वाचा

Feature 5

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

अधिक वाचा
12345678910...