Enquire Now

Request A Quote

नग्नता अंकाची गोष्ट...


न्यूड क्लासच्या शताब्दी वर्षानिमित्तानं एक विशेष लेखमाला आम्ही प्रसारित करीत आहोत. निर्मिती कथा 'नग्नता : चित्रातली आणि मनातली' अंकाची. खरं तर अशी लेखमाला लिहायचं अनेक दिवसांपासून मनात होतं, कारण 'नग्नता' अंकाची कल्पना सुचण्यापासून तो अंक प्रसिद्ध होईपर्यंत आणि नंतरही बऱ्याच घटना घडल्या होत्या, ज्या कुणालाही सटपटवून टाकतील अशाच होत्या. त्या सगळ्यांची जर नोंद झाली तर ते एक छान डॉक्यूमेंटेंशन होईल असं मला राहून राहून वाटत होतं. म्हणूनच मोठ्या उत्साहाच्या भरात मी लिखाणाला सुरवात केली. पण नंतर चार-सहा भागातच माझा उत्साह मावळला. त्याचं खरं कारण इतर 'व्यवधानं' हेच होतं अन्य दुसरे काही नाही. आणि नंतर तर मग लिहायचे सारे राहूनच गेले. आता मात्र कुणीतरी त्यावर पुस्तक काढू इच्छित आहे म्हणूनच न्यूड क्लासच्या शताब्दी वर्षाचं निमित्त साधून ही लेखमाला पूर्ण करायचं ठरवतोय. ही काही मी रोज लिहीन असंही काही नाही. मला वाटेल तसं आणि वाटेल तेव्हा मी लिहिणार आहे. आणि तुम्हाला वाचायला आवडलं तर तुम्ही ते वाचणार आहात. अन्यथा कि-बोर्डही तुमचाच आहे आणि माऊस ही तुमचाच.


'चिन्ह'च्याच इतिहासात नव्हे तर मराठी साहित्य विश्वातच या अंकाची निर्मिती अजोड अशी ठरली. कारण असा अंक प्रसिद्ध करण्याचं धाडस तोपर्यंत तरी मराठीत कुणी केलं नव्हतं. मराठीविषयी मी इतकं छातीठोकपणे सांगू शकतो कारण उमलत्या वयात मी मराठी साहित्याचं भरभरून केलेलं वाचन. पण अन्य भाषांविषयी पुरेशी माहिती मजजवळ नसल्याने मी तसे विधान करू इच्छित नाही. पण असा प्रयत्न कुणी अन्य भाषांत केला असल्याचे माझ्या ऐकिवात आलेले नाही.


अशा स्वरूपाचा अंक प्रसिद्ध करावयाची कल्पना बहुधा मी जेजेत शिकत असतानाच मला सुचली होती. ती देखील न्यूड क्लासचा पहिल्या दिवशीचा अनुभव घेतल्या नंतरच. तेव्हा तर मी एक किरकोळ विद्यार्थी होतो. पण वाचन मात्र अगदी अद्यावत होतं, त्यावरून प्रा.संभाजी कदम आणि माझी कॉलेजच्या पहिल्याच दिवशी काहीशी चकमक देखील उडाली होती. मी न्यूड क्लास मध्ये प्रवेश केला त्याच वर्षी सत्यकथेत उर्मिला सिरूर यांची 'न्यूड' ही कथा प्रसिद्ध झाली होती. न्यूड क्लास मध्ये प्रवेश करण्याआधीच मी ती वाचली देखील होती. साहजिकच उर्मिला सिरूर यांच्या कथेची इम्प्रेशन्स मनात वागवतच मी न्यूड क्लास मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळेच की कुणास ठाऊक 'न्यूड' या विषयाकडे पाहण्याचं माझं परिमाणच बदलून गेलं होतं.


'नग्नता' अंकाचं संपादकीय लिहिताना न्यूड क्लासच्या पहिल्या दिवसाचा अनुभव मात्र मी जसाच्या तसा शब्दांकीत केला होता. हे लिहित असताना देखील न्यूड क्लास भोवतालच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांची कावकाव मला आजही जशीच्या तशी आठवते आहे. कल्पना करा अगदी पिन ड्रॉप सायलेन्स, ऐन विशीतली मुलं-मुलीं एकमेकांच्या नजरेत नजर देखील न मिळवता पेन्सिल किंवा चारकोलनं कागदावर काहीतरी रेखाटण्याचा प्रयत्न करतायेत. चारकोल आणि पेन्सिल कागदावर घासल्याने होणारा आवाज आणि त्यातच त्या कावळ्यांच्या असह्य कावकावीचा आवाज मिसळला जात असेल तर ते कसं वाटत असेल ? इतक्या वर्षांनी आजही ते क्षण मला जसेच्या तसे आठवतात. मी काही लेखक नव्हे, मी मूळचा चित्रकार. माझं थोडंफार कर्तृत्व असलं तर ते संपादनाच्या क्षेत्रातलं. पण तरीदेखील मला नग्नता अंकाचं संपादकीय आजही आवडतं. तुम्ही जर ते वाचलं नसेल सोबत शेअर करतोय जरूर वाचा.[' नग्नता ' अंकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या शिल्लक प्रती ( मूल्य रुपये ७५०+ टपाल खर्च ५० = रुपये ८०० ) आता वितरणासाठी उपलब्ध आहेत. नग्नता अंक घेतल्यास त्यावर 'चिन्ह'चाच ५०० रुपयांचा 'गायतोंडे' ग्रंथ भेट मिळतो. आपल्या संग्रहात ही दोन्ही प्रकाशनं हवी असतील तर 90040 34903 या व्हाट्सअप नंबरवर Chinha 2 हा मेसेज पाठवून घरपोच मागवा. या अंकाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी नग्नता च्या फेसबुक पेजला भेट द्या. https://www.facebook.com/Nagnataa-Chitratali-ani-Manatli-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-138544429595101/ ]

सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

भोला पागला

अधिक वाचा

Feature 2

चित्रकारांच्या ग्रुपवर अमीर खॉ साहेब ...

अधिक वाचा

Feature 3

मे मध्ये जेजे जगी जगले... प्रसिद्ध होणार !

अधिक वाचा

Feature 4

एअर इंडियाचा कलासंग्रह कुठं गेला ?

अधिक वाचा

Feature 5

ग्रंथाचं काम मार्गी लागलं..

अधिक वाचा
12345678910...