Enquire Now

Request A Quote

अखेर अंत्ययात्रेत सहभागी होता आलं नाहीच !

आधीचं बांद्रा स्कूल ऑफ आर्ट आणि नंतरचं रहेजा स्कूल ऑफ आर्टमधील एक विद्यार्थी प्रिय कलाशिक्षक म्हणजे दामोदर पुजारे सर. ते निव्वळ पोटार्थी कलाशिक्षक नव्हते तर पट्टीचे चित्रकारदेखील होते. मुद्राचित्रणाच्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठं काम केलं होतं. अनेक विद्यार्थी घडवले होते. आज मुद्राचित्रणकलेला चांगली मान्यता मिळत चालली आहे यामागे पुजारे सरांसारख्या कलावंतांचा देखील वाटा आहे. नुकतंच त्यांचं निधन झालं. पण ठाण्यातल्या भयानक ट्रॅफिक प्रॉब्लेममुळे अनेकांना जागोजागी अडकून पडावं लागल्यामुळे सहभागी होता आलं नाही. त्याच अनुभवाला दिलेलं हे शब्दरूप. 


काल सकाळी पोस्टात गेलो होतो. मुख्य पोस्ट ऑफिस आमच्या घरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. अर्ध्यावर पोहचतो न पोहचतो तोच शिरीष मिठबावकर यांचा फोन आला. 'पुजारे सर गेले' म्हणून सांगणारा, म्हणाले दुपारी तीन वाजता नेणार आहेत तू थेट घरीच ये. मी बरं म्हटलं आणि फोन ठेवला. खरं तर पुजारे सर मला कधीच शिकवायला नव्हते. कारण मी जेजेत शिकलो आणि ते रहेजात शिकवत होते. पण त्यांचे मित्र म्हणजेच सुधाकर लवाटे हे माझे जेजेतले शिक्षक. त्यांचं माझं छान जमायचं. साहजिकच पुजारे सर जेजेत आले की मग छान  बोलणं चालणं व्हायचं. 

पुढं मी संस्थात्मक कामात गुंतल्यामुळे सायंकाळी जहांगीरच्या खेपा वाढू लागल्या. अधनं मधनं पुजारे सर भेटू लागले. आणि मग कालांतराने लवाटे सरांमुळे ते मला त्यांच्यातलाच  मानू लागले. अधनं मधनं नियमित भेटीगाठी, फोनवर बोलणं हे चालूच असायचं. मग नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले आणि त्या भेटीही खूपच कमी झाल्या. तेदेखील ठाण्यातच राहायचे पण ठाण्यात मात्र त्यांच्या भेटी क्वचितच झाल्या. 

त्यांची शेवटची भेट झाली ती लवाटे सरांच्या अंत्ययात्रेत. त्यालाही आता बरीच वर्षे झाली. काल अचानक मिठबावकरांचा फोन आला अन हे सारं काही आठवले. रिक्षात असतानाच मिठबावकरांचा पुन्हा फोन आला आणि म्हणाले, डॉक्टरांनी सांगितलंय दुपारपर्यंत बॉडी ठेवू नका. त्यामुळे त्यांना सकाळी साडे दहालाच नेणार आहेत असं सांगितलं. घड्याळात पाहिले तर साडेनऊ वाजले होते, हातातलं सामान घेऊन अंत्ययात्रेत सहभागी होणं बरं दिसलं नसतं म्हणून मिबावकरांना म्हटलं मी पोस्टातलं काम आवरतो, घरी जाऊन सामान देतो आणि लगेच थेट स्मशानातच येतो. यावर मिठबावकर बरं म्हणाले. 

सकाळी लवकर गेल्यामुळे पोस्टात अजिबात गर्दी नव्हती. रांग लावावी लागली नाही. पटकन काम आवरलं आजूबाजूच्या दुकानातून हवी ती खरेदी केली आणि दहाच मिनिटांत पुन्हा घरी येण्यासाठी रिक्षात बसलो. स्टेशन ते घर हे अंतर कापायला आधारण वीस मिनिटे लागतात. गर्दीच्या वेळात उलटा प्रवास लगेचच होईल आणि मी पुन्हा त्याच रिक्षात बसून दादोजी कोंडदेव स्टेडियम नजीकच्या स्मशानात येईन असं मला वाटलं होतं. जवळजवळ पाऊण अंतर पार केलं देखील. पण टोल नाक्याला आलो आणि हबकलोच. जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर तोबा गर्दी होती. भयंकर  ट्रॅफिक  जाम ! स्कूटर आणि मोटर सायकलवाल्यांनी पादचाऱ्यासाठी चालायला देखील  रस्ता शिल्लक ठेवला नव्हता. त्यातच अँब्युलन्सचा सायरन जोरजोरात वाजत होता. प्रचंड कोलाहल. ते सारं पाहिलं आणि माझं अवसानच गळून गेलं. 

खूप वाट पाहून रिक्षा तिथेच सोडली आणि वजनदार सामान खांद्यावर टाकून सुमारे पंधरा मिनिटे चालत चालत घरी आलो. घरात शिरताच पहिला मिठबावकर यांना फोन केला. मिठबावकर म्हणाले आता तर मुळीच येऊ नको कारण अंत्यविधी सुरु झाले आहेत . म्हणाले वाईट वाटून घेऊ नकोस पण खूपच कमी लोक इथं आहेत. सगळेजणं कुठेना कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकून पडले आहे. त्यांचे बहुतेक नातेवाईक देखील  ट्रॅफिक मध्ये अडकून पडलेत. चित्रकला क्षेत्रातील कोणाचंही निधन झालं तर मी आवर्जून अंत्ययात्रेला जातो पण काल  मात्र ट्रॅफिकने माझ्या प्रयत्नांवर अक्षरशः पाणी फिरवलं. मुंबई ठाण्यासारख्या महानगरातली सतत भसाभस वाढत चाललेली लोकवस्ती पाहिली आणि हे असं  ट्रॅफिक मध्ये अडकून पडायला झालं की भयंकर अगतिक वाटायला लागतं. याच्यावर आणखीन काय काय लिहायचं? आपली वाटचाल विनाशाकडे चालली आहे. दुसरं काय ?
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...