Enquire Now

Request A Quote

आर्ट बीटस् फाऊंडेशनची जाणीव


पुण्याच्या संतोष पांचाळ यांनी कलाक्षेत्रात प्रवेश करताना आपल्याला जो त्रास झाला तो नवीन येणाऱ्या कलावंतांना होऊ नये या हेतूने आर्ट बीटस् फाऊंडेशन स्थापन केलं. फाउंडेशन तर्फे आयोजित केलं जाणारं 'जाणीव प्रदर्शन' हे तर आता तरुण कलावंतांमध्ये चांगलंच रुजलंय. या फाऊंडेशनच्या कार्याची माहिती करून देत आहेत संतोष पांचाळ. 


या क्षेत्रात उभं राहतांना आपल्याला जो त्रास सहन करावा लागला, जे स्ट्रगल करावं लागलं ते नव्या पिढीला करावं लागू नये यासाठी स्वतः पुढाकार घेऊन असं काहीतरी सुरु करावं, जेणे करून नवीन मुलांना संधी मिळेल. ही जाणीव म्हणजेच 'आर्ट 
बीटस् फाऊंडेशन ' मार्फत सुरु केला गेलेला 'जाणीव आर्ट शो ' संतोष पांचाळ यांनी आपल्या 'आर्ट  बीटस् फाऊंडेशन 'च्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी 'जाणीव आर्ट शो' ची सुरवात केली. 
 
'आर्ट  बीटस् फाऊंडेशन' आणि  'जाणीव आर्ट शो' बद्दल सांगताना संतोष पांचाळ म्हणतात,

'दहा वर्षांपूर्वी विविध कलांमधील नव्या जुन्या कलाकारांना एकत्र आणण्याच्या हेतूनं या फाऊंडेशनची सुरवात केली. फक्त चित्रकला नाही तर संगीत, नृत्य या सगळ्याच कलांमधील कलाकार त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आर्ट 
बीटस् या अंकाची सुरवात केली. या नंतर काय करावं हा विचार करत असतांनाच नव्या कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी काहीतरी करावं या हेतूनं  'जाणीव आर्ट शो ' करण्याची कल्पना सुचली. ज्यात देशभरातील  कलाकार आपली कला लोकांसमोर आणू शकतील.  '

जाणीव चा विचार केल्यापासून प्रत्यक्षात उतरवेपर्यंत किती काळ गेला?
'साधारण वर्षभर. सुरवातीला काही लोकांना बरोबर घेऊन हा शो आयोजित करण्याचा विचार होता. पण ते काही जुळून येईना मग ठरवलं आपणच आपल्या मनातली कल्पना प्रत्यक्षात उतरवावी. आणि केली सुरवात. '

कसा प्रतिसाद मिळू लागला? 
'लोकांपर्यंत पोहोचायला जो वेळ लागला तितकाच. गेल्या वर्षी तर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. २०० कलाकार आपलं काम घेऊन आले होते आणि शो नऊ दिवस होता. यंदा आर्ट गॅलरी ३ दिवसासाठीच मिळाली असल्याने शो फक्त तीनच दिवस असेल. पण कलाकारांचा प्रतिसाद उत्तम आहे. १५० कलाकारांनी सहभाग घेतला आहे.  ' 

काय स्वरूप असतं या शोचं ?
'सिनियर, ज्युनियर आणि स्टुडंट हे तीन विभाग असतात. यासाठी कलाकार आपापली कामं पाठवतात. त्यातली एक किंवा दोन पेंटिंग्ज शोसाठी निवडली जातात. सहभागी होण्यासाठी ३००/-₹ प्रवेश शुल्क असतं, ज्यातून संस्थेचा शोसाठी जो खर्च असतो तो निघतो. जी पेंटिग्ज विकली जातील त्यातले ५०%  कलाकारांना मिळतात तर ५०% नाम या संस्थेला दिले जातात. विक्री हाच या शो चा प्रमुख उद्देश आहे. याबद्दल सांगताना ते पुढे म्हणतात, 
' मी बार्शी तालुक्यातल्या दहिटणे सारख्या छोट्याशा गावातून आलोय. ज्यावेळी मी पुण्यात आलो तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. अगदी इथे आर्ट गॅलरी कुठे आहेत ते ही नव्हतं माहीत. कोणाचाही पाठिंबा नव्हता. आपल्यासारख्या मुलांना मदतीचा हात मिळावा या जाणिवेतूनच या फाऊंडेशनची सुरवात झाली.'

तुम्ही कलाक्षेत्राकडे कसे वळलात?
'लहानपणापासून मला या क्षेत्राची आवड होती.  आमचे वडील कृष्णाथ पांचाळ गायक आहेत. ते नाटककात काम करत. ते कलाकार असल्याने  त्यांना जेव्हा माझा चित्रकलेकडे असणारा कल लक्षात आला तेव्हा त्यांनी पाठिंबाच दिला. आमच्या गावात तर असं शिक्षण मिळणं शक्य नव्हतं मग मी लातूरहुन G.D.आर्ट केलं. अजून शिक्षण सुरूच आहे. M.A.ला ऍडमिशन घेतली आहे' 

पुण्यात कसे आलात?
'कामाच्या शोधासाठी. १९९९साली पुण्यात आलो. खूप स्ट्रगल केलं. स्वारगेटला उतरलो तेव्हा कोणत्या दिशेला जायचं हेही माहीत नव्हतं. एक मित्र होता इथे इतकाच काय तो आधार. घरातून आर्थिक मदत मिळणार नव्हतीच. आईचा विरोध पत्करून इथे आलो होतो.  '

'आर्ट बीटस् फाऊंडेशन' ची  जाणीव   
 ' आईला वाटत होतं मी शेतीत काम करावं. पण शेतीत कितीही कष्ट केले तरी हाती फार काही लागतच नव्हतं. आमची शेतीही काही फार नव्हती. शेतीत काम करायला टंगळमंगळ करतो म्हणून आईने एकदा खूप मारलं. तेव्हा चिडून घरातून बाहेर पडलो. वडिलांचा पाठिंबा असला तरी त्यांच्याकडूनही आर्थिक मदत मिळणं शक्य नव्हतं. मग चाचपडत स्वतःच स्वतःचा मार्ग शोधला. वडिलांकडून गाणं घेऊन आलो होतं. मग इथे येऊन विशारद झालो.  कला शिक्षक आणि संगीत शिक्षक म्हणून नोकरी करू लागलो. हळू हळू सेट्ल होऊ लागलो. एक भाऊ  आहे. तो संगीत क्षेत्रात काम करतो. आमची रिदम म्युझिक नावाची म्युझिक अकॅडमी आहे. तिथे ही मी तबला शिकवतो. '

तुमचं यश बघून आईची प्रतिक्रिया काय होती?
'आता तर आई नाही. पण आम्ही सेट्ल झालेलं तिनं बघितलंय. तिलाही खूप समाधान वाटलं. आमच्या कोरडवाहू शेतीत कितीही कष्ट केले तरी उत्तम उत्पन्न मिळणं कठीण होतं हे ही तिला पटलं. '

आज वीस वर्षांनी तुम्ही कुठे आहात असं वाटतं?
'जे काम करतोय त्यात मी समाधानी आहे. माझ्यामुळे चार नवीन मुलांना संधी मिळतेय ही भावनाच खूप समाधान देणारी आहे.'


['चिन्ह ' च्या 'गायतोंडे ' ग्रंथविषयी आता सतत विचारणा होऊ लागली आहे , होय ! ' गायतोंडे ' ग्रंथाच्या डिलक्स आवृत्तीच्या प्रती अद्यापही विक्रीसाठी उपलब्ध आहेत . या निमित्ताने रु ३००० च्या या ग्रंथाच्या प्रती आम्ही विशेष सवलतीत म्हणजे रु २२५० मध्ये उपलब्ध करून देत आहोत . इच्छुकांना ९००४० ३४९०३ या आमच्या व्हाट्सअप नंबरवर GAI - D हा मेसेज आपल्या नावपत्यासह पाठवून आपली प्रत घरपोच मागवता येईल . ५०० रु किंमतीची जनआवृत्ती देखील ४०० रु इतक्या सवलतीत घरपोच मिळू शकेल. पण त्यासाठी मेसेज पाठवताना GAI - Jan असा उल्लेख करणं आवश्यक आहे . ( जन आवृत्तीच्या प्रती पुण्याच्या अक्षरधारांमध्ये देखील मिळू शकतील ) गायतोंडे ग्रंथाच्या प्रती सवलतीत मिळवण्याची ही बहुदा अखेरचीच संधी ठरावी.]    
मनीषा सोमण

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...