Enquire Now

Request A Quote

गायतोंडे प्रदर्शन : मी पाहिलं, तुमचं काय ? भाग १


२ ऑगस्ट रोजी सुरु झालेलं गायतोंडे प्रदर्शनं मुंबईत सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेकांना पाहता आलं नाही. 'चिन्ह'चे संपादक त्यापैकीच एक. परवा शनिवारी मात्र मुंबई ठाण्यात पाऊस नव्हता ती संधी साधून त्यांनी म्युझिअमकडे धाव घेतली. आणि ते प्रदर्शन पाहिलं सुद्धा. ही त्यांची पहिलीच खेप होती. २५ डिसेम्बर पर्यंत अशा त्यांच्या अनेक खेपा होणार आहेत. आणि त्याविषयी ते लिहिणार देखील आहे. त्यातला हा पहिला लेखांक. 


अखेर म्युझिअम मधलं गायतोंडे प्रदर्शन बघायचा योग आलाच. परवाच्या शनिवारी पाऊस नसल्यामुळे प्रदर्शन पाहायला जायचे ठरवले आणि ते पाहिलेसुद्धा. माझे कलासंग्राहक मित्र दीपक गुप्ता माझ्यासोबत होते. आणि प्रदर्शन पाहत असतानाच चित्रकार मनोहर म्हात्रे यांचा फोन आला. ते म्हणाले मीसुध्दा येतो प्रदर्शन पाहायला. पण ते येताना नेमके ट्राफिकमधे सापडले. बिचारे कसेबसे पाच साडेपाच वाजता म्युझिअममध्ये पोहोचले. दीपक गुप्तांसोबत मी म्युझियममध्ये पोहचलो ती वेळ साडेतीनची होती. साडेतीन ते सहा एवढा वेळ मी चक्क म्युझिअममध्ये होतो. गायतोंडे यांची चित्रं पाहिल्यानंतर म्हात्रे येईपर्यंत बराच वेळ होता. तो वेळ मी म्युझियमच्या नितांत सुंदर परिसरात घालवला. आपण मुंबईत कारण नसताना धावाधाव करत असतो,असं शांतपणे बसणं कधी होतच नाही. मलादेखील ते खूप दिवसानं  अनुभवता आलं. नाही म्हटल तरी खूप काही घडलं कालच्या दिवसात. पण मी ते इतक्यात उघड करू इच्छित नाही. फेसबुकवर मोकळेपणानं लिहिलं की काय काय घडतं या साऱ्या भयंकर अनुभुवातून मी अलीकडेच गेलो आहे. त्यामुळे तूर्ततरी मी मौन बाळगणंच पसंद करतो. 

जंहागीर निकोल्सन फाऊंडेशन, पंडोल्स फॅमिली कलेक्शन आणि टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर यांच्या संग्रहातील गायतोंडे चित्रे एकत्र येणार असल्यामुळे या प्रदर्शनाविषयीच्या अपेक्षा निश्चितपणानं वाढल्या होत्या. पण त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अगदी उदारणार्थ सांगायचं झालं तर TIFR च्या कलेक्शन मधलं गायतोंडे यांचं १९७२ सालचं पेंटिंग हे माझं सर्वाधिक आवडतं. पण ते पेंटिंग या प्रदर्शनात नव्हतं. तेच नाही तर TIFR  संग्रहातली अन्य काही पेंटिग्सदेखील या प्रदर्शनात नव्हती. का कुणास ठाऊक? खरं तर त्या पेंटिंग्समुळे प्रदर्शनाने आणखी मोठी उंची निश्चितपणाने गाठली असती असं माझ स्पष्ट मत झालं. 

किंवा झालंच तर  दादीबा पंडोल यांच्या संग्रहातलं केवळ चारकोलच्या साहाय्यानं गायतोंडे यांनी केलेलं  दादीबांचं  अफलातून स्केच या प्रदर्शनात दिसलं नाही. दादीबांच्या संग्रहातली अन्य अनेक रेखाटनं होती पण ते मात्र नव्हतं. मी ते अद्याप पाहिलेलं नाही पण त्याविषयी मी खूप ऐकून होतो. उदाहरणार्थ चारकोलचं फक्त टोक कागदावर टेकवून गायतोंडे यांनी दादीबांचे काढलेले डोळे वगैरे.. या साऱ्या प्रकाराने मन किंचित खटटू झालंच. मुंबईत गायतोंडे यांची असंख्य चित्रं आहेत. ती या प्रदर्शनासाठी का मागवली नाही हे उमगत नाही. मला कल्पना आहे की आपल्या संग्रहात गायतोंडे यांचं पेंटिंग आहे हे कोणीच संग्राहक आता उघड करू इच्छित नाही, कारण ते केलं म्हणजे येणारे अनुभव काही फारसे चांगले नसतात. किमानपक्षी हाकेच्या अंतरावर असलेल्या जेजे स्कूल ऑफ आर्टच्या संग्रहातली चित्रं जरी मागवली गेली असती तरी प्रदर्शनाने खूप मोठी उंची गाठली असती यात शंकाच नाही

जेजे स्कुल ऑफ आर्टच्या  संग्रहातील गायतोंडे यांच्या चिंत्रामुळे त्यांचा प्रारंभापासूनच प्रवास आणि त्यांचा नंतर झालेला विस्तार निश्चितच कलारसिकांना पहायला मिळाला असता. पण या तीनच संग्रहातील चित्रं प्रदर्शित करण्याच्या आयोजकांच्या अट्टाहासामुळे संपूर्ण प्रदर्शन कलारसिकांच्या मनाची पकड घेऊ शकत नाही हे स्पष्ट जाणवत आहे. अर्थात गायतोंडे प्रेमामुळे भारावून गेलेले कलावंत व कलारसिक त्याविषयी उघडउघडपणे फारशी तक्रार करू इच्छित नाही. पण काल मात्र चित्रकार,लेखक,चित्रपट दिग्दर्शक रघुवीर कुल यांचा अचानक दुपारी फोन आला. थोडेसे कावलेले दिसत होते, मला विचारत होते 'तुझा या प्रदर्शन आयोजनात सहभाग किती?' म्हटलं काहीच नाही .. तुम्ही आज पाहताय तसंच ते मी काल बघितलं इतकंच. अर्थात गायतोंडे यांचा झेंडा हातात घेतल्यामुळे मी या सदर प्रदर्शनाचा माझ्या लिखाणातून प्रसार करतोय हे मात्र निश्चित . 

यावर ते काही बोलले नाही पण त्यांच्या बोलण्याचा सूर असा होता की, हे काही गायतोंडे यांचं ते परिपूर्ण प्रदर्शन नव्हे ( आणि ते एका अर्थानं खरंच आहे) पण नीटसं नेटवर्क नसल्यानं त्यांचा फोन तुटला. मी ही एका मीटिंगमध्ये बिझी असल्यामुळं त्यांना पुन्हा काही फोन करू शकलो नाही किंवा त्यांचा ही नंतर फोन आला नाही. पण रघुवीर कुल यांचा मुद्दा रास्त होता यात शंकाच नाही. पण असं असलं तरी गायतोंडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन प्रत्येक कलारसिकानं आवर्जून पाहायलाच हवं असं मात्र माझं ठाम मत आहे. मी ते परवा पाहिलं, तुम्ही कधी जाणार आहेत?. 


['चिन्ह ' च्या 'गायतोंडे ' ग्रंथविषयी आता सतत विचारणा होऊ लागली आहे , होय ! ' गायतोंडे ' ग्रंथाच्या डिलक्स आवृत्तीच्या प्रती अद्यापही विक्रीसाठी उपलब्ध आहेत . या निमित्ताने रु ३००० च्या या ग्रंथाच्या प्रती आम्ही विशेष सवलतीत म्हणजे रु २२५० मध्ये उपलब्ध करून देत आहोत . इच्छुकांना ९००४० ३४९०३ या आमच्या व्हाट्सअप नंबरवर GAI - D हा मेसेज आपल्या नावपत्यासह पाठवून आपली प्रत घरपोच मागवता येईल . ५०० रु किंमतीची जनआवृत्ती देखील ४०० रु इतक्या सवलतीत घरपोच मिळू शकेल. पण त्यासाठी मेसेज पाठवताना GAI - Jan असा उल्लेख करणं आवश्यक आहे . ( जन आवृत्तीच्या प्रती पुण्याच्या अक्षरधारांमध्ये देखील मिळू शकतील ) गायतोंडे ग्रंथाच्या प्रती सवलतीत मिळवण्याची ही बहुदा अखेरचीच संधी ठरावी.]
  
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...