Enquire Now

Request A Quote

गायतोंडे आणि मी : अर्थात कॅ ब्र करावं?


१९७४- ७५  सालापासून म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतल्या दिवसापासूनच  मी जेजेच्या भिंतीवर टांगलेलं गायतोंडे यांचं एक चित्र पाहून, त्यांच्या प्रभावाखाली आलो. त्यातूनच मग गायतोंडे यांच्या निधनानंतर आधी गायतोंडे यांच्यावरच्या पुरवणीची आणि नंतर तर 'गायतोंडे' ग्रंथाची निर्मिती झाली. या निमित्तानं गायतोंडे यांच्या संदर्भात मला खूप काही लिहिता आलं. मुंबईत भरलेल्या 'गायतोंडे ' प्रदर्शनानिमित्तानं या ४४ - ४५ वर्षाच्या प्रवासाच्या  साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. गायतोंडे यांच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाचा असाच आणखी एक पदर उलगडण्याचा हा एक प्रयत्न आणि त्या निमित्तानं पडलेला प्रश्न . 


गायतोंडे याना मिडियाविषयी फारसं ममत्व कधीच  नव्हतं. किंबहुना पत्रकार, संपादकांशी संपर्क वाढवून आपल्याविषयी काही छापून वगैरे यावे असं त्यांना कधीच वाटलं नाही. कुणी  पत्रकार किंवा कलासमीक्षक काही प्रश्न वगैरे विचारू लागला म्हणजे ते अत्यंत अस्वस्थ होत आणि तिथून ते एक तर काढता पाय तरी घेत किंवा त्या प्रश्नकर्त्याला तुसडेपणाने उत्तरं देत तिथनं हुसकावून तरी लावत. त्यांचा अड्डा होता तो म्हणजे आर्टिस्ट सेंटर. त्या काळातले जवळजवळ सर्वच बंडखोर आर्टिस्ट तिथं नेमानं एकत्र येत. चहा घेत  गप्पा मारत, आपापसात  हास्यविनोद आणि आपल्या चित्रांवर  चर्चा करत. चित्रकार आरा यांचे पत्रकारांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. हुसेन तर पत्रकार लेखकांचे लाडके होते, त्यामुळेच की काय  या चर्चांमध्ये अनेकदा  लेखक - पत्रकार मंडळी देखील सहभागी होत असत .

या गप्पा किंवा चर्चामध्ये गायतोंडे यांच्या मताला मोठा मान होता.कारण गायतोंडे यांचं वाचन अफाट होतं. आजूबाजूला  काय चाललं आहे याची त्यांना अपटुडेट माहिती असे. आणि विचार मांडण्याची हातोटी देखील. साहजिकच एखादा वाद रंगला  तर त्यात त्या विषयावर गायतोंडे काय बोलणार याकडे साऱ्यांचच लक्ष असे. गायतोंडे देखील आपलं परखड मत मांडून सगळ्यांनाच गप्पगार करून टाकत असत. अनेक वेळा ही लेखक पत्रकार मंडळी या गप्पामधली  गायतोंडे यांची मतं परस्पर छापून टाकत असत. असं काही झालं की गायतोंडे अस्वस्थ होत. चिडत. त्या पत्रकार लेखकांना चारचौघात सुनवायला देखील ते कमी करत नसत. त्यांचं म्हणणं असे की'  मी एखादा विषय किंवा चित्रासंदर्भात  मला जे काही वाटतं ते बोलतो .पण मी जे काही बोलतो ते सारं माझ्यासाठी असतं. इतरांसाठी नसतं. त्यामुळे तुम्हाला ते परस्पर प्रसिद्ध करायचा अधिकार नाही.'  

प्रसिद्धीच्या तर ते संपूर्णपणे विरोधात होते. कुणी मुलाखत मागितली की ते तात्काळ नकार देत. म्हणायचे  'मी चित्रकार आहे. चित्र काढणं हे माझं काम आहे. बोलण्याचं काम माझं नाही. ते तुमचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला शोधा. मी सांगितल्यावर तुम्ही जर लिहिणार असाल तर त्याला काय अर्थ आहे? तुमचं त्यातलं कर्तृत्व काय?' १९५७ साली गायतोंडेंच्या चित्राला जपानचं एक लाख येनचं  पारितोषिक मिळालं, तेव्हा अनेक वृत्तपत्रांची पत्रकार आणि फोटोग्राफर  मंडळी त्यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या  गिरगावातल्या घरी गेली  तर त्यांनी त्या साऱ्यांना चक्क घरातून हाकलून दिलं होतं. त्यावेळी गायतोंडे अवघे ३३ वर्षांचे होते. बहुदा हे असं मीडियावाल्याना दुखावल्यामुळेच  हुसेन, आरा, रझा,सूझा याना नंतर जी आणि जशी  प्रसिद्धी  मिळाली तशी ती गायतोंडे याना मिळाली नसावी . 

टाइम्सचे कला समीक्षक एस व्ही वासुदेव हे या बहुसंख्य चित्रकारांच्या जवळचे. अतिशय संवेदनशीलता लाभलेल्या वासुदेव यांच्याशी मात्र गायतोंडे यांचं जमत असावं. कारण १९६४ सालच्या ' इलस्ट्रेटेड विकली ' मध्ये वासुदेव यांनी गायतोंडे यांची घेतलेली दीर्घ मुलाखत वाचायला मिळते. हा अपवाद वगळता दिल्लीला जाईपर्यन्त म्हणजे १९७१ सालापर्यन्त गायतोंडे यांच्या  कुणी पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखती अगदी अभावानेच आढळतात. दिल्लीला स्थायिक झालेले गायतोंडे नंतरच्या काळात मात्र किंचित  मवाळ झालेले दिसतात. कारण जेव्हा जेव्हा ते पंडोल मधील  शोच्या निमित्ताने मुंबईत येत तेव्हा तेव्हा त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या दिसतात. कदाचित  पंडोल गॅलरीला  शो ची प्रसिद्धी करायची असेल म्हणून  देखील हे असू शकेल .

या काळात ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी त्यांच्या सर्वात जास्त मुलाखती घेतल्या आहेत . कारण नाडकर्णी आणि गायतोंडे यांच्यात छान  मैत्री होती. नंतर तर ललित कलासाठी नाडकर्णी यांनी गायतोंडे यांच्यावरचा मोनोग्राफ देखील लिहिला होता . या काळातच अमूल्य मुजुमदार यांनी घेतलेल्या गायतोंडे यांच्या मुलाखती देखील आपल्याला ( आपल्याला म्हणजे अर्थातच मला , कारण मीच त्या पद्धतशीरपणे जमवल्या होत्या. ज्या नंतर मी जगजाहीर केल्या  आणि अनेकांना ' संशोधक आणि अभ्यासक ' होण्यास मदत केली ) वाचायला मिळतात. पण हे अमूल्य मुजुमदार म्हणजे कोण तर ते  देखील ज्ञानेश्वर नाडकर्णीच. दस्तुरखुद्ध नाडकर्णी यांनीच हे गुपित मला सामोवारमधल्या आमच्या बैठकीत सांगितलं होतं . नाडकर्णी मुक्त पत्रकार होते. साहजिकच अनेक टोपण नावं घेऊन ते लिहीत असत. त्या काळात  'बुलेटिन' या सायंकालीन  वर्तमानपत्राचे कला समीक्षक एस आय क्लार्क यांनाही  गायतोंडे यांनी मुलाखती दिल्याचे आढळते, शिरीन बहादुरीजी सारख्या तरुण पत्रकारांना देखील त्यांनी मुलाखत  दिलेली आढळते .

गायतोंडे यांच्यावरील आधी अंकामुळे आणि नंतर ग्रंथामुळे मला या साऱ्याचा बारकाईनं अभ्यास करावयाची संधी मिळाली, म्हणूनच मी इतक्या मोकळेपणानं  ही विधानं करू शकतोय. २००१ सालापासून आज २०१९ सालापर्यन्त गायतोंडे यांच्या संदर्भात मी फेसबुक, ब्लॉग आणि वृत्तपत्रातून अक्षरश : शेकडो लेख लिहिले आहेत, जे अक्षरश: लक्षावधी लोकांनी वाचले आहेत. हे मी अत्यंत ठामपणाने सांगू शकतो कारण ही  सारी आकडेवारी  फेसबुकच्या  इन्साईटस किंवा गुगल स्टॅटिस्टिक मध्ये उपलब्ध आहे. आणि ती मी वारंवार पडताळून पाहिली आहे. वारंवार हा शब्द अशासाठी वापरला कारण अनेकदा त्या आकडेवारीतले आकडे थक्क करून टाकत असत. एखाद्या चित्रकारावरील लिखाणाला आणि तेही मराठीत भाषेतल्या, जागतिक पातळीवर इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल हे मी कधी स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं . 

म्हणूनच हे सारं लिखाण एकत्रित स्वरूपात  पुस्तक रूपाने यायला हवं असं  माझ्यातल्या संपादकाला मनापासून वाटतं. पण माझ्यातला आळशी लेखक त्यापासून मला सतत परावृत्त करतो आहे. आता माझ्यातल्या संपादकाने माझ्यातल्या चित्रकारावर अधिक अन्याय केला आहे का लेखकावर हे देखील मला धड सांगता येत नाही. आयुष्यभर ' चिन्ह 'ची ओझी वाहिल्यावर आता या वयात मी पुन्हा नवं धाडस करण्यास देखील मी आता फारसा उत्सुक नाहीये. अशावेळी कॅ ब्र करावं ? 

( आता हे सारं मी इतक्या मोकळेपणानं लिहिलंय खरं, पण हे सारं वाचुन  दुसऱ्या कुणी उठून गुपचूप पुस्तक नाही काढलं म्हणजे मिळवली .असं म्हणतोय  कारण पूर्वानुभव भयंकर आहे .त्यावरही लिहिणार आहे पण ते इतक्यात नाही. वेळ येताच. आणि ती लवकरच येईल याची खात्री आहे . ) 
 
['चिन्ह ' च्या 'गायतोंडे ' ग्रंथविषयी आता सतत विचारणा होऊ लागली आहे , होय ! ' गायतोंडे ' ग्रंथाच्या डिलक्स आवृत्तीच्या प्रती अद्यापही विक्रीसाठी उपलब्ध आहेत . या निमित्ताने रु ३००० च्या या ग्रंथाच्या प्रती आम्ही विशेष सवलतीत म्हणजे रु २२५० मध्ये उपलब्ध करून देत आहोत . इच्छुकांना ९००४० ३४९०३ या आमच्या व्हाट्सअप नंबरवर GAI - D हा मेसेज आपल्या नावपत्यासह पाठवून आपली प्रत घरपोच मागवता येईल . ५०० रु किंमतीची जनआवृत्ती देखील ४०० रु इतक्या सवलतीत घरपोच मिळू शकेल. पण त्यासाठी मेसेज पाठवताना GAI - Jan असा उल्लेख करणं आवश्यक आहे . ( जन आवृत्तीच्या प्रती पुण्याच्या अक्षरधारांमध्ये देखील मिळू शकतील ) गायतोंडे ग्रंथाच्या प्रती सवलतीत मिळवण्याची ही बहुदा अखेरचीच संधी ठरावी.]  

सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 2

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 3

मुक्काम बिष्णुपुर !

अधिक वाचा

Feature 4

पुनर्जन्म !

अधिक वाचा

Feature 5

मुक्काम शांतिनिकेतन !

अधिक वाचा
12345678910...