Enquire Now

Request A Quote

गायतोंडे : कहाणी आणखी एका शोधाची !


बरोबर १८ वर्षांपूर्वी याच दिवशी गायतोंडे यांचं गुरगांवमध्ये निधन झालं. गायतोंडे यांच्या लिखाणाची जुळवाजुळव करत असताना अचानक  व्हाट्सअँप वर तुषार जावकर यांचा लेख आला. त्यांना तो 'चिन्ह'च्या व्हाट्सअँप ग्रुपवर टाकायचा होता. तो वाचला आणि ठरवलं की हाच लेख आज 'Chinha Art News' वर पोस्ट करायचा. 'चिन्ह'चं  काम जनमानसात कसं झिरपत गेलं आहे याची ही एक प्रकारे पावतीच आहे. नव्या लेखकाचा हा लेख अवश्य वाचा. 


"२०१४" हे साल बहुदा माझ्यासाठी (मुख्यत्वे घरातल्यांसाठी) क्रांतिकारी ठरले असावे,कारण मी वयाच्या अठ्ठाविशीनंतर HDFC बँकेची मॅनेजरपदाची नोकरी सोडून माझा लहानपणापासूनचा छंद जोपासण्याचा निर्णय घरी जाहीर केला. माझ्या या निर्णयामागे अनेक कारणं होती. त्यातलंच एक म्हणजे सुधाकर यादव सर जे त्या दरम्यान जेजेमध्ये शिकवायचे. त्यांची आणि माझी ओळख झाली HDFC च्या कामामुळे पण त्याचा जास्त फायदा (नफा) बँकेला न होता मलाच झाला. 

माझी बालपणापासूनची चित्रकला जोपासायची सुप्त इच्छा पुनःश्च जागृत झाली, आपण काही ८-१२ तासांच्या कामामध्ये रमू शकत नाही.निर्णय झाला, घराजवळच एक पार्ट-टाइम जॉब देखील मिळाला, सगळं काही अगदी मनासारखं जुळून आलेलं. माझं ठरलं होतं की कलेचे धडे घ्यायचे तर ते जेजेमधूनच. म्हणूनच मग मी त्यासाठी  थेट जेजेचे डीन साबळे यांनाच जाऊन भेटलो. पण तिथे थोडी निराशा पदरी पडली. सरांनी मला सांगितले की तुला SSC ला मार्क्स कमी आहेत (माझी दहावी झाली २००० साली आणि त्या काळात ७५% म्हणजे खूप असायचे पण २०१४ च्या तुलनेत ते कमी होते) त्यामुळे इथे प्रवेश मिळणे अशक्य होते. साबळे सरांनी माझं निराश चेहरा पाहून काही पर्यायी कला विद्यालयांची नावे सुचवली. आणि शेवटी मी आर्ट टीचर्स डिप्लोमा (ATD) साठी चर्नीरोडच्या कलाविद्यासंकुलामध्ये प्रवेश घेतला.

वरती जी थोडी पार्श्वभूमी दिली आहे ती माझी बढाई मारण्यासाठी नाही, जर कोणाला तसे वाटत असेल तर मी  आधीच क्षमा मागतो. मग तुम्ही म्हणाल की का बरं लिहिलेस एवढे सविस्तर. त्याचे कारण की चर्नीरोडच्या त्या  कलाविद्यालया पासून अगदी २-३ मिनिटांवर आहे ती कुडाळदेशकर वाडी जिथे गायतोंडे त्यांच्या जेजेच्या दिवसांत वास्तव्यास होते. झाले असे की तुम्हाला बहुधा ठाऊक असेल की ATD च्या शेवटच्या वर्षाला एक प्रकल्प करायचा असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या आवडीचा कलाकार निवडू शकता. बहुतेक विद्यार्थ्यांनी सोपे विषय किंवा ज्यांची माहिती उपलब्ध आहेत असेच कलाकार निवडले, पण मी मात्र ठरवलं की प्रकल्प करायचा तर तो गायतोंडें यांच्यावरच. पण त्यातही अडथळे खूप होते कारण गायतोंडें यांच्यावरची फारशी अशी माहितीच उपलब्ध नव्हती. योगायोगाने एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे आमच्या कलाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्या योगिता होले या चित्रकार राजाराम होले यांच्या पत्नी. त्यांनी 'सरांशी बोल ते माहिती देतील' असे सांगितले आणि मग मी होले सरांना भेटलो. त्यांनी गायतोंडे यांच्या आठवणी अगदी मनमोकळेपणाने सांगितल्या, पण तरीही ती एका प्रकल्पासाठी पुरेशी माहिती नव्हती. मग मी ठरवले की मुळापासूनच सुरवात करायची. कुडाळदेशकर वाडी गाठायची आणि पाहायचे की काही माहिती वगैरे मिळते का. माझ्या याही निर्णयाची अनेकांनी चेष्टा केली. कारण गायतोंडें यांचा परिवार त्यांचं ते वाडीतलं घर फार आधीच विकून तिथून निघून गेला होता. पण मग तरीही मी ठरवलं की जाऊन बघायचंच.  

कुडाळदेशकर वाडी मध्ये पोहचलो आणि विचारत विचारत गेलो तेव्हा अखेर गायतोंडें यांचे घर सापडले. ते सापडले खरे, पण त्याला कुलूप होते. पुन्हा एकदा धीर खचला. पण मनाशीच ठरवलं की आजुबाजूला विचारण्याचा प्रयत्न करू. आधी काही हाती लागलं नाही. पण गायतोंडें यांचे एक शेजारी सतीश सामंत यांना माझ्याबद्दल बहुधा आपुलकी वाटली असावी, त्यांनी मला त्यांच्या घरात बोलावलं, पाणी दिलं आणि कुठून आलास, काय काम होतं या गोष्टींची खातरजमा करून घेतल्यावर ते म्हणाले 'ये मी तुला गायतोंडें यांचं घर दाखवतो'. पण मी त्यांना म्हणालो त्याला तर कुलूप आहे, तर ते म्हणाले चिंता करू नकोस त्या घराच्या किल्ल्या आमच्याकडेच असतात. त्यांच्या या शब्दांनी मला त्यांच्या घरात असलेल्या स्वामी समर्थ यांच्या फोटोफ्रेम मधल्या ओळी आठवल्या "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", क्षणभर माझ्या मदतीला चक्क देवच धावून आला होता की काय असं वाटलं. ते मला गायतोंडें यांचं घर दाखवायला घेऊन गेले आणि त्यांनी  सगळ्या गोष्टी अगदी आपुलकीनं सांगितल्या. गायतोंडें यांची घराबाहेरची झोपण्याची जागा, ते चित्र काढायला घरात कुठे बसत असत, त्यांच्या आईचं स्वयंपाक घर, पोटमाळा, सगळं काही त्यांनी मला दाखवलं. ही माहिती देता देता सामंतकाका म्हणाले की गायतोंडें यांच्या बहिणीनं जेव्हा हे घर विकलं तेव्हा त्यांची काही चित्रं या पोटमाळ्यावर होती. पण नवीन घर मालकानं ती बहुधा कचरा समजून फेकून दिली असावी. एवढा अमूल्य ठेवा जेव्हा कचऱ्यात फेकून दिला जातो तेव्हा आपल्याकडे  कलेबद्दल किती अनास्था आहे, कलाकार आणि त्याची कला यांच्याकडे किती निरुत्साहीपणे पाहिले जाते याची मला कल्पना आली. काहीशा जड अंतःकरणानेच मी तिथून निघालो.

माझ्या प्रकल्पासाठी पुरेशी माहिती आता माझ्याजवळ होती. अर्थात सतीश सरांच्या लिखाणातून नंतर अधिकाधिक माहिती मिळत गेली आणि अखेरीस माझा "गायतोंडे" प्रकल्प पूर्णत्वास आला.

आज गायतोंडें यांच्या स्मृतीस उजाळा देण्याच्या निमित्ताने ते सारे जुने दिवस पुन्हा एकदा आठवले आणि जे एक अबोल नातं नकळतच तयार झालेलं, त्यानं मन पुन्हा एकदा गहिवरून आलं. आज मागे वळून संपूर्ण घटनाक्रम पहिला तर असं वाटतं की
I was destined to meet Gai .

In  loving  memory  of  Gaitonde ...
तुषार जावकर

Top Features

 

Feature 1

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 2

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 3

मुक्काम बिष्णुपुर !

अधिक वाचा

Feature 4

पुनर्जन्म !

अधिक वाचा

Feature 5

मुक्काम शांतिनिकेतन !

अधिक वाचा
12345678910...