Enquire Now

Request A Quote

गायतोंडें स्वतःचे कॅनव्हास फाडतात तेव्हा.....


८६ वर्षाचे चित्रकार मनोहर म्हात्रे गायतोंडे यांच्या प्रदर्शनाला जायला उत्सुक आहे. पण मुंबईचा पाऊस त्यांना ते करू देत नाहीये. जेजेत शिकत असताना म्हात्रेंना गायतोंडे शिकवायला होते तेव्हापासूनच त्यांचा स्नेह शेवटपर्यंत टिकला. त्यामुळेच 'चिन्ह'च्या गायतोंडे ग्रंथातील गायतोंडे यांच्या विषयीच्या प्रदीर्घ लेखासाठी आठवणी सांगताना मनोहर म्हात्रे रंगून गेले. पण तरीदेखील काही आठवणी उरल्याच. त्यातली एक अत्यंत महत्वाची आठवण म्हात्रे यांनी आजच सांगितली, तोच हा लेख.   


चित्रकार मनोहर म्हात्रे यांची आणि माझी मैत्री जवळ जवळ ८० सालापासूनची. म्हणजे पुढील वर्षी आमच्या मैत्रीला तब्बल ४० वर्ष पूर्ण होतील आणि त्यांच्या वयाला तब्बल ८६ वर्ष. ही मैत्री  इतकी प्रदीर्घ काळ  टिकवण्यात त्यांचाच वाटा मोठा आहे हे मी काही वेगळे सांगावयास नकोच. असो. मुद्धा तो नाहीये. मुद्धा 'गायतोंडे' यांच्या प्रदर्शनाचा आहे. मग मी असा व्हाया व्हाया का जातोय? तर तसं ते नाही. 

गायतोंडे यांना व मला जोडणारा दुवा म्हणजे हे मनोहर म्हात्रे नावाचे गृहस्थ. ते स्वतः चित्रकार आहेत हे या लेखाच्या सुरुवातीला आलंच आहे. दुसरं म्हणजे ते जेव्हा जेजे मध्ये शिकत होते. म्हणजे पन्नास च्या दशकाच्या अगदी उत्तरार्धात तेव्हा चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे हे त्यांना चक्क शिकवायला होते. जेजे मधला शिक्षणक्रम पूर्ण करताच गायतोंडे जेजे मध्येच फेलो म्हणून निवडले गेले होते. त्या फेलोशिपच्या काळातच ते ज्या वर्गाला शिकवत होते त्या वर्गात मनोहर म्हात्रे शिकत होते. इतकंच नाही तर प्रफुल्ला डहाणूकर, शरद पाळंदे (ज्यांनी पुढं सिरॅमिक मध्ये खूप काम केलं.) सचिदानंद दाभोळकर (जे पुढे एअर इंडिया चे आर्ट डिरेक्टर झाले.) रामचंद्र सावंत (ज्यांच्या म्युरल्सनीं सजली.) श्रीकांत वणकुद्रे (व्ही शांताराम यांचे पुतणे.) मनु राठोड (जे पुढे विव्हर्स सेन्टर मध्ये रुजू झाले.) आणि बी. प्रभा व काही काळ डॉ. शरयू जोशी अशी नंतर नामांकीत झालेली मंडळी फेलोशिपच्या काळात गायतोंडेच्या हाताखाली शिकली. म्हात्रे वयानं जवळजवळ माझ्या वडलांच्या वयाचे पण तरीही त्यांच्यात आणि माझ्यात मैत्र निर्माण झालं ते याच गायतोंडे यांच्या अदृश्य धाग्यानं. 

मी पत्रकारितेत असताना म्हात्रेंशी जवळजवळ रोजच जहांगीरच्या पायऱ्यांवर गाठ पडायची. आणि मग मद्रास कॅफेमध्ये चहा घेत घेत चित्रकलेवरच्या गप्पा चालायच्या. त्या गप्पांमध्ये गायतोंडे यांचा विषय आला नाही असा एकही दिवस गेला नाही. नंतर म्हात्रेंचं वयोमानापरत्वे आणि माझं पत्रकारिता सोडल्यामुळे जहांगीरला जाणं येणं कमी होऊ लागलं. दररोज भेटणं कालांतरानं आठवड्यावर आलं नंतर मग महिन्यावर आलं आणि आता तर एक दोन महिन्यांनी आम्ही भेटतो. त्याला कारण मुंबईचं ट्रॅफिक आणि कलाक्षेत्राची झालेली धुळधाण हेच आहे. पण असं असलं तरी ठरवून आम्ही जहांगीरला अद्यापही भेटतोच आणि फोनवर तर दर एक दोन दिवसाआड गप्पा मारतोच मारतो. 

परवा २ ऑगस्टला गायतोंडे उदघाटन समारंभाला आमचं भेटायचं ठरलं होत पण पावसानं त्यावर पाणी फेरलं. आज ८ ऑगस्ट,पावसामुळे अजूनही त्या प्रदर्शनाला भेट देऊ शकलो नाही, आता बहुधा पाऊस निघाल्यावरच गायतोंडे प्रदर्शनात त्यांची भेट होईल. नेहमी मारतो तशाच फोनवर मात्र आम्ही भरपूर गप्पा मारल्या. म्हात्रे रंगात आले की तारीखवार वर्णन करतात. ते एकदा भेटलेल्या व्यक्तीच्यादेखील जन्मतारखा अचूक लक्षात ठेवतात आणि ती व्यक्ती पुन्हा पाच दहा वर्षांनी जरी भेटली तरी ती तारीख अचूक सांगतात. ती तारीख सांगताना त्या व्यक्तीची रास देखील सांगून जातात. इतकंच नाही तर जास्तच मूड मध्ये असले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेली एखादी घटना किंवा भविष्यात घडू पाहणारी घटना देखील ते फाटदिशी सांगून जातात. (या त्यांच्या कथनामुळे अनेक कलावंत त्यांच्या समोरदेखील यायला कचरतात.) 

परवा असाच फोनवर बोलता बोलता म्हात्रे यांनी गायतोंडे यांच्या प्रदर्शनाच्या अनेक गमतीदार आठवणी सांगितल्या. म्हात्रे यांचा गायतोंडे यांच्यावर जीव होता, साहजिकच सुरवातीपासूनच ते गायतोंडे यांच्यासोबत असत. गायतोंडे यांच्या कुडाळदेशकर वाडीत ते नियमित जात असत पण गायतोंडे यांचे वडील जमदाग्नीचा अवतार असल्यामुळे खोलीच्या दरवाजातूनच ते गायतोंडे यांना खूण करत आणि खाली वेलणकर हॉटेलात जाऊन बसत. १९५० पासून १९६० पर्यंत म्हणजे, म्हात्रे मुंबईत असेपर्यंत गायतोंडे यांच्या सहवासात होते. ६० साली म्हात्रे विव्हर्स च्या नोकरीसाठी मद्रासला गेले. त्यानंतर त्यांचा संपर्क कमी झाला. नंतर त्यांची शेवटची भेट झाली ती २००१ साली गायतोंडे गेले त्याच्या थोडं आधी, ती देखील  गुरगांव  मधल्या त्यांच्या शेवटच्या मुक्कामात. दिल्ली आणि गुरगांव यांच्या भोगौलिक अंतराची ज्यांना कल्पना आहे त्यांना म्हात्रे यांनी केलेल्या धाडसाची कल्पना येऊ शकेल. 

परवा म्हात्रेंनी गायतोंडे यांचा छान किस्सा सांगितला म्हणाले, प्रदर्शनात कोणी काही चित्रांविषयी विचारलेलं गायतोंडे यांना अजिबात आवडत नसे. त्यावर त्यांनी उपायदेखील शोधून काढला होता. एखाद्या प्रेक्षकांनी काही विचारलं तर ते सरळ सांगायचे हे प्रदर्शन ज्यांनी भरवलं आहे त्या चित्रकाराचा मी फक्त मित्र आहे. इथं कोणी नसल्यामुळं मला उभं करून तो टॉयलेट ला किंवा चहा प्यायला गेला आहे तो आल्यावर तुम्ही त्याला विचारू शकता. किंवा एखादा प्रेक्षक फारच भोचकपणा करू लागला याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय ? असं विचारू लागला की ते सरळ त्याला सांगत त्या चित्राची किंमत दोन हजार रुपये आहे, तू ते दे आणि विकत घे म्हणजे तुला आपोआपच त्याचा अर्थ कळेल. (१९५० ते ६० च्या दशकातला त्यांचा कॅनवास जो दोन हजार रुपयाला मिळायचा त्याची किंमत आज वीस ते पंचवीस कोटीत मोजली जाते हा कालमहिमा म्हणता येईल.)

हा लेख लिहीत असतानाच म्हात्रे यांचा फोन आला. असा असा लेख लिहितो म्हंटल्यावर त्यांनी गायतोंडे यांचा आणखी एक किस्सा सांगितला. म्हणाले १९६२ किंवा ६३ साली ताजमध्ये गायतोंडे यांचं प्रदर्शन भरलं होतं, त्या प्रदर्शनातील चित्रांची फारशी विक्री झाली नाही आणि गायतोंडे देखील त्या चित्रांविषयी काहीसे नाखूष होते. ('चिन्ह'च्या गायतोंडे ग्रंथाला प्रस्तावना देताना चित्रकार प्रभाकर कोलते यांनी गायतोंडे यांचं न आवडलेलं प्रदर्शन असा जो उल्लेख केला आहे ते बहुधा हेच प्रदर्शन असावं.) प्रदर्शन संपताच गायतोंडे यांनी त्यातला एकेक कॅनव्हास कात्रीने कापून नष्ट केला. म्हात्रे यांनी अगदी अभावीतपणे सांगून टाकलेली आठवण या लेखाचा किंवा गायतोंडे यांच्या आजवरच्या आठवणींचा परमोच्च बिंदू ठरावी. 

गायतोंडे यांच्या अशाच एकाहून एक अफलातून आठवणी सांगणारा मनोहर म्हात्रे यांचा प्रदीर्घ लेख 'चिन्ह'च्या गायतोंडे ग्रंथात केला आहे. जिज्ञासूंनी (ग्रंथ विकत घेऊन) तो अवश्य वाचावा.   


['चिन्ह ' च्या 'गायतोंडे ' ग्रंथविषयी आता सतत विचारणा होऊ लागली आहे , होय ! ' गायतोंडे ' ग्रंथाच्या डिलक्स आवृत्तीच्या प्रती अद्यापही विक्रीसाठी उपलब्ध आहेत . या निमित्ताने रु ३००० च्या या ग्रंथाच्या प्रती आम्ही विशेष सवलतीत म्हणजे रु २२५० मध्ये उपलब्ध करून देत आहोत . इच्छुकांना ९००४० ३४९०३ या आमच्या व्हाट्सअप नंबरवर GAI - D हा मेसेज आपल्या नावपत्यासह पाठवून आपली प्रत घरपोच मागवता येईल . ५०० रु किंमतीची जनआवृत्ती देखील ४०० रु इतक्या सवलतीत घरपोच मिळू शकेल. पण त्यासाठी मेसेज पाठवताना GAI - Jan असा उल्लेख करणं आवश्यक आहे . ( जन आवृत्तीच्या प्रती पुण्याच्या अक्षरधारांमध्ये देखील मिळू शकतील ) गायतोंडे ग्रंथाच्या प्रती सवलतीत मिळवण्याची ही बहुदा अखेरचीच संधी ठरावी.]  

सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 2

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 3

मुक्काम बिष्णुपुर !

अधिक वाचा

Feature 4

पुनर्जन्म !

अधिक वाचा

Feature 5

मुक्काम शांतिनिकेतन !

अधिक वाचा
12345678910...