Enquire Now

Request A Quote

प्रदीप शिंदे : स्क्रॅपमधून अभिव्यक्ती


लहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या प्रदीप शिंदे यांनी ठाणे स्कूल ऑफ आर्ट मधून फाउंडेशन कोर्स केल्यावर, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून पुढील शिक्षण घेतले. शिकत असतानाच शिल्पकार म्हणून काम करायचे त्यांनी ठरवलं होतं.  त्यानुसार शिक्षण पूर्ण होताच ते आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळले.... आता स्क्रॅप्सरख्या वैचित्र्यपूर्ण माध्यमात काम करून आपला ठसा ते उमटवत आहेत त्यांच्याशी केलेली ही बातचीत. 

 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सच्या मागच्या बाजूला G.P.O म्हणजेच मुख्य पोस्ट ऑफिस आहे. त्या पोस्ट ऑफिसच्या समोर कबुतरखाना आहे, म्हणजे आता त्याला कबुतरखान्याचं स्वरूप दिलं गेलं आहे, खरं तर पूर्वी तिथे पाणपोई होती. आता पाणपोईच नामोनिशाण देखील नाही ती गोष्ट वेगळी... तर त्या चौकात जर कधी लक्ष गेलं असेल तर गेल्या वर्षांपासून  एक लॅम्प पोस्ट लागलेली दिसते.... शिडीवर चढून लॅम्प लावणारा माणूस....त्या अतिशय देखण्या शिल्पाकडे कधी लक्ष गेलं नसेल आवर्जून बघा... माझं जेव्हा त्या शिल्पाकडे लक्ष गेलं तेव्हाच ते मनात भरलं होतं. पण ते कोणी केलं असेल वगैरे प्रश्न काही मनात आले नाहीत... आणि 'चिन्ह'साठी काम करू लागल्यावर अनपेक्षितपणे त्या शिल्पाच्या  शिल्पकारचं नाव समजलं....  प्रदीप शिंदे.... इतकंच नाही तर त्यांच्याशी बोलण्याचा योगही आला..... 

प्रदीप शिदें बरोबरच्या गप्पांची सुरुवात त्याच शिल्पावरून होणं अपरिहार्यच होतं. ते शिल्प त्यांनी कसं केलं? कोणासाठी केलं ? हे सांगताना ते म्हणतात... 
" कोबाल्ट आर्टच्या नीता पाठारे यांच्यासाठी मी शिल्प करून देतो. त्यांनीच मला हे काम दिलं. या आधीही  त्यांच्यासाठी मी  काम केलेलं आहे. पूर्वीच्या मुंबईची आठवण येईल असं काहीतरी शिल्प त्यांना तिथे लावायला करायचं होतं. मग कन्सेप्ट विचार करताना चौकात लॅम्प पोस्ट असते, पूर्वीच्या काळातल्या लॅम्प पोस्ट वेगळ्या होत्या तशी करायची ठरलं. त्यावेळी गॅसचे लाईट असत . ते पेटवायला टॉर्च असे. त्या टॉर्चनी तो माणूस शिडीवर चढून लॅम्प लावत असे. मग त्याचे त्याकाळी कपडे कसे असतील तर धोतर आणि डोक्यावर पगडी.... शिडीवर चढून दिवा लावणारा माणूस ही कल्पना सगळ्यांनाच आवडली. "

त्या शिल्पावर किती काळ आणि कसं काम केलंत ?  
" वेळ काही फार नाही लागला.  कोणताही शिल्प ज्या प्रोसिजरने केलं जातं तसंच हे ही केलं. पण ते माझ्या आवडत्या माध्यमात, म्हणजे स्क्रॅपमधे केलं.  जुने रिक्षा, बाईकचे पार्ट, पाईप वगैरे वापरून केलय. "

स्क्रॅप आवडतं माध्यम म्हणालात....म्हणजे?
"मी ज्या काळात काम सुरु केलं त्याकाळात काही मटेरियल घेण्यासाठी माझ्याकडे पैसेच नसायचे. मग समोर जे मटेरियल मिळेल त्यात काम करत असे.. याची सुरवात म्हणायची तर आम्ही कामासाठी जो ब्लोअर किंवा ज्याला स्टोव्ह म्हणू शकतो तो वापरतो त्यातून  पाहिल्यादा स्क्रॅप वापरून काहीतरी करण्याची कल्पना सुचली. तो ब्लोअर बघितला की डायनासोरची आठवण होतं असे. मग काय केला त्याचा डायनासोर . या शिल्पाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.  पुढे प्रदीप शिंदे म्हणजे स्क्रॅपमधली शिल्प हे समीकरणच झालं. "

तुमच्या नावाचा ठसा कामावर पडेपर्यंतचा प्रवास कसा होता?
 " त्याची सुरवात शाळेत असल्यापासून झाली. विक्रोळीतल्या विकास हायस्कूलमधे शिकत असतांना आम्हाला चित्रकलेचे श्रीरंग भगत  आणि रजनीनाथ लुडबे हे दोन उत्तम शिक्षक लाभले होते. त्यांनी आमच्या मनात चित्रकलेविषयी गोडी निर्माण केली, आम्हांला चित्र बघायची दृष्टी दिली. ते आम्हांला वेगवेगळ्या आर्ट गॅलरीत घेऊन जायचे, त्यांनी जे जे स्कूल दाखवलं. त्यांच्याबरोबर जेव्हा पहिल्यांदा बोरिबंदर स्टेशन बघितलं तेव्हा मी आठवीत होतो. त्याचवेळी ठरवलं की आपणही असंच काहीतरी क्रिएटिव्ह करायचं. "

क्रिएटिव्ह म्हणजे काय ते त्या वयात कळत होतं?
"अगदी नक्की काय ते कळत नसलं तरी मला काय करायचंय हे माहिती होतं. तशी तर आमच्या घरात सगळ्याच भावंडाची चित्रकला चांगली होती.  तरी कोणी या क्षेत्राकडे वळलं नाही. पण मी मात्र शाळेत असल्यापासूनच काम करू लागलो होतो. चिंचपोकळीला काशिनाथ घोलप यांचा गणपतीचा कारखाना होता. तिथे मोठाल्या मूर्ती बनत. त्यांच्याकडे फक्त कलाच नाही तर माती कशी बनवतात वगैरे टेक्निकही शिकलो.  मग दहावी नंतर ठाण्याला आर्ट स्कूललाच प्रवेश घेतला.  "

तेव्हाच पक्क केलं होतं शिल्पकार होण्याचं? 
" जवळपास. तिथे वंजारी सर, एम.पी.पवार सर होते. त्यांनी खूप छान शिकवलं. टेक्निक शिकवलं, मास्टर वर्क बघायला मिळाले. ज्यामुळे मला दिशा मिळाली. माझा थ्री डी विषय चांगला आहे हे समजलं. आणि मग नक्की काय करायचं ते समजायला मदत झाली. "

आपण काय करू शकतो हे कधी समजलं?
"फौंडेशनला असतानाच. त्यावेळी मास्क मेकिंगची स्पर्धा होती. त्यावेळी सगळ्यांनी काय काय वापरून मास्क केले होते. पण मी कामाला जात असल्याने मला वेळच नव्हता. मग माझ्याकडे रस्त्यात मिळालेली कबुतरांची पिसं होती, पावसात झाडाला अळंबी लागते ती, सुतळ वगैरे वापरून भिल्ल तयार केला होता. यासाठी मला पहिल्यांदा पुरस्कार मिळाला. मग काय वाया गेलेल्या वस्तूत शिल्प दिसू लागली आणि घडू लागली.  "

लहानपणासून काम करण्याचा नक्कीच खूप फायदा झाला असणार?
"खूपच. जे वर्गात शिकायला मिळत नाही असं कितीतरी शिकायला मिळालं.  कॉलेजमध्ये असल्यापासून मी कमर्शियल कामं करत होतो. फेमस स्टुडिओत कंपनीत काम करत असतांना मला कामाची सगळी प्रोसेस समजली, ते क्लासिक इंटिरिअर करायचे ते बघायला मिळालं. कारखान्यात काम कसं करतात ते शिकायला मिळालं ज्याचा उपयोग पुढं स्वतःच काम करताना झाला.  "
 
तुम्हाला पाहिलं स्वतंत्रपणे मिळालेलं काम कोणतं?  
"सिप्ला कंपनीचा आई आणि बाळ हा जो लोगो आहे तो मी करून दिला आहे. तो त्यांच्या वरळी ऑफीसमध्येही मोठा फायबरचा पुतळा करून लावला आहे. हा लोगो सगळीकडे वापरला जातो. "

स्क्रॅपमध्ये काम करण्याची पहिली संधी कुठं मिळाली?
"कॉलेजमध्ये असताना कॉलेज सुटलं की बाहेरची कामं आणि मग माझी काम करायचो. वेल्डरला सांगितलेलं असे संघ्याकाळी मी माझं काम घेऊन येईन. त्याप्रमाणे पिशवी भरून त्याच्याकडे जायचो. त्यावेळी स्टोव्ह, सायकलची चेन आणि इतर स्क्रॅपमधून घोडा, कोंबडा वगैरे केलं होतं. जे जे च्या मान्सून शो मध्ये ते  ठेवायला दिलं . ती शिल्प लगेच विकली गेली. मग इस्त्रीमध्ये चेहेरे केले ते ही विकले गेले. तीच पहिली संधी. मग वाय.बी.चव्हाण सेटर, नेहरू सेन्टर, NGMA मध्ये लावलं. ज्याचं लोकांनी खूप कौतुक केलं. "

त्यानंतर प्रदीप शिंदेना कधी मागे वळून बघावच लागलं नाही. त्यांनी स्क्रॅपमध्ये अनेक प्रयोग केले. जुनं सामान वापरून त्यांनी कावळे केले, वेगवेगळ्या मूडमधले, वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलं कावळे लोकांच्या अतिशय पसंतीस पडले. 
या इतक्या कामातलं तुमच्या कायम लक्षात राहील असं काम कोणतं?
"कोबाल्ट आर्टच्या नीता पाठारे यांनी दिलेलं एक काम म्हणजे वरळीला एका ८० मजली इमारतीच्या लॉबी मध्ये ब्रॉन्झमध्ये पृथ्वी आणि त्यावर आनंदान नाचणारी तीन माणसं हे एक आहे.... ठाणा किंवा कलानगर बांद्राला एकावर एक दगड रचून केलेली रचना आहे... तिथंच म्हाडाच्या ऑफिसमध्ये  केलेला आंबेडकरांचा पुतळा आहे,.... यंदा पु.ल जन्मशताब्दी वर्ष आहे त्या निमित्तानं पु.ल.चं शिल्प घडावायची संधी मिळाली, ही कामं माझ्यासाठी माईल स्टोन आहेत. तर २०१६साली पूजेतल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला गणपतीचा, सूर्याकडे झेप घेणाऱ्या किंवा लंका दहन करणारा हनुमान अशी वेगळाली पंधरा सोळा रूपं केली. ते कामही खूप समाधान देणारं होतं."

मनीषा सोमण

Top Features

 

Feature 1

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 2

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 3

मुक्काम बिष्णुपुर !

अधिक वाचा

Feature 4

पुनर्जन्म !

अधिक वाचा

Feature 5

मुक्काम शांतिनिकेतन !

अधिक वाचा
12345678910...