Enquire Now

Request A Quote

प्रदर्शन गायतोंडे यांचं - आठवण बरवे यांची !


गायतोंडे यांचं प्रदर्शन सुरु झालाल्या आता तीन दिवस झाले आहेत पण मुंबई ठाण्यात पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे असंख्य गायतोंडे चाहत्यांना प्रदर्शन स्थळापर्यंत पोहचता आलं नाही. गायतोंडे ग्रंथ प्रकाशित करणारे सतीश नाईक हे त्यापैकीच एक. प्रदर्शनाला जाता आलं नाही याचं त्यांना निश्चितच दुःख झालं. त्यानिमित्तानं झालेलं विचारमंथन आणि आठवणी त्यांनी लिहून काढल्या. तोच हा लेख. 


मुंबई आणि ठाण्यात सुरु झालेला पाऊस थांबण्याचं नावच घेत नाहीये. या पावसामुळेच दोन तारखेला झालेल्या गायतोंडे प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभास अतिशय इच्छा असूनही सहभागी होता आलं नाही. वाटलं होत दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात निदान उदघाटन समारंभाची एखादी बातमी तरी येईल किंवा काहीच नाही तर फोटो तरी. पण तसंही काही घडलं नाही . खरं तर कुठल्याही वृत्तपत्राच्या स्थानिक कार्यक्रमात देखील या समारंभाला स्थान मिळालं नसल्यामुळं तशी अपेक्षा करणं मूर्खपणाचं होतं. पण असं असूनही आपण अपेक्षा करतो,तसंच काहीसं हे झालं. त्याच नाही तर नंतरच्या २ -३ दिवसांत देखील प्रदर्शनासंदर्भात काहीही वाचायला मिळालं नाही. 

अर्थात या कालावधीत पडलेला प्रचंड पाऊस हेही कारण त्याला असावंच. कार्यालयापर्यंत पत्रकार पोहचू शकले नाही तर बातम्या येणार तरी कशा ? मुंबईतल्या एका महत्वाच्या वृत्तपत्रातून प्रदर्शनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आवर्जून फोन आला. त्यांनी प्रदर्शनाविषयी कुतूहलापोटी असंख्य प्रश्न विचारले, पण तीही काही बातमी आजपर्यंत आलेली नाही. प्रचंड पाऊस पडला का मुंबईचं जीवन अस्ताव्यस्त होतं. त्याचा परिणाम वृत्तपत्राची  पृष्ठसंख्या कमी होण्यात होतोच. आणि मग रात्रीच्या मुख्य संपादकाकडून पहिली गदा येते ती कलाविषयक बातम्यांवर,मग ती बातमी हुसेनची असो व गायतोंडे यांची, ती सरळ काढून फेकून दिली जाते. वृत्तपत्रात नोकरी केल्या असल्यामुळं हा अनुभव मला काही नवीन नाही.या संदर्भात आलेला एक भयंकर अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. 

गायतोंडे यांच्या नंतर ज्यांचं नाव मानानं घेतलं जातं अशा चित्रकार प्रभाकर बरवे यांचा एक कार्यक्रम एका संस्थेने मुंबईच्या उपनगरात आयोजित केला होता. तसं कशाला नांव घेऊनच सांगतो मुलुंडमध्ये केला होता. कार्यक्रम खूप चांगला  झाला होता. चित्रकार  बरवे  सहसा अशा कार्यक्रमांना जात नसत, पण कसं  कोणास ठाऊक बरवे  यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आणि सुंदर भाषण देखील केलं. त्याचा अतिशय सुरेख वृत्तांत आमच्या वृत्तपत्रात कलासमीक्षा करणाऱ्या व्यक्तीने वृत्तसंपादकांना आणून दिला. वृत्तसंपादकानी तो वृत्तांत एडिट करून कंपोझला पाठवला. त्या काळात आजचा काळासारखी डीटीपी वगैरे भानगड नव्हती.त्यातल्या एका वाक्याबद्दल शंका आल्यामुळे आणि मला चित्रकलेतील बरंच काही कळतं असा समज कार्यालयात रूढ असल्यामुळे मुद्रितशोधकांनी तो मजकूर मला दाखवून त्या शंकेचं निरसन करून घेतलं. 
त्या मुद्रितशोधकाच्या शंकेचं निरसन करून देताना तो मजकूर मला वाचावयास मिळाला.  बरवे समारंभात अप्रतिम बोलले होते. त्याचं वृत्तांकन देखील सुरेख झालं होतं.  बरवे  यांचं भाषण इतक्या सुंदर पध्दतीने आपल्या वृत्तपत्रात येणार याचा आनंद मला देखील झाला होता. पण तो आनंद हळूहळू मावळत गेला. कारण ती बातमी काही प्रसिद्ध झाली नाही. ती का प्रसिद्ध होत नाही या संदर्भात विचारणा केली की उत्तर मिळायचं येईल येईल थोडं थांबा. 
सुमारे २०-२५ दिवसांनंतर ती बातमी आली. पण ती पाहिल्यावर मला अक्षरशः चक्कर आली. कारण त्या विस्तृत बातमीतलं  बरवे  यांचं  संपूर्ण भाषण काढून टाकून शेवटच्या तीन-चार ओळी घेऊन ती बातमी फिलर स्वरूपात वापरली गेली होती. ते करणाऱ्या मुख्य वृत्तसंपादकांना मी ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते भयंकर होतं. ते म्हणाले होते, पान पूर्ण करायला मला एखादा फिलर  हवा होता (वृत्तपत्रात एखादी मोठी बातमी लावल्यानंतर जी जागा उरते त्या जागेत लावली जाणारी बिन महत्वाची छोटी बातमी) आणि त्या बातमीत लावण्यासारखे माझ्या दृष्टीने तेवढेच  होते. ते ऐकल्यावर माझी तर वाचाच बसली. वाईट याचं वाटलं बरवे यांच्या भाषणाची ती बातमी आमच्या वृत्तपत्रात अखेर आलीच नाही. आणि नंतर लगेचच बरवे गेलेच. 

तर असा हा चित्रकलेच्या बातम्या संदर्भात वृत्तपत्रवाल्यांचा दुजाभाव ठाऊक असल्यामुळे गायतोंडे यांच्या प्रदर्शनाविषयी बातमी आली नाही याविषयी मला काही फारसे वाईट वाटलेच नाही. गायतोंडे गेले तेव्हा तर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या चार ओळींच्या बातमीमुळेच मी खवळलो आणि पुढे मग 'चिन्ह' चं पुनरुज्जीवन करून 'गायतोंडे अंक' प्रकाशित करण्यास प्रवृत्त झालो. हा आता इतिहास झाला आहे त्याविषयी काही बोलणं योग्य नव्हे. पाऊस थांबताच आणि मुंबईत जाऊन प्रदर्शन पाहण्याजोगती परिस्थिती निर्माण होताच मी ते नक्की पाहणार आहे आणि त्यावर लिहिणार देखील आहे. तुम्ही देखील गायतोंडे यांचे चाहते असाल तर हे प्रदर्शन चुकवू नका. जितक्या शक्य असेल तितक्यावेळा पहा. अगदी डोळे टक्क उघडे ठेवून पहा. अगदी खात्रीने सांगतो 'अमूर्त चित्रकला म्हणजे काय ?' हा प्रश्न तुम्हाला भविष्यात कधीच पडणार नाही. 

  
'चिन्ह ' च्या 'गायतोंडे ' ग्रंथविषयी आता सतत विचारणा होऊ लागली आहे , होय ! ' गायतोंडे ' ग्रंथाच्या डिलक्स आवृत्तीच्या प्रती अद्यापही विक्रीसाठी उपलब्ध आहेत . या निमित्ताने रु ३००० च्या या ग्रंथाच्या प्रती आम्ही विशेष सवलतीत म्हणजे रु २२५० मध्ये उपलब्ध करून देत आहोत . इच्छुकांना ९००४० ३४९०३ या आमच्या व्हाट्सअप नंबरवर GAI - D हा मेसेज आपल्या नावपत्यासह पाठवून आपली प्रत घरपोच मागवता येईल . ५०० रु किंमतीची जनआवृत्ती देखील ४०० रु इतक्या सवलतीत घरपोच मिळू शकेल. पण त्यासाठी मेसेज पाठवताना GAI - Jan असा उल्लेख करणं आवश्यक आहे . ( जन आवृत्तीच्या प्रती पुण्याच्या अक्षरधारांमध्ये देखील मिळू शकतील ) गायतोंडे ग्रंथाच्या प्रती सवलतीत मिळवण्याची ही बहुदा अखेरचीच संधी ठरावी .  

सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 2

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 3

मुक्काम बिष्णुपुर !

अधिक वाचा

Feature 4

पुनर्जन्म !

अधिक वाचा

Feature 5

मुक्काम शांतिनिकेतन !

अधिक वाचा
12345678910...