Enquire Now

Request A Quote

व्हेनिस बीएनालेत शकुंतला कुलकर्णी


शकुंतला कुलकर्णी यांची निवड यंदाच्या व्हेनिस बीएनालेसाठी झाली होती. तिथं प्रदर्शित केलेलं आपलं कामं कसं सुचलं, कसं केलं या संदर्भात मनीषा सोमण यांना मोकळेपणाने उत्तरं दिली. तीच ही मुलाखत.


शकुंतला कुलकर्णी हे कलाक्षेत्रातलं स्थापित नाव. जवळपास पाच दशकांपूर्वी जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी मिळाल्यावर, त्यातच समाधानी न राहता त्यांनी बडोद्याला जाऊन पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर शांतिनिकेतन मधून सोमनाथ होरे यांचेही मार्गदर्शन घेतले. म्युरल पेंटिंग्जमधे मग  प्राविण्य मिळवलं असूनही त्यांनी आपली कला कधी एकाच बंधनात बांधून ठेवली नाही. त्या सतत नवनवीन प्रयोग करत राहिल्या. त्यांना नाट्यकलेची देखील तितकीच आवड असल्याने, आपल्या कामातून नेहमीच  सतत काहीतरी प्रवाही देण्याची किंवा कथा सदृश्य मांडणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यातूनच जन्माला आलेली संकल्पना म्हणजे' ऑफ बॉडीज आर्मर अँड केजेस.... '   स्त्री सुरक्षा या मुद्यावर आधारित  हे त्यांचं अभिनव काम सध्या व्हेनिस बीएनाले  इथे प्रदर्शनार्थ ठेवले आहे. 

ही संकल्पना नक्की काय आहे.....यातून त्या काय संदेश देतात....आणि व्हेनिस  बीएनाले अनुभव कसा होता? हे त्यांच्याचकडून जाणून घेतले...... 
' ऑफ बॉडीज आर्मर अँड केजेस.... ' हे नक्की काय आहे ?
२०१२साली केलेलं हे काम आहे. स्त्रीला समाजात वावरतांना सतत असुरक्षीत वाटतं म्हणूनच  तिला आपल्याभोवती काहीतरी कवच असावं असं वाटत असतं याच विचारातून ही कल्पना सुचली.

व्हेनिस  बीएनालेसाठी हाच विषय का द्यावासा वाटला? तिथला अनुभव कसा होता?
' मला मार्च महिन्यात रुबिना करोडे या क्युरेटरचा व्हेनिस  बीएनालेसाठी फोन आला ते माझ्यासाठी सरप्राईझच होतं. हे जगातलं सगळ्यात मोठं  आणि मानाचं बोलावणं असल्याने आनंद होणं स्वाभाविकच आहे. पण वेळ खूप कमी होता. मार्च महिन्यात बोलावनं आलं आणि मे महिन्यात शो होता. त्यामुळे माझ्याकडे जे काम तयार होतं ते दिलं. जे त्यांच्या कन्सेप्टला सूट होणारंही होतं.  '

काय होती त्यांची कंसेप्ट?
'गांधीजींची १५०वर्ष..... आता या विषयात काही सगळेच फक्त गांधीजींचं चित्र तर नाही काढणार. त्यात गांधीजींचं तत्वज्ञानही येणार. माझं काम हे गांधीजींच अहिंसा तत्व मांडणार आहे. ' 

ही  कल्पना कशी सुचली?
'मी आधीच सांगितल्याप्रमाणे स्त्रीला  समाजात वावरताना सुरक्षीत वाटत नाही या कल्पनेवर  आधारित  हे काम आहे.  त्याला कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे मी एकदा रस्त्याने जात असताना माझ्या चेहऱ्यावर डांबराचे थेंब पडले.  ते काही कोणी मुद्दाम केलं नव्हतं. पण त्यातून मला स्त्री सुरक्षा ही  समस्या किती गंभीर आहे हे लक्षात आलं. मग सुरक्षीत वाटण्यासाठी काय करता येईल तर सुरक्षा कवच घालता येईल. त्यातून विचार करतांना  ' ऑफ बॉडीज आर्मर अँड केजेस.... 'सुचलं.  मग हळू हळू हे काम आकार घेत गेलं. ' 

कशी होती ती प्रक्रिया?
'खूप मोठी आणि बुद्धीचा कस लावणारी होती. आता स्त्रीसाठी आर्मर करायचं म्हणजे ते नाजूक हवं. त्यासाठी मटेरियलही  तसंच नाजूक हवं. माझ्याकडे वेताची एक खुर्ची आहे, ते वेत स्त्रीला शोभेल असं नाजूक आणि लवचिक ही आहे. म्हणून यासाठी वेत वापरायचं ठरवलं. शिवाय हे विणलं की यातून स्त्री देहाची नाजुकताही दिसेल. पण हे काम प्रत्यक्षात उतरवणं सोपं नव्हतं.'

कसं प्रत्यक्षात उतरवलंत हे काम?
'आधी प्रयोग करण्यासाठी एका वेताच्या खुर्च्या दुरुस्त करणाऱ्या बरोबर काम सुरु केलं. जसं काम सुरु केलं तशा अडचणी लक्षात येत गेल्या. हे आर्मर घातल्यावर कोपर वाकवता आलं पाहिजे. त्या दृष्टीने काम करू लागले. कोणीतरी सुचवलं आसाममध्ये माजोली रिव्हर आयलंडमध्ये एक म्हातारा राहतो तो अशा प्रकारचं काम खूप छान करतो. त्याचा पत्ता शोधून काढला तेव्हा समजलं त्याला मोतीबिंदू झालाय. त्यानं दुसऱ्या कोणाचं नाव दिलं. त्याच्याकडे गेले. तो माणूस वेताची ज्वेलरी करतो. त्याला अंगठी विणताना बघितलं. ते त्यानं इतक्या नजाकतीने केलं होतं की तिथेच माझा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानं मला वेताची जवळपास ९०मीटर वेणी पण अनेक पदरी वेणी विणून दिली. आणि आमच्या कामाला सुरवात झाली. '

ही कल्पना जरी माझी असली तरी जे काही काम आम्ही केलं त्याचं श्रेय मला एकटीला नाही जात म्हणतांना, त्या पुढे सांगतात, 
'आसामचा  टॉकेश्वर बारीक, मुंबईचा दिनेश परदेशी आणि मी अशी आम्हा तिघांची टीम होती. आम्ही तिघेही एकमेकांच्या चुका दाखवत किंवा काय सुधारणा करता येईल याचा विचार करत काम केलंय. '

आर्मर्सचं डिझाईन कसं असावं याचा कसा विचार केलात?
'नाजूक आणि दिसायला सुंदर हे सगळ्यात महत्वाचं होतं. मग त्यासाठी मी माझा अभ्यास, जगभरातून पाहिलेले वेगळाले कपड्याचे प्रकार, इतिहास, ७०च्या दशकातल्या बॉलीवूड फिल्म्स मधली फॅशन हे सगळं मला आठवायला लागलं.  या सगळ्याचा उपयोग केला. तसं फ्युजन केलं. आपलं मणिपुरी, कथकलीचे पेहराव, राजस्थानी घागरा.... याला रोमन, आफ्रिकन, इजिप्तशियन डिझाईनची जोड दिली आणि हे काम प्रत्यक्षात उतरवलं. '

२००९ ते २०१२ पर्यंत त्यांचं  काम सुरु होतं. काम प्रत्यक्षात उतरल्यावर ते घातल्यावर कसं दिसेल हे बघणं आलं..... 
'त्यासाठी काही कलाकार मंडळींना ते आर्मर्स घालून बघायला दिले. ते डोक्यावर घातलं की मोकळं वाटत नाही हे समजलं. मग परत तशा सुधारणा केल्या. हे कपडे घालून काहीजणींना शिवाजी पार्क, जुहू, एशिएटिक लायब्ररी अशा काही ठिकाणी फिरवलं. बॉडी प्रोटेक्शन बरोबरच सिटी प्रोटेक्शन ही कल्पना घेऊन भारतमाता इथे उभं राहून आज लुप्त होणारी चाळ संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न केला.   '

त्यांची ही आगळी वेगळी कल्पना खूप उचलली गेली. त्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला. व्हेनिस बीएनालेमध्ये तर लंडनला राहणारे जगप्रसिद्ध शिल्पकार अनिश कपूर यांनी त्यांच्या या कल्पनेला खूप दाद दिली. 
मनीषा सोमण

Top Features

 

Feature 1

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 2

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 3

मुक्काम बिष्णुपुर !

अधिक वाचा

Feature 4

पुनर्जन्म !

अधिक वाचा

Feature 5

मुक्काम शांतिनिकेतन !

अधिक वाचा
12345678910...