Enquire Now

Request A Quote

कोण हे जहांगीर निकोल्सन ?

मागच्या ४-५ दशकांत मुंबईतल्या चित्रकलाविषयक कार्यक्रमांच्या स्थळी कोट घातलेली एक बुटकीशी, बारकीशी आणि कृश व्यक्ती कुठलाही बडेजाव न बाळगता लगबगीने धावपळ करताना दिसायची. विशेषतः एन.सी.पी.ए. , एन. जी. एम. ए किंवा जहांगीर आर्ट गॅलरी या ठिकाणी ती व्यक्ती अतिशय मोकळेपणाने वावरताना दिसायची. त्यांच्याविषयीची उत्सुकता जेव्हा वाढली तेव्हा विचारणा केल्यावर कळले की ते मुंबईचे शेरीफ प्रख्यात कलासंग्राहक जहांगीर निकोल्सन. त्यांची पहिली ओळख ही अशीच झाली. गायतोंडे प्रदर्शनामुळे त्यांचा कलासंग्रह प्रकाशझोतात आला आहे. म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचा हा परिचय करून देणारा हा विशेष लेख. 


तब्बल सात दशकांपूर्वी श्री जहांगीर निकोल्सन यांनी कलासंग्रह करण्यास सुरवात केली. तो संग्रह आता जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकांसमोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या, जहांगीर निकोल्सन गॅलरीत नुकतेच सुरु झालेले सुप्रसिद्ध चित्रकार व्ही.एस.गायतोंडे यांच्या प्रदर्शनातील अनेक चित्र श्री जहांगीर निकोल्सन यांच्या संग्रहालयातील आहेत. 

जहांगीर निकोल्सन हे काही स्वतः कलाकार नव्हते किंवा त्यांच्या घराण्यात कला संग्रहाची आवड चालत आली होती असं ही नाही. मग कला किंवा कला संग्रह यातील काहीच पार्शवभूमी नसतांना, कापसाचे व्यापारी म्हणून मुंबईत सुप्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर निकोल्सन यांना कला संग्रहात कशी रुची निर्माण झाली? हे सांगण्यासाठी ते स्वतः आज नसले तरी  जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांचे विचार पुढील पिढयांपर्यंत  जात आहेत आणि जाणार आहेत. 

कला संग्राहक म्हणून त्यांचा प्रवास कसा सुरु झाला याबद्दल सांगताना त्यांनी म्हटले आहे.... " I bought art because it did something for my soul. I never thought of it in terms of value appreciation.'   ..... 'कोणी मूल्यमापन करावं किंवा कौतुक करावं म्हणून काही त्यांनी कला संग्रह केला नाही तर आत्मशांतीसाठी ते चित्र विकत घेऊ लागले.' 
त्यांच्या पत्नी दीनाच्या  निधनानंतर एकटेपणाची पोकळी भरून काढण्यासाठी  ते चित्रकलेत रस घेऊ लागले आणि त्याच काळात....म्हणजे १९६८साली, ताज आर्ट गॅलरीमधून तब्बल ६००रुपयांना शरद वायकुळ यांचं 'द सिनरी '  हे पाहिलं चित्र विकत घेतलं. त्या चित्रापासून सुरवात झालेल्या त्यांच्या संग्रहात आज ८०० चित्रं आहेत. या चित्रांनीच त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. दुःख आणि निराशेतून बाहेर येण्यासाठी चार विरंगुळ्याचे क्षण दिले. 

चित्रांच्या जगात मिळालेल्या  मनःशांतीमुळे ते यात अधिकच गुंतत गेले. केमोल्ड आणि  पंडोल आर्ट गॅलरीना ते नेहमी भेट देऊ लागले. यातून त्यांचा कला आणि कलाकारांशी संपर्क वाढू लागला. 

चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठा यांच्याशी त्यांची चांगलीच मैत्री जुळली. त्यांनींच मग पुढे अकबर पदमसी, तय्यब मेहता, एम.एफ.हुसैन, क्रिशन खन्ना,एस. एच. रझा यासारख्या कलाकारांशी त्यांची ओळख करून दिली. श्रेष्ठाच्या सांगण्यावरूनच त्यांनी विविध स्टुडिओजना अगणित वेळा भेटी देऊन  अनेक प्रख्यात कलाकारांशी मैत्री केली.  त्यातूनच त्यांची कलेविषयीची रुची आणि अभ्यास वाढू लागला. उत्तम कला आणि कलाकारांच्या शोधात ते भारतभर फिरले. त्यामुळेच त्यांच्या संग्रहात श्रेष्ठ  कलाकारांच्या मास्टरपीसेसची  भर पडू लागली. राम कुमार, वासुदेव गायतोंडे,सुझा इत्यांदीची माईलस्टोन समजली जाणारी चित्रं देखील त्यांच्या संग्रहात जमा झाली आहेत. 

अशी विविध काळातील जवळपास  २५० हून अधिक चित्रकारांची ८०० हून अधिक चित्रं त्यांच्या संग्रही आहेत. चित्र आणि चित्रकार या विषयाने झपाटलेल्या या माणसानं शेवटच्या श्वासापर्यंत..... २००१साली वयाच्या ८६व्या वर्षी त्यांचं निधन झालं.... तो पर्यंत ही  चित्रं  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून गॅलरी सुरु करण्यासाठी जीवाचं रान केलं. मुंबईत त्यासाठी जागा मिळावी यासाठी सरकारी-दरबारी खेटे घातले. पण ते अपूर्ण स्वप्न उराशी घेऊनच त्यांना हे जग सोडावं लागलं. 

त्यांनी घेतलेल्या या ध्यासाची परिणीती म्हणजे....जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशन...त्यांच्या खाजगी संग्रहातील  चित्रं,छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात, २००८साली सुरु झालेल्या जहांगीर निकोल्सन गॅलरीत पाहावयास मिळतात. 
एक सर्वसामान्य व्यापारी ते कलेचा चाहता,अभ्यासक ,संग्राहक असा प्रवास करणाऱ्या  जहांगीर निकोल्सन यांचा ध्यास आता जहांगीर निकोल्सन गॅलरीच्या स्वरूपात कायम लोकांसमोर राहणार आहे.  

मनीषा सोमण

Top Features

 

Feature 1

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 2

मुक्काम सुंदरबन !

अधिक वाचा

Feature 3

मुक्काम बिष्णुपुर !

अधिक वाचा

Feature 4

पुनर्जन्म !

अधिक वाचा

Feature 5

मुक्काम शांतिनिकेतन !

अधिक वाचा
12345678910...