Enquire Now

Request A Quote

पत्रकारितेतून चित्रकारितेत !

प्रकाश बाळ जोशी हे मुळचे पत्रकार .काळ्या शाईने रेखाटनं करता करता ते  कधी  तरी कॅनव्हासकडे वळले आणि कॅनव्हासमयच झाले. पत्रकारितेतून चित्रकारिता असा बदल  अगदी पन्नाशीत केल्यावर देखील ते आता या नव्या क्षेत्रात चांगलेच स्थिरावले आहेत. आज मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांच्या मूळ मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध होतो आहे तर उद्या विलेपार्ल्यात आर्ट यार्ड संस्थेतर्फे त्यांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम होत आहे, त्या निमित्ताने ..... 

प्रकाशला फोन केला किंवा त्याचा आला का  पाहिलं त्याला विचारावं लागतं की ' अरे बाबा , तू आहेस कुठे ? भारतात की परदेशात ?'  मग तो छानसं हसतो आणि सांगतो ' न्यूयॉर्क मध्ये आहे ' किंवा ' फ्रान्स ' मध्ये किंवा ' इटली ' मध्ये आहे, किंवा पोर्तुगल , नेदरलँड , टर्की झालंच भूतान बितांन अशी काहीही नावं तो सांगतो .

 टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे तो आपल्या अगदी शेजारच्याच घरातून बोलतो आहे की काय ?  थापा तर मारत नाहीये ना ? ' असेही विचार आपल्या मनात येऊ शकतात. पण ते तसं नसतं .  एक तर तो थापा मारणारांच्या जातकुळीतला  नाहीये  आणि दुसरं म्हणजे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक  घटना तो आपल्या मित्र वर्तुळाशी व्हाट्सअप , ट्वीटर , फेसबुक द्वारे वेळोवेळी शेअर करीत असतो. साहजिकच  तो जे म्हणतो आहे ते कुणालाही ताडून पाहता येतं. दुसरं म्हणजे  त्याचं मित्रवर्तुळ हे प्रचंड मोठं आहे. 

त्यात तो पत्रकारितेत होता , तेही टाइम्स सारख्या वृत्तसमूहात , तेही संपादकीय विभागात . त्याची माझी ओळख पत्रकारितेमुळेच झाली . ऐशीच्या दशकात बिहार प्रेस बिलाच्या विरोधात मुंबईत पत्रकारांचा एक मोठा मोर्चा निघाला होता. मीही तेव्हा पत्रकारितेतच होतो साहजिकच मीही त्या मोर्च्यात सामील झालो होतो . त्या मोर्चातच आमची पहिली गाठभेट झाली . 

तेव्हा मुंबई आजच्या सारखी आक्राळ विक्राळ वाढलेली नव्हती , पत्रकारिता देखील आजच्यासारखी  एव्हडी विस्तारलेली नव्हती , साहजिकच फिल्डमधल्या  लोकांचा ट्रॅक ठेवणं फारसं कठीण नव्हतं . त्यामुळे पहिल्या भेटीतच  मी त्याला " तू चित्रं बित्रं कशी काय काढतोस असं विचारून चकित करून टाकलं  होतं . तर  त्यावर त्याने देखील  मला जेजेमधूनच  थेट पत्रकारितेत कसा काय आलास असा प्रश्न विचारून थक्क  करून टाकलं होतं. 

त्यानंतर मग  या ना त्या निमित्तानं अधनं मधनं आमच्या भेटी होतंच राहिल्या . कधी पत्रकार संघात , तर कधी कॅपिटल सिनेमा खालच्या आदर्श उपाहारगृहात . किंवा झालंच तर जहांगीर मध्ये किंवा आर्टिस्ट सेंटर मध्ये देखील आम्ही भेटत असू . अनेकदा आर्टिस्ट सेंटर मधून चहा प्यायला उतरलं का तिथं जवळपास तो हटकून भेटायचाच . बाँम्बे युनियन ऑफ जर्नालिस्टचं काम तो पाहत असल्यानं बहुदा तो त्या परिसरात भेटत असावा असं नंतर एकदा त्यानंच मला सांगितलं होतं.  

नंतर त्यानं त्याच्या रेखाचित्रांचं प्रदर्शन आर्टिस्ट सेंटर मध्ये भरवलं होतं . त्यावेळी बहुदा चित्रकार आरा सेंटरचे सचिव होते . आरांचे आणि पत्रकारांचे छान जमायचे . साहजिकच त्यांची आणि प्रकाशची मैत्री झालं झाली नसती तर नवलच ठरले असते . याच काळात आरांनी  प्रकाशला चित्रकलेचं बाळकडू पाजलं असावं असा माझा समज आहे . पण त्यानंतर कधीही प्रकाश भेटला की चित्रांविषयी चित्रकलेविषयी विचारत राहायचा. पण नंतरच्या काळात त्याचा एक लेख संग्रह आमच्याच एका जुन्या  पत्रकार मित्राने कपिल पाटील याने प्रसिद्ध केला. ' गेटवे ' नावाचा. त्यात त्याने लिहिलेले लेख प्रसिद्ध केले होते आणि त्यासोबत त्याची चित्रं देखील . अतिशय छान पुस्तक होतं ते.
 
तेव्हा मी मुलुंडला राहत होतो. प्रकाशही मुलुंडला राहायचा ,साहजिकच कुठे नाही तर स्टेशन किंवा ट्रेन मध्ये त्याची भेट अगदी हमखास व्हायचीच. त्याच्याशी मैत्री जुळण्यात या अनेक धाग्यांसोबत तो  मराठी सरस्वतातली एक अत्यंत विक्षिप्त वल्ली असलेल्या रॉय किणीकरांचा जावई होता हे देखील कारण होतंच. किणीकर यांच्याविषयी  लहानपणापासूनच मी खूप खूप वाचून होतो . आणि मग या क्षेत्रात प्रवेश केल्यावर त्यांचे एकाहून एक अफलातून किस्से ऐकून ऐकून मी तर त्यांचा कट्टर चाहता झालो होतो .(  पण इतकं सारं असूनही राजा रविवर्मा प्रकरणात त्यांनी जे काही आपल्या उतुंग प्रतिभेनं रचून ठेवलं होतं त्याचा रहस्यभेद करायला देखील मी मागेपुढे पाहिलं नव्हतं . पण ते पाहायला मात्र रॉय किणीकर नव्हते , आणि  असते तर त्यांनी माझी पाठ नक्कीच थोपटली असती याची मला खात्री आहे . असो .  त्याविषयी नंतर कधीतरी लिहिनच. ) हे सगळं असं अधनं मधनं चाललं असताना एके दिवशी तो माझ्या प्रदर्शनाला आला. खूप वेळ थांबला .चौकसपणाने  अनेक प्रश्न विचारत होता. जाताना म्हणाला तुझ्या स्टुडियोत येऊ का, काम आणि स्टुडियो बघायला ? म्हटलं ये. अवश्य ये. 

ठरवून तो एकदा आला. खूप वेळ बसला. त्याचे असंख्य प्रश्न होते. मी मला जमतील तशी त्यांची उत्तर देत होतो . त्याला माझा स्टुडियो तिथलं वातावरण एकूणच  खूप आवडलं  होतं . म्हणाला मीही पेंटिगला सुरुवात केली आहे . हे पत्रकारिता वगैरे आता खूप झालं . मला आता निवृत्त झाल्यावर सृजनात्मक काम करायचं आहे . थोडं थोडं काम सुरु देखील केलं आहे, जरा वेळ काढून बघायला येशील का? काय चुकतं आहे ते सांगशील का ? वगैरे. म्हटलं नक्की येईन. जाताना मी त्याच्या हातात कोऱ्या ड्रॉईंग पेपर्सची चवड दिली. आणि बहुदा ड्रॉईंग इंकची बॉटलसुद्धा. नंतर जेव्हा जेव्हा तो भेटायचा तेव्हा ' ते पेपर्स वापरतो आहे ' म्हणून आवर्जून सांगायचा 

मग एके दिवशी मी त्याच्याकडे गेलो . तर त्याने कुणाचा तरी फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि तिथं तो रोज येऊन पेंटिग वगैरे करीत होता . मोठे मोठे कॅनव्हास त्याने लावले होते . त्याचं तंत्र कसं पाळायचं वगैरे काही जुजबी सूचना मी त्याला केल्या . तर तो म्हणाला ' तुझ्या स्टुडियोत आल्यापासून माझ्यात खूप फरक पडला . खूप काही गोष्टी मला नव्याने कळल्या वगैरे . आता मी दिवसातले काही तास तरी स्टुडियोत असतोच असतो . नंतर म्हणाला तुझ्याकडून आल्यावर  तुझ्या स्टुडियोच्या  भेटीवर  मी माझ्या ब्लॉगवर एक लेख लिहिला आहे , २००६ किंवा २००७ साल असणार ते. तेव्हा मी काही एव्हडा कॉम्प्युटर सॅव्ही नव्हतो. त्यामुळे त्याने पाठवलेली लिंक मी वाचली असली तरी मी काही ती सेव्ह करून ठेवू शकलो नाही. आणि त्यात काय लिहिले होते ते मला आता आठवतही नाही. 

पण त्यानंतर मात्र तो चित्रकलाकडे अतिशय गंभीरपणे पाहू लागला असावा . कारण सतत  तो गॅलरीजमध्ये दिसू लागला. हौशी चित्रकारांच्या कोंडाळ्यात दिसू लागला. एकदा  मुंबईत त्यानं शो भरवला. आणि नंतर तर तो सुटलाच . टाइम्सच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर तर त्याने चित्रकलेवरच  संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. तरी पण तो  जवळ जवळ रोजच कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर चर्चेत दिसू लागला, त्यावर  एकदा मी त्याला खोचक प्रश्न विचारला देखील.  त्या नंतर मात्र त्याने हे वाहिनी प्रकरण देखील जुगारून दिलं . परवाच्या निवडणुकीच्यावेळी तर कुठल्याही वाहिनीच्या पॅनल डिस्कशनकडे तो फिरकला देखील नाही . 

आता तर तो सतत फिरतीवरच असतो की  काय असं वाटत राहतं . आज काय इकडे , उद्या काय तिकडे. हे इकडे तिकडे म्हणजे परदेशात बरं का!  कुठूनही परत आला का मग मात्र फोनवरून सर्व प्रवासातल्या गमती जमती तो आवर्जून सांगतो. आता पूर्वी सारखं  नियमित भेटणं होत नाही त्यामुळे फोनवरूनच आम्ही तासनतास गप्पा मारत बसतो. ख्याली खुशाली कळवतो . प्रकाशनं चित्रकलेच्या क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे यात शंकाच नाही.  एके दिवशी सहज कुतूहल म्हणून मी त्याला विचारलं तर म्हणाला. 'अरे मी फेसबुकचा खूप वापर करतो, व्हाट्सअप खूप वापरतो , ट्वीटर देखील खूप वापरतो. सतत अपडेट करत असतो. नव्या नव्या लोकांच्या संपर्कांत  देखील मी सतत असतो. मी पत्रकारितेत होतो त्याचा मला फायदा होतो नाही असं नाही , पण आधीचं सारं विसरून जाण्याची वेळ या नव्या माध्यमांनी आणली आहे यात शंकाच नाही . मलाही हे काही फारसं यायचं नाही, पण कुणी कुणी मला शिकवत गेलं आणि मी शिकत गेलो. अगदी माझ्या मुलाने मला शिकवलेला धडा मी विसरणार नाही . तो म्हणाला ' हे फेसबुक वगैरे विसरा , फक्त ट्विटर वापरा , उद्याचं माध्यम ते आहे . मी फक्त त्याच पालन करतो . काम तर सतत करतोच . नाहीतर या साऱ्याला काही अर्थच नाही . 

प्रकाशची ही भरारी ज्यांनी रीतसर कलाशिक्षण घेतलं आहे अशा अनेक मूळ चित्रकारांच्या असूयेचा विषय ठरलेली आहे आणि त्यामागचा कार्यकारणभाव जर ती संबंधित मंडळी  समजून घेणार नसतील तर ती तशीच राहणार आहे याविषयी देखील माझ्या मनात कोणतीच शंका नाही, अर्थात तो पर्यन्त प्रकाश खूप पुढे निघून गेलेला असेल याची मला १००%  खात्री  आहे. 

सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...