Enquire Now

Request A Quote

नग्नता : स्टुडिओतली !

विक्रांत भिसे आणि सिद्धी जाधव हे उभयता चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेतलेले . ते घेत असतांनाच त्यांना या क्षेत्रातल्या असंख्य त्रुटी जाणवू लागल्या. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षण पूर्ण झाल्यांनतर काम करण्यासाठी सुसज्ज स्टुडिओ न मिळणं, किंवा न्यूड पेंटिंग करायचं असेल तर मॉडेल्स न  मिळणं, वगैरे. मग त्यांनी ठरवलं यावर आपला उपाय आपणच शोधायचा आणि सुरु झाला सुसज्ज स्टुडिओचा उपक्रम. थोडेसे शुल्क मोजले का तिथं जागा तर उपलब्ध होतेच, मॉडेल्सही येतात आणि चित्रांवर मार्गदर्शन देखील मिळतं. ही कल्पना कला वर्तुळाने अक्षरश : उचलून धरली. खार तर "चिन्ह" ला त्यावर विशेष फिचर करायचं होतं पण तोवर सिद्धी जाधवचा फेसबुकवरचा लेख वाचला आणि ठरवलं हाच 'चिन्ह ' च्या वाचकांपुढं  सादर करायचा.  

जेव्हा मी पहिल्यांदा न्यूड मॉडेल ड्रॉईंग सेशनसाठी पाहिलं तेव्हा काही सेकंद मन धस्स झालेलं. परस्त्रीला निर्वस्त्र पाहाण्याचा असा हा पहिलाच अनुभव. काही वेळ काही सुचेचना. केवढ हे धाडस त्या समोरच्या व्यक्तीच ? धाडस म्हणावं की परिस्थिती  की  लाचारी? असे का आणि कसे  तयार होतात? खूप साऱ्या प्रश्नांनी काही काळासाठी माझं मन घेरलं होतं. 

काही क्षणांच्या त्या झटक्यानंतर जेव्हा मन चित्रात एकरूप होत तेव्हा समोरचं ते निर्वस्त्र शरीर एखाद्या आकाराप्रमाणे भासू लागत. त्यानंतरची तल्लीनता ही फक्त कॅनवास, रंग, मी आणि समोर असलेला आकार या मध्ये असते. समोरील नग्न शरीर आकार कधी होते समजतच नाही. भावना शून्य मन निर्वस्त्र शरीराकडे एक आकार म्हणून अभ्यास करू लागत. त्याचा रंग, पोत, आकार... त्यावरील लाईट, पर्स्पेक्टिव्ह  असे वेगवेगळे विषय हाताळत हुबेहूब कॅनव्हासवर उतरवण्याच्या प्रयत्नात असत. हा प्रवास खूप काही शिकवतो.

विक्रांत नेहमी म्हणतो चित्रकलेत लाईव्ह स्टडी हा खूप महत्वाचा विषय आहे. अगदी रिऍलिस्टिक पेंटिग, क्रिएटिव्ह 
 पेंटींग  ते ऍबस्ट्रॅक्ट  पेंटींग  पर्यंत. याची प्रचिती आता येतेय. मी फाईनची नसली तरी खूप साऱ्या गोष्टी विक्रांतच्या आणि इतर चित्रकार मित्राच्या सहवासात राहून कळू लागल्यात. असे लाईव्ह पेंटिंग स्टडी सेशन्स असायला हवेत; पण दुर्भाग्य हेच की असे पारंपरिक कला शिक्षण मुंबई महाराष्ट्रातच (प्रगतिशील) काय.. भारतातसुद्धा मिळणं कठीण होत आहे आणि होत राहील. हातावर मोजण्याइतक्याच संस्था असतील ज्या अशा दुर्मिळ कला शिक्षणाकरता कार्यरत आहेत. जो पर्यंत नग्नता या विषयावरून माणसांच्या कपाळावरच्या  आठ्या कमी होणार नाहीत मनातील विचारांतील 'नग्नता' निघणार नाही तो पर्यंत भारत - भारतीय कला विद्यार्थी अशा कला अभ्यासाला मुकला जाईल.

जसं डॉक्टरी-मेडिकल क्षेत्रात माणसाचं शरीर हे अभ्यासाचं विषय असत/ संशोधनाचा भाग असतो त्याप्रमाणे कलाकारासाठी सुद्धा ते तेवढच महत्वाचं असतं. जेव्हा डॉक्टर / मेडिकल स्टुडंट मानवी शरीराचा अभ्यास करतात  तेव्हा ते  त्या समोर असलेल्या शरीराचा अभ्यास करतात  तेव्हा ते  त्या समोर असलेल्या शरीराचा नग्न म्हणून विचार करून त्यांच्या भावनांचा उद्रेक करत नाहीत ते त्या शरीराकडे एक ऑब्जेक्ट एक अभ्यासाचा विषय म्हणून बघतात. नग्नता / अश्लीलता या  सर्वांच्या बियॉंड त्यांची मानसिकता गेलेली असते. आता हा समाज (मानसिक नग्न)  डॉक्टरांना सुद्धा सांगणार आहे का की कपडे न काढता ऑपरेशन करा म्हणून / तपासा म्हणून. नाही ना? मग हा विषय जेव्हा चित्रकार हाताळतात तेव्हा दुजा भाव का? तेव्हाच का समाजाची प्रतिष्ठा ढासळते. रूढी परंपरा यांवर गदा येते. क्षणात अश्लीलतेचा वारे वाहू लागतात. कारण  चित्रकारांच्या मनात नसणारे भाव हे समाजाच्या डोक्यात डोकावू लागतात. समाजाच्या मनातील 'नग्नता' या सगळ्याच्या आड येते. जसा डॉक्टरीमध्ये शरीराचा अभ्यास महत्वाचा आहे तसाच कलाकारांना सुद्धा तेवढच महत्वपूर्ण आहे. 

जेव्हा भारतातील न्यूड विषयीची नाराजीची २१ व्या शतकातील परिस्थिती पाहिली जाते तेव्हा भारतातीलच खजुराहो सारख्या मंदिरांची आठवण येते; जेथे आपल्याच पूर्वजांनी असे विषय सुंदरपणे स्थापत्य कलेद्वारे आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या मंदिरांवर साकारलेले आढळतात. मग भारत तेव्हा प्रगत राष्ट्र होता की आता आहे असा प्रश्न येतो. 

न्यूड ... न्यूड म्हणजे तरी नक्की काय? तर एखादी स्त्री किंवा पुरुष आपल्या अंगावरील संपूर्ण कपडे  काढून स्तब्ध पणे चित्रकाराने ठरवल्याप्रमाणे पोझ मध्ये तासानं तास बसून राहणे. आता असं कोण आणि का बसतं ? तर परिस्थिती. केवळ गरिबीमुळे त्यांना हा पेशा स्वीकारावा लागतो. बर यात काय ते गडगंज श्रीमंत होत नाहीत. चित्रकारांसाठी बसणाऱ्या मॉडेल्सना किमान ५-६ तासांचे फक्त ८०० - १००० रुपयेच मिळतात आणि तीच जर एखादी प्रायव्हेट संस्था असेल तर २००० पर्यंत दिले जातात. त्यांना पैशांपेक्षा इज्जतीमध्ये आणि चित्रकारांनी दिलेल्या सन्मानाची जास्त किंमत वाटते. प्रॉस्टिट्यूट, बार डान्सर या पेक्षा खूप इज्जतीच आणि भलं काम त्या करतायत याची त्यांना जाणीव असते; एक वेगळाच अभिमान आणि आनंद त्यांना मिळत असतो. त्यांना या कामात कसलीच लाज वाटतं नाही कारण समोरच्या चित्रकाराची नजर ही चित्रकारापेक्षा त्यांना जास्त समजते/ जाणवते.

जेव्हा त्यांना निवस्त्र होताना पाहते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेदना नसून समाधान असतं. खरंच त्यांच्या या धाडसाला सलाम ठोकावासा वाटतो.. चित्रकारांना तसंही कोणी विचारात नाहीत... सरकार असो व घरातले पण अशा व्यक्तींच्या योगदानामूळे चित्रकारांची चित्र - त्यांचा अभ्यास चालू राहण्यात विशेष हातभार लागतो. ते चित्र आणि चित्रकार जगवतात. पण दुर्देव असं की ज्यांनी कलाकारांसाठी - कलाक्षेत्रासाठी सर्वस्व अर्पण केलं मात्र त्यांच्या वाट्याला त्यांचं भावी उर्वरित आयुष्य अंधारात असताना भासतंय. या मॉडेल्सची भविष्याची काय वर्तमानाची सुद्धा काही तरतूद नसते. रोजच्या दिवसावर त्यांच पोट असत. कुठे सेशन असल्यावर त्यांना काम नाहीतर मग काहीच नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे बऱ्याच मॉडेल्सनी डान्स बार जॉइन केलेत. तरीसुद्धा या सगळ्या परिस्थितीत हजारो चित्रकारांनी/ विद्यार्थ्यांनी त्यांचे केलेले पोट्रेट आठवले.. त्यांनी केलेली चित्र आठवली की समाधानत्माक हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटत. सरत्या वयात या समाधानाशिवाय आणि तुटपुंज्या पैशांशिवाय त्यांच्याकडे काहीच राहत नाही. म्हातारपणाची अशी काहीच सोय ना आर्ट कॉलेज करत ना सरकार..  तसेच त्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढून करोडो कमावणारे, अवार्ड्स मिळवणारे सुद्धा औरच. यातून त्यांना असं वेगळं काहीच मिळत नाही.. एकंदर काय तर सगळ्या बाजूनी पिळवणूक. सगळं सहन करायचं ते आहे तो संसार चालवण्यासाठी. नवरा बेवडा.. पदरात दोन-दोन मुली.. शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही... न्यूड सेशनला आलेल्या मॉडेल्सशी गप्पा मारताना नकळत समोर आलेल्या वेदना.  वर वर सगळं छान सुरळीत वाटतं पण गाभा खूप खोल आहे.    

या सगळ्या परिस्थितीकडे पाहता कॉलेज वगळून अजून त्यांना कामं मिळावी.. थोडेफार का होईना काही पैसे गाठीशी यावेत या उद्देशाने विक्रांतने स्टुडिओवर न्यूड सेशन चालू  केले. याचा फायदा असाही झाला की ज्यांनी कॉलेज सोडून बरेच वर्ष लाईव्ह स्टडी केलेलं नाही अशांनी सेशन्स जॉईन करण्यास  सुरुवात केली. "खूप वर्षानंतर परत काम करायला मिळतंय.. रुळावरून उतरलेल्या गाडीला पुन्हा ट्रक वर आणायचा प्रयत्न सुरु झालाय.. आणि तुमच्या लाईव्ह स्टुडी मुळे आम्हाला खूप फायदा होतोय!" असं जेव्हा आम्हाला ऐकू यायला लागल तेव्हा केलेल्या प्रयत्नांच समाधान झाल्यासारखं वाटलं. प्रत्येक महिन्याच्या दोन रविवार खास या सर्वांसाठी आम्ही राखून ठेवलेयत. कलाकारांनी आणि कलाविद्यार्थ्यांनी यावं  मनसोक्त काम करावं.. कलेबाबत चर्चा.. विचारांची देवाणघेवाण करावी अशी प्राथमिक कल्पना आणि त्याच प्रत्यक्षात आलेलं रूप पाहून खूप उत्साह वाटतोय. तो संपूर्ण रविवार कसा संपतो हे समजतच नाही. तसेच कला विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आपला हक्काचा असा स्टुडिओ त्यांना मिळालाय.. कॉलेज व्यतिरिक्त आपली हक्काची अशी जागा म्हणजे आमचा स्टुडिओ झालाय. 

आता हळू हळू कानावर येऊ लागलंय कि काही कला संस्थासुद्धा असे न्यूड सेशन्स सुरु करण्यास उत्सुक आहेत तेव्हा एका वेगळ्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रचल्याचा आनंद मनाला समाधान देऊन जातो. ज्या विषयाकडे एवढे वर्ष दुर्लक्ष केले गेले त्याची गरज उशिरा का होईना पण समजली याच समाधान वाटत. शेवटी काय तर कलाकार त्याच काम सतत करत राहणार.. फक्त गरज आहे ती (भारतीय समाजाने)  त्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्याची.
सिद्धी जाधव

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...