Enquire Now

Request A Quote

हे माझं कर्तव्य आहे !

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट तर्फे दिल्या जाणाऱ्या माया कामत मेमोरियल अवॉर्ड्स २०१८ चा  सर्वोत्कृष्ट व्यंगचित्राचा  पुरस्कार मुंबईच्या प्रशांत कुलकर्णी यांना  सुमारे दोन महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आला होता.  सदर निवड समितीत प्रख्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते  गिरीश कार्नाड यांचा समावेश होता . तो पुरस्कार उद्या ६ जुलै रोजी म्हैसूर येथे प्रदान केला जाणार आहे. त्या निमित्तानं व्यंगचित्रकलेबाबत श्री प्रशांत कुलकर्णी यांना लिहावयाची विनंती केली होती. तोच हा लेख.  

जगभरात राजकीय व्यंगचित्रं अनेक प्रकारे काढली जातात. व्यंगचित्राची मनोधारणा, त्याची वैचारिक जडणघडण, त्याच्यावर झालेले चित्रकलेचे संस्कार, राजकीय - सामाजिक - आर्थिक विषयाचं त्याचं आकलन आणि त्याची प्रतिभा या साऱ्यांच्या मिश्रणातून त्याची व्यंगचित्रं आकाराला येत असतात. त्यातूनच व्यंगचित्रकाराची शैली निर्माण होत असते. प्रख्यात राजकीय व्यंगचित्रकार लक्ष्मण अबू अब्राहम, ओ. व्ही. विजयन, ठाकरे, उन्नी यांची उदाहरणं देता येतील. या सर्व प्रतिभावान व्यंगचित्रकारांची शैली भिन्न असली तरी ते प्रभावी राजकीय भाष्य करतात. 

मी जवळपास पस्तीस वर्षांपासून व्यंगचित्रं काढतोय. व्यंगचित्रकलेतील बहुतेक सर्व उपप्रकार मी थोड्या बहुत फरकाने हाताळले आहेत. रोजचं  पॉकेट कार्टून, दिवाळी अंकातील हास्यचित्रं मालिका, अर्कचित्रं, रेखाटनं, कॉमिक स्ट्रिप्स आणि मोठी राजकीय व्यंगचित्रं हे सर्व प्रकार मी माझ्या परीने हाताळले आहेत आणि त्यात मी सतत प्रयोग करून वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे , करतही असतो. 

राजकीय व्यंगचित्रामध्ये माझ्यावर बऱ्याच अंशी कुणाचाही प्रभाव नाही, असं म्हटलं तरी चालेल. माझी चित्रं, म्हणजे कल्पना आणि रेखाटनं, ही वेगळ्या  धारणीची असतात. अर्थात हे ठरवून  झालेलं नाही, आपोआप झालंय. सुचतानाच ती वेगळ्याप्रकारे माझ्यासमोर उभी राहतात. त्यातही माझा कल हा प्रयोग करण्याकडे असल्याने नव्या नव्या मार्गाने मी भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे सिम्बॉल्सचा वापर करून व्यंगचित्र साकारणे, त्यातूनच काही राजकीय -सामाजिक भाष्य करता येतं का ते पाहणे. 

याबाबत पहिलं मोठं उदाहरण द्यायचं तर ते १९९६ सालच्या शिवसेना भाजप सरकारच्या काळातल्या एका प्रसंगाचं देता येईल. ते प्रकरण म्हणजे 'रमेश किणी ' प्रकरण. या प्रकरणामुळे एरवी आक्रमक असणारी शिवसेना अचानक माघारी गेली. दादरसारख्या मराठी भागातून एका कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाचा संशयास्पद मृत्यू होणं हे मराठी माणसाला अस्वस्थ करणारं होतं. या पार्श्वभूमीवर ती बातमी मी पुन्हा पुन्हा वाचत होतो. त्यातल्या एका ओळीवर माझं लक्ष केंद्रित झालं. ती ओळ होती " रमेश किणी हे पुण्याच्या अल्का थिएटरमध्ये मृतावस्थेत सापडले. त्यावेळी अलका थिएटरमध्ये 'ब्रोकन अँरो' हा इंग्रजी चित्रपट  सुरु होता."  ब्रोकन अँरो  म्हटल्यावर मला बाण दिसला, त्यांनतर धनुष्य, आणि धनुष्य बाण ही शिवसेनेची निशाणी दिसली. मी लगेचच धनुष्य रेखाटलं, बाण मोडलेला दाखवला, त्याच्या टोकाला रक्त लागलेलं दाखवलं. कारण प्रकरण संशयास्पद मृत्यूचं होतं. त्यानंतरचं काम खूप जोखमीचं होतं जे मी खूप खुबीने दाखवलं कारण मला ते बटबटीत न करता सुचकतेने करायचं होतं. मी मथळा (कॅप्शन ) दिलं "ब्रोकन अँरो - एक खळबळजनक मराठी भयपट !" ( या व्यंगचित्रातला हा बाण मोडलेला असला तरी तो योग्य जागी लागला. कारण पुढे राज आणि बाळासाहेब या दोघांनीही या व्यंगचित्राची प्रत्यक्ष भेटीत खूप तारीफ केली !) 

अशा रितीने सिम्बॉल्सचा वापर करून अनेक चित्रं काढली. राजकीय पक्षांची चिन्ह आणि त्या पक्षाचे नेते यांच्यात काही साम्य आहे का ? हे शोधत गेलो आणि त्यातून काही गंमतीदार, धक्का बसणारी चित्रं साकारली. 

१९९८ साली अणुबाँबची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर भारताची ओळख आता अध्यात्मा ऐवजी अणुबॉम्बधारी अशी होणार हे जाणून त्या चिन्हांचा व्यंगचित्रात वापर केला. मुंबईतल्या गिरणी कामगार नेत्याचा खून होऊन दहशतीच्या वातावरणात संपूर्ण चळवळच संपण्याचं कारस्थान सुरु झालं. त्यावेळी त्यांच्या युनियनच्या चिन्हाचा, लोगोचा वापर करून रक्तरंजित वर्तमान दाखवणारं व्यंगचित्रं काढलं होतं. 

रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात काढलेल्या पुरस्कार प्राप्त व्यंगचित्राच्या संदर्भातही असंच काहीसं सांगता येईल. गव्हर्नरनी अचानक दिलेला राजीनामा आणि त्या सुमारास देशाच्या अनेक अभयारण्यात होणारे वाघांचे अनैसर्गिक मृत्यू यांची सांगड मनात आपोआपच ( व्यंगचित्रकाराची तिरकस विचार करण्याची क्षमता) घातली गेली आणि एकप्रकारे रिझर्व्ह बँकेचे हे खच्चीकरण आहे का अशा आशयाच्या चर्चा, लेख, बातम्यांचा प्रभाव मनावर होऊ लागला. त्यातूनच बँकेच्या लोगोमधूनं वाघाने बाहेर पडणं हे स्वाभाविकपणे डोळ्यासमोर आलं. त्या खालची कॅप्शन मात्र मुद्दामच चित्राला उघडपणे मदत होणार नाही अशी ठेवली. कारण काही गोष्टी वाचकांवर, त्यांच्या समजुतींवर सोडून द्यायच्या असतात. त्यामुळे चोखंदळ वाचकांना जास्त गंमत वाटते व ही क्रिया अधिक बौद्धिक होते असं मला वाटतं. 

समाजातील अनेक चाली, रूढी, समजुती, परंपरा, चिन्ह, प्रतिकं यांचं वेळोवेळी लेखापरीक्षण करणं हे विचारवंतांचं, कलावंतांचं, शास्त्रज्ञांचं कामच असतं. अशा अनेक प्रतिमा, चिन्ह यांची व्यंगचित्रात प्रसंगी मोडतोड करून त्या अनुषंगाने सत्य सांगणं, भाष्य करणं  हे व्यंगचित्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे असं मी मानतो.
प्रशांत कुलकर्णी

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...