Enquire Now

Request A Quote

राजभवनात कलाउत्सव !

महाराष्ट्रातल्या व्यक्तिचित्रण करणाऱ्या काही कलावंतांना अलीकडेच तब्ब्ल आठवडाभर लखनौच्या राजभवनाचा पाहुणचार घेण्याची संधी मिळाली होती. ललित कला अकादमी दिल्ली आणि लखनौच्या ललित कलाच्या प्रादेशिक केंद्राने एका कार्यशाळेच्या किंवा शिबिराच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित केला होता. राजवाड्यासारख्या भव्य आणि विशाल राजभवनात दस्तुरखुद्द राज्यपालांच म्हणजे श्री राम नाईक यांचं व्यक्तिचित्र काढणं हा एक अनोखा अनुभव होता. त्याविषयी सांगता आहेत त्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 'मंजिरी मोरे'. 

नबाबी राजवटील्या खाणाखुणा अजूनही अंगाखांद्यावर खेळवणारं.....  .आदरातिथ्य हा ज्या संस्कृतीचा स्थायीभाव आहे असं लखनौ......तिथल्या वैभवाची चुणूक ठायी ठायी दिसत असतानाच, अचानक भव्य प्रवेशदाराशी येऊन पोहोचल्या आणि चित्रकार मंजिरी लखनौमय झाल्या.  लखनौच्या राजभवनात केवळ पाच दिवसांसाठीच्या पेंटिंग कार्यशाळेसाठी गेलेल्या मंजिरीं  यांनी आयुष्यभर पुरून उरेल इतका अनुभव गाठीशी बांधून आणला आहे .... काय होती ही कार्यशाळा ? तिथे त्या कशा पोहोचल्या? त्याचा अनुभव कसा होता? हे सगळे प्रश्न मनात घोळवतच त्यांच्यापर्यंत पोहोचले.    

गप्पांची सुरवात ही कार्यशाळा  नक्की काय होती ? हे जाणून घेण्यापासून होणं स्वाभाविकच होतं..... 
" ललित कला अकॅडमी आणि संस्कार भारती यांनी मिळून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. राम नाईक तिथले राज्यपाल आहेत. त्यांच्यामुळे  तिथे जाण्याची संधी मिळाली, पाचारणे  सर ललित कलाचे चेअरमन झाल्यापासून त्यांनी खूप चांगले उपक्रम राबविले आहेत. त्यातलाच हा एक उपक्रम, आधी ललित कलाकडून कायमच अब्स्ट्रॅक्टमध्ये काम करणाऱ्याना प्रोत्साहन किंवा प्राधान्य  दिलं जायचं पण सरांनी पोर्ट्रेट काढणाऱ्यांनाही संधी दिली. कुंभमेळ्यातही  त्यांनी काही  पोर्ट्रेट आर्टिस्टना आवर्जून पाठवलं होतं. तसाच हा ही एक उपक्रम होता, जिथे मला जाण्याची संधी मिळाली  " 

पुढचा प्रश्न होता, तुमच्या बरोबर अजून कोण होतं ?

" पुण्यात आमचा काही  पोर्ट्रेट  आर्टिस्टचा ग्रुप आहे. आम्ही दर शुक्रवारी एकत्र भेटतो. त्या निमित्तानं रमेश भोसले यांच्याशी ओळख झाली होती. त्यांनी माझं नाव सुचवलं. आम्ही एकूण सात जण महाराष्ट्रातून गेलो होतो. मनोज सकले आणि नानासाहेब येवले मुंबईहून, मी, सुरभी गुळवेलकर  आणि उत्तम साठे पुण्याहून आणि सत्यजित वरेकर आणि मंगेश पाटील सांगलीहून. खूप छान ग्रुप होता आमचा आणि तिथे गेल्यावर अजून काही आर्टिस्ट आम्हाला जॉईन झाले. ललित कलेचं प्रादेशिक केंद्र आहे तिथे त्यांनी आमची सगळी व्यवस्था केली होती. पाचारणे सर तर होतेच बरोबर. "

तिथे काही तुम्हांला खास विषय दिले गेले होते? 
" हो अर्थातच,  पोर्ट्रेटसाठी दोन विषय होते, एक  म्हणजे मा. राम नाईक स्वतः आणि दुसरे संस्कार भारतीचे बाबा योगेंद्र. त्याच बरोबर राजभवन परिसरातले लँडस्केपही करायचे होते. "

कसा अनुभव होता तो ? 
" केवळ  अविस्मरणीय ! राजभवनाची भव्यता, तिथला आब,  त्या पार्शवभूमीवर मा.राम नाईक यांचा साधेपणा. आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रचंड उन्हाळा होता. म्हणजे संघ्याकाळी सात/साडेसात वाजून गेले तरी भट्टीत उभं केलेलं असावं इतकं प्रचंड गरम होत असे. पण तिथलं वातावरण  छान होतं, आमची यथायोग्य काळजी घेतली गेली. आम्हाला काम करायला ए.सी हॉलची व्यवस्था  होती, त्यामुळे कोणाच्याही कामावर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम झाला नाही. "

म्हणजे लँडस्केप करायला राजभवनाच्या परिसरात उभं राहण्याचा योग काही नव्हता तर.... कसा होता तो अनुभव? 

"माझा एक विषय होता चरैवती -चरैवती ... हे  श्री राम नाईक यांच्या आत्मचरित्राचं शीर्षक आहे... राजभवनाचं भव्य प्रवेशदार, दुतर्फा असणाऱ्या हिरवळीच्या मधून  तिथपर्यत पोहणारा वळणदार, देखणा रास्ता, प्रवेशदाराशी दूरवर उभा असणारा पट्टेवाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विचारमग्नतेत धीमी पावलं टाकणारे मा.राम नाईक.... तर दुसरा विषय होता कोर्टयार्ड.... राजभवनाच्या मागच्या बाजूला चारी बाजूनी लाल पायऱ्या आणि मध्ये संगमरवरी  चौक त्यामधे छोटंसं कारंज आणि भोवताली निगुतीनं लावलेली कुंड्यामधली झाडं.... हे दृश्य मला इतकं भावलं की ते चित्रात उतरल्याशिवाय राहवलं नाही. आणि प्रत्यक्ष राम नाईक यांचं  पोर्ट्रेट .... त्यांनी स्वतः  पोर्ट्रेटसाठी पोझ दिली. तेव्हाच तो थाट, सिक्युरिटी हे सगळंच माझ्यासाठी नवीन होतं. खूपच सुंदर अनुभव होता. " 

एरवी घरी काम करणं आणि तिथे काम करणं यात काय फरक होता?
"खूपच फरक होता . मुळात मी ऑइल पेंटिंग करते. अगदी आरामात दोन/तीन आठवडे घेऊन मी एक काम संपवते. पण तिथे आमच्याकडे एकूण पाचच दिवस होते. त्यातले दोन दिवस स्थिरावण्यात गेले. म्हणजे उरले तीन, त्यात तीन पेंटिग्ज करायची होती, म्हणून ऍक्रेलिकमध्ये काम करावं लागलं जे मला फारसं नाही आवडत. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा फरक होता. "

हेच काम तुम्ही ऑइलमध्ये केलं असतं तर?
"तर नक्कीच अजून छान झालं असत. ऑईलमध्ये जी टोनल रेंज असते ती मला जास्त आवडते. ऍक्रेलिक ज्या वेगानं ड्राय होतात त्याच्याशी मी नाही जमवून घेऊ शकत. मला ऑईलची प्रवृत्ती जास्त आवडते. ऑईलमध्ये जो मोकळेपणा जाणवतो ना तो अनुभवत काम करू शकले असते. तरी जे काम करायला मिळालं तो लाईफ टाईम अनुभव होता हे नक्की. "

ती चित्रं  कोणाला बघायची असतील तर?
"तर लखनौ ललित कलाच्या ऑफीसमध्ये जावं लागले. तिथे ही  पेंटिग्ज  ठेवली आहेत. तिथे तर राजभवनात आत्तापर्यन्तच्या सगळ्या राज्यपालांची  पेंटिग्ज  आहेत त्यात कदाचित आमच्यापैकी एकानं काढलेलं त्यांचं पोर्ट्रेट असेल....  "

ते  पोर्ट्रेट  मंजिरींनी काढलेलं असावं अशी त्यांची सार्थ अपेक्षा आहे. तिथे जाताना महाराष्ट्रातील एक व्यक्ती राम नाईक तिथले राज्यपाल आहेत, आणि तिथे जाऊन काम करायचं आहे इतकंच डोक्यात ठेऊन गेलेल्या मंजिरी जेव्हा परत आल्या तेव्हा... राम नाईक यांचं आत्मचरित्र वाचून मनात निर्माण झालेला त्यांच्या विषयीचा अभिमान आणि लखनौ राजभवनाची डोळ्यातच काय पण मनातही सामावायला कठीण असणारी भव्यता घेऊन आल्या.... 
मनीषा सोमण

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...