Enquire Now

Request A Quote

"नग्नता" रिचवणारी गायत्री

गायत्री मेहता गेले वीस वर्ष न्यूड्स विषयात काम करत आहेत. त्यांनी चित्रकारितेमधील कोणतेही अकॅडमिक शिक्षण घेतलेले नाही. बी .कॉम. झाल्यावर गुजराती साहित्यात एम.ए करून लेक्चरर म्हणून काही वर्ष काम केलं. मग इंटिरिअर डिझायनींगचा कोर्स करून तीस वर्ष याच व्यवसायात काम केलं. पण लहानपणापासून असणारी चित्रकलेची आवड त्यांना त्या क्षेत्राकडे घेऊन गेली. डॉ. बिंदू कुलकर्णी आणि जॉन  फर्नाडिस यांनी त्यांना चित्रकलेकडे वळण्यास प्रोत्साहन दिलं. जॉन फर्नाडिस हे गायत्रीच्या गुरु स्थानी आहेत. तर वासुदेव कामथ यांच्याकडूनही त्यांना मार्गदर्शन मिळालं आहे. १९९६ सालापासून त्या आर्ट सोसायटीशी संलग्न आहेत. २००२ साली त्यांनी आपल्या चित्राचं पहिलं प्रदर्शन भरविलं होतं तर २०१८ साली कबीराच्या पदांवर आधारित कबिराक्षरी म्हणून वेगळ्या विषयावरील पेंटिग्जचं प्रदर्शन भरविलं  होतं . 


माझी एक मैत्रीण जपानला राहते. तिथं निसर्गाच्या कुशीत लपलेली  ओनसेन म्हणून ओळखली जाणारी सार्वजनिक स्नानगृह असतात.  या ठिकाणी कोणीही जाईल त्याला संपूर्ण नग्न होऊनच पाण्यांत उतरावं लागतं.  ती पहिल्यांदा तिथं गेली तेव्हा तिला सगळ्यांसमोर दिगंबर अवस्थेत जाणं अगदीच विचित्र वाटलं होतं. पण सगळ्या वयाच्या स्त्रिया अगदी निःसंकोचपणे वावरताना बघून तिचीही भीड चेपली. एकूणच जगभरातील संस्कृतीचा विचार करता आपल्याकडे नग्नतेचा खूपच बाऊ केला जातो असं वाटतं . आणि त्यासाठी ज्या संस्कृतीचे दाखले दिले जातात ती आपली संस्कृती नग्नतेला कधीच बिभित्स मनात नव्हती हा विचारच आपण करत नाही. अजंठा वेरूळची शिल्प असतील किंवा खजुराहोची शिल्प असतील त्यातून नग्नतेतल जे सौंदर्य दिसत त्याची भुरळ जगभरातल्या महान कलाकारांनाही पडलेली आहे. मग आज आपण इतका संकुचित विचार का करतो हा प्रश्न उरतोच... आज एकविसाव्या शतकात चित्रकारांना न्यूड्स करण्यासाठी मॉडेल्स मिळणं कठीण जाताय या मागचं कारण काय आहे? अजूनही आपल्याकडे न्यूडसाठी मॉडेलिंग करणं हे अनैतिक मानलं जातं का? असे अनेक प्रश्न मनात होते. 

त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गायत्री मेहतांना भेटले. गायत्री पोर्ट्रेट आणि फिगरेटीव्हमध्ये काम करत असतांना त्यांच्या पेहरावाखालचा देह जाणून घायची उत्सुकता वाढली. जर मानवी देहाची सगळी वळणं, रेषा माहिती झाल्या तर  पोर्ट्रेट  करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल या हेतून त्यांनी न्यूड मध्ये काम करायला सुरवात केली. साधारण २०००सालापासून गेली १९वर्ष त्या सातत्यानं न्यूड्स करताहेत. या इतक्या वर्षाचा त्यांचा प्रवास कसा होता? त्यांना काय आणि कसे अनुभव आले? हे त्यांच्याचकडून जाणून घेतलं. 

तुम्हांला न्यूड विषयात कधी आणि कसा इंटरेस्ट निर्माण झाला?
" मला वाटतं  पोर्ट्रेट  करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला ऍनाटॉमी किंवा शरीरशास्त्र जाणून घ्यावंसं वाटतच असतं. डॉक्टरांसारखी हाडांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं नसलं तरी कुठल्या हाडाचा कुठं आणि कसा संबंध आहे हे कळलं तर चित्र अजून जिवंत होतं. शरीर सौष्ठव यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही  हे जेव्हा माझ्या लक्षात येऊ लागलं तेव्हा या विषयात मला काम करावंसं वाटू लागलं. "

शरीर सौष्ठवाचे काय मापदंड आहेत तुमच्यासाठी?
"शरीर सौष्ठव म्हणजे जाड किंवा बारीक किंवा उंच-बुटके शरीर नव्हे. तर शरीर सौष्ठव म्हणजे एक रिदम.... जो कलाकाराला आकर्षित करत असतो. ती वळलं त्या रेषा कलाकारांशी बोलू लागतात हे त्याच्यासाठी महत्वाचं असतं, हाताची बोटं हलवली तर त्याचा परिणाम पाठीच्या कण्यावर कसा होतो हे जेव्हा समजत आणि चित्रात उतरतं तेव्हा ते समाधान काही वेगळंच असतं. हातापायांच्या बोटांची टेन्शन आणि त्याचा मांडीशी किवा खांद्याशी असणारा संबंध हे सगळंच खूप सुंदर आहे. आणि हे फक्त मानवी देहाबद्दल नाही म्हणायचं तर अगदी कुत्र्या-मांजराचं शरीरही असच बोलत असतं.  मला वैयक्तिक दृष्टया नेहमी वाटतं की पोशाख घातलेली व्यक्ती चित्रात उतरवणं तुलनेने सोपं असत कारण त्याखाली सगळी वळणं, रेषा लपून जातात. हेच जर न्यूडमध्ये काम केलं असेल तर  पोर्ट्रेट  किंवा फिगरेटीव्ह करतांना पोशाख असतांनाही तुम्हाला हे बारकावे दाखवता येतील. जे कित्येक महान कलाकारांच्या कलाकृतीतून आपण बघतो. डेव्हिड किंवा व्हीनसच्या कलाकृतील अजरामर सौंदर्य  हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.  "

तुम्ही न्यूड्स मध्ये कधीपासून काम करता आहात?
"मी पहिल्यांदा न्यूड मध्ये काम केलं ते १९८७साली. त्यानंतर बरीच वर्ष नाही केलं. मग २००० सालापासून माझा जेव्हा या विषयातला अभ्यास झाला तेव्हा परत काम सुरु केलं. मग मी जेव्हा आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, ही  ऑपेरा हाऊसला असणारी १०२ वर्ष जुनी संस्था आहे, या संस्थेचीची सेक्रेटरी झाले तेव्हा तिथं न्यूड्समध्ये काम करण्याचा उपक्रम सुरु केला. आम्ही वर्गणी काढून ही सेशन करत असू.  त्यावेळी माझ्या नशिबाने प्रफुल्ला डहाणूकर प्रेसिडेंट होत्या त्यांनीही या उपक्रमाला चांगला पाठिंबा दिला. आज मी जरी संस्थेत काम करत नसले तरी हा उपक्रम अजून सुरु आहे.  "

तुमचा पहिला अनुभव कसा होता?
आर्ट सोसायटीमध्येच मी पहिल्यांदा १९८७साली या विषयावर काम केलं.  माझा पहिला अनुभव जरा विचित्रच होता. एक तर मला या विषयातलं फारसं काही माहिती नव्हतं. आम्ही जेथे काम करत होतो त्या आर्ट सोसायटीची जागा तशी लहान होती. माझ्याबरोबर आणखी एक जण काम करत होते ते गरम होतंय म्हणून चित्र काढायला शर्ट काढून बसले ते ही जरा ऑड वाटलं, शिवाय जी मॉडेल बसली होती ती साधारण माझ्याच वयाची मुलगी होती. त्या मुलीकडे बघून त्यावेळी विचार आला होता. काय बिचारी मुलगी आहे तिला पैशासाठी काय काम करावं लागतंय. आणि मग माझा यातला इन्टेरेस्टच संपला. "

परत कशा वळलात याकडे?
" नंतर जॉन फर्नाडिस यांची पैंटिंग्स बघून एक वेगळाच विश्व समजलं.  ना यात काही वाईट आहे किंवा ना ती मुलगी बिचारी होती हे कळलं आणि या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. पुढे अमेरिकेला गेले, रशियाला गेले, तिथे जास्त अभ्यास केला, तेव्हा या विषयातलं कुतूहल वाढलं. अमेरिकेला तर न्यूड मॉडेल म्हणून बॅले डान्सर येतात. त्याची बॉडी इतकी रिदमिक असते . ते बघून माझ्यातही वेगळी सौंदर्य दृष्टी आली. या विषयाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन मिळाला. मग मात्र मी कायम न्यूड मध्ये काम करत राहिले. आत्ता काही वर्षांपूर्वी रहेजा बंद होण्याआधी बांदेकर प्रिंसिपल असताना सलग २ ते ३ वर्ष न्यूडचं सेशन केलं होतं.  "

२०वर्षाहून अधिक काळ न्यूड्स मध्ये काम करताय, परदेशातही या कामाचा अनुभव घेतला आहात. २०वर्षांपूर्वी आणि आज न्यूड्समध्ये काम करण्यात काय फरक पडला आहे?
" खूपच. त्यावेळी या विषयाकडे आजच्या इतकं मोकळेपणांन बघितलं जायचं नाही किंवा मॉडेल्स ही सहजी मिळायच्या नाहीत. पण आज आपणहून न्यूड्ससाठी मॉडेलिंग करायला मुलं-मुली येतात. नाशिकचे एक प्रोफेसर आहेत ते आणि त्याचा भाचा स्वतःहून यायचे, पुण्याचा तापन म्हणून एक कॉलेजमध्ये शिकणारा बंगाली मुलगा तो ही आपणहून येऊ लागला. या मॉडेल्सना दिवसाचे १२००/१५००रु. मिळतात, ते पैशासाठी काम करतात. पण परदेशी जसं याकडे प्रोफेशन म्हणून बघितलं जातं तसं आजही आपल्याकडे नाही बघितलं जात. "

अजून आपल्याकडे लोक याकडे चांगल्या दृष्टीनं नाही बघत असं वाटतं?
"असं अजिबात नाही. बाहेर हे माहिती असायची गरज नाही पण आमच्यासाठी जे न्यूड मॉडेल्स म्हणून काम करतात त्यांना आम्ही खूप मान देतो. स्टुडिओ मध्ये कोणीही मोबाईल वापरत नाही. त्यांच्या कोणत्याही पोजला हसायचं नाही हा तर अलिखित नियमच आहे जो सगळे पळतातच. आराई आजी किंवा लक्ष्मी अम्माला इतके वर्षात  कोणीही कधीही वाईट वागणूक दिली नाही. म्हणूनच तर त्या स्वतःहून त्याच्या ओळखीच्या अजून मुलं-मुलींना मॉडेलिंगसाठी घेऊन आल्या ना! "

इतके वर्षातला एखादा अविस्मरणीय अनुभव?
"न्यूड सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं कल्याणी मुळे यासारख्या प्रतिभावान अभिनेत्रीशी ओळख झाली. इतकंच नाही तर माझ्या छोट्याशा स्टुडिओमध्ये त्यांनी आपणहून न्यूड मॉडेलिंग केलं . खूप गप्पा मारल्या, आमच्याकडून या विषयी खूप जाणून घेतलं आणि त्याचा सिनेमात उत्तम उपयोग केला. "

आणि वाईट अनुभव?
" तसं म्हंटल तर एकही नाही. नग्न मॉडेल्स बघताना मनातं वासना आली तर ते चित्र होणारच नाही. कारण तुमचा जो फोकस असतो तोच मुळात हलतो. आता हेच बघणं एखाद्या सफरचंदाचं चित्र काढत असतांना भूक लागलेय म्हणून ते सफरचंदच खाऊन टाकणं हा पर्याय असू शकतो का? नाही ना ? तसंच हे आहे हे. अगदी सांगायचंच तर फक्त एकदा असा अनुभव आलाय.  आर्ट सोसायटीमध्ये आम्ही लक्ष्मी अम्मा बरोबर काम करत असतांना एक साठीच्या वयाचे आर्किटेटक्ट गृहस्थ आले होते. आमचं काम सुरु असतांना ते उठले आणि लक्ष्मी अम्मा समोर उभे राहिले. त्यांना काय करताय विचारलं तर तिच्या पायाचा स्टडी करतोय म्हणाले. ते जवळ गेले म्हणून अम्मा ही अस्वस्थ झाली होती. तेव्हा त्यांना ठराविक अंतराच्या पलीकडे मॉडेल जवळ जायचं नाही म्हणून टोकलं होतं आणि न्यूड्सवेळी त्यांना प्रवेश बंद करावा लागला. हा एकमेव वाईट अनुभव.  " 

तरी अजूनही आपला समाज न्यूड्स स्वीकारत नाही असं वाटतं ?
" काही अंशी हे खरं आहे. हा इतका मोठा विरोधाभास आहे, ज्या समाजात अजंठा वेरूळ किंवा खजुराहो सारखी जगभरातल्या कलाकारांना प्रेरणा देणारी लेणी आहेत.  तिथं अजूनही ही परिस्थिती आहे." 

हा विचार कसा बदलेल?
" नग्नता ही आपल्या मनात आणि समोरच्याचा दृष्टीत असते हे जेव्हा पटेल तेव्हा हा विचारही बदलेल "
मनीषा सोमण

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...