Enquire Now

Request A Quote

कोण हे गायतोंडे ?

तरुण चित्रकार राजाराम होले यांना ते पुण्याच्या अभिनव कलामध्ये शिकत असतांना 'चित्रकार गायतोंडे' यांना भेटायचा ध्यास लागला. महाराष्ट्राच्या एका लहानश्या खेड्यातून पुण्यात शिकायला आलेल्या होले यांना तेव्हा धड हिंदी देखील नीटपणे बोलता येत नव्हतं. पण त्यांनी ठरवलं दिल्लीला जायचंच. त्यांचे शिक्षकही त्यांच्या पाठी उभे राहिले. होले गायतोंडे यांच्याकडे गेले खरे पण तोपर्यंत गायतोंडे दिल्ली सोडून दूर गुरगावकडे राहावयास गेले होते. तो ही पत्ता त्यांनी शोधून काढला आणि गुरगावच्या जंगलात गायतोंडे यांना ते  भेटायला गेले.  गुरगाव तोपर्यंत एवढं सुधारलं नव्हतं. होले दोन -तीन वाहनं बदलून होले गायतोंडे यांच्या घराजवळ पोहोचले. मनात नसेल तर चित्रकार हुसेन यांच्यासारख्या मित्राला देखील दारातून हाकलून देणारे गायतोंडे होले यांना भेटले का ? दुसऱ्या भागात अवश्य वाचा.   

शेवटी गायतोंडे सर दार उघडून बाहेर आले आणि मी कुठून, कसा आलो वगैरे चौकशी करायला लागले.  त्यांनी विचारलं की कॉलेजमध्ये आहेस का?  मी हो म्हटलं.  मला काय बोलावं आणि काय नाही तेच कळत नव्हतं.  मला सरांनी आधीच सांगितलं होतं की तू फार काही बोलू नकोस.  त्यांनाच बोलू दे.  आपण काही प्रश्न करायचे नाहीत.  तुला काय करायचं आहे ते सगळं अजिबात बोलायचं नाही.  त्यांना तू त्रास द्यायचा नाही.  त्यामुळे मी बोलायचं टाळत होतो.  पण गायतोंडे सर मला विचारत होते म्हणून मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होतो.  मग मी त्यांना सांगितलं की मी प्रबंध लिहित आहे.  
 
एक मुलगा इतक्या लांबून मला भेटायला येतो याचं त्यांना इतकं अप्रूप वाटलं होतं.  दुसरा एखादा नामांकित कलाकार असता तर त्याने असं स्वतः घराबाहेर येऊन अनोळखी मुलाशी बोलण्याचे कष्ट घेतले नसते.  मग मी त्यांना सांगितलं की मी त्यांच्यावर प्रबंध लिहित आहे.  त्यासाठी असा असा अभ्यास करत आहे.  ते माझ्याशी व्यवस्थित बोलले.  साधंच बोलणं झालं.  मला काही चित्रांचा वगैरे विषय काढायचा नव्हता.  त्यांनी कुठून आलास विचारलं.  मी म्हणलो, “मी राजाराम होले.  पुण्याहून आलो आहे.  अभिनव कला महाविद्यालयात दुस-या वर्षाला आहे.  मी पुस्तकात तुमच्याविषयी वाचलं.  मला तुमच्याविषयी खूप आपुलकी निर्माण झाली म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो.”  त्यांना इतका अचंबा वाटला.  एक कॉलेजचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी इतक्या दूरवर येतो आणि त्याला धड नीट बोलताही येत नाही. 

मग मी त्यांना सांगितलं की त्यांच्यासाठी एक भेट आणली आहे.  मी गीतेचं पुस्तक त्यांच्या हातात ठेवलं तर ते इतके खुश झाले, इतके खुश झाले की त्यांना काही सुचेच ना.  त्यांनी मला छातीशी कवटाळून धरलं.  माझ्या डोळ्यांना तर पाण्याची धारच लागली.  आजही तो प्रसंग आठवला की गहिवरून येतं.  अनेक जण भेटायला येताना वेगवेगळ्या भेटी घेऊन येतात.  पण या कॉलेजच्या मुलाने माझ्यासाठी गीता आणली याचं त्यांना खूपच कौतुक वाटलं.  त्यांनी मला कवटाळून धरलं होतं.  त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.  मी त्यावेळेस काढलेले त्यांचे हसरे फोटो  माझ्याकडे आहेत.  

मी धडाधड त्यांचे फोटो काढले.  मला काहीच सुचत नव्हतं.  बाहेर गेटवर वॉचमन उभा होता.  तो आम्हा दोघांकडे बघत होता.  आम्ही दोघे गेटच्या बाहेर उभे होतो आणि आनंदामुळे मला काहीच सुचत नसल्यामुळे माझ्या हालचाली अतिशय वेगाने होत होत्या.  मी असा भराभर बोलतो आहे, त्यांच्या पाया पडतो आहे, त्यांना काहीतरी भेट देतो आहे.... तो वॉचमन दूरवर उभा राहून ते सगळं बघत होता.  मग मी त्यांना म्हटलं की मला माझ्या प्रबंधासाठी या पुस्तकावर सही द्याल का?  त्यांनी एका पुस्तकावर सही केली.   ते म्हणाले फोटो पण काढ.  पण तिथे आमचा फोटो काढण्यासाठी इतर कोणीच नव्हतं.  त्यावेळेस मला त्यांच्यासोबत फोटो काढता आले नाहीत पण मी त्यांचे मात्र भरपूर फोटो काढले.  आणि प्रबंधात लावण्यासाठी म्हणून मी पेपर आणि पुस्तकांवर त्यांच्या सह्या घेतल्या. 

मला ब-याच जणांनी सांगितलं होतं की ते तुला घरातच घेणार नाहीत.  हाकलून देणार.  त्यांच्याविषयी अशा आख्यायिका होत्या.  पण गायतोंडे मला भेटले, ते खुश झाले... इतकंच काय पण त्यांनी मला त्यांच्या छातीशी कवटाळून धरलं... माझ्याशी इतकं बोलले.. थोडावेळ थांबून मग ते म्हणाले की मी आता जातो.  मी तिथेच गेटबाहेर उभा होतो.  ते गेट उघडून आत गेले.  बंगल्यात शिरले आणि मला हात केला.  मी ही त्यांना हात केला आणि मी परत फिरलो.  तेव्हा त्या वॉचमनने मला थांबवलं.  तो हिंदीत बोलता होता.  त्याने विचारलं काय चाललं होतं?  मी त्याला सांगितलं की मी पुण्याहून आलो आहे, विद्यार्थी आहे.  त्याने माझ्याकडे ओळखपत्र मागितलं.  तो म्हणाला की पंधरा दिवसांपूर्वी तिथे एक खून झाला होता.  मी आणि गायतोंडे त्याच्यासाठी वेगळ्या असणा-या भाषेत –मराठीत बोलत होतो... त्यामुळे त्याचं आमच्याकडे लक्ष होतं.  ती बंगले असणारी खूप मोठी कॉलनी होती.  तो वॉचमन पार त्या गेटच्या बाहेर मला सोडायला आला.  

खूप अंधार पडला होता.  सहा-साडे सहा वाजून गेले होते.  मी बाहेर आलो.  त्या डीएलएफ कॉलनीपासून तेबस डेपोपर्यंत इतका अंधार होता ना की, मला भीती वाटत होती.  कोणीच नव्हतं आजूबाजूला.  एक दोन किलोमीटर मी अंधारात मागे-पुढे चालत होतो.  शेवटी मी बस थांब्यावर पोहोचलो आणि बस बदलत बदलत ललितकला अकॅडमीत रत आलो.  

मी तिथे गेलो तर कानडे सर तिथेच बसले होते.  जिथे त्यांनी मला सोडलं होतं तिथेच कानडे सर बसून राहिले होते.  त्यांना मी लांबूनच बघितलं.  धावत गेलो आणि त्यांना इतकी घट्ट मिठी मारली...मला काही बोलताच येईना.  मी हसत होतो आणि अक्षरश: रडतही होतो.  सर म्हणाले, “अरे काय झालं?  तुला भेटले का ते?”  मी “हो” म्हटलं तर ते पण इतके खुश झाले.  आणि मग सगळ्यांना सांगायला लागेल- “अरे, गायतोंडेंना भेटून आला...गायतोंडेंना भेटून आला...”  मला काहीच सुचत नव्हतं.  त्यांनी विचारलं की ते काय म्हणाले.  मी म्हटलं, “सर, मी तिथे गेलो आणि त्यांना भेटलो.  त्यांनी मला मिठी मारली आणि मला सही दिली.  मी त्यांचे फोटो काढले.”  सगळे इतके खुश झाले.  आम्ही तेरा जण होतो ना... सगळीकडे तीच चर्चा- ‘अरे हा दोन-तीन दिवस सारखा इकडे-तिकडे पळत होता, गायतोंडेंना भेटण्यासाठी...हा भेटूनच आला.’  बाकीचे काही जण खरेदी करायला गेले... 

मग आमची तीच चर्चा.  नंतर मी पुण्यात आल्यावरही सगळीकडे तेच- ‘हा गायतोंडेंना भेटून आला...’  सगळेजण मला विचारायला लागले.  नंतर मग मी कोलते सरांना भेटलो, प्रफुल्ल डहाणूकरांना भेटलो, लक्ष्मण श्रेष्ठांना भेटलो.  भुलाभाई देसाई इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत गेलो.  मी भोपाळला गेलो होतो.  तिथे मी अखिलेशला भेटलो.   तिकडे गायतोंडेची दोन ऑईल पेंटिग्ज आहेत- मास्टर पीस आहेत अगदी!  त्यांनी मला ती पेंटिग्ज दाखवली.  त्या काळात मला अखिलेशने खूप मदत केली. 

नंतर मी पुण्याला आलो.  तिथे त्यांचे कामत म्हणून एक मित्र होते.  त्यांना भेटलो.  कामतांनी मला कॉलेजची काही माहिती दिली.  जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या लायब्ररीतून काही माहिती घेतली.  अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी माहिती गोळा केली.  टाईम्सचे काही जुने अंक काढले.  लायब्ररीमध्ये मला बरंच काही साहित्य सापडलं.  कामतांनी त्यांच्या मित्राची माहिती दिली होती.  त्या काळात ते कॉलेजमध्ये एकत्र होते.  कोलते सरांनी त्यांच्या विषयीची काही आर्टिकल्स दिली.  प्रफुल्लांनी मला त्यांच्या विषयी खूप माहिती दिली आणि श्रेष्ठांनी तर बरीचशी माहिती पुरवली- ते तर त्यांच्या जवळचेच होते.  याचा एक फायदा असा झाला की, गायतोंडेंचा अभ्यास करताना मला एक जाणवलं की कलाकार किती एकरूप झालेले असतात.  कलेतच कसं जीवन जगायचं हे मला गायतोंडेंमुळे समजलं.  

हा अभ्यास करताना त्या काळात ज्या लोकांशी मी जोडलो गेलो होतो- श्रेष्ठ असोत किंवा कोलते सर किंवा प्रफुल्ल किंवा अखिलेश- त्यांच्याशी आजही तितकंच जिव्हाळ्याचं नातं आहे.  त्या काळात तर मला नीट बोलताही येत नव्हतं.  अखिलेश तर मला आजही म्हणतो की, ‘तेव्हा तर तुला साधी हिंदी भाषा देखील बोलता येत नव्हती; आता कसा आहेस आणि तेव्हा कसा होतास तू!  आज तू सगळीकडे फिरतोस.  मला तुझा खूप अचंबा वाटतो.’  म्हणजे मी एक खेडवळ पोरगा आणि कसे ते कपडे घालून तिकडे गेलो होतो.  माझ्या कामाबद्दल अखिलेशने काही चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत.  

तो जो प्रवास होता ना.... गायतोंडेंमुळे मला कलावंत म्हणून कसं जगायचं, कसं काम करायचं हे शिकता आलं.  मी त्यांच्यावर लिहिलेला प्रबंध हा हे गायतोंडे एकदम प्रसिद्ध आहेत म्हणून लिहिला नव्हता.  एका विद्यार्थ्याने एखाद्या चित्रकाराचा कसा अभ्यास करायचा असतो त्या प्रकारे मी ते केलं आहे- म्हणजे कोणते रंग, रेषा कशा, आकार कसे, त्यांचे फॉर्म कसे, विषय कसा ....अशाप्रकारचा तो अभ्यास आहे.  आणि गायतोंडेंचा साठ वर्षांचा जो काळ होता... ते ४७ साली उत्तीर्ण झाले.  तेव्हापासून ९७ सालापर्यंत एक कलाकार टप्प्याटप्प्याने कसा अभ्यास करत गेला...अशाप्रकारचा तो प्रबंध आहे.  त्यांचे रंग कसे बदलत गेले, त्यांचे फॉर्म कसे बदलत गेले, त्यांचे आकार कसे बदलत गेले.. ते कसे परिपक्व होत गेले...    अशाप्रकारचा पाच पाच वर्षांमधल्या फरकावरचा तो प्रबंध आहे.  १९९७ साली मी तो प्रबंध लिहिला तेव्हा गायतोंडेंचा १९४७ पासून प्रवास कसा बदलत गेला आणि त्यांना समकालीन त्यांच्या चित्रकार मित्रांचा प्रवास कसा बदलत गेला, यातली तफावत मी यात दाखवली आहे.  अशाप्रकारचा अभ्यास मी केला.  एका कलाकाराचा वैचारिकदृष्ट्या कसा विकास झाला, त्यांची कला कशी परिपक्व होत गेली, त्याचा मी अभ्यास केला आणि त्याचा मला खूप उपयोग झाला.  गायतोंडेंवर पॉल क्लीचा जेवढा प्रभाव आहे. बरीच लोकं असं लिहित नाहीत पण टर्नर या चित्रकाराचा त्यांच्यावर बराच प्रभाव आहे असं मला जाणवलं.  टर्नरच्या जगण्याचा आणि त्याच्या चित्रांचाही त्यांच्यावर परिणाम आहे असं मला जाणवलं आहे.  १९६० च्या काळात हा परिणाम दिसतो.  

गायतोंडेंवरच्या प्रबंधासाठी मला सर्वात जास्त गुण पडले.  मी दोन वर्षे त्यावर काम केलं होतं.  अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी तो एक चांगला प्रबंध आहे.  गायतोंडेंचा स्पर्श हा एखाद्या दिव्य विभूतीचा स्पर्श होण्यासारखं आहे आणि त्यांचं दर्शन हे माझ्यासाठी भाग्याचं आहे.  त्या काळात का मी त्यांचा इतका अभ्यास केला हे आजही मला कळत नाही.  एखाद्या गोष्टीचं वेड लागतं ना तसा मी झपाटून गेलो होतो.  त्या झपाटण्यामुळेच एक कलाकार म्हणून कसं जगायचं असतं, कसं तन्मय व्हायचं असतं हे शिकता आल्याने माझा फायदा झाला. त्यानंयर पुन्हा मी १९९९ आणि २००० साली त्याना भेटलो. समाप्त 
शब्दांकन - शशिकांत सावंत 
राजाराम होले

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...