Enquire Now

Request A Quote

इथं "जेजे स्कूल" होतं !

जेजे स्कूल वर आर्ट वरचं  पहिलं पुस्तक म्हणजे रावबहादूर धुरंधर यांचं 'कलामंदिरातील एकेचाळीस वर्ष " 
दुसरं धोंड मास्तरांचं 'रापण' , तिसरं बहुदा बाबुराव सडवेलकर लिहितील अशी अपेक्षा होती पण त्यांनी घोर निराशा केली. शेवटी ठरवलं की 'चिन्ह'नंच पुढाकार घ्यायचा आणि ही पोकळी भरून काढायची. त्याच 'जेजे जगी जगले' या पुस्तक किंवा या ग्रंथाची निर्मिती आता शेवटच्या टप्पयात आली आहे.  त्याचीच माहिती देणारा हा विशेष लेख.   


काहीं ना  काही कारणामुळे  गेले अनेक वर्ष रखडलेला 'निवडक चिन्ह' मालिकेतील उर्वरित दोन खंडांचा प्रकल्प आता खरोखरच मार्गी लागला आहे. येत्या सप्टेंबर अखेर "जेजे जगी जगले"... चा खंड प्रकाशित होईल तर ऑक्टोबर अखेर 'व्यक्तिचित्र पण शब्दातली' चा. हे दोन्ही खंड प्रकाशित झाल्यानंतरच  'निवडक भास्कर कुलकर्णी ' निवडक चिन्ह मुलाखती आणि चिन्ह आत्मकथन हे तीन खंड प्रकाशित करावयाचे किंवा नाही याचा निर्णय होईल. ज्या वेगाने आपण ऑनलाईन तंत्रज्ञानाकडे  झुकत चालतो आहोत ते पाहता तो निर्णय कितपत सकरात्मक असेल याविषयी मनात काहीशी शंकाच आहे . पण ते एक असो. तूर्त आपण उर्वरित दोन खंडांचाच विचार करू. 

पूर्व घोषित संकल्पनेपेक्षा 'जेजे जगी 'च  स्वरूप खूपच वेगळं झालं आहे. पूर्वघोषित संकल्पनेमध्ये विश्वास यंदे ( जमशेठजी जीजीभाई ), चिंतामण गोखले ( कॅप्टन सॉलोमन ), बी डी शिरगावकर 
( जेजेतले सोनेरी दिवस ), अरविंद हाटे ( शंकर पळशीकर ) , सुधाकर लवाटे ( बाबुराव सडवेलकर ), माधुरी पुरंदरे ( संभाजी कदम ), माधव इमारते ( विश्वनाथ सोलापूरकर ), सुभार्या पळशीकर ( डीन बंगलो ) , आशुतोष आपटे ( जेजे कॅन्टीन ), देवदत्त पाडेकर ( जेजे दिसले तसे ) याखेरीज जेजे जगी जगले या लेख मालिकेत भानू अथैय्या , विद्या चव्हाण, संदीप कुलकर्णी , अमिता खोपकर, मनोज जोशी, चंद्रशेखर गोखले यांच्या चिन्ह मधील पूर्व प्रकाशित लेख प्रसिद्ध होणार होते. 

पण या साऱ्या संकल्पनेमध्ये काहीतरी उणीव भासते आहे. असं सतत वाटत होतं. त्यामुळेच ते काम पुढं पुढं ढकलण्याची प्रवृती आपोआपच मनात निर्माण झाली होती. बराच विचार झाल्यानंतर शेवटी तो तिढा एकदाचा सुटला आणि त्यात असंख्य नवे लेख जोडले गेले. उदाहरणार्थ जेजे जगी जगले या लेख मालिकेत जेजेमध्ये शिकलेले पण अन्य क्षेत्रात नावं कमावलेले सारेच अवतीर्ण झाले. नावंच घ्यायची तर  प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर ,  नाटककार गंगाराम गवाणकर, दिग्दर्शक अभिनेते अमोल पालेकर, शास्त्रीय गायक पं शरद साठे ( ज्यांचं अलीकडेच निधन झालं), ग्रंथसखाचे श्याम जोशी, अभिनेते सतीश पुळेकर, चित्रपट निर्माते विनय नेवाळकर, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, समीक्षक दीपक घारे, पटकथा लेखक  संजय पवार, कला दिग्दर्शक नितीन चंद्र्कांत देसाई, चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव, गिरीश मोहिते, महेश लिमये, अभिनेत्री सुप्रिया मतकरी, हेमांगी कवी आणि प्रिया तेंडुलकर वगैरे. अशी किती म्हणून नावं आणि विषय सांगू ?  

सारंच आता तयार होत चाललं आहे. या ग्रंथाची प्रकाशन पूर्व जी कॅम्पेन प्रकाशित होणार आहे त्यात हे क्रमश: येणारच आहे. एवढंच सांगतो की  या ग्रंथासाठी काहीही करायचं आम्ही शिल्लक ठेवलेलं  नाहीये. या साऱ्या प्रदीर्घ शोधात जी अतिशय दुर्मिळ छायाचित्रं आणि रंगचित्र आम्हाला गवसत गेली ती ही या ग्रंथात प्रकशित करीत आहोत. 'गायतोंडे' ग्रंथसारखाच याही  ग्रंथाचा पसारा खूप मोठा झाला आहे. भविष्यात जेजे राहील किंवा नाही राहील याविषयी आताच काही ठामपणे सांगता येणार नाही. पण याही राज्यकर्त्यांचं लक्षण धड नाही हे निश्चित. तसं नसतं तर  दीडशेपेक्षा जास्त वर्षाची परंपरा लाभलेल्या या आशिया खंडातल्या सर्वश्रेष्ठ शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांवर जवळ जवळ सर्वच कंत्राटी शिक्षकांच्या हातून शिक्षण ( ? ) घेण्याची वेळ आली नसती. ज्या राज्याला कलेच्या क्षेत्रातलं सर्वोच्च असलेलं कला संचालकाचं पद देखील भरता येत नाही त्यांच्याकडून आपण आणखीन कसली अपेक्षा करायची ? 

म्हणूनच जेजेचं सुवर्णयुग किंवा विद्यार्थी अवस्थेत तिथं अनुभवलेले सोनेरी मंतरलेले दिवस या ग्रंथात कायम स्वरूपी बंदिस्त करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.  कुणी सांगावं कदाचित आणखीन  ५०/१०० वर्षानं  आज आपण जसं नालंदा, तक्षशिला विषयी म्हणतो तसं तेव्हाचे लोकं म्हणतील "इथं जेजे स्कूल ऑफ आर्ट "होतं  !  


सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

जीव वाचवणारे "गोडसे"

अधिक वाचा

Feature 2

आपल्याला ठाऊक नसलेलं...

अधिक वाचा

Feature 3

इथं "जेजे स्कूल" होतं !

अधिक वाचा

Feature 4

धोंड मास्तर आणि रापणीतून सुटलेलं वगैरे...

अधिक वाचा

Feature 5

रंगांधळा चित्रकार ???

अधिक वाचा
12345678