Enquire Now

Request A Quote

धोंड मास्तर आणि रापणीतून सुटलेलं वगैरे...

जहांगीर मध्ये आजपासून १७ जूनपर्यंत धोंड मास्तरांच्या चित्रांचं प्रदर्शन भरणार आहे. ( त्या निमित्तानं एक गौरव ग्रंथ  देखील प्रकाशित होणार आहे, ज्याचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे .)  धोंड  मास्तर म्हणजे आमच्या जेजेचे  अधिष्ठाता  प्रल्हाद अनंत धोंड. ' रापण ' कार  धोंड. ज्यांनी लिहिलेलं  जे जे स्कूल ऑफ आर्ट च्या रम्य आठवणी जागवणारं  विलक्षण वाचनीय पुस्तक तुम्ही अजूनही वाचलं नसेल तर हा लेख वाचून झाल्याबरोबर लगेचच मागवा अन्यथा एका विलक्षण वाचनानुभवाला तुम्ही नक्कीच मुकाल. 

' नाईकानु , तुमी खंयचे  ? ' 
जहांगीर आर्ट गॅलरीत १९८१ -८२ साली  भरलेल्या माझ्या पहिल्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी गॅलरीत पाऊल टाकल्या टाकल्या  धोंडसरांनी विचारलेला हा प्रश्न ! 
त्यांना मी उत्तर दिलं ' मियां मालवणाचो ' 
' माका वाटलाच ता ! ' असं म्हणून धोंडसरांनी टाळीसाठी थेट हातच पुढं केला .. 
आणि मग धोंडसर आपण प्रदर्शनाला आलो आहोत हे विसरून घरच्यांची विचारपूस करू लागले . 
मालवणात नेमकं कुठं राहतो , गावाचं नावं काय , कोण असतं तिथं वगैरे असे अनेक प्रश्न मला त्यांनी उत्सुकतेपोटी आणि गाववाला या नात्याने  विचारले असावेत.  
 
भरपूर गप्पा , हास्य विनोद झाल्यावर मला  म्हणाले ' चल , आता तुझी चित्रं पाहूया ! ' 
माझ्या मनात पहिला विचार आला तो ' हे स्वतः निसर्गचित्रकार , माझी  अमूर्त चित्रं  त्यांना कितपत आवडतील ? ' 
पण तसं काही झालं नाही . त्यांनी अत्यंत शांतपणे चित्रं पाहिली . 
मला म्हणाले असंच सतत छान काम करत राहा , मालवणचं नाव मोठं कर ! हल्ली वॉटर कलर मध्ये कुणी फारसं काम करत नाही , कारण  वॉटरकलर फारशी टिकत नाहीत या गैरसमजापोटी प्रदर्शनातून  कुणी विकत घ्यायला सहसा धजावत नाहीत . आणि  हे ठाऊक असूनही तू तर पहिल्याच प्रदर्शनात वॉटरकलर्स लावली आहेस या तुझ्या धाडसाचं खरोखरच कवतुक करायला हवं . मनापासून सांगतो वॉटरकलर छान लावला आहेस तू , तुझी चित्रं कधीच ' डल ' पडणार नाहीत , निस्तेज होणार नाहीत ! शाबास ! मालवणचं नाव काढशील तू . 
सर ! हे मी तुमच्याकडूनच शिकलो . असं मी म्हणताच ते माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले , म्हणाले  ' कित्याक फेकतस , थापा मारूची संवय असा तुका ? ' 
म्हटलं , 'नाही सर !  तुमच्या ' रापण' मुळे मी हे शिकलो ' असं मी म्हटल्यावर तर ते चकरावूनच गेले . त्यांना अधिक कोड्यात न ठेवता मी त्यांना म्हणालो ' तुम्ही ते तासकर मास्तरांच्या चित्रांविषयी लिहिताना चुडेकर मास्तरांचं ' तो चित्रात पांढरो रंग वापरता ,  पुढे त्याच्या चित्राची माती होतली . ती टिकूची नायत ! ' हे वाक्य मी वाचलं आणि मला जलरंग कसे लावायचे हे  मला समजून गेलं . हे माझं ऐकलं अन मग  मात्र धोंड सर खूश झाले. पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढं आला आणि मग नंतर मला जवळ घेऊन त्यांनी शाबासकीची थापही दिली . नंतर किती तरी वेळ ते गॅलरीत रेंगाळत होते . गप्पा मारत होते . जुन्या आठवणी सांगत होते. जेजे आणि  मालवणला तर ते विसरू शकत नव्हते.' रापण ' मध्ये न प्रकाशित झालेले असंख्य किस्से त्यांनी त्यादिवशी मला ऐकवले . 

हीच धोंड सरांची आणि माझी पहिली भेट . 
त्या आधी त्यांना भेटलो होतो तो त्यांच्या ' रापण ' या पुस्तकामधून. १९७९ मध्ये ते मौज प्रकाशनानं ते प्रसिद्ध केलं होतं. मी तेव्हा जेजेमध्येच शिकत होतो . पुस्तकाची किंमत तेव्हा अवघी ३० रुपये होती .पण रुपयाला मोठी किंमत होती. विद्यार्थीदशेत ते  विकत घेणे केवळ अवघड होतं . आजच्या पिढीतल्या अनेकांना  ही अतिशयोक्ती वाटेल पण ती वस्तुस्थिती होती . बोरीबंदर स्टेशन समोरून ६६ नंबरची बस घ्यायची. गिरगावात मॅजेस्टिक सिनेमापर्यंतचं बेस्टचं तिकीट किती होतं तर फक्त १० पैसे . मॅजेस्टिकला उतरायचं . मॅजेस्टिक बुक स्टॉल किंवा  आजूबाजूच्या स्टॉलवरून मधून ललित किंवा सत्यकथेचा अंक घ्यायचा ( त्याची किंमत किती होती तर एक दोन रुपये ) आणि पैसे खिशात असतील तर प्रार्थनासमाजसमोरच्या कुलकर्ण्यांची मिसळ आणि भजी खाऊन चिराबाजार वरून चालतचालत परत जेजेत यायचं असा माझा महिन्यातल्या एका दिवशीचा दिनक्रम होता. शोकेसमधली ' रापण ' ची प्रत खुणवायची . पण तेव्हा तरी ती घेणं शक्य झालं नाही . सुदैवानं जेजेच्या लायब्ररीत मात्र मला ते वाचायला मिळालं आणि मग त्याची किती पारायणं झाली कुणास ठाऊक ! 

' रापण ' माझी स्वतः ची प्रत मी १९८३ साली विकत घेतली . त्या वर्षी राज्य कला प्रदर्शनात माझ्या चित्राला २५०० रुपयांचा राज्य पुरस्कार मिळाला होता , त्या पैशातून मी मुलुंडला झालेल्या मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलनात मौजेच्या स्टॉलवरून मी ' रापण 'ची माझी प्रत विकत घेतली होती . हे काही मी आठवणीनं सांगत नाहीये तर हा लेख  लिहिण्यासाठी  जेव्हा मी पुन्हा आज ' रापण ' ची प्रत चाळू लागलो तेव्हा शेवटच्या पानावर २३ /०१ / १९८३ रोजी मी करून ठेवलेली नोंद मला सापडली त्या आधारे मी हे लिहू  शकतो आहे. 
'
माझ्या सोबतच्या  सहाध्यायांना तसेच अनेक मित्र मैत्रिणींना  मी ' रापण ' मधली असंख्य प्रकरणं  वाचुन  देखील दाखवल्याचं आता आठवतंय . ' रापण' वरची मटा लोकसत्ता मधली परीक्षणं तर  मी अगदी कालपरवापर्यन्त जपून ठेवल्याचं आठवतंय . आजही ती घरात असतील कुठे तरी . ८० च्या दशकात  तर ललित कला अकादमीचा कलामेळा क्रॉस मैदानावर भरला होता तर बॉंबे आर्ट सोसायटीच्या किंवा आर्टिस्ट सेंटरच्या स्टॉलवर मी  मौजेतून ' रापण ' च्या चिक्कार प्रती आणून चक्क सवलतीत विकल्या होत्या . त्यानंतर मात्र ते पुस्तक आउट प्रिंट झालं ते झालंच. मधल्या काळात खूप जण यायचे ते पुस्तक मागायला. पण नाही दिलं मी कधी ते कुणाला .कारण मला ते कधीही लागायचं . आजही जेजेतले ते मंतरलेले दिवस आठवले की आपसूकच ' रापण ' च्या प्रतीकडे हात जातोच . आता अलीकडेच म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वी मौजेनं  ' रापण ' ची दुसरी आवृत्ती काढली आहे. त्यामुळे आता कुणी ती प्रत मागायला येत नाही , पण त्या आधी मात्र  अनेकांना मी नकार देऊन दुखावलं होतं हे नक्की.

१९८७ साली ' चिन्ह ' सुरु झाल्यावर मी ठरवलं देखील होतं की  आपण ' रापण ' वर काहीतरी प्रकाशित करायचं . मला त्या लेखाचं शीर्षक देखील सुचलं होतं ' रापणीतून सुटलेलं ' . पण का कुणास ठाऊक  काहीना काही कारणामुळे ते शक्यच झालं नाही . त्याचं मला खरं तर खूप वाईट वाटलं . आता अलीकडेच ' जेजे जगी जगले...' या 'चिन्ह'च्या  आगामी ग्रंथासाठी मी धोंड सरांचे जावई  श्री कृष्णा कामत त्यांच्याशी संपर्क साधला,  म्हटलं जेजे वरच्या चिन्हच्या  ग्रंथात ' रापण ' वर एक तरी लेख हवाच आहे , रापणीतून सुटलेल्या पण  लिहून यायला हव्यात अशा काही आठवणी सरानी सांगितल्याचं आठवतं का ? तर कामत सरानी त्याला चक्क नकार दिला. म्हणाले असं काहीच नाही आठवत. त्यामुळे माझा शेवटचा प्रयत्न देखील वाया गेला . पण मी असा सहजासहजी हार मानणारा नाही. मी तो विषय कुठल्याही परिस्थितीत ग्रंथात घेतो आहे, कसे ते मात्र आता इतक्यात उघड करू इच्छित नाही. 

धोंड सरांची शेवटची भेट मात्र चांगलीच स्मरणात राहिली आहे . बहुदा बेंद्रे किंवा हेब्बर सरांचं निधन झालं होतं . अंत्य दर्शनाला गेलो तर त्यांच्या बंगल्याच्या गेटवर सर उभे होते. खूप थकलेले दिसत होते. पण तरीही हात जोडत म्हणाले. " आता असंच भेटायचं ! आमच्यावेळी देखील असेच या ! ' 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...