Enquire Now

Request A Quote

रंगांधळा चित्रकार ???

तो अवघा दोन वर्षाचा असल्यापासून चित्रं काढतोय. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या अतिशय प्रतिकूल, पण सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याचा चित्रकलेचा छंद चांगलाच जोपासला. इतका की, सर्वसाधारणपणे आर्ट स्कूला गेल्यावरच विद्यार्थी मॉडेल समोर ठेऊन काम करतात तर हा ते शाळेत असल्यापासूनच करू लागला. नुकताच कुठं त्यानं बारावीला प्रवेश घेतला पण त्याआधीच तो जगविख्यात फ्लोरेन्स अकादमी (इटली ) च्या व्यक्तिचित्रण स्पर्धेत तिसरं पारितोषिक मिळून मोकळा झालाय. या सर्वात कहर म्हणजे तो रंगांधळा आहे. "रेड ' ग्रीन " सारखे काही विशिष्ट रंग तो आपल्या आईच्या साहाय्याने ओळखतो आणि चित्रात वापरतो. फ्लोरेन्स अकादमीने पारितोषकासाठी त्याच्या ज्या चित्राची निवड केली आहे ते चित्र चक्क "रेड" रंगातलंच आहे. आता यावर आपण काय बोलायचं ? खरं तर आपण बोलायचं नाहीच हा लेख वाचायचा आणि आपल्याला त्याला काही मदत करता येईल का एवढंच पाहायचं!  

अवघी विशी देखील पार न केलेल्या 'प्रेम आवळे ' या मुलानं चित्रकलेचं कुठलंही शिक्षण न घेता इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील प्रख्यात फ्लोरेन्स अकादमी ऑफ आर्ट या कलासंस्थेनं घेतलेल्या जागतिक पोर्ट्रेट स्पर्धेत जगभरातील कलावंतांमध्ये चक्क तिसरा क्रमांक पटकावला आहे. या  अकादमीचं पारितोषिक मिळणं ही जागतिक पातळीवरची मोठी घटना आहे. पण प्रेमनं मात्र बारावीच्या प्रवेशाच्या उंबरठयावर असतांना चित्रकलेचा डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स केलेल्या चित्रकारांना देखील लाजवेल असं यश केवळ आपल्या पदार्पणातच मिळवलं आहे. 

प्रेमचा हा चित्रकलेचा प्रवास वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षांपासूनच सुरु झाला. बिकट आर्थिक परिस्थितीवरच नाही तर जन्मजात असलेल्या दृष्टीदोषावर देखील मात करत करत त्यानं आपली कलासाधना सुरूच ठेवली आहे आणि याच त्याच्या मेहनतीचं फळ म्हणूनच बहुदा त्याला ही जागतिक स्तरावरची शिष्यवृत्ती तो शाळकरी विद्यार्थी असतांना देखील मिळाली असावी. त्याला चांगलं माध्यमिक शिक्षण घेता यावं तसेच आर्थिक परिस्थितीवर  देखील तोडगा निघावा यासाठी आवळे कुटुंबानं इचलकरंजीसारख्या छोट्या शहरातून पुण्यासारख्या महानगरात स्थलांतर केलं. प्रेमचे वडील संजय आवळे हे पुण्यात टेल्कोमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. प्रेम आता नुकताच बारावीत रुजू झालाय. 

आर्थिक परिस्थिती बिकट असतांना देखील प्रेमाच्या आई वडिलांनी प्रेमच्या कलासाधनेत कधी कुठलीही कमतरता पडू दिली नाही. त्याला लागणारं चित्रकलेचं साहित्य, पुस्तकं, प्रदर्शनं पाहायला जाण्याचा त्याचा हट्ट त्यांनी कायम पुरवला. मोठ्या मोठ्या कलावंताची पुस्तकं वाचून तो त्यांची शैली आपल्या पद्धतीनं समजावून घेत पुढं जात राहिला. सुरुवातीला फोटोवरून स्केचेस करणारा प्रेम नंतर तर चक्क मॉडेल बसवून काम करू लागला. ते देखील कुणाचंही मार्गदर्शन नसतांना केवळ पुस्तकं वाचून, पाहून , त्यातल्या शैली पाहून तो आपल्या कामात सुधारणा करत गेला. 'चिन्ह' शी देखील तो जोडला गेला ते देखील फेसबुकवरून. फेसबुकवरची एक पोस्ट पाहून त्याने 'चिन्ह'च्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये घेण्याची विनंती केली. आणि एकेदिवशी चर्चेत सहभागी होऊन त्याने आपली कामं ग्रुपमध्ये पोस्ट केली. ती पाहिल्यावर अनेकांचा त्यावर विश्वासच बसला नाही. पण त्याने आपण कसे विद्यार्थी आहोत ? हे सांगितल्यावर मात्र बहुसंख्य सभासद मात्र चक्रावलेच. काही सभासदांनी मात्र त्याच्या कामाचं स्वागत केलं तर अनेक जण मात्र साशंकतेने बघत राहिले. फ्लोरेन्स अकादमीची बातमी आली आणि मग मात्र ती साशंकता कुठल्या कुठे निघून गेली. साऱ्यांनीच त्याचं मनापासून अभिनंदन केलं.    

प्रेमच्या या कलासाधनेचं कौतुक तर आहेच पण त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं ते त्याच्या खंबीरपणाचं, कारण  निसर्गानं त्याला जन्मतः दिलेल्या दृष्टिदोषावर मात करून तो सतत चित्रकलेची साधना अविरतपणे करतोच आहे . हो ! हे खरं आहे की, प्रेम अगदी बालपणापासूनच चक्क रंगांधळा आहे. त्याला काही विशिष्ट रंगाची जाणीव अगदी बालपणापासून होत नाहीये आणि मुख्य म्हणजे त्याचा हा दोष कधीही बरा होणार नाही हे देखील त्यांच्या डॉक्टरांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं आहे. पॅलेटवर काढले जाणारे लाल, निळा, हिरवा, जांभळा असे काही मोजकेच रंग प्रेमला नीटसे समजत नाही. उदाहरणार्थ लाल- तपकिरी-हिरवा हे रंग त्याला एकसारखेच दिसतात, तर निळ्या आणि जांभळ्या रंगाचं देखील तेच. या रंगांमधला फरक त्याचे डोळे टिपू शकत नाही. शिवाय रस्त्याच्या सिग्नलचे तिन्ही रंग त्याला सारखेच म्हणजे पिवळेच दिसतात. या आपल्यातल्या दृष्टीदोषाचा मात्र  प्रेमनं कधीही  'बाऊ' केला नाही. तो सातत्यानं आपलं काम करतच राहिला.  गंमत म्हणजे त्याच्या ज्या चित्राला फ्लोरेन्स अकादमीनं पारितोषिक दिलं आहे ते महाराष्ट्रीय नववधूचं  पोर्ट्रेट त्यानं समोर मॉडेल बसवूनच केलं आहे.  नववधू म्हटलं की 'लाल' रंग हा आलाच. पण प्रेमनं ज्या बेधडकपणे त्या चित्रात लाल रंगाचा वापर केला आहे तो पाहता त्याला काही असा दृष्टीदोष असेल यावर कुणाचाच विश्वास बसत नाही, तुम्ही ते चित्रं पाहाल तेव्हा तुमचाही त्यावर विश्वास बसणार नाही हे निश्चित ! 

यावर विचारलं असता प्रेम सांगतो; चित्रं  रंगवतांना जेव्हा जेव्हा अचानक सगळे रंग एकसारखे जाणवायला लागतात तेव्हा तेव्हा कायम त्याची आई येऊन रंगाविषयी बोलत राहते.  त्याचं प्रत्येक चित्रं पूर्ण करतांना त्याची 'आई' त्याच्या निर्मितीत कशी सहभागी होते हे सांगताना त्याला अगदी गहिवरून येतं. पण तरी देखील मिसरूड देखील न फुटलेल्या या मुलाचा आत्मविश्वास पाहून खरं सांगायचं तर अगदी थक्क व्हायला होतं. 

कलेचा हा असा रियाज सुरु असतांना त्यानं त्याच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन ऑगस्ट २०१६ ला पुण्यातील बालगंधर्व कलादालनात भरवलं. साहजिकच तिथं त्याच्या मेहनतीचं, कामाचं खूप कौतुक सुरु झालं. त्यानंतर तर त्याने अनेक ग्रुप शोमध्ये सहभागी होऊन आपली चित्रं प्रदर्शित केली. आजवर त्याच्या चित्रांना अनेक पारितोषिक  मिळाली आहेत. तेव्हाच कधीतरी आता पुढे आपण याच क्षेत्रात राहायचं आणि कलाकार म्हणूनच जगायचं असा निश्चय त्यानं केला.    

फ्लोरेन्सची शिष्यवृत्ती मिळणं हा आवळे कुटुंबासाठी जेवढा सुखद अनुभव आहे तेवढाच तो आर्थिक दृष्ट्या दडपण आणणारा देखील ठरला आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून फ्लोरेन्सला जाणं ही प्रेमसाठी अत्यंत कठीण गोष्ट आहे. फ्लोरेन्सला जाणं, तिथं राहणं, खाणं पिणं , प्रवास खर्च, तिकीट हा सगळाच खर्च त्यांना न झेपणारा आहे.  साहजिकच त्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळाची अत्यंत गरज आहे. 

सोशल मीडियावर आवाहन प्रसिद्ध होताच त्याला अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.  पण इथं देखील  त्याच्या सुपीक डोक्यातली एक सुंदर कल्पना आली. जे कुणी त्याला आर्थिक मदत करीत आहेत त्यांचं किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं तो लागलीच पोर्ट्रेट काढून देतो. म्हणजे तिथं देखील त्याच कलाप्रेम त्यानं चांगल्या पद्धतीनं राबवलं. त्याच्या मेहनतीचं आणि संकल्पनेचं कौतुक करावं तेवढं थोडंच. प्रेमला १ जुलै रोजी फ्लोरेन्ससाठी रवाना व्हायचं आहे. 
आपण प्रेमच्या ९७६५७ ६६३४१ या नंबरवर संपर्क करून शुभेच्छांसोबत शक्य ती मदत देखील नक्कीच करू शकता. 
स्नेहल बाळापुरे

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...