Enquire Now

Request A Quote

चित्रं काढता काढता शेवट !!

हरिभाऊ वाकणकर मूळचे चित्रकार. ते जेजे मध्येच शिकले. त्यांच्यातल्या अभ्यासू वृत्तीनं त्यांना संशोधक बनवलं. मानवाच्या आजवरच्या इतिहासातले एकापेक्षा एक सरस शोध लावून देखील ते आपल्यातल्या चित्रकाराला ते कधी विसरले नाहीत. एका परिषदेसाठी सिंगापूरला गेले असताना हॉटेलच्या पंधराव्या मजल्यावरून सभोवतालचं निसर्गचित्रण करीत असतांनाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. नटसम्राटांना एखादी भूमिका साकार करता करता रंगमंचावर मरण येण्याची अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत पण चित्रकार चित्रकारी करता करता मरण आलेल्या चित्रकाराचं उदाहरण बहुदा हे पहिलंच ठरावं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्तानं प्रसिद्ध करत असलेल्या लेखाचा अंतिम भाग सादर करत असतांना "चिन्ह "ची आदरांजली.  त्यांच्या संदर्भात भरीव असे काही तरी करण्याचे 'चिन्ह 'ने योजिले होते. ते या जन्मशताब्दी वर्षात तरी होते का ? ते आता पाहायचे !


1975 मधे भीमबेटकाच्या शैलाश्रयांच्या संशोधनाकरता हरीभाऊंना पद्मश्री ही पदवी मिळाली. 2003 मधे युनेस्कोने हा परिसर जागतिक वारसा म्हणून जाहीर केला आहे. ‘वाकणकर शोध संस्थान’ मधे एक फेरी मारली की हरीभाऊंच्या आणि त्यांचे मोठे बंधु लिपिकार स्व.ल.श्री.वाकणकर यांच्या कर्तृत्वाची साक्ष पटते. भारतीय लिप्यांचे संगणकावर आरोहण करण्याचे श्रेय लिपिकार वाकणकरांच्या नावावर आहे. प्राचीन भारतीय लेखन कलेचा धांडोळा त्यांनी त्यांच्या ‘गणेश विद्या’ या पुस्तकात घेतला आहे. दोघा भावांनी मिळून जमवलेली सातशेहुन अधिक हस्तलिखितं या संस्थेत अभ्यासकांची वाट पाहत आहेत. याखेरीज हरीभाऊंनी जमवलेली पाच हजार जुनी नाणी या संस्थेकडे आहेत. या नाण्यांमध्ये इसवी सन पूर्व दुस-या शतकापासुनच्या नाण्यांचा समावेश आहे. शहामृगाच्या अंड्याचे, डायनॉसोरच्या नखांचे फॉसिल्स, इतर फॉसिल्स, उत्खननानत सापडलेल्या वस्तू अशा अनेक गोष्टी या संग्रहात आहेत. वाकणकर शोध संस्थानच्या जोडीने हरीभाऊंनी वाकणकर भारती संस्कृती अन्वेषण न्यास आणि वाकणकर पुरातत्त्व संग्रहालय अशा दोन संस्थाही स्थापन केल्या विशेष म्हणजे त्यांच्या मृत्युनंतरही या सगळ्या संस्था कार्यरत आहेत. नुकतेच फेब्रुवारी 2019 मधे इंडियन रॉक आर्ट सोसायटीचे अधिवेशन वाकणकर शोध संस्थानमधे पार पडले.


हरीभाऊ वाकणकरांच्या नावावर भीमबेटकाच्या शोधा इतकेच आणखी दोन महत्त्वाचे शोध आहेत. पैकी एक म्हणजे उज्जैनजवळच्या डोंगला या खेड्याजवळून जाणारी कर्कवृत्ताची रेष स्थानिक रेखांशाला नेमकी कुठल्या बिंदूवर भेदते तो बिंदू त्यांनी शोधून काढला. 21 जूनला या ठिकाणी आपली सावली आपल्या पायाखाली गायब होते. या दिवशी विक्रम युनिव्हर्सिटी आणि गावकरी मिळून एक समारंभही करतात.  या कामातल्या त्यांच्या एका सहका-याने सांगितले की  हरीभाऊंनी हा बिंदू वराहमिहिराच्या साहित्यांतर्गत पुरावे आणि गणित यांच्या आधारे शोधून काढला. ही प्राचीन भारताची मेरिडियन रेखा होती. खुंट्यांना सुतळी बांधून वाकणकरांनी हा बिंदू निश्चित केला. पुढे जीपीएस तंत्रज्ञानाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. वाकणकर शोध संस्थान आणि विक्रम युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त प्रयत्नानी इथे दिल्लीच्या जंतर-मंतरच्या धर्तीवरची कालमापन यंत्रे उभी राहिली आहेत. वाकणकरांचे प्रतिपादन असे होते की कालगणनेसाठी ग्रीनविच मेरिडियनच्या ऐवजी हीच रेषा संयुक्तिक आहे.


त्यांच्या नावावर असलेले तिसरे संशोधन म्हणजे लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या पात्राचा शोध.  वैदिक वाङ्मयातल्या पुरावे आणि त्या आधारे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व हरीभाऊ वाकणकरांनी केले होते. या सर्वेक्षणादरम्यान त्यांनी हडप्पा संस्कृतीशी समकालीन अशा काही जागा निश्चित केल्या.  तथापी या संशोधनाच्या गृहितकाबद्दल वाद होते आणि आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या बाबसाहेब आपटे इतिहास संकलन समिती या संस्थेच्या पुढाकाराने ही मोहिम हाती घेण्यात आली होती. ढोबळ मानाने या संशोधनामागे गृहितक असे होते की ज्या संस्कृतीला सिंधु संस्कृती म्हटले जाते तिचा विस्तार हा प्रमुख्याने लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या काठाने राजस्थान आणि गुजरात या प्रांतांमधुन झाला आहे त्यामुळे भारतात असलेल्या सिंधु संस्कृतीच्या अवशेषांच्या वर्गीकरणासाठी सिंधु संस्कृती ऐवजी सारस्वत संस्कृती असे वर्गीकरण करावे. याखेरीज आर्यांच्या टोळ्या या  भारताबाहेरून आलेल्या नसून ते एतद्देशीयच होते यासाठी पुरावे गोळा करण्याचा हेतूही होता.


उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर आदिमानवाने झाडावरून उतरून दोन पायांवर उभे राहून सभोवतालच्या परिसराचा धांडोळा घ्यायला सुरूवात केली.पंचमहाभूतांच्या फटका-यांपासुन आदिमानवाने आसरा शोधला तो खडकांचा आणि खडकातल्या गुहांचा. कित्येकदा हे नुसते आडोसे होते किंवा सावलीच्या जागा. हिंस्र पशुंपासून लपून रहाण्याच्या जागा. पशू जसे आडोसे शोधतात तितक्याच आदिम प्रेरणेने शोधलेला आसरा. घनदाट जंगलात,थंडी वाऱ्यापासूनपावसापासून स्वत:ला वाचविण्यासाठी केलेलं पहिलं घर. या पृथ्वीतलावर अस्तित्वात आल्यापासून माणूस जसा अस्तित्वाची लढाई लढतो आहे तसाच स्वत:ला व्यक्त करण्यासाठी धडपडतो आहे. निसर्गातल्या घडामोडींचा संदर्भ लावू बघतो आहे. काळाच्या विविध टप्प्यांवर व्यक्त होण्याची साधने बदलत गेली. अधिकाधीक समृद्ध होत गेली. पण माणसाला सापडलेलं मूळ साधन अद्यापही शिल्लक आहे आणि जितकं आदिमानवाच्या हाती होतं तितकंच आजही महत्वाचं आहे. रेषा आणि रंग. भोवतालच्या विश्वाचा अर्थ लावण्यासाठीस्वत:ला व्यक्त करण्यासाठी वापरलेले पहिले साधन.अशा या घरामधे आदिमानवाने चित्रे काढली.ही चित्रं काढण्यामागची पहिली प्रेरणा काय असावी हा एक मोठाच प्रश्न आहे. निर्मितीच्या अदम्य इच्छेने म्हणा किंवा घर सजविण्यासाठी म्हणा किंवा रिकामपणाचा उद्योग म्हणाखडकांवर चित्रे आहेत. जगभर सगळीकडे अशा गुहा सापडतात. खडकावर काढलेली किंवा खोदलेली चित्रे हा माणसाने लिहिलेला पहिला दस्तावेज आहे.


चित्रं ही एकप्रकारे जगड्व्याळ भाषा. ते काढणा-या माणसाच्या भोवतालची परिस्थिती आणि त्या माणसाने त्या परिस्थितीविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया असे चित्रात एकत्रितपणेच व्यक्त होते. हातातल्या दगडाने किंवा गेरूने हिंस्र प्राण्यांची चित्रे काढताना त्या माणसाला कदाचित त्याच्या स्वत:च्या भीतीवर विजय मिळवायचा असेल किंवा शिकार करण्याच्या दृष्टिने तो त्या प्राण्यांच्या शरिरयष्टीचासवयींचा अभ्यास करत असेल. त्याच्या हालचालींची स्वत:शीच उजळणी करत असेल. काही कारणाने का होईना पण आदिमानवाने चित्रे काढली. माणसांनी डोंगरद-यांचा आश्रय सोडून मैदानात वस्ती करायला घेतली त्या काळापर्यंतची चित्र सापडतात.म्हणजे साधारण वीस लाख वर्षांपूर्वीपासून ते पाच सहा हजार वर्षांपर्यंतचा त्रोटक इतिहास या चित्रांमधे सापडतो. चित्रं पाहतांना त्यांची आकडेवारीकाळ ठरविणेरंग तयार करण्याची कृतीचित्रातून दिसणारे सामाजिक जीवन असल्या सगळ्या प्रश्नांना बाजुला ठेवून त्या रेषांमधला जोम आणि आवेग पाहून चकित होऊन जातो. अगदी तुटपुंज्या साधनांच्या आधाराने केवळ आंतरिक उर्मीने काढलेली चित्रं आहेत. माणसाच्या मनातली सगळी उर्जा त्या चित्रांमधे प्रकट झाली आहे. प्राण्यांच्या पायात वेग आहे. शिकार करणा-यांमधे त्वेष आहे आणि नाचणा-यांच्या पायात ताल आहे.


‘पेन्टेड रॉक शेल्टर्स ऑफ इंडिया’ या आपल्या प्रबंधाच्या शेवटी हरीभाऊ वाकणकर अशा निष्कर्षाला येतात की अश्मयुगीन मानवाच्या सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यासाठी ही प्रागैतिहासिक चित्रकला हे एकमेव साधन आहे. ही शैलचित्रे हा गतकाळाविषयीचा सुस्पष्ट असा सकारात्मक पुरावा आहे. या चित्रांची रुपरेखा, मांडणी आणि आवेग किंवा भावनात्मक प्रतिसाद यांची गुणवत्ता उच्च कोटीची आहे. चित्रकार, कलासमीक्षक आणि कलेचे इतिहासकार यांनी या चित्रांची दखल घेणे आवश्यक आहे. या महान चित्रकारांच्या काळाच्या आणि त्यांच्या कामगिरीचा उल्लेख केल्याखेरीज या देशाचा कलेतिहास पुढे जाऊ शकणार नाही.


स्व. वि. श्री. वाकणकर यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता. ते एकाचवेळी दोन्ही हातांनी लिहू शकत असत. यातला 'एकाचवेळी' हा शब्द महत्वाचा. एका हातानी मजकूर लिहित असताना, दुस-या हातानी ते चित्र काढू शकत असत. एप्रिल 1988 मधे सिंगापुरला एका सेमिनारमधे पेपर वाचण्यासाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.  हॉटेलच्या खोलीचे दार फोडले तेंव्ह दिसले की हरीभाऊ पॅडवर पंधराव्या मजल्यावरून दिसणा-या सिंगापुरचे चित्र रेखाटत होते आणि दुस-या हाताने लिहित होते. त्यांनी जे  भीमबेटकाच्या चित्रकारांबद्दल आणि चित्रांबद्दल म्हटले आहे ते त्यांच्या स्वत:च्या बाबतीतही खरे आहे. त्यांच्या कामगिरीचा उल्लेख केल्याखेरीज या देशाचा कलेतिहास आणि पुरातत्त्व पुढे जाऊ शकणार नाही.


समाप्त 

सुनंदा भोसेकर

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...