Enquire Now

Request A Quote

लोकविलक्षण हरिभाऊ २

हरिभाऊ वाकणकर यांचं काम पाहिलं की  छाती अक्षरश: दडपून जाते. फक्त ६९ वर्षांतच त्यांनी हे हिमालयाएव्हड्या उंचीचं काम कसं केलं असेल याचं नवलच वाटत राहतं . त्यांच्याविषयी असं सांगितलं जातं की फक्त झोपण्यापुरतेच ते घरी जायचे बाकी सारा वेळ ते संस्थेतच असायच. त्यांनी विविध शोधांपायी केलेल्या प्रवासाच्या नुसत्या नोंदी जरी चाळल्या तरी आपल्यासारख्याना घामच फुटावा. आणि हे सारं अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना. त्यांच्या कार्याला महाराष्ट्रात मात्र मिळावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. ते फक्त ' तरुण भारत ' पुरतंच मर्यादित राहिलं. ऐशीच्या दशकाच्या साली ज्या वृत्तपत्रात मी काम करत होतो तेथे ' तरुण भारत 'चा  अंक सहज हाती पडला, ज्यात त्यांच्यावरचा एक लेख आला होता . तो वाचला आणि मी अतिशय प्रभावित झालो. १९८७ साली ' 'चिन्ह'  च्या पहिल्या अंकात मी त्यांच्यावर आवर्जून एक लेख  प्रसिद्ध केला. असं ठरवलं होतं की पहिल्यांदा त्यांच्यावरचा परिचय लेख द्यायचा  आणि नंतर त्यांच्यावर एक विशेषांकच प्रसिद्ध करायचा. पण ते  झाले नाही कारण नंतरच्या पाच सहा महिन्यातच ते अचानक गेलेच. ते गेले ती बातमी देखील फक्त ' तरुण भारत' मध्येच वाचावयास मिळाली. त्यांच्यावरच्या लेखाचा हा दुसरा भाग.

हरीभाऊ वाकणकरांनी शोधलेले भीमबेटकाही मध्यप्रदेशात भोपाळपासून 45 मैलांवर आहे.आजही या परिसरात ब-यापैकी दाट जंगल आहे आणि जनावरांची ये-जा आहे. वाकणकर या ठिकाणी पोचले तेच दाट जंगलातून वाट काढत. त्यांनी पाहिलेल्या पहिल्याच गुहेत त्यांना चित्रं दिसली. त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं आहे की या जागी त्यांना मानवी वस्तीचे अवशेष दिसले जे किमान पाच लाख वर्षांपूर्वीचे होते. ते एका मातीच्या ढिगा-यावर उभे होते. त्यांना जाणवले की हे एका बौद्ध स्तुपाचे अवशेष आहेत. शेजारीच आणखी एका स्तुपाचे अवशेष होते. ते म्हणाले की ‘सम्राट अशोकाचा काफिला याच रस्त्याने गेला असेल. समोर भग्नावशेष दिसताहेत, ते भोजराजाने बांधलेल्या धरणाचे आहेत. त्याने इतिहासातला सगळ्यात मोठा तलाव बांधला. भोपाळहून इथपर्यंत नावा येत असतील. ही जागा भारतीय पुरातत्त्वाच्या दृष्टीनेच नाही तर जागतिक पुरातत्त्वाच्या दृष्टीने महत्वाची आहे.’

रातापाणी नावाच्या अभयारण्यात साधारण दहा किलोमीटरच्या परिसरात आदिमानवांची भीमबेटकासह सात आश्रय संकुले सापडली आहेत. या संकुलांमधे मिळून सहाशे सत्तावीस गुहा किंवा आडोसेआसरे आहेत. या सगळ्या संकुलांपैकी भीमबेटका संकुलाचा विस्तृत प्रमाणावर  अभ्यास झाला आहे. तिथे उत्खननही ब-यापैकी झाले आहे.एकट्या भीमबेटका संकुलात दोनशे तेवीस गुहा आहेत पैकी एकशे तेहतीस गुहांमधे चित्र असल्याची नोंद झाली आहे. विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेकडच्या पायथ्याच्या भागात भीमबेटका आहे. या सगळ्या परिसरातल्या या गुहा साधारणत: १६०० ते २००० फुट उंचीवर आहेत. भीमबेटका संकुलाचा विस्तार अडीच मैलांच्या परिसरात आहे.


विक्रम युनिव्हर्सिटीच्या विद्यमाने असो किंवा स्वत:चे पैसे घालून केलेले असो, हरीभाऊंचे संशोधन नेहमीच तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत चालायचे. स्थानिक आदीवासींना हाताशी धरून त्यांना काम शिकवून त्यांच्याकडून ते उत्खननासारखे जोखमीचे काम यशस्वीपणे करून घ्यायचे. सच्चिदा नागदेव यांनी लिहिले आहे की एका जुन्या सायकलवर कागद, रंग, ब्रश आणि चणे, शेव अशी खाण्याची सामग्री असलेली झोळी अडकवून वाकणकरांबरोबर त्यांचे शिष्य दाट जंगलात शैलाश्रय शोधत हिंडत असत. सर पुढे हातात एक लाठी घेऊन जंगली जनावरांना दूर ठेवण्यासाठी जोरजोरात देशभक्तीपर गाणं म्हणत चालत असत आणि मागाहून त्यांचे शिष्य त्यांची री ओढत असत. श्रीमती वाकणकर यांनीही एक किस्सा सांगितला होता. भीमबेटकाच्या गुहांमधे उत्खनन चालू असताना, एका आदिवासी मुलाला फणफणुन ताप भरला होता म्हणुन त्याला वाकणकरांच्या तंबूत निजवले होते. रात्री तो मुलगा उठून पाणी मागायला लागला. तंबूतले पाणी संपले होते हरीभाऊ तसेच हातात पाण्याचा गडवा घेऊन निघाले. वहिनी त्यांच्या मागोमाग कंदील घेऊन गेल्या तर पाणवठ्यावर वाघ पाणी पीत होता. असे अनेक किस्से त्यांच्या निकटवर्तीयांकडून ऐकायला मिळतात. परदेशात गेले तेंव्हा तर परदेशी चलन मिळणे मुश्किल आणि पैसे टाकून ते खरेदी करणेही मुश्किल. परदेशातला राहण्याचे खर्च भागवण्यासाठी स्केचेस विकून पैसे उभे करत असत.


त्यांनी लिहिले आहे की भीमबेटका मधली चित्रं ही काळाच्या दोन टप्प्यांवर काढली गेली आहेत. पहिला टप्पा जेंव्हा इथे रहाणारे समूह केवळ शिकार करणारे आणि फळं कंदमुळं खाऊन जगणारे होते त्यांची शस्रे गारगोटीच्या दगडाची होती. या मानवांनी इथून स्थलांतर का केले हे समजायला मार्ग नाही. बहुधा निसर्गातल्या काही अकस्मात बदलामुळे किंवा घटनांमुळे त्यांनी मुक्काम हलवला असावा. दुसरा टप्पा जेंव्हा इथली माणसं गुहेतच रहात होती पण त्यांच्या समोर घोड्यावर बसून युद्ध करणारेलवाजम्यासह शिकार करणारे सैनिक होते. जेंव्हा केंव्हा ते डोंगर उतरून तेंव्हाच्या नागरी वस्तीत जात असतील तेंव्हा त्यांच्यातल्या कुणीतरी हत्तीवरून निघालेली राजाची मिरवणूक पहिली असेल. या दोन टप्प्यांमधे मध्य पुराश्म युगापासून गुप्त साम्राज्याच्या अस्तापर्यंतचा काळ सामावला आहे. मध्य पुराश्म युगात काढलेल्या चित्रांचेही अभ्यासकांनी पाच भाग पाडले आहेत. पहिल्या टप्प्यात चित्रांमधे चित्ताहत्तीजंगली रेडागायी अश्या मोठया प्राण्यांची मोठमोठी रेखचित्रे आहेत. काही चित्रांमधे थोडे रंग भरलेले आहेत किंवा नागमोडी रेषा काढल्या आहेत. वापरलेले रंग गेरुफिका किंवा गडद लालपिवळातपकिरी, नारिंगीजांभळा असे आहेत. अर्थात आता बहुतांश रंग फिकट झाले आहेत. दुस-या टप्प्यात प्राण्यांच्या चित्रांचा आकार अतिशयोक्त होता त्यांच्या शरीरमानाप्रमाणे आहेप्राण्यांच्या शरीरामधे अनेक भौमितिक किंवा अमुर्त आकार आढळतात. सगळयात जास्त चित्रे हरणांची आहेत. या टप्प्यातल्या चित्रांमधे मनुष्याकृती आहेत त्या केवळ रेखाकृतींच्या स्वरुपात. बहुतेक चित्र शिकारीविषयी आहेतहरणांच्यागेंड्यांच्या शिंगांचे मुखवटे घातलेली माणसे हातात तिरकमठे काठ्यादगडाचे टोक लावलेले भाले इत्यादी घेऊन प्राण्यांचा पाठलाग करत आहेत. यात बायकाही सामील आहेत. या चित्रांमधे बावीस प्रकारच्या प्राण्यांची नोंद झाली आहे. रंग तेच आहेतत्यात हिरव्या रंगाची भर पडली आहे. तिस-या टप्प्यातल्या चित्रांमधे बायका आणि लहान मुलांची भर पडली आहेत्याच बरोबर हाताचे ठसेठिपके आणि रेषा यांनी तयार केलेल्या आकृत्या आहेत. चौथ्या टप्प्यात प्राण्यांपेक्षा माणसांच्या आकृत्या जास्त आहेत.


किमान एका गुहेमधे तरीएक लाख वर्षांपुर्वीपासून इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत म्हणजे एक हजार वर्षांपूर्वीपर्यंत वारंवार वस्ती झाल्याचा पुरावा सापडला आहे. मात्र मुख्यत: या ठिकाणीताम्रपाषाण युगात म्हणजे साधारणपणे पंचवीस हजार वर्षांपूर्वीया गुहांमधे सगळ्यात जास्त वस्ती होती. ताम्रपाषाण युगातल्या वस्तीचे चित्रांखेरीज इतरही अवशेष सापडतात. उदाहरणार्थ प्राण्यांची हाडेमाणसांची दफन स्थानेचित्रांसाठी वापरलेल्या रंगांचे अवशेषइत्यादी. गंमत अशी की या सगळया चित्रांमधे कुठेही बैलगाडी किंवा रथ अशा वाहतुकीच्या साधनांचे चित्र नाहीझोपडी नांगर अशीही चित्रे नाहीत आणि सुरईवजा भांडे आणि ग्लास सदृश भांडे सोडल्यास कुठेही भांड्यांची चित्रे नाहीत. माणसांच्या आकृती या काड्यांसारख्या रेखाकृती आहेत. त्यांच्या अंगावर कपडे नाहित. क्वचित कुठे कमरेला गुंडाळेले आहे. ती कदाचित वल्कलं असावीत. नंतरच्या चित्रांमधे माणसांच्या गळ्यात माळा वगैरे आहेत. धर्मभावना किंवा देवकल्पना विकसित झाली होती की नाही हे समजायला वाव नाही पण एका चित्रात एक माणूस हात उभारून गुडघ्यांवर उभा रहिलेला दिसतो. एक गणपती सदृशही चित्र आहे. त्याच्या बाजुला काही चिन्हे आहेत,  ती अशोकपूर्व  ब्राह्मी लिपीतली अक्षरे असावीत असा तज्ञांचा कयास आहे.


वापरलेले रंग हे खनिज रंगांच्या ढेकळांमधे पाणी घालून तयार केले असावेत. वनस्पतींचा रसमधही घातलेला असावा. इतरत्र प्राण्यांची चरबी रंगात मिसळल्याचे पुरावे आहेत. पण भीमबेटकामधल्या रंगांमधे चरबी आढळत नाही. गेरू आणि पिवळी माती जमिनीतून खरवडून घेतली आहे आणि जनावरांच्या हाडांच्या पसरट तुकड्यामधे खडकांच्या खोबणींमधे खलून घेतली आहे. चित्र कढण्यासाठी बहुधा हाताच्या बोटांचा किंवा जनावरांच्या केसापासुन बनवलेल्या ब्रशचा वापर केलेला असावा.


या सगळया चित्रांचे शास्त्रीय पद्धतीने कालमापन झालेले नाही त्यामुळे तिथे आढळणा-या परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांच्या काळाचे अनुमान बांधावे लागते. दगडाच्या हत्यारांची जातकुळीचित्रांसाठी वापरलेले रंग आणि त्याचबरोबर चित्रांचे विषय, त्यांची शैली यावरून ती कुठल्या काळात काढली गेली असावीत याचा अंदाज बांधता येतो. अनेक ठिकाणी जुन्याच चित्रांवर नवी चित्रे काढलेली आहेत. काही ठिकाणी रंगांचे एकावर एक पंधरा थर सापडले आहेत. काळाप्रमाणे चित्रांचे विषय बदलत गेले आहेत. शिकार करणारे समूह प्राणी पक्षीझाडे यांच्याबरोबरच घोड्यावर बसुन केलेल्या लढाईची दृश्ये आणि हत्तीवरुन निघालेल्या मिरवणूकीचेही चित्र आहे. ऐतिहासिक काळात बौद्धांचे शिलालेखही आढळतात. यात चित्रांबरोबरच वेगवेगळे पॅटर्न्स डिझाईन्सही आहेत. बहुतेक सगळ्या गुहांची जमीन समतल करून घेतलेली दिसते. अनेकदा चित्रे छतावरगैरसोयीच्या जागी काढलेली आहेतगुहेतले चांगले गुळगुळीत दगड सोडून देऊनखडकाळ ओबडधोबड पृष्ठभागावर चित्रे आहेत. विशिष्ट ठिकाणी चित्र काढण्यामागे काही धर्मिक समजुत होती की काय हे समजायला मार्ग नाही. संशोधकांचे असेही म्हणणे आहे की जरी बहुतेक रहात्या गुहांमधे चित्रे असली तरीकाही गुहांमधेजिथे सातत्याने केलेल्या वस्तीचे पुरावे आढळतात अशा ठिकाणी चित्रे नाहीतमात्र जिथे वस्तीचे पुरावे नाहीत अशा काही गुहांमधे चित्रे मोठया संख्येने आहेत. धार्मिक कार्यासाठी माणसे त्यांच्या गुहेबाहेर इतर ठिकाणी जमत असावीत असा निष्कर्ष काढण्याएवढी माहिती या समुहांविषयी आपल्याला नाही. अलिकडेच उजेडात आलेला आणखी एक मुद्दा म्हणजे मध्यभारतात असलेल्या या गुहा एका प्रवासाच्या वाटेवर आहेत आणि हा मार्ग उत्तरेत मिर्झापूरवरून बनारस पर्यंत जातो. गुहांमधे रहाणारे मानवसमुह ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करणारे असावेत असा होरा आहे.


या चित्रांमधे आढळणारं जनजीवन आणि सध्या या भागात रहात असलेल्या गोंडकोरकुप्रधान या आदिवासी समुहाच्या जगण्यामधे अद्यापही काही साम्य आहे.या आदिवासींची चित्रं आणि गुहांमधली चित्रं यांच्यात काहीसं साम्य आहे. मुख्य म्हणजे रहात्या घराच्या भिंतींवर आणि छतावर प्रसंगमलिका चितारण्याची पद्धत अद्यापही आस्तित्वात आहे. अद्यापही या जमाती उपजिविकेसाठी जंगलावर अवलंबुन आहेत.फळंकंदमुळं गोळा करणेआदिम पद्धतीने शेती करणे आणि छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार ही पोट जाळण्याची साधने आहेत.असे असले तरी स्थानिक आदिवासी समुह या चित्रांशी स्वत:ची परंपरा जोडत नाहित.त्यांना या गुहा पुर्वापार माहित होत्या पण त्यांचा तिथे वावर नव्हता. या गुहांमधुन मृतात्मे रहातात आणि त्यांनी ही चित्र  काढलेली आहेत अशी त्यांची समजूत आहे.


अपूर्ण 


सुनंदा भोसेकर

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...