Enquire Now

Request A Quote

मानवी देहचित्रण

" २०११ साली 'चिन्ह'चा "नग्नता: चित्रातली आणि मनातली" हा अंक प्रसिद्ध झाला आणि लगेचच पहिली प्रतिक्रिया आली ती पुण्यातून. मधुरा पेंडसे या तरुणीची. अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात. ती आम्ही फेसबुक आणि ब्लॉगवर वापरली आणि मग मात्र प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस कोसळला. मग फोनवरून मधुराशी वरचेवर बोलणं होऊ लागलं. अशाच बोलण्यात तिनं आपणही चित्रं काढतो असं सांगितल्यावर मात्र चित्रांवरूनच अधिक चर्चा होऊ लागली. तोपर्यंत महाराष्ट्रातील अन्य शहरातून देखील आपणही न्यूड चित्रण करतो असं सांगणारे अनेक फोन येऊ लागले. त्यातूनच मग नग्नताच्या तिसऱ्या अंकात अशा तरुणींनी लिहिलेल्या लेखांची मालिका करायची कल्पना सुचली. सर्वाना ती आवडली देखील आणि त्या लिहूही लागल्या. लिहिलेलं पाठवूसुद्धा लागल्या. त्याबरोबर अर्थातच काढलेल्या चित्रांचे फोटोज देखील असायचेच. पण दुर्दैवानं त्यानंतर 'चिन्ह'च्या वार्षिक अंकाचं प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे सारे लेख तसेच बासनात/ संगणकात पडून राहिले. 'चिन्ह Art News' सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि त्या लेखांची आठवण झाली. ते लेख इथून पुढं जसे जमतील तसे प्रकाशित करणार आहोत. नाशिकच्या मानसी सागर यांचा लेख याआधी प्रकाशित केला आहे. आज आणि उद्या प्रकाशित करीत आहोत पुण्याच्या मधुरा पेंडसे यांचा. "


मी देहचित्रण करते. मानवी देहाची चित्रं काढताना मला मजा येते. अर्थात या मजेविषयी थोडं अधिक सांगायला हवं. मला असं कायम वाटत आलं आहे की मानवी देह हे अभिव्यक्तीचं एक आदिम आणि स्वाधीन साधन आहे. देहाविषयीचं कुतूहल, जिवंतपणाचा उल्हास, जीवनातली विविधता आणि जीवनाची मिती... सारं काही समजावून घेण्याचं ते पुरातन काळापासून चालत आलेलं माध्यम आहे. सुजान लँगर या थोर कला समीक्षक बाईंनी नृत्य हाच सर्वात प्राचीन कलाविष्कार असल्याचं म्हटलं आहे ते यामुळेच. देह हे आदिम मानवाच्या जगण्याचं साधन होतं आणि आविष्काराचंही. जो देह वापरून ते अन्न गोळा करीत होते तोच देह कलाविष्कारासाठी ते वापरीत होते आणि हेच चित्र आजही काही आदिवासीसमूहांमध्ये दिसून येतं. नृत्य हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. याला अन्य कोणतंही साधन लागत नाही हे त्यामागचं मोठं कारण असणार.

हे माध्यम वापरताना मला दडपण, शरम किंवा अस्वस्थता वाटत नाही. अभिव्यक्तीच्या शोधाचं समाधान लाभतं. चित्रकाढतानायातना, क्लेश, दुखः भोगावं लागत नाही. माझी आई मला विचारते - तुला हीच चित्र काढावी असं का वाटतं ? तिला माझ्या या आवडीबद्दल नेहमीच शंका असते. पण हा प्रश्न कला निर्मितीच्या दृष्टीनं गैरलागू नाही. कलाकाराचा एक शोध असतो. या शोधाचा एक हेतू असतो.


स्वदेह हा माणसाच्या अनुभवविश्वातील निकटतम विषय आहे आणि त्याचं काही प्रमाणात सामान्यीकरण होऊ शकतं हा त्याचा दुसरा गुणधर्म आहे. स्वशरीराचा अनुभव व्यक्तिगत असतो आणि काही प्रमाणात तो अनुभव वाटून घेण्याजोगासुद्धा असतो. यातूनच काय दाखवलं असता काय दिसेल याचे ढोबळ आडाखे तयार व्हायला लागतात. प्रमाणबद्धतेच्या कल्पना तयार व्हायला लागतात. सौंदर्याच्या कल्पना तयार व्हायला लागतात. म्हणजे स्वतः अनुभवणं, अनुभव वाटून घेता येणं, आणि सामायिक अनुभवातून आविष्काराच्या कल्पना दृढ करणं असा हा प्रवास आहे. दृढ झालेल्या कल्पनांच्या नजरेतून स्वतःकडे पाहणं  हा त्याचा पुढचा टप्पा आहे.


लहानपणापासून एक गोष्ट ऐकली होती, दुर्योधनाची. महाभारताच्या युद्धात सर्व कौरव मारले गेले. केवळ दुर्योधन जीवित होता. गांधारीनं भगवान शिवाकडून दिव्य दृष्टीचं वरदान मिळवलं होतं, डोळ्यांची पट्टी काढून ज्या नग्न देहाकडे तिची नजर पडेल ते शरीर वज्राचे होईल असा तो वर होता. दुर्योधनास गंगेत स्नान करून नग्न अवस्थेत स्वतः समोर उपस्थित राहण्यासाठी गांधारीनं सांगितलं. परंतु व्हायचं काहीतरी वेगळंच होतं. जेव्हा दुर्योधन गंगेत स्नान करून नग्न अवस्थेत गांधारीकडे चालला होता तेव्हा वाटेतच श्रीकृष्ण त्यास भेटला.एव्हढा मोठा झालास आणि आई समोर असा नग्न जाशील? तुला जराही लाज वाटत नाही? असं त्यानं त्याला उगीच खडसावलं. यावर लाज वाटून  दुर्योधनानं आपल्या मांड्यांवर झाडाची पाने गुंडाळली आणि तो गांधारीच्या समक्ष उभा राहिला. जेव्हा गांधारीनं डोळ्यांवरची पट्टी काढली तेव्हा दुर्योधनाच्या मांडयांवर तिची दिव्य दृष्टी पडलीच नाही. त्यामुळं शरीराचा तो भाग वज्राचा झालाच नाही. पुढं युद्धात कृष्णाच्या सुचनेनुसार भीमानं त्याच्या मांड्यांवर प्रहार केला. अखेरीस दुर्योधनास हार मानावी लागली. महाभारताला उपजीव्य महाकाव्य का म्हणतात हे अशा लहानमोठया गोष्टींवरून कळत राहतं. महाभारताची रचना ज्या काळात झाली त्या काळापासून शरीराची लाज आपल्यात आहे.  काय झाकलं पाहिजे, काय दडवलं पाहिजे याचे सामाजिक संकेत आपल्याकडे केंव्हा आणि कसे कसे चालत आले असले पाहिजेत याचा दाखला देणारी ही गोष्ट आहे. महाभारतापासून काहीही वेगळं राहू शकलं नाही. लहानपणापासून अशा ब-याच गोष्टी वाचून/ ऐकून स्वशरीराबद्दलच्या संकल्पना कळत नकळत होत राहतात. याला सोशल कंडीशनिंग म्हणजे विचारांचं वळण म्हणता येईल.  प्रश्न असा आहे की अशा गोष्टी ऐकत जेंव्हा आपण मोठे झालेलो असतो तेंव्हा या पलीकडं स्वतःचं म्हणून काही वेगळं जाणवणं  असतं ते सामाजिक वळण विचाराबरोबर पुरेसं जाणारं नसलं तर काय करायचं या पातळीवर आपल्याला आपलं उत्तर शोधत राहावं लागतं.


माणसाला स्वतःबद्दल, स्वशरीराबद्दल जे आकलन होतं ते शरीरबाह्य निसर्गाच्या किंवा इतर प्राणिमात्रांच्या आकालनापेक्षा केव्हाही अधिक असतं. त्याला आपल्या शरीराची रचना, अवयव आणि त्यातून निर्माण होणारे आकार हे केव्हाही जास्त जवळचे वाटतात. साहजिकपणे तो अनाकलनीय गोष्टींची तुलना प्रथम स्वतःशी आणि स्वतःच्या शरीरानं बनलेल्या आकारांशी करतो. लहानाचं मोठं होताना आपल्या भोवतालच्या परिसराबरोबर, इतर मानवी देह दिसतात. उदा. आईचा आकार , वडिलांचा आकार त्यामधून आलेले पंचेंद्रियांचे अनुभव, हे शरीराचे आकार निरनिराळ्या भावभावना उत्पन्न करतात. हे समजताना हळूहळू आपण स्वतःसही प्रतिबिंबाच्या स्वरुपात बघतो व आपल्या अनुभवांच्या सीमेप्रमाणे आपला देह, त्याबद्दलच्या सौंदर्यकल्पना जाणू लागतो.  


कलाकार म्हणून या सगळ्याशी भिडताना माझ्या बाबतीत असं झालं की कलामहाविद्यालय सोडून जवळ जवळ दहा/अकरा वर्षांनी पुन्हा चित्र काढण्याची ओढ वाटू लागली. मग माझ्या आवडीचा आणि ज्याबद्दल नेहमीच जवळीक वाटली अशा मानवी देहाच्या रेघोट्या कागदावर काढायला सुरवात केली. हवं तसं समाधान मिळत नव्हतं. मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी, मुळात मानवी शरीर डोळ्यासमोर असणं   गरजेचं आहे हे माहित होतं. चांगल्या पातळीवर मजा यायला पाहिजे, देहचित्रण सुधारले पाहिजे म्हणून मी मॉडेल समोर बसवून चित्र काढायचे ठरवले. पुण्यात राहणा-या  कुठल्याही कलाकाराप्रमाणेच माझ्याकडेही देहचित्रणासाठी मॉडेल्सची यादी अशी नव्हती. चित्रकलेची आस्था असलेल्या एका मित्राला विचारल्यावर त्यानं तत्परतेनं होकार दिला! मग इंटरनेटवर मेल मॉडेल्सला कसं उभं करावं इत्यादीबद्दल माहिती वाचली. मग घरीच कॅरमबोर्डवर लावतात तसला दिवा आणून लावला. हे आमचं पहिलंच सेशन. मित्र दोन पायात अंतर ठेऊन उभा राहिला, मग खुर्चीवर बसला मग उकिडवा पडला.. पण एकाही स्थितीमध्ये फार वेळ थांबू शकला नाही. त्याला थंडी वाजत होती.  मग ५ /१० मिनिटांची छाया प्रकाश आणि body contour (शरीर रेषा) दिसतील अशी भरभर स्केचेस  केली आणि त्याचे वेगवेगळ्या पोजेसमध्ये फोटो काढले. हे करताना निरीक्षणानी आणखीही काही लक्षात आलं, हा मित्र अबोल आहे,  सातत्यानं कसलासा विचार करतो आहे असं त्याच्याकडे बघणा-याला वाटावं. नुसता चेहराच नाही तर त्याचं संपूर्ण शरीर कुठलासा विचार करत आहे असं मला भासलं. हे शरीराच्या नुसत्या बाह्य दर्शनाच्याच्या पलीकडचं होतं. डोक्यात असलेले  ग्रे सेल्स आपल्या शरीराच्या ठेवणीवर परिणाम करतात याचा जवळून अनुभव आला.. असो, या फोटोंचे प्रिंट काढण्यासाठी एका मित्रानं स्वतःच्या ऑफिसचा प्रिंटर उपलब्ध करून दिला. परत परत त्याच्याकडे जाऊन प्रिंट्स काढणं  शक्य नव्हतं त्यामुळं सरळ नेहेमीच्या प्रिंटरकडे गेले आणि या फोटोंचे प्रिंट्स काढले. माझ्या चेहे-यावर गुन्ह्याचे भाव नसल्यानं कदाचित त्यानंही कधीच माझ्याकडं भलते कटाक्ष टाकले नाहीत ना कोणत्याही प्रकारची विचारपूस केली.


हाडांचे सापळे सर्व सामान्य नजरेस सारखेच दिसतात. जेव्हा त्यावर मांस चढते तेव्हा जरा त्यात भेद होतो. स्त्री/पुरुष, स्थूल/ बारीक इत्यादी. मग त्वचा! या त्वचेशिवाय हा देह कसा दिसेल? मग you tube वर अशा काही गोष्टींचा शोध. येथे काही medical research clips मध्ये हाडांची रचना कशी असते? त्यामुळे शरीराचे आकार कसे होतात याही गोष्टी बघता येणं  शक्य झालं. मग हाच मानवी देह रात्री कसा दिसतो, अगदी नैसर्गिक वातावरणात म्हणजे आकाशाखाली, पाण्याजवळ, कसा जाणवतो ? बंद खोलीत कसा भासतो ? सामाजिक मान्यता असलेला सुंदर देह कोणता ? असे बरेच प्राथमिक प्रश्न कुतूहल म्हणून मनात येतात.


देहचित्रण करताना ब-याचदा काही मंडळींनी "बसतो!" पण कपडे काढणार नाही असं सांगितलं मग त्यांचे हात/ पाय/ पाठ किंवा फक्त शॉर्टस घातलेली अशी स्केचेस केली. मला चित्रं काढण्यासाठी जर योग्य देह भेटला तर मी अनेकांना मॉडेल व्हाल का? असं सहज विचारते. मानवी देहाची नव्याने ओळख करून त्याचाशी दोस्ती करणे इतके साधे मनोरंजन असताना त्यामध्ये चावटपणा किंवा गुन्हा केल्यासारखं असं काही नसतंच.


अलीकडेच हाती आलेल्या सुंदराचा वेध लागो या  पुस्तकात लेखिका श्यामला वनारसे यांनी म्हटले आहे की देहजाणीवा म्हणजे लैंगिकता हे संकुचित समीकरण त्यातली कोंडी फोडून खुलं केलं पाहिजे. लहानपणापासून आठवूया. सगळ्या संवेदना हे शारीरिक अनुभवाच्या घडणीतले  मूलकण. कामं केली, कुशलता मिळवली ते सारं शरीरमाध्यमातूनच. पहिला पाऊस अंगावर घेताना जे काही वाटलं ते शब्दातीत भावभांडार असो की एखादी अवघड कृती जमली तेव्हा शरीरानं काय घडवायला पाहिजे ते कळलं, तो क्षण असो .. शरीरच तर ज्ञान देतंय. भावभावनांचे रस चाखतंय, कृतीचे निर्धार, कामाचे कष्ट, कर्माचे भोग, अंगावर घेतंय. ते सारं अनुभवतः लैंगिक कुठं असतं ? लैंगिक आकर्षणानं बदलणारं शरीर वेगळं, उत्तेजना वेगळी, मत्तधुंदीही वेगळी. विश्राम घेणा-या शरीराचा आनंद, आवेगानं सळसळणा-या शरीरात व्यापून राहिलेली उत्कंठा, भान हरपून झोकलं जाणारं आणि आकंठ बुडलेलं असतानाही भानावर असणारं शरीर, हे सगळं त्या पेक्षा वेगळं. या प्रचंड घटिताला आपण देहजाणीवा म्हणू. हा प्रदेश प्रांतवार विभागून हे तुमचं अतिसंवेदनशील’, खरं तर लैंगिक प्रदेश असं सांगण्याचे प्रयत्न झाले आहेत. पण तरीही देह जाणिवांचे काही शब्दाबाहेर उरतेच. त्यातला एक भाग लैंगिक जाणिवांचा असतो. काही वेळा तोच आपला संपूर्ण ताबा घेऊन बसू शकतो. स्पष्टता लागते ती याच घोटाळ्याच्या प्रसंगी.’  

दृश्यकलेतील देहजाणीवा यापेक्षा वेगळ्या नाहीत. ही स्पष्टता जशी यायला लागली तसा माझा देह चित्रणातील आनंद वाढला आणि काम अधिक मोकळेपणाने होऊ लागले.


पूर्वाध संपला


मधुरा पेंडसे

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...