Enquire Now

Request A Quote

जेजेच्या विद्यार्थिनीचा अनोखा प्रयोग

जेजे स्कूल ऑफ आर्टच्या इतिहासात एका विद्यार्थिनीनं, तेही शिल्पकलेच्या परफॉर्मन्स सादर करण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. अलिशा बायस्कार हीन अतिशय धाडस दाखवून इन्स्टॉलेशन  आर्ट आणि परफॉर्मिंग आर्ट या दोघांची सांगड घालून एक वेगळीच संकल्पना सादर केली. तिच्याविषयी लिहिते आहे तिचीच मैत्रीण रुची मणचेकर. 

जेजेच्या वार्षिक प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला अगदी तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना,आपण आपली कला संकल्पना इन्स्टॉलेशनच्या स्वरूपात इतक्या कमी कालावधीत कशी उभारायची हा प्रश्न आलिशासमोर होता. वेळ मर्यादा कितीही कमी असली तरीसुद्धा आपली संकल्पना रसिकांसमोर मांडण्याचा तिचा निश्चय मात्र पक्का होता ! 

जेजेच्या वार्षिक प्रदर्शनाला सुरुवात झालेली तरी आलिशाचं इन्स्टॉलेशन काही पूर्ण झालं नव्हतं, पण तरीही ते  पूर्ण करायचा हट्ट मात्र तिनं सोडला नाही. या काळात तिला काही मंडळींनी प्रोत्साहन दिलं परंतु अनेकांनी तिला परावृत्त करायचा देखील प्रयत्न केला. वार्षिक प्रदर्शन समाप्त व्हायला अगदी चार दिवस शिल्लक असताना आलिशाचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालं आणि लगेचच तिनं तिच्या सादरीकरणाला सुरुवात देखील केली आणि दृश्य कला व सादरीकरण कला यांची एकत्र सांगड घालत तिनं तिची संकल्पना  इन्स्टॉलेशनच्या स्वरूपात कलारसिकांसमोर मांडण्याचा वेगळा प्रयोग केला. जेजेमध्ये अशा प्रकारचं  इन्स्टॉलेशन  प्रथमच झालं असून तिला तिच्या या अनोख्या संकल्पनेला कलारसिकांकडून चांगलाच प्रतिसाद देखील लाभला.

सुरुवातीला मिळणारा प्रतिसाद खूपच कमी होता पण ज्या विद्यार्थी किंवा रसिकांनी तिच्या या सादरीकरणाचा आस्वाद घेतला, त्यांनी तिचं कौतुकही केलं. आलिशाचं सादरीकरण इतरांनी पाहावं यासाठी दुसऱ्या दिवसापासून तिच्या मित्रा- मैत्रिणींनी जेजेच्या कॅम्पसमध्ये फिरून लोकांना गोळा केलं.  त्यानंतर मात्र आलिशानं आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. तिनं काही काळासाठी उभारलेल्या तिच्या विश्वात आणि सादरीकरणात ती अगदी बुडून गेली होती.

आलिशा आपली इन्स्टॉलेशनची संकल्पना मांडताना सांगत होती की, 'चंद्र आणि स्त्री अशा सृष्टीतील दोन सुंदर घटकांमधलं साम्य मी माझ्या  इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्र कलाकलानं आपलं रूप निसर्गासमोर उलगडत असतो. अमावास्येला पृथ्वी छायेच्या दबावाखाली चंद्राचं अस्तित्व असतं. त्याचप्रमाणे भारतीय स्त्री ही सुद्धा समाजाच्या दडपणाखाली जगत असते. पावलापावलांवर तिला समाजभान राखावं लागतं, तसेच ती आपलं मन आणि भावविश्व एकदम कळू देत नाही. भीती, आत्मविश्वास, संकोच, लज्जा अशा नानाविध सावल्यांच्या दडपणाखाली आपलं संपूर्ण अस्तित्व पूर्णतः प्रकट न करण्याचा तिचा आटोकाट प्रयत्न असतो. पौर्णिमेला चंद्र पूर्ण रूप दाखवत आकाशाला भरून टाकतो व स्वतःचे डागही निसर्गासमोर निर्भीडपणे उघड करतो त्याचप्रमाणे स्त्री सुद्धा स्वतःचं  सामर्थ्य निःसंकोचपणे समाजासमोर उघड करते, व हेच मी माझ्या इन्स्टॉलेशन  आणि सादरीकरणाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला"

तिच्या या संकल्पनेला कलारसिक तसेच कला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला परंतु का कुणास ठाऊक शिक्षकांकडून मात्र म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 
 जेजेला वारंवार बरीच मोठमोठी दिग्गज मंडळी आणि कलाकार वरचेवर भेट देत असतात तसेच बरेच कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. परंतु या  दिग्गज कलाकारांकडे लक्ष देत असताना जेजेमधल्या आजी विद्यार्थ्यांकडे म्हणजेच कलाकारांच्या येणाऱ्या  पुढच्या  पिढीकडे दुर्लक्ष तर होत नाही ना ...याचा देखील विचार व्हायला हवा. 
रुची मणचेकर

Top Features

 

Feature 1

म्युझियम दिवसाच्या निमित्तानं !

अधिक वाचा

Feature 2

मानवी देहचित्रण भाग 2

अधिक वाचा

Feature 3

मानवी देहचित्रण

अधिक वाचा

Feature 4

जेजेच्या विद्यार्थिनीचा अनोखा प्रयोग

अधिक वाचा

Feature 5

अत्रंगी चित्रकार...

अधिक वाचा
123456