Enquire Now

Request A Quote

अत्रंगी चित्रकार...

एकीकडे दस्तुरखुद्द महाराष्ट्र सरकारच ग्रेड परीक्षांमधून "नेचर" हा विषय काढून टाकण्याचा निर्णय अत्यंत निर्बुद्धपणे घेतं त्याच महाराष्ट्र सरकारच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेले किंवा घेणारे तरुण एके दिवशी उठतात आणि थेट "नेचर" मधूनच शिकण्यासाठी नेरळच्या जंगलात जातात. कोणे एके काळी संपूर्ण भारतात पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि आज कुठलाच दर्जा न राखू शकलेल्या महाराष्ट्राच्या " वैभवशाली "कलाशिक्षण परंपरेच्या ही एकप्रकारे सणसणीत चपराकच आहे, या आमच्या मताशी हा लेख वाचल्यानांतर आणि सोबतचा व्हिडीओ पाहिल्यावर आपण निश्चितच सहमत व्हाल. 
  
जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये मी साधारण वर्षाभरापूर्वी त्यांना भेटले असेन. तशी काहीना मी ओळखतही होते. त्यांच्यात काही तरी लगबग चालू असलेली दिसली. कुतुहल जागं झालं ... आणि मग सुरु झाला संवाद. 'दर्शन महाजन', त्यानं नाव सांगितलं.  विशीतली आणखी काही मुलं आता भोवताली जमा झाली होती. अगदी साधा पोशाख पण  चित्रकार म्हणून शिक्का बसावा असा बाकी जामानिमा.  जेजेच्या उंच भिंतीना पुरतील एवढी मोठी चित्रं, आणि खूप सारी ऊर्जा..!!! त्यांच्याशी झालेला संवाद चकरावून टाकणारा ठरला. 

जेजेचं सारंच वातावरण भारावून टाकणारं असं आहे. जुन्या इमारती, त्यातील भव्य स्टुडिओ, परिसरातील गर्द झाडी, खरं म्हणजे तिथला कण न कण भारावलेला...!! मग अशा वातावरणात काही 'हटके' सुचलं नाही तर नवलच नाही का? खूप काही आगळं वेगळं घडलं आहे या संस्थेतून. त्याचाच वारसा सांगत काही तरुण भेटतात काय, आणि उत्साहानं कामाला देखील लागतात काय ! चाकोरी बाहेरचं जग त्यांना खुणावत असतं.  खरं तर ते त्यांनीच शोधून काढलेलं असतं. रुळलेली पायवाट सोडून त्यांनी जी नवी पायवाट किंवा पायवाटा तयार केल्या आहेत त्या विषयी समजून घ्यायलाच हवं. म्हणूनच मग दर्शन महाजन आणि मिलिंद शीद या दोघांशी बोलायचं ठरवलं.
"ही कल्पना मिलिंदच्या सुपीक डोक्यातून आली. आधी नीट अंदाज आला नव्हता, पण अनेक वेळा आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्याच विषयावर सतत बोलू लागलो. साधारण खर्च आणि काही तांत्रिक अडचणी यांचा अंदाज आल्यावर ठरवलं, हे तर करायचंच !

काय होत हे त्यांच्या डोक्यात? 
"निसर्गाशी संवाद, खरं म्हणजे आम्हाला निसर्गाचं ऐकायचं होतं. आपण काय सांगणार त्याला? त्याच्याकडं इतकं आहे .... ते कधीतरी,  कुणीतरी ऐकायला हवं ना ? आणि आम्ही तसंच करायचं ठरवलं होतं."
दर्शन सांगत होता तेव्हा कुठं जेजेतील त्याच्या त्या सगळ्या कलाकृतींचा मला अंदाज येऊ लागला. 

"आम्ही मुंबई जवळच असलेल्या नेरळजवळच्या एका छोट्याशा खेडे गावात पोहोचलो."

आता इथून सुरु होते एक अद्भुत कहाणी. निसर्गाच्या प्रेमात पडलेले सहा सात युवक एका अनपेक्षित अशा प्रवासाची सुरुवात करत होते. पाठीवरच्या बॅगेत जुजबी गरजेचं सामान आणि भरपूर मोठे कान, हो कानच, निसर्गाचं ऐकायचं होतं ना त्यांना ? मुंबईत एकमेकांशी खूप गप्पा झाल्या होत्या, पण इथं मात्र निसर्गाशी बोलायचं होतं, निसर्गाचं ऐकायचं होतं. मोकळं आकाश,सर्वत्र हिरवी गर्द झाडी. वेडगळ आणि वाट फुटेल तिकडं धावणारं पाणी, अधून मधून नाद मधुर आवाज, पक्षी, माती, दगड-धोंडे, लाड्काचे ओंडके हाच तर नंतरचे काही दिवस या चित्रकारांचा भव्य दिव्य स्टुडिओ ठरला आणि त्यातनं मिळाले ते मन थक्क करणारे विलक्षण अनुभव. 

एखादा नवीन विद्यार्थी चित्र काढण्यापूर्वी जसा स्वतःला सावरतो, तसे हे पण स्वतःला सावरत होते. पहिले दोन दिवस तर कुणी पाणी 'ऐकत' होतं, तर कुणी वारा, कुणी मातीत 'टक' लावली होती, तर कुणी गवतात. आता कुणालाच एकमेकांशी बोलण्याची गरजच भासत नव्हती. फक्त रात्री जेवण बनवताना चांदण्या आकाशात कविता, गाणी आणि गप्पा रंगायच्या. दिवसभराचा सारा शिणवटा क्षणार्धात निघून जायचा. पाठीला जे मिळेल ते लावून प्रत्येकजण झोपी जायचा.

या साऱ्या प्रकियेतून तयार झाल्या त्या कलाकृती. त्यात या मुलांनी चक्क निसर्गाशी झालेला संवाद  जेरबंद केला होता, तो ही निसर्गाला न दुखावता, अगदी अलगद आणि विलक्षण शांततेत. त्यावेळी घेतलेला प्रत्येक श्वास टिपला गेला तो त्यांच्या कॅमेरात. त्यामुळेच त्यातल्या सगळ्याच फ्रेम्स बोलक्या झाल्या.  काय आहे त्यात वेगळं? तर एक अतिशय भारावून टाकणारा अनुभव. 

नदीकाठी पाण्याचं गाणं तासनतास ऐकत बसलेला एक युवक , पाण्यात खाली असलेल्या दगड गोट्याचं हितगुज ऐकत जगाला विसरलेला व मग बेभान होउन त्या दगड गोट्यांशी झालेल्या संवादामधून उमगलेल्या कथा त्यांच्याच मदतीनं पाण्याखाली साकारणारा. पाण्याचीच, पाण्यानं सांगितलेली गोष्ट, आणि या गोष्टीचे नायक असतात असंख्य रंगीबेरंगी दगड गोटे .... 

इथं इतरांचं काही वेगळंच चालू असतं. तो फक्त दगडांचेच संवाद ऐकत बसलाय तेही तासनतास. "माणसाला काही वेळा दगडासारखं का बरं म्हणतात ?" असा विचार करत असताना अचानक त्याला 'दगड' भेटतो व त्याच्याशी बोलतो आणि मग  एका क्षणी हा वीर विवस्त्र होतो, त्या दगडासारखाच, अटळ, निश्चल आणि कुठलंही खरं खोटं आवरण नसलेला दगड होऊन तो त्या दगडांमध्ये स्वतःला निश्चल करतो. त्या दगडांशी एकरूप होतो. 

कुणीतरी दोरी घेऊन फिरतोय... झाडांच्या वेड्या वाकड्या सावल्याना त्या दोरीच्या रेषांनी सांधतोय..... ती दोरीचं त्याची पेन्सिल आहे आणि ब्रश देखील तीच आहे. कुणीतरी नेहमीचा निसर्गचित्राचा अभ्यास करतोय. रंगाचे उतू जाणारे आवेग जास्त जोमदार की त्याचा जोश ? असा पाहणाऱ्याला प्रश्न पडावा. 
तिकडे म्हणे एकाला मातीशी काहीतरी हितगुज करायचंय.  दगड, लाकूड आणि मोहरी... संवादाची ही सारी त्याची साधन सामुग्री. आता वाट पहायची आहे ती मोहरीच्या हळुवार कोंबांची. दगड आणि लाकूड यांना अलगद जराही धक्का न लावता.... हिरवं गार मोहरीचं चित्र... आता फार तर तुम्ही याला लँड आर्ट म्हणाल.. 
एकाला मिळाला आहे गेरू आणि बांबू. आयुष्याची चौकट मोडून तो बांबूला कामाला लावतोय. गेरूच्या लेपानंच तो भरतोय मांजरपाट. 
इकडं एक जण निसर्गाचे रंग शोधत असतो. झाडांतून, पानांतून, फुलांतून... रंगच रंग. कशाचीही बंधनं नसलेले रंग. एक अनिर्बंध चित्र साकारायला. 
गावातल्या स्त्रिया, त्यांचे कपडे यांचं एक भलं थोरलं चित्रं. गावात बेफाम सुटलेला पिवळा रंग, हिरवा रंग... 

पण मुळात हे सगळं कशासाठी ? आणि का ? नियमानं जगणाऱ्या प्रत्येकालाच बाहेर पडायचं असतं त्या एका चौकटीच्या. मोकळा श्वास, भला मोठा कॅनव्हास, न संपणारे विषय आणि साहित्य... 

या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन आलेल्या त्या तरुणांची नावे आहेत मिलिंद शीद (संकल्पनाकार), दर्शन महाजन, सूरज पाटील, राज वावडणकर, अजिंक्य पाटेकर, आशु कांबळी, राहुल पाटील. स्वतःच्याच खिशातून थोडे थोडे पैसे काढून या तरुण चित्रकारांनी आगळा वेगळा 'आर्ट कॅम्प' जन्माला घातला आहे. यात त्यांचा स्वतःशीच  एक वेगळाच परिचय होऊ लागला आहे. नेहमीची पायवाट आता ते विसरले आहेत. दर वर्षी एक गाव अशा अनेक निसर्ग 'ऐकणाऱ्या' चित्रकारांना भेटणार आहे. आणि हा सारा देखावा कॅमेरात साठवून ते तुम्हा आम्हा सर्वाना दाखवणार आहेत. मला वाटतं त्यांना भेटतायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

 सोबत यु ट्यूब लिंक जोडली आहे. जरूर बघा. 
डॉ. मंजिरी ठाकूर

Top Features

 

Feature 1

चित्रकलेतही राजकारणी शिरले ?

अधिक वाचा

Feature 2

राज कारणापलीकडचा चेहेरा !

अधिक वाचा

Feature 3

आत्ता नाही तर कधीच नाही !

अधिक वाचा

Feature 4

अमृता : पुस्तकातली आणि नाटकातली !

अधिक वाचा

Feature 5

भोला पागला

अधिक वाचा
12345678910...