Enquire Now

Request A Quote

देशील किती दो कराने ....प्रतीक जाधवची स्टोरी छापली आहे तिला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला ते पाहून आम्ही थक्क झालो. प्रतिसाद केवळ प्रतिक्रिया आणि शुभेच्छाचा नव्हता तर मदतीच्या हातांचा देखील होता. 'चिन्ह'नं आजवर म्हणजे २५ -३० वर्षात जे केलं ते अगदीच वाया नाही गेलं. त्याच बीज जनमानसात खोलवर रुजलं हा दिलासा या घटनाक्रमाने मात्र आम्हाला नक्कीच मिळवून दिला. २६ मे रोजी प्रतीक भारत भ्रमणाला निघेल. त्या दिवशी आम्ही आणखीन एक लेख छापणार आहोत. त्याचा प्रवास सुरु झाल्यानंतर मात्र दर आठवड्याला त्याच्या प्रवास वर्णनाचा एक लेख तरी नेमानं द्यावा असा विचार आहे. पाहूया सारं सांभाळून हे जमतंय का ? जर त्याला आपल्या प्रवासाची व्यवधानं सांभाळून जमलं तर मात्र ते एक अभूतपूर्व दस्तावेजीकरण ठरणार आहे. याचा आम्हाला विश्वास आहे. 

जेजे स्कूल ऑफ आर्ट मधला अवघ्या २४ वर्षाचा 'प्रतीक जाधव' नावाचा तरुण कलाक्षेत्रात काही तरी नवीन उपक्रम करतोय असं 'चिन्ह' पर्यंत येऊन पोहचलं आणि त्याच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची शहानिशा करायला मी जेजेमध्ये त्याला भेटायला गेले. त्याच्याशी बोलल्यानंतर त्याच्या या ध्येयवेड्या प्रवासाबद्दल संपूर्ण  माहिती जाणून घेतल्यावर मी "सायकलवरून भारत भ्रमण..." हा लेख लिहिला. अशा पद्धतीनं मुलाखत घेऊन ती लिहिणं हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. या लेखाला कशा प्रतिक्रिया येतील ?  याविषयी माझ्या मनात शंकाच होती. मग प्रतीकला मदत वगैरे मिळवून देणं असे विचार देखील मनात येणं दूरचंच. 

'चिन्ह'साठी देखील हे नवंच होतं. पण ही स्टोरी  समाज माध्यमातून इतकी व्हायरल झाली की फेसबुकवरच्या तिच्या आकडेवारीचा आलेख तर रोज उंचावतच गेला. हा मजकूर लिहीत असताना त्याला तब्बल १४,३९५ एवढ्या हिट्स पडल्या आहेत आणि त्या सतत वाढतच चालल्या आहेत. लाइक्स आणि शुभेच्छांविषयी तर काही विचारूच नका. एवढंच नाही तर प्रतीकपर्यंत असंख्य वाचकाच्या मदतीचे हातसुद्धा जाऊन पोहोचलेत.  हे सारं जसं जसं  घडत होतं तस तसं  प्रतीकच फोन किंवा मेसेज पाठवून आम्हाला सांगत होता. त्याला दिलेल्या शुभेच्छां आणि मदतीचे हात पाहून आम्ही आश्चर्यचकित आणि आनंदित झालो.  त्यानं हे सारं एका प्रदीर्घ मेसेजद्वारा आम्हाला कळवलं. ते आम्ही जसंच्या तसं इथं देतो आहोत. इतकंच नाही तर त्याचा प्रवास संपेपर्यंत त्यानं 'चिन्ह' ला आपले सारे अनुभव आठवडा पंध्रवड्यानं कळवायला देखील त्याला  सांगितलं आहे. त्यानं ते कबूलही केलं आहे. त्यामुळं त्याचा हा प्रवास आपल्याला पुढलं वर्षभर निश्चितपणानं वाचायला मिळेल. 

- स्नेहल बाळापुरे 

" हल्ली हे खूप ऐकायला मिळतं की कोणी कोणाचं नसतं, जग खूप स्वार्थी आहे वगैरे वगैरे. पण माझा अनुभव याच्या एकदम उलट आहे. 
जेव्हा मी भारतभर सायकलने फिरून कला अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आर्थिक कारणामुळं मी अडचणीत आलो होतो, पण लगेच मित्रांनी सुचवलं की आपण लोकांकडून मदत घेऊया आणि आम्ही मदतीसाठी मित्रपरिवारात आवाहन केलं. बघता बघता एकाचे दोन दोनाचे चार असे अनेक हात पुढं आले. मित्र किंवा नातेवाईकच नाही तर कित्येक अनोळखी हात देखील पुढं आले आणि मला माणसं नव्यानं उलगडत जाऊ लागली.

याचे अनुभव सुद्धा तितकेच गमतीशीर आहेत. मुळात मला शून्यापासून सुरुवात करायची होती. सायकलबद्दल मला अगदी शून्य माहिती होती.  म्हणून मी fb वर सायकलिस्ट लोकांचा शोध सुरू केला आणि वाईचे प्रसाद एरंडे सर भेटले.  फोनवर त्यांच्याशी बोलण झालं आणि त्यांनी परीक्षा म्हणून  थेट वाईलाच बोलावलं.  मी ही न डगमगता वाईला जाऊन त्यांना भेटून आलो.  त्यांनी अक्षरशः सर्व मार्गदर्शन तर केलंच पण प्रवासाला लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची सायकल, बॅग्स अशा काही महत्वाच्या वस्तू देखील देऊ केल्या.  माझा मित्र मराठी सिनेदिग्दर्शक सिद्धांत घरत याने टेंट आणि कॅमेऱ्याची सोय केली.  कविता संगरूळकर या माझ्या मावशी थेट मला सोलापुरात घेऊन गेल्या आणि तिथले प्रख्यात डॉ. आणि  फोटोग्राफर मेतन सर यांची भेट करून दिली.  त्यांनी गोप्रो कॅमेरा आणि काही आर्थिक मदत केली. संतोष काळबांधे सर यांच्याशी तर माझी चांगलीच गट्टी जमली. त्यांचे  मार्गदर्शन तर वेळोवेळी मिळतंच आहे, पण त्यांच्या मित्रपरिवाराकडून मदत मिळवुन देण्यासाठी देखील ते धडपडत आहेत. 

माझ्या या उपक्रमाचा 'चिन्ह' च्या टीमला विशेष म्हणजे स्नेहल बाळापुरे यांना कोठून सुगावा लागला माहीत नाही पण चातक पक्षाला ढग दिसावा तशी "चिन्ह" ची माझी भेट झाली. 
आदरणीय सतीश नाईक सर आणि स्नेहल बाळापुरे मॅम यांच्या प्रयत्नातून 'चिन्ह' च्या ऑनलाईन आर्ट पेपरवर माझ्या भारत भ्रमणाची संकल्पना झळकली आणि अक्षरश: असे कित्येक हात ज्यांच्याकडे मी पोहोचणं शक्य नव्हतं ते पुढे आले. अनेकांनी फोन करून सदिच्छा दिल्या. किती फोन आले त्याचा हिशोब ठेवणं देखील मला जड जाऊ लागलं. या साऱ्यातून एक वेगळीच ऊर्जा मला मिळाली आहे. मन अगदी भरून आलं आहे. 

सदैव पाठीशी असणाऱ्या अश्विन थूल आणि निलंजना सिंग या दाम्पत्यानं कमालीची साथ दिली आहे.  डॉ आशीष भोसले यांनी प्रवासात लागणाऱ्या सर्व औषधपाण्याची मेडिकल किट दिलं आहे. समाजसेवक विवेक भाऊ पंडित यांच्याकडून सुद्धा साहाय्य मिळत आहे.  अलका गाडगीळ या सामाजिक कार्यकर्तीने सुद्धा सढळ हातानं आर्थिक मदत केली आहे. 
गजानन जाधव हा औरंगाबादचा तरुण चित्रकार जो स्वतः स्ट्रगल करतोय पण  त्यानेसुद्धा सर्वात आधी मदत पाठवली आहे. अनंत जाधव आणि त्याच्या मित्रांनी थोडे थोडे पैसे जमा करून पाठवलं आहेत. हंसोज्ञेय तांबे सरांना मी माझ्या प्रवासाबद्दल सांगत होतो तर त्यांचे एक चित्रकार मित्र जवळच बसले होते. त्यांनी लगेचच  आर्थिक साहाय्यासाठी हात पुढे केला. जेजेच्या कला इतिहासाच्या प्रा. स्नेहल खेडकर आणि प्रा. जॉन डग्लस हे सुद्धा मला मदत करत आहेत. हैद्राबादचा एक मित्र अबू झुबेर इथे मुंबईत आला होता.  त्याला समजल्याबरोबर त्याने लगेचच प्रवासात लागणाऱ्या हेडलॅम्पची सोय केली.  राहुल घरतनं स्लीपिंग बॅग दिली.  तर संदेश शेकटकर यानं चांगल्या बुटांची व्यवस्था केली. 

दूर दूर राहणाऱ्या कित्येकांनी फोन करून प्रवासात आपापल्या घरी जेवणाची व्यवस्था करू म्हणून आश्वासनं दिली आहेत.  गणेश अपराज यांनी 'चिन्ह'चा लेख वाचून लगेच फोन केला आणि म्हणाले की त्यांना असे फिरता आले नाही, पण ते माझ्यात त्यांचे तरुणपण पहात आहेत. माझं स्वप्न हे त्यांचंही स्वप्न आहे असं म्हणत त्यांनी मला आर्थिक साहाय्य केलं आहे.प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांनीही मला मदतीचं आश्वासनं दिलं आहे. मंजिरी ठाकूर मॅम यांच्या प्रयत्नातून त्यांचे स्नेही सचिन वाघळे तसेच त्यांचे आई बाबा राणे परिवार सुद्धा मदतीला पुढे आले. तर कित्येक मित्र मैत्रिणी पॉकेटमनी साठवून मला मदत करत आहेत.  

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे सरांनी फोन करून मला सदिच्छा दिल्याच, पण प्रवासात ललित कलाच्या सर्व प्रादेशिक केंद्रावर त्या त्या वेळी राहण्याची व्यवस्था सुद्धा केली.  आता 'चिन्ह' माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्यामुळं मला कशाचीच भीती वाटेनाशी झाली आहे.  कुणी फोन करून माझं मनोधैर्य वाढवत आहे तर कुणी आर्थिक मदतीचा हात पुढं करतो आहे. तर असंख्य जण मला लागणाऱ्या वस्तू आठवणीनं देत आहेत. भविष्यात देखील मदतीचे असेच असंख्य हात पुढं येतील आणि मी माझं अनेक दिवसांचं भारत भ्रमण करून कला दस्तावेजीकरणाचं स्वप्न पूर्ण करू शकेन याविषयी माझ्या मनात आता तिळमात्रही शंका उरलेली नाही". 

प्रतीक जाधव ( ८९२८६ ८२३३०)

Top Features

 

Feature 1

म्युझियम दिवसाच्या निमित्तानं !

अधिक वाचा

Feature 2

मानवी देहचित्रण भाग 2

अधिक वाचा

Feature 3

मानवी देहचित्रण

अधिक वाचा

Feature 4

जेजेच्या विद्यार्थिनीचा अनोखा प्रयोग

अधिक वाचा

Feature 5

अत्रंगी चित्रकार...

अधिक वाचा
123456