Enquire Now

Request A Quote

हिंदी गायतोंडे ग्रंथाच्या निमित्ताने...

हिंदी 'गायतोंडे' ग्रंथाची निर्मिती ही  अक्षरश: अवघ्या दोन महिन्यात झाली.  अंक किंवा ग्रंथ निर्मितीसाठी वाचकांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणाऱ्या 'चिन्ह ' च्या दृष्टीने हा एक विक्रमच ठरावा. निर्मितीच्या या दोन  महिन्याच्या काळात देखील विविध अनुभव आले. निर्मितीची प्रक्रिया ऐन भरात आली असताना सतीश नाईक यांच्या मातोश्रीचे निधन झाले. पण ग्रंथ अखेरीस किंचित उशिरा का होईना प्रसिद्ध होतोच आहे. त्या विषयी सांगताहेत गायतोंडे ग्रंथाचे संपादक सतीश नाईक आपल्या लेखमालेत . 

मी उत्तम पाचारणे बोलतोय , ललित कला अकादमी दिल्लीमधून . ललित कला अकादमीच्या प्रकाशनांचा ढाचाच बदलून टाकायचा विचार आहे .चित्रकलाविषयक जे काही महत्वाचं काम  प्रादेशिक भाषांत झालंय ते राष्ट्रीय पातळीवर आणायचं आहे . सुरुवात 'चिन्ह ' च्या ' गायतोंडे ' ग्रंथानं करायची आहे . करणार ? उत्तमनं थेट पहिल्या फटक्यात प्रस्तावच मांडून टाकला .ललित कला अकादमीच्या अध्यक्षाचा उल्लेख मी अरे तुरेत करतो आहे . पण आम्ही जेजेतले सहाध्यायी आहोत ,. अगदी एकाच बॅचचे , एकाच वर्गातले . पण तो पुढं शिल्पकलेकडे वळला . मला आठवतं जेजेत शिकतानाच आम्ही ललित कलाच्या प्रदर्शनाला दिल्लीला गेलो होतो . त्या वर्षीचं त्रिएनाले प्रदर्शन पाहणं हाही त्या दिल्ली भेटीचा उद्देश होता . चांगले आठवडाभर आम्ही अकादमीच्या गेस्ट हाऊस मध्ये मुक्काम ठोकून होतो .
 
परवा कसली तरी शोधाशोध चालू असताना अचानक काही फोटो हाती लागले , तर त्यात उत्तम , अनिल नाईक , श्रीराम खाडिलकर , नलिनी भागवत मॅडम  , श्रीकांत जाधव सर असे सारे तेव्हा दिल्लीला गेलेले एकत्र दिसलो. त्यातल्या एका फोटोत कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी देखील  आमच्याशी गप्पा मारताना  दिसतायत . ते देखील कुठे तर ललित कला अकादमीच्या  बहावलपूर हाऊस मधल्या गेस्ट  हाऊसच्या हिरवळीवर. तब्बल ३७- ३८ वर्ष झाली ते फोटो काढल्याला. पण तेव्हा जागृत अवस्थेतच काय पण स्वप्नात देखील असा विचार मनात आला नाही की  आपल्या सोबत आलेला आपला वर्ग मित्र ३५ वर्षांनंतर याच अकादमीचा अध्यक्ष वगैरे होईल . पण ते आता खरोखरच  घडले आहे . आणि त्यांच्याकडूनच मला आता फोन आला आहे की ललित कला अकादमी ' गायतोंडे ' ग्रंथ हिंदीत प्रकाशित करू इच्छिते वगैरे . 

प्रस्ताव आव्हानात्मक होता. कारण ज्या भाषेत आपण  कधी  काम केलं नाही त्या भाषेत काम करायचं आणि मुख्य म्हणजे  हे सारं काम  मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनाच्या वेळी प्रकाशित करायचं होतं .पण  मी क्षणभराचाही विचार न करता प्रस्ताव स्वीकारला . कारण या मुळे मला गायतोंडे यांचं कर्तृत्व भारतभर पसरलेल्या हिंदी भाषिकांपर्यत पोचवण्याची  मोठी संधी मला मिळणार होती .मी  कामालाही लागलो .पण तिथंच दिल्लीच्या अनोख्या  कार्यप्रणालीचं   दर्शन घडण्यास सुरुवात झाली . जी माझ्या सहजासहजी पचनी पडण्यासारखी नव्हती .सरकारी बाबूंकडून   प्रस्तावांचे कागदी घोडे नाचवायला सुरवात झाली ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात . मुंबईतलं राष्ट्रीय प्रदर्शन भरणार होतं मार्च महिन्यात.  तरी देखील प्रस्तावावर शिक्कामोर्तबाची मोहोर उठवायला अकादमीच्या सचिव साहेबानी  तब्बल तीन आठवडे घेतलेच . त्यात काय काय खेंगटी त्यांनी घातली ते सारं लिहिण्यासारखंच आहे , पण ते राखून ठेवतो आहे . 

सरतेशेवटी ' गायतोंडे ' ग्रंथाच्या हिंदी आवृत्तींचं काम एकदाचं  सुरु झालं , पण ते केव्हा ? तर एक फेब्रुवारीला . प्रकाशनाला फक्त ६० पेक्षा कमी दिवस उरलेले. मनानं घेतलेलंच की हे आव्हान स्वीकारायचंच.  मी ते स्वीकारलं देखील. आणि पूर्ण देखील करून दाखवलं . वृत्तपत्रातल्या अनुभवाचा मला इथं खूप उपयोग झाला . अर्थात २५ मार्चचा राष्ट्रीय प्रदर्शनाच्या उदघाटनाचा मुहूर्त  काही मी गाठू शकलो नाही याचं मला वाईट वाटलं पण त्याला कारण देखील तसंच होतं. काम सुरु झालं आणि माझ्या आईच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरु झाल्या. तिला  दोन वेळा इस्पितळात दाखल करावं लागलं. तिला बरं वाटू लागल्यावर घरी देखील आणलं. पण ते काही खरं नव्हतं . अखेर २७ फेब्रुवारी रोजी तिनं अखेरचा श्वास घेतला . आयुष्यातल्या सर्वात दुःखद आणि कठीण प्रसंगाला मी या अशा अवस्थेत  सामोरा गेलो . 

 आई वडील असतात तेव्हा आपण बिनदिक्कतपणे सर्वच भार  त्यांच्यावर  टाकून अगदी  सर्वच बाबतीत  निर्धास्त राहतो. पण आता  मात्र ती परिस्थिती नाही  याची जाणीव मला त्या दिवशी प्रकर्षानं झाली .  पण डेड लाईन समोर आ वासून उभी होती . दुःख करायला देखील वेळ नव्हता . साहजिकच  ग्रंथ निर्मितीच्या कामात स्वतःला अक्षरश: गाडून  घेऊन मी दुःखाचे कढ थोपवले . परवा जेव्हा ग्रंथ छपाईला गेला तेव्हा  कुठं  मला ही सारी जाणीव झाली . आई गेल्यानं निर्माण झालेली पोकळी तेव्हा कुठं  मी प्रचंड अनुभवली . या साऱ्याचा  उल्लेख मी ग्रंथात केलेला नाही . मला ते करणं  योग्य  देखील वाटलं नाही . तो विकत घेऊन वाचणारानी सहानुभूतीपूर्वक  तो वाचावा असं काही मला वाटत नाही .  पण आज मात्र मला त्या ग्रंथाविषयी लिहिताना माझ्या  त्या  विषयीच्या भावनांना शब्द रूप देण्याची गरज भासली आहे .वडील आणि आई शेवटपर्यत ( आजारपणाचा काळ सोडला तर ) कार्यरतच राहिले होते . तीच शिकवण त्यांनी मला दिली , पण त्याची परीक्षा अशा रीतीनं पाहिली जाईल असं मात्र माझ्या कधीच ध्यानीमनी देखील आलं नाही . असो . 

 मराठी प्रमाणेच  हिंदी ' गायतोंडे ' ग्रंथाची निर्मिती करताना देखील  अक्षरश : मी स्वतःला झोकून दिलं होतं . अर्थात या ग्रंथाच्या मुख्य अनुवादिका डॉ स्मिता दात्ये ( ज्यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट अद्यापि झालेली नाही पण तरी देखील ) यांनी  दिलेलं सहकार्य  केवळ शब्दातीत होतं . त्याच बरोबर साहित्य अकादमीच्या मुंबई विभागाचे निवृत्त सचिव प्रकाश भातंब्रेकर , माझ्या संकल्पनेनुसार ज्यांनी ग्रंथाचं दृश्यरूप प्रत्यक्षात आणलं ते मयूरेश ठाकूर आणि स्नेहल बाळापुरे यांच्या अविश्रांत परिश्रमामुळे हा ग्रंथ या स्वरूपात प्रसिद्ध होतो आहे हे सांगावयास मला कोणातच संकोच वाटत नाहीये .  मराठी ग्रंथापेक्षा हिंदी ग्रंथाला जास्त दृष्यात्मकता लाभली आहे याला कारण लंडन निवासी कला संग्राहक अंशुल नागर . ते मूळ मराठी ग्रंथ पाहिल्यावर इतके  प्रभावित झाले की सदर  ग्रंथ आता ललित कला अकादमी तर्फे हिंदीतून येतो आहे कळताच  या ग्रंथासाठी परदेशात असलेल्या गायतोंडे यांच्या दुर्मीळ  चित्रांच्या  इमेजेस मिळवण्याची जबाबदारी स्वतः च्या शिरावर घेतली आणि ती यशस्वीपणे पूर्ण देखील करून टाकली . हिंदी ग्रंथाला जे अभूतपूर्व असं स्वरूप प्राप्त झालं आहे ते अंशुल नागर  यांच्या या कर्तृत्वामुळेच . 

या संदर्भात लिहिण्यासारखे खूप काही आहे आणि लिहिणार देखील आहे . पण तूर्त थांबतो .     
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

जीव वाचवणारे "गोडसे"

अधिक वाचा

Feature 2

आपल्याला ठाऊक नसलेलं...

अधिक वाचा

Feature 3

इथं "जेजे स्कूल" होतं !

अधिक वाचा

Feature 4

धोंड मास्तर आणि रापणीतून सुटलेलं वगैरे...

अधिक वाचा

Feature 5

रंगांधळा चित्रकार ???

अधिक वाचा
12345678