Enquire Now

Request A Quote

गायतोंडे : पहिल्या भेटीची कहाणी - प्रभाकर कोलते

"गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये दिल्लीच्या ललितकला अकादमी तर्फे "गायतोंडे" हा हिंदी ग्रंथ प्रसिद्ध होणार आहे.मुंबईच्या "चिन्ह" ने मूळ मराठीत प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाचे अकादमीतर्फे हिंदीत प्रकाशन होणं ही कलाक्षेत्रातील प्रकाशकांच्या दृष्टीने अत्यंतमहत्वाची घटना आहे. या निमित्ताने प्रख्यात चित्रकार 'प्रभाकरकोलते' यांनी "गायतोंडे" ग्रंथाला कलाक्षेत्रातअतिशय महत्वाची ठरू शकेल अशी प्रस्तावना लिहिली आहे. जी हिंदी आवृत्तीत देखीलजशीच्या तशी घेतली आहे. या प्रस्तावनेच्या निमित्तानं  चित्रकारकोलते यांनी जागवलेल्या गायतोंडे यांच्या काही आठवणी."

 

गायतोंडेना त्यांचे मित्र गाय म्हणत. ते होतेही गायीसारखे शांत. म्हणूनच शरीर, मन आणि दृष्टी स्वत:च्या आंतरविश्वावर खिळवून वैचारिक रवंथ करीत बसत, तास न् तास, असेऐकले होते. हे मंथन त्यांच्या चित्रातून निखळपणे प्रतिबिंबीत झालेले आ ढळे. मला त्यांचे अप्रूप वाटे, एखादा माणूस इतका मूर्तीसारखा नि:स्तब्ध, शांतकसं काय राहू शकतो. त्यांच्या जीवनात त्यांना असं नि:शब्द, निढळ, नि:संग, निरीच्छ,निर्विकार करत निर्वाणीच्या क्षणाकडे त्यांचे चित्रच घेऊन जात असावं. पुस्तकातून छापल्या जाणार्‍या त्यांच्या छायाचित्रातून देखील ते तसेच दिसत. प्रत्यक्ष जीवनाला ही त्यांनी पुस्तकाहून वेगळे समजले नसावे.विद्यार्थी दशेत गायतोंडे म्हणजे आमच्यासाठी कायम एक संशोधनाचा विषय झाला होता, आणि त्याचे कारण मात्र त्यांची अभ्रष्ट चित्र. ती जणू त्यांचा आरसाचहोती. त्यांना भेटणे दुर्लभ म्हणून मग आम्ही त्यांच्या भेटीची तहान त्यांच्याचित्रावर भागवत असू. गायतोंडे मुंबईत कुठे राहत होते याचा आम्ही अंदाज बांधत असू.त्यांना ओळखणार्‍या एखाद्याला त्यांचा पत्ता विचारावा तर तो आमची पंधरा मिनिट तरीउलट तपासणी करीत असे, आम्हीही त्याला सगळी उत्तर देत असू, तीअश्या आशेने की निदान हा आपल्याला पत्ता देईल, परंतु तोच शेवटी म्हणत असे, मलाहीमाहीत नाही, तुम्हाला सापडला तर मलाही द्या,अस म्हणून निघून जात असे.


का कुणासठाऊक त्यांच्या बद्दलच्या कुतुहलापोटी,आणित्यातून निर्माण झालेल्या आंतरिक ओढीमुळे, तसेच त्यांच्या चित्रातले निरतिशय सौम्य, शांत, निखळआणि अद्भुत रंगांनी जागे होत जाणारेआणि पहाणार्‍याला थेट दुसर्‍या जगात नेऊननि:शब्द  करणारे अवकाश कायमचे माझ्या मनाच्यापडद्यावर उमटले गेले असल्यामुळे त्यांच्याबद्दलची वाटणारी ओढ वाढत गेली कारण ती विनाकारण नव्हती हेच,शिवाय  त्यांच्याबद्दलच्या अद्भुत बातम्या, अफवा अथवा थक्क करणारे त्यांचे चित्र-दाखले सातत्याने मला त्यांच्या अस्तित्वाकडे ओढून नेत होते,त्यांच्या पत्त्याशिवाय आणि प्रत्यक्ष ओळखीशिवाय. मग केंव्हा कधी कसा माहीत नाही परंतु मला छंदच जडला त्यांच्याविषयी मिळेल तिथून माहिती गोळा करण्याचा. मग नियमित ग्यालरींना भेट देण, वाटेवरकोणी ओळखीचे वाटणारे चित्रकार भेटले तर त्यांच्याशी उगाचच ईकडच्या तिकडच्या गप्पामारत शेवटी गायतोंडे ह्या विषयावर येण मला जमायला लागलं. परंतु पत्ता मिळवण अधिकचदूर गेल. कारण गप्पांच्या ओघात समोरच्या सोबत मीही मूळ विषयापासून भरकटत भलतीकडेच वाहून जात असे.


गायतोंडे हा विषय माझ्या मनावरची जखम होऊन नंतर व्रण होऊन राहिली परंतु पत्ता कांही मिळाला नाही. आणि मग दरवाजा एका बाजुने बंद करावा आणि तो दुसर्‍या बाजूने आपसूक उघडला जावातसे त्यांच्या पत्त्याबद्दल झाले.मी त्या काळात टाईम्स ऑफ इंडिया ह्यावृत्तसंस्थेत मराठी विभागात कला-समीक्षक म्हणून काम करीत होतो.एक दिवशी इमारतीत शिरत असताना समोरून चित्रकार बाळ छाबडा येताना दिसले. त्यांना थोडेफार मी ओळखतहोतो, ते एक चित्रपट वितरक आणि चित्रकार असल्याचे मला माहीत होते. आम्ही एकमेकाच्या समोरासमोरच आल्यामुळे ह्यालो-हाय झालेआणि मी अचानक त्यांना गायतोंड्यांचा पत्ता विचारला. ते जरा गांगरलेच पण नंतर म्हणाले“अरे ते तर माझ्याचकडे बराच काळ राहत होते, आता ते दिल्लीला असतात,” मला हायसे वाटले आणि मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना गायतोंडेंचा दिल्लीतील पत्ता द्याल का म्हणून विचारले, त्यांनी हि क्षणाचाही विलंब न लावता पत्ता लिहून घ्यायला मला संगितले. त्यां नी सांगितला आणि मी लिहून घेतला. मला लॉटरी लागल्यासारखे वाटले. लॉटरीचे तिकीट जपून ठेवावे तसा तो खिश्यात ठेवला.  

                   

पत्ता मिळाला पण काय कारण काढून जायचे त्यांना भेटायला हे कांही केल्या डोक्यात येत नव्हतं. मनात आल, केवळभेट हेच कारण, दुसर हवकश्याला. मग भेटायचा बेत केला आणि गेलो दिल्लीला, दिल्लीत माझ्या एका मित्राकडे उतरलो, त्यामुळे माझ्या जेवणा-रहाण्याची सोय झाली. त्याला माझ्या येण्याचे कारण सांगितले, तो उडालाच. मी मुंबईहून एका चित्रकाराला भेटायला येण हे त्याला आश्चर्यकारक वाटलं परंतु मी कोणाला भेटायला आलोय हे कळल्यानंतर त्याला माझ अप्रूप वाटलं, ते त्याच्या भावपूर्ण डोळ्यात मला दिसलं. दुसर्‍या दिवशी सकाळीच मी रिक्शात बसलो आणि गायतोंडेंचे घर गाठले.प्रवासात मनात अनेक विचार येत होते, गायतोंडे बरसातीत रहातात म्हणजे नक्की कश्या प्रकारच्या घरात रहातअसावेत, ते घरी असतील का, आपण त्यांना आधी कळवून जायला हवे होते का, ते जागे असतील की काम करीत असतील, ते ओळखतील का मला; कारण मी एकदाच त्यांच्या ताज ग्यालरीतल्या प्रदर्शनात त्यांना आणि त्यांच्या चित्रांना मनमुराद पहिलं होत. मी कसे सामोरे जावे त्यांना याची मनातल्या मनात योजना आखत होतो. बरेच उलट-सुलट विचार करत होतो आणि ते कांही केल्या संपत नव्हते पण प्रवास संपला आणि रिक्शा एका ठिकाणी थांबला, रिक्षावाल्याने बाजूची बोळ दाखवीत आत जायला सांगितलं. हातात पत्ता होताच; त्यावर लिहीलेल्या घराचा क्रमांक शोधतपुढे गेलो.बोळीत एक इसम दिसला त्याला तो नंबर दाखवला, तो म्हणाला पिछे वाली गली मे जाव’, गेलो. घराचा नंबर दिसला, जीव भांड्यात पडला. तीन मजली घर त्याला एकच प्रवेशाचा दरवाजा, बाजूला तीन बेल होत्या प्रत्येक बेल समोर नावे होती त्यापैकि तिसरा मजलावाल्या बेलसमोर गायतोंडेंचे नाव दिसले, चला देवपावला म्हणत बेल वाजविली, कोणी चदरवाजा उघडेना. पुन्हा वाजवली, पुन्हातोच अनुभव. मग म्हटलं थोडसं आजूबाजूची दिल्ली बघून यावी, गेलो. बजबजपुरी बघण्यात अर्धा पाऊण तास घालवला, एका नाक्यावरच्या ठेल्यावर चहा मारला आणि पुन्हा गल्लीत शिरलो पणभलत्याच मग परत अंदाज घेत मूळ गल्लीत आलो, घराजवळ येऊन बेल दाबली. कोणीही दार उघडेना, मनात म्हटलं ह्या गल्लीला बरसाती म्हणायचं की साडेसाती ?


रिक्षात बसलो, मित्राच्या घरी पोहोचलो, तो तर अधीर झाला होता माझी भेट कशी झाली ते ऐकायला. त्याचे कान अधीर, माझे तोंड शब्दाविना बधीर. पुन्हा दुसर्‍या दिवशी गेलो, तोच अनुभव. पार निराश झालो. बिन देवाचे देऊळ पाहून आल्यासारखे वाटलेमला. मुंबईला  परतलो. येतानाचा प्रवासदीर्घ झाल्यासारखा वाटला. मन थकले, शरीरआंबले परंतु आलेला अनुभव बिजरूपाने माझ्या जाणिवेत रुतून राहिला, पुन्हा गायतोंडेंच्या भेटीची वाट बघत.


गायतोंडेंची भेट न झाल्याने थोडासा निराश झालो परंतु नाऊमेद झालो नाही. परत  कधी संधि मिळाली तरजायचे मनात पक्के केले होतेच म्हणून मग मी माझ्या नेहमीच्या कामात व्यस्त झालो.दोन-तीन वर्षांनंतर मला कांही कामानिमित्ताने दिल्लीला जाण्याचा योग आला. एक दिवस थांबूनगायतोंडेना भेटायला गेलो. पुन्हा अगदी तोच अनुभव. पहिलीच्या वर्गातली चिमणी-चिमणीदार उघड ही गोष्ट आठवली. गायतोंड्यांनी माझा चक्क कावळा केला की काय असवाटलं.तिसर्‍यांदा मात्र स्वर्गातल्या वासुदेवाला साकड घातले, भेट होऊ दे म्हणून. दरवाज्यावरची बेल दाबली वरच्या दिशेने आवाज आला “कोण आहे” म्हणून. मी एका दमात  सांगितलं “मी पळशीकरांचा विद्यार्थी, कोलतेम्हणून आणि वर पहिलं, वासुदेव गायतोंडे चक्क वरुन खाली माझ्याकडे थंड चेहर्‍याने पाहत होते. म्हणाले “ थांबा, खाली येतो “ मनात आले, मलाइथूनच परत पाठविणार की काय ! तस झालं तर ते जाम इन्सल्टिंग होईल, माझ्या मनात आल. मी संशयित नजरेने दरवाज्याकडे पहात उभा होतो. पण तेआले, त्यांनी पहिलं, ते हसले आणि म्हणाले “ या,या, मी तिसर्‍या माळ्यावर म्हणजे गच्चीवर राहतो. ते पुढे, मी मागे असे सावकाश त्यांच्या घरात शिरलो.


घर नव्हते ते. समाधी स्थान वाटले मला.त्यांच्या अंगावर फक्तच गाऊन होता.घरात एक बेड, दोन खुर्च्या, एकराखेने ओतप्रोत भरलेले चौकोनी टेबल त्यातून सिगरेटची थोटक कोंब फुटावेत तशी डोकावत होती. मी मनात म्हटले, अरे वा, ही तर विझलेल्या सिगरेटींची दफनभूमिच ! तेवढ्यात त्यांचा आवाज आला, बसा म्हणाले. मी खुर्ची शोधू लागलो. लक्षात आले ती एकच आहे आणित्यावर ते बसले आहेत, मी बाजूच्या बेडवर बसलो. म्हणाले “ संगीत आवडते का तुम्हाला, आवडत होतेच; हो म्हणालो, मग ते म्हणाले ऐका आणि त्यांनी उठून समोरच्या छोट्या टेबलावरच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर पिन ठेवली. गंगूबाईंनी आधीपासूनच सूर लावला होता पण ते खाली आले होते तेंव्हा त्यांनी पिनची दांडी बाजूला काढून ठेवली होती त्यामुळे त्या गप्प होत्या, त्यापुन्हा सुरात आल्या. मी कांही गाण ऐकायला आलो नव्हतो. मला त्यांच्याकडून कांहीतरी ऐकायचं होत, चित्रकलेबद्दल. 


माझ्या मनात प्रश्नांची रांग लागलेली होती. कांहीतरी मी त्यांना विचारणार तर पुन्हा बेल वाजली. मी त्यांना म्हटले मी जाऊन पाहू का, तर म्हणाले; नको, माझा जेवणाचा डबा आला असणार म्हणत ते खाली गेले. डबा घेऊन वर आले, दरवाज्यात उभे राहून म्हणाले; ह्या डब्यात मला पुरेल एवढच अन्न आहे, तुम्ही जेवलात का ? मलाही थोडी भूक लागली होतीच तरी मी त्यांना म्हणालो, तुम्ही घ्या जेउन तोवर मी खाली जाऊन जरा फिरून येतो, त्यावर ते तत्काळ म्हणाले, परत येऊ नका , कारण मी जेवल्यानंतर झोपतो. मी हिरमुसलो पण स्वत:ला सावरून म्हटले, बरे आहे सर,  येईन परत कधीतरी, चालेल ना, तर म्हणाले अवश्य; पण फोनकरून या. मी हो म्हणत त्यांना नमस्कार केला आणि जड मनाने पायर्‍या उतरून खाली गेलो. खालून पुन्हा एकदा वर पाहिलेआभाळातल्या देवाला पहावे तसे.तो वरच होता फक्त वरुन डोकाऊन खाली पाहत नव्हता एवढेच. मी तिथूनच अवघ्या आभाळाला नमस्कार केला आणि निजामुद्दीन रेल्वे-स्थानकाकडे चालत निघालो. 


गायतोंडेंशी झालेल्या ह्या पाहिल्याच अतृप्त भेटीत एक जाणवलं की त्यांच्या नकळत त्यांनीच स्वत:भोवती एक संथपणे विस्तारत जाणारं अदृश्य; भक्कम वलय निर्माण करून ठेवलं असावं. किंवा हे त्यांना स्वत:च स्वत:मध्ये गुंतवून ठेवणारे त्यांचे मौनव्रत असावे जे केवळत्यांच्या चित्रातूनच निर्विघ्नपणे मोकळे होत असावे. त्यांना भेटून परतल्या पासून आजपर्यन्त माझ्या स्वत:च्या आयुष्यावर ते त्यांच्या मौनाची सावली सोडून गेले आहेत असे मला जेंव्हा जेंव्हावाटते तेंव्हा तेंव्हा मला त्यांचे गूढ डोळे आठवतात आणि त्यांची चित्रे पाहतो तेंव्हा त्यांच्या डोळ्यातली गूढता त्यात प्रसवत असल्याची तीव्र जाणीव मला होते. ते माझे कोणी नव्हते; मीही त्यांचा कोणी नव्हतो तरी देखील आम्हा दोघांमधले हे बंध आजतागायत मला आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांनाही जखडून आहेत अशी माझी भावना आहे॰


कालांतराने त्यांनी निजामुद्दीनमधील बरसाती सोडली आणि ते दिल्ली जवळच्या गुरगांवला नव्या घरात राहायला गेले. नवीन घर टुमदार आणि छानच होते, आहे, परंतु त्यात त्यांच्या त्या बरसातीमधील गूढ बंदिश नव्हती. ऐतिहासिक; खानदानी गंध नव्हतातेही होते पण त्यांच्यात बरसाती नव्हती, त्यांच्या चित्रातल्या रंगांसारखी हळुवारपणे बरस बरस बरसणारी. नव्या घरात त्यांचे चित्रकामही मंदावत गेले, एखाद्या लामण-दिव्याच्या वातीप्रमाणे.


गायतोंडेंच्या बरसातीतल्या वास्तव्यात; फ्रांसला स्थायिक झालेल्या सुनील काळदातेने दादीबा पंडोल यांच्या सहाय्याने, त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी, काळजाला स्पर्श करणारी चित्रफीत तयार केली, त्या दरम्यान त्यांच्या घरात दोन-तीन दिवस वावरण्याची संधी त्याच्या सोबत मला आणि नितिन दादरावालालाही मिळाली.


विशेष म्हणजे त्यांनी आमच्या चित्रपट-चमूला घातलेल्या अटी किरकोळ होत्या परंतु त्या मागची त्यांची मनो-धारणा साधारण वाटत असली तरी त्यांचा गंभीर स्वभाव आणि स्पष्ट वक्ते पणा अधोरेखित करणारी होती. त्या अटी अश्या होत्या- घरातली कुठलीही वस्तू तिच्या मूळ जाग्यावरून हलवायचीनाही. ते नेहमी जसे त्या घरात वावरतात तसेच वावरतील,अंगावरचे कपडेही नेहमीचेच असतील,

सिनेमावाल्यासारखे दिग्दर्शन आणि पुर्नचित्रण चालणार नाही इत्यादी इत्यादी. अर्थात त्यांच्या सर्व अटी तंतोतंत पाळून चित्रण पार पडले तरी त्यांच्या निष्पाप चेहर्‍यावरना आनंद, ना खेद. ना औत्सुक्य, जीवनाच्या पलीकडच्या काठावर ते जणू शांतपणे स्वत:चीच वाट पहात उभे होतेअसे वाटले मला.


जिथे त्यांनी आयुष्याचा श्रीगणेशा गिरविला त्या मुंबईत येऊन थोडे दिवस रहाण्याची त्यांना खूप इच्छा होती परंतु वय, आजारआणि एका अपघातानंतर हळू हळू वाढत गेलेल्या शारीरिक व्यथा त्यांना घराबाहेरजाण्याची परवानगी देईनात. ते स्वत:च्या विकलांग शरीरातच कैद झाले. मृत्युनेत्यांची सुटका केली आणि त्यानंतर ते त्यांच्या चित्रातून डोकावत राहिले.


स्वत:च्याच नव्हे तर कुणाच्याही चित्राबद्दल ते फारसे बोलत नसत.  ते म्हणत चित्र ही पहाण्याची बाब आहे. ऐकण्याची अथवा वाचण्याची नव्हे. जेंव्हा आपण चित्राकडे पाहत असतो तेंव्हा तेही आपल्याला पहात असते हे लक्षात ठेऊनच चित्रप्रवास करायला हवा. त्यांनी तो केला तो इतक्या दूरवर आणि खोलवर की ते त्या प्रवासात दृश्याच्याही पलीकडे निघून गेले.


गायतोंड्याना चित्र रंगविताना पळशीकर, लक्ष्मणपै,बाल छाबडा, प्रफुल्ला डहाणूकर, लक्ष्मणश्रेष्ठ अशा मोजक्याच चित्रकारांनी पाहिले असावे. मलाही त्यांच्या नव्या घरात त्यांना चित्र चितारताना दुरून पाहण्याचा योग आला होता. ताणलेला कॅनव्हास जमिनीवर पसरूनत्यावर ते काम करीत होते, मधूनचन्यूज पेपरचे तुकडे कापून ते रंग लावलेल्या ठिकाणी ठेऊन त्यावर रोलर फिरवीत होते; बस एवढेच. त्यानंतर ते थांबले,तिथून ते बाहेर आले आणि मग गप्पा मारीत आम्ही संध्याकाळ साजरी केली.


गायतोंडेंची चित्रे त्यांच्या अनेक मित्रांना आणि रसिकांना काव्यमय भासतात. त्याचे कारण माझ्यामते; त्याना आणि त्यांच्या मित्रांना मूलत:च असलेली संगीताची गोडी आणि समज. गायतोंडेना अध्यात्माबद्दल असलेली तीव्र आंतरिक ओढ.त्यांना इतर कलांबद्दल असलेली यथायोग्य जाण.जीवनाबद्दलचा त्यांचा व्यापक आणि निर्भीड दृष्टीकोण. शिवाय विशेष म्हणजे त्यांचा एकटेपणाशी असलेला अजोड, अतूट लगाव.आणि हा लगाव त्यांनी मला भेट दिलेल्या एका चित्रात(प्रिंट) प्रखरपणे दिसून येतो. वाटत हे त्यांचे शेवटचे चित्र असावे आणि ह्याचित्रात ते निवृत्त झाले असावेत,ही स्थितित्यांना आनंदाच्या डोही आनंदाचा तरंग होऊन जाण्यासाठी योग्य आणि आनंददायी वाटली असावी. आणि म्हणूनच चित्रकलेसकट एकूणच ज्ञांनापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी तो निस्सीम, निरामयी क्षण साधला असावा.


त्यांचेचित्र कांही सांगत नाही; ते फक्तचपाहत राहते आपल्याकडे. त्यांच्या चित्रातले आकार त्यांना ओळखीच्या असलेल्या दृश्यआशयाकडून अदृश्य; अनोळखी रूपाकडे येऊन स्थिरावलेले असतात. ते आकार अनंतात अंतिम स्थिरतेकडे जाणारे भासतात.गायतोंडेविषय नव्हे आशय आकाराला आणतात.त्यांच्या रंगातले मुक्त प्रवाही पण अंतिमत: शिस्तबद्धतोल सांभाळत सहज समाधीवस्थेत येऊन थांबते. ते गायतोंडेंपेक्षा अधिक गंभीर रूप घेऊन आपल्याला शांतपणे निरखत रहाते असे आपल्याला अधून मधून वाटत रहाते.मला स्वत:ला तरत्यांचे कुठलेही चित्र जणू त्यांचे आत्मचित्रच( सेल्फ-पोट्रेट ) वाटते,त्यांच्या निखळ चारित्र्याचे आणि चरित्राचे अविरत गुंजन करणारे. त्यांनीकळत-नकळतपणे स्वत:च्याआत्मभानाला चित्राच्या माध्यमातून वैश्विकतेशी जोडले. त्यांनी चित्र-माध्यमातूनभोगलेली सहजावस्था त्यांच्या चिंतनाचा आणि सर्जनशीलतेचा कणा ठरली आणि त्यावरभक्कमपणे उभी राहिली त्यांच्या चित्र-भानाची वैश्विक जाण आणि आस्था.आणि ती अधिकाधिक प्रबळ होत गेली निसर्गदत्त महाराजांच्या निर्मळ सानिध्यात.

महाराजांनी प्रबळ, गंभीर तरीही सहज जाणिवेतून उद्गारलेले मी तो आहेहे वचन गायतोंडेंच्या स्मरणात खोलवर रूतले गेले असावे आणि त्यामुळे तेही तो होऊन त्या असीम भावस्थितीशी एकरूप झाले होते.  

प्रभाकर कोलते

Top Features

 

Feature 1

जीव वाचवणारे "गोडसे"

अधिक वाचा

Feature 2

आपल्याला ठाऊक नसलेलं...

अधिक वाचा

Feature 3

इथं "जेजे स्कूल" होतं !

अधिक वाचा

Feature 4

धोंड मास्तर आणि रापणीतून सुटलेलं वगैरे...

अधिक वाचा

Feature 5

रंगांधळा चित्रकार ???

अधिक वाचा
12345678