Enquire Now

Request A Quote

स्वायत्तता की कला विद्यापीठ ?

नेमकं काय होणार ?


जेजे स्कूल ऑफ आर्ट परिसरातल्या तीन महाविद्यालयांना घेऊन अभिजात कला, उपयोजित कला आणि वास्तुशास्त्र कला अशा तीन शासकीय महाविद्यालयांना स्वायत्तता द्यावी असा शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०१७ रोजी झाला आहे. सुमारे १३ पानाच्या या मसुद्यात अगदी बारकाईनं विचार करून निर्णय घेतल्याचे जाणवते, पण दुर्दैवानं १७ सालानंतर आज २१ सालापर्यंत यासंदर्भात कोणतीही कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही. याचा अर्थ सदर निर्णय बारगळला असल्याचे स्पष्ट होते. 

हा निर्णय घेतला जात असताना शासनाकडून कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या अनुदानित किंवा विनाअनुदानित कला महाविद्यालयासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही हे सहज लक्षात येते. अर्थात या संदर्भात निर्णय घेण्यासाठी लागणारी अधिकारी व्यक्तीच कला संचालनालयात उपलब्ध नसल्यामुळे हे झाले आहे, हे उघड आहे. याला देखील अर्थातच वेळोवेळी घेतलेले शासन निर्णयच कारणीभूत आहेत. कला संचालनालयातील आणि तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे सारे निर्णय झाले असल्यानं हे घडले आहे, हे ही उघड आहे. या गैर प्रकाराला देखील खूपच प्रसिद्धी मिळाली. वृत्तपत्राद्वारे किंवा 'चिन्ह'च्या अंकाद्वारे यातली बहुतांशी कृत्ये चव्हाट्यावर आणली गेली. जिथं शासनाला निर्णय घेणं भाग पडलं, तिथं शासनानं संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं. पण नंतर मात्र त्यांना सेवानिवृत्ती वेतन देण्याची चोख व्यवस्था केली गेली. यामुळे त्या अधिकाऱ्यांना काही काळ मान खाली घालून वावरावे लागले, पण नंतर मात्र त्यांनी त्याची किंमत वसूल केली. यात यापेक्षा त्यांचे काहीच बिघडले नाही.
 
बिघडले ते मात्र विद्यार्थ्यांचे. काही ज्येष्ठ शिक्षकांचे, काही कर्मचाऱ्यांचे किंवा लक्ष्मणसारख्या कँटीन चालवणाऱ्यांचे. आता शासन तेथे कुणाचीच नियुक्ती करू शकत नाही अशी अवस्था आली आहे याला कारण या साऱ्याची मुळं इथंच रुजलेली आहेत. खरंतर शिक्षण मंत्र्यांनी कला संचालनालयातील गेल्या ३० वर्षाच्या कारभाराची सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला हवी ( भले ते सेवानिवृत्त झाले असतील तरी ) इतकी त्यांची भयंकर कृत्य होती. आज हे सारे गुन्हेगार वृत्तीचे अधिकारी उजळ माथ्यानं समाजात वावरत आहेत. कलेचे किंवा कला संचालनालयाचे खरे मारेकरी तेच आहेत आणि त्यांच्यावर अंकुश न ठेऊ शकलेले शिक्षण सचिव किंवा शिक्षण मंत्री देखील त्यास तितकेच जबाबदार आहेत. 

आताच हे सारे लिहावेसे का वाटले ? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, २०२२ साली आपली सारी शिक्षण प्रणाली बदलते आहे. या बदलत्या परिस्थितीस महाराष्ट्रातील कला महाविद्यालये कशा प्रकारे तोंड देणार आहेत ? ती अस्तित्वात राहणार आहेत का ? त्यांचं नेमकं काय होणार आहे ? याविषयी संबंधितांच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले आहेत. कलासंस्थांची मातृसंस्था असलेल्या जेजेच्या तीन महाविद्यालयांना स्वायत्तता मिळणार असेल तर त्याच परिसरात असलेल्या कला संचालनालयाचं काय होणार ? झालंच यात त्या कला संचालनालयावर विसंबून असलेल्या शे - सव्वाशे कलामहाविद्यालयांचं काय होणार ? असे सारे असंख्य प्रश्न उभे ठाकले आहेत. 

आणि आता तर अशी बातमी आली आहे की त्या तीन कला महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या स्वायत्ततेचा प्रस्ताव बारगळल्यात जमा आहे आणि त्याऐवजी स्वतंत्र कलाविद्यापीठाचीच स्थापना करण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलली आहेत. असे जर घडले तर अनुदानित आणि विना अनुदानित कला महाविद्यालयांचे प्रश्न काही अंशानं सुटतील. पण हे सारे कसे होईल ? कधी होईल ? जेजे आणि अन्य तीन शासकीय कला महाविद्यालयातील गुणवान शिक्षक, प्राध्यापकांशी अक्षरशः एक फळीच्या फळी कापून काढली गेली असल्यामुळं सरकारकडून यात काही खरोखरंच होईल का ? असे नाना प्रश्न या क्षेत्रातील संबंधितांना सतावू लागले आहेत. त्यातच २०२२ साली केंद्रसरकारकडून जो बदल केला जाणार आहे त्यात यातली किती महाविद्यालयं शिलकीत उरणार आहेत ? असाही मोठा प्रश्न आहे. 

कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या कुठलेही अभ्यासक्रम हे मान्यताप्राप्त नसल्याचे जाहीर झाल्यामुळं अनेक कला महाविद्यालयांनी कालिदास किंवा तत्सम विद्यापिठांची वाट आपलीशी केली आहे. त्यांचे या बदलात काय होणार आहे ? हाही एक मोठा प्रश्न आहे. या साऱ्यांवर चर्चा व्हावी असे 'चिन्ह'ला वाटते. म्हणूनच येत्या गुरुवारी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५.०० वाजता या क्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री सुरेश खरे, डॉ. सुभाष पवार, सुधाकर चव्हाण आणि शिरीष मिठबावकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. सूत्रसंचालन करणार आहेत 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक.
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

बाबरी मशीद दंगल आणि आर्टिस्ट कॅम्प !

अधिक वाचा

Feature 2

મારું નામ ચંદ્રશેખર પાટીલ છે !

अधिक वाचा

Feature 3

स्वायत्तता की कला विद्यापीठ ?

अधिक वाचा

Feature 4

बाल मन...कला धोरण...आणि कला अभ्यासक्रम !

अधिक वाचा

Feature 5

एक हट्टी मुलगी !

अधिक वाचा
12345678910...