Enquire Now

Request A Quote

बाल मन...कला धोरण...आणि कला अभ्यासक्रम !

नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा २०१९ साली प्रसिद्ध झाला होता. शिक्षकांच्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो फिरत होता. त्यावेळी कोरोना लॉकडाऊन सुरु असल्यामुळं त्याकडे काहीसं दुर्लक्षच झालं, पण आता मात्र सारं काही सुरळीत होऊ लागलं आहे. २०२२ साली हा अभ्यासक्रम लागू देखील केला जाणार आहे. यासंदर्भात चित्रकार राज शिंगे यांनी एक टिपण लिहिलं होतं. तेच इथे प्रकाशित करीत आहोत. 

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्यानं नवीन शैक्षणिक धोरण २०१९ चा मसुदा जनतेसमोर ठेवला असून पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक बदल यात सुचविले आहेत. वरचा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ चा मसुदा ठरवताना पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत होणारे बदल लक्षात घेता पुढील कलाशिक्षण कसे असेल यासंदर्भात अनेक मुद्दे समोर येतात.

आतापर्यंत १०+२ म्हणजे १२वी नंतर सर्वसाधारण कला शिक्षण सुरू होतं, हे गृहीत धरलं तर १०वी नंतर ही कला शिक्षणाची पायरी चढता येते, अशी सोय आहे, त्यात जुना डिप्लोमा कला अभ्यासक्रम येतो. साधारण मागील काही वर्षाचे कला अभ्यासक्रम धोरण विचारात घेता, इतर राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार कला शिक्षणात बदल होत गेले आहेत.

आपण अगदी सुरवातीला डिप्लोमा कला अभ्यासक्रमाचा आधी विचार करूया... साधारण ४५/४६वर्षापूर्वी १९७४ च्या सुमारास इयत्ता ११वी पास मॅट्रिक झाल्या नंतर ग्रेड परीक्षेच्या आधारे कला महाविद्यालयात प्रवेश दिला जात असे, किंवा जर ड्रॉईंग ग्रेड परीक्षा दिली नसेल, तरीही कला महाविद्यालयात प्रवेश देऊन, त्या वर्षी ग्रेड परीक्षा द्यावी लागायची. डिप्लोमा कला अभ्यासक्रमात कला निपुणता आत्मसात करत, कलेतून अर्थार्जन करता येणारे कोर्स होते. त्यात टेक्स्टाईल, क्राफ्ट, शिल्पकला, धातुकला, मातीकला, कलाशिक्षक अभ्यासक्रम या विविध अभ्यासक्रमांचा समावेश असायचा. रेखा व रंगकला, उपयोजित कला, आर्टस् आणि क्राफ्टच्या विविध कला विषयाची आखणी असायची. यासाठी महाराष्ट्र राज्य कला संचालनालय ही स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे ,कलानिर्णय आणि कलाधोरणं राबवण्याचं कलात्मक स्वातंत्र्य घेऊन निर्णय व्हायचे.

कला संचालक हे पद, कला दूरदृष्टी आणि परिणाम याचं भान असणारं आणि समकालीन कलेत योगदान देणारं राहायला हवं. असं पुढं भविष्यात घडलं का ? हा प्रश्न महत्वाचा आहे. नंतरच्या कला पर्वात, १०वी नंतर काही काळ कलाशिक्षण डिग्री अभ्यासक्रम राबवण्यात आला. नंतर पुन्हा नियम बदलून १२वी नंतर कला महाविद्यालय प्रवेश देणं ठरलं. यात जुने डिप्लोमा अभ्यासक्रम आणि डिग्री अभ्यासक्रम असे दोन्ही राबवण्यात आले. त्यातील गोंधळ अजूनही सुरु आहे असं वाटतंय. मुंबई विद्यापीठ संलग्न कलेतील डिग्री कला अभ्यासक्रम आणि कला संचालनालय संलग्न डिप्लोमा कोर्स इतर कलात्मक धोरण राबवतानाचं आजचं चित्र आहे असं वाटतं.

डिग्री कला अभ्यासक्रम बदलामुळे १२वीनंतर.. CET परीक्षा या निवडप्रक्रियेतून जाताना प्रवेश घेणं स्पर्धात्मक होऊन गेलं. महाराष्ट्र राज्य या कला धोरणाचा विचार करता राष्ट्रीय धोरणानुसार, इतर राज्यातील मुलांना प्रवेश परीक्षा यात समाविष्ट करताना महाराष्ट्र राज्य कला धोरण बाजूला होत गेलं का? हा एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम बदलत जाताना, महाराष्ट्र राज्य कला धोरण राबवताना निव्वळ कला अभ्यासक्रम आखला गेला, डिग्रीला महत्व देताना नक्की महाराष्ट्रात कलात्मक बदल झाले का? की फक्त आपण अभ्यासक्रम राबवून महाराष्ट्रात निव्वळ विविध भागात, डिग्री देणारी कला महाविद्यालये सुरू केली गेली ? त्याचे राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर झालेले परिणाम आपण तपासून पाहिले का?

कलेचा वारसा असलेली जे जे स्कूल ऑफ आर्ट या पलीकडे महाराष्ट्र राज्यात विविध कला महाविद्यालये निर्माण झाली, त्यातून कला शिक्षण राबवताना कला अभ्यासात आपण अभ्यासक्रम शिकवताना महाराष्ट्र राज्य समकालीन बदल झाले का ? किंवा राज्यपातळीवर राष्ट्रीय कला धोरण आखताना समकालीन कलेत आपण नक्की घडत जातोय का ? कलेतील अभ्यासक्रम शिकवणं, मार्क देणं पोर्टफोलीओ सबमिशन,परीक्षा या पलीकडे महाराष्ट्र राज्य पातळीवर प्राथमिक शालेय आणि माध्यमिक कला शिक्षणात दूरगामी विचार झाला आहे का ? या मुद्द्यावर विचार होणं महत्वाचं आहे असं वाटतं. 

मधल्या काळात शालेय अभ्यासक्रमात कला अभ्यासाचं महत्व बाजूला सारत, ग्रेड परीक्षेपुरता कलाविषय मर्यादित ठेवला गेला. शाळेतून कला विषय हद्दपार केल्यानं होणाऱ्या कलामानसिकतेवर परिणामाला सामोरं जावं लागत आहे. CET च्या प्रवेश परीक्षेच्या नादात फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा निव्वळ उपयोग करून घेत, विशिष्ट कला महाविद्यालयात प्रवेशासाठीची चढाओढ करताना आपण काय साध्य केलं हे तपासलं पाहिजे. समकालीन कला धोरणात किती मदत झाली ? हे पाहायला हवे.. आत्तापर्यंतचे कलासंचालक आणि त्यांची कामगिरी पाहता, आपण समकालीन कलेत कुठपर्यंत पोहोचलोय ! हा विचार व्हायला हवा असं वाटतंय. कला महाविद्यालयातील रिक्त पदे, कला शिक्षकांच्या राज्यात बदल्या आणि जैसे थे धोरण अंमलात आणत आपण कलाशिक्षक म्हणून समकालीन कलेत काय शिकलो? आणि काय शिकवलंय ? याचा अभ्यास, चिंतन मनन करायची स्थिती आहे असं वाटतं. जुन्या शिक्षणपद्धतीत ५+२+३ ऐवजी ५+३+३+४ या राष्ट्रीय अभ्यासक्रमात दृश्य कला कशी अंमलात आणायची हा गहन विचार असायला हवा ,जेणे करून पुढील कला महाविद्यालयीन शिक्षण पद्धतीत त्याचा समकालीन कलेच्या विकासात कसा भर देता येईल ! याचा विचार भविष्यात व्हायला हवा.

महाराष्ट्र राज्यात कलेचे शाळेतील प्राथमिक कलेतील धडे, माध्यमिक कलात्मक विकास, त्यानंतर कला महाविद्यालय शिक्षण पद्धतीत बदल घडायला हवे असं वाटतं. राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर समकालीन कलेत कलाशिक्षण, भारतीय कला बीज किती घट्ट मूळ धरतेय, हा संशोधनाचा विषय आहे. भारतीय लोककला ,शिल्पकला इतर कलेत आपली कलेतून जडणघडण होताना ,आपण पाश्चिमात्य कलेकडे झुकत जातोय का ? हे पाहिले पाहिजे. महाराष्ट्र राज्यात पुढील १०वर्षात कलाशिक्षणात बदल घडवत, राष्ट्रीय पातळीवर भारतीय समकालीन कला आपण आत्मसात करणार आहोत का ? हे तपासलं जायला हवं असं वाटतं.

शालेय समकालीन अभ्यासक्रमात बदल करून कलादृष्टीकोनातून प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षणात दृश्यकला कशी शिकवायला असावी याचा आतापासून विचार व्हायला हवा असं वाटतंय, तरच भविष्यात कला महाविद्यालयात येणारा कला विद्यार्थी, समकालीन कलेत आपल्या कला कर्तृत्वाने समाजात भर घालू शकेल, असं वाटतं. आता शालेय कलाशिक्षणाचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक टप्पे कसे असायला हवेत याचा विचार व्हायला हवा.

पहिला टप्पा वय वर्ष पाचपर्यंत यात पूर्वप्राथमिक ते दुसरी इयत्ता -५ वर्षे.
दृश्यकला अभ्यासापेक्षा स्वानुभूतीत कलानिर्मिती आणि मुक्तचित्रण रंगलेपन असायला हवं आणि कुठल्याही विशिष्ट विषयसक्ती न करता दृश्यचित्रण असायला हवं. 

दुसरा टप्पा तिसरी ते पाचवी इयत्ता, दृश्यकला -३ वर्षे. 
अभ्यासक्रमात अवलोकन चित्रण, विषय देऊन चित्रण रंगलेपन, कोलाजपद्धती, रंगमाध्यम,पोत पद्धती, वस्तुचित्र यातुन ..दृश्यकलेतील जाण, आकलन शक्तीचे दृश्यपोषण व्हायला हवं .

तिसरा टप्पा सहावी ते आठवी इयत्ता -३ वर्षे
सदर कलाअभ्यासक्रमात स्वतंत्र कलावर्गातून कलाप्रशिक्षण असावं, अवलोकन चित्रण ,निसर्गचित्र संकल्पना ,द्विमित आणि त्रिमित कलाप्रकार ,मुक्तहस्त चित्रण ,महाराष्ट्रातील लोककलाकार चित्रकला याची माहिती ,प्रश्न मंजुषा ,रंगसंगती सैध्दांतिक आणि सराव सत्र यातून, कलात्मक विचार आणि कलादृष्टी तयार व्हावी.

चौथा टप्पा नववी ते बारावी इयत्ता -४वर्षे
या कला अभ्यासक्रमात अवलोकन चित्रण, वस्तू चित्रण निसर्गचित्रण, द्विमिती आणि त्रिमित संकल्पना, हस्तकला स्वतंत्र आणि सामूहिक चित्रनिर्मिती, शाळेच्या भित्तिचित्र कार्यशाळा, पारंपरिक लोकचित्रकाला, भारतीय चित्रकार प्रश्नमंजुषा कार्यक्रम, कलादालन अवलोकन सहल, स्वतंत्र कलाप्रकल्प आणि सामूहिक चित्र संकल्पना, मांडणी शिल्प आणि कलामहाविद्यालयाच्या भेटीतून महाराष्ट्रातील आणि भारतातील कलाजगताची ओळख करून देणं असायला हवं. या जाणीवेतून विशिष्ट कला शाखेत जाण्याची कलादिशा ,
मानसिकता तयार होण्यास साहाय्य होवू शकते..असं वाटतं.

१२ वी नंतर कला महाविद्यालयात प्रथम वर्ष पायाभूत अभ्यासक्रम असायला हवं, पायाभूत कलानिर्मिती शिक्षणात महाराष्ट्रातील चित्रकला प्रकार, भारतीय चित्रकला लघुचित्रे, द्विमित, त्रिमित संकल्पना ,अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांचं इतर अंगभूत कलागुण हेरत.. लेखन काव्य, नृत्य, नाट्य, छायाचित्रण, संगीत, वादन इत्यादी गुणांचा वापर करून दृश्यकलेतून सादरीकरण असावं. समूहचित्रसंकल्पना मैत्री यातून कलामन घडत जायला हवं असं वाटतं. पुढील विशिष्ट कलाशिक्षणात, चार वर्ष कलाअभ्यास क्रमात महाराष्ट्रात कलामहाविद्यालयाचीआखणी करताना ,संपूर्ण महाराष्ट्रात कलाजागरण होणं गरजेचं आहे.

भारतीय चित्रकला, रंगकला, शिल्पकला उपयोजित कला यातून महाराष्ट्राचा कलाविकास, लोककला जतन, संवर्धन, संग्रह निर्मिती, कलाप्रबंध, कलात्मक अर्थार्जन, स्वावलंबन या कला विकासातून कलाशिक्षण व्हायला हवं. उच्च कलाशिक्षणात महाराष्ट्रात स्थानिक जिल्ह्यात कला प्रकल्प मोहीम अमलात आणून, त्यावर कलाअभ्यास प्रबंध, शोधनिबंध याचं सादरीकरण होणं आवश्यक आहे. आर्ट डॉक्युमेंटरी, ऑडिओ व्हिज्युअल, पुस्तक स्वरूप असावं. सामाजिक जाणिवा बाळगून ,स्व विकासाबरोबर राष्ट्र विकास आणि देशविकास करण्यासाठी, कलात्मक बीज वाढीस लावणारा... नवतरुण कलाशिक्षणातून तयार होण्याची प्रक्रिया, कलाभ्यासात असायला हवी असं वाटतं. कला महाविद्यालयात कला परीक्षा पद्धती नसावी. प्रत्येक सत्रात कलाभ्यास त्याची आखणी करताना मुलाखत, व्हायवा पद्धतीत, कला निरीक्षण यातून कलाभ्यास तपासत, पुढच्या अभ्यासासाठी तजवीज करत ,प्रत्येक कलाविद्यार्थी विविध शाखेत घडत जायला हवा..भविष्यात पुढच्या कलाजगतात.. जबाबदार कलाकार नागरिक घडावा असं वाटतंय. जेणे करून महाराष्ट्राचा कला विकास, त्याच बरोबर भारतीय कलेचा विकास करत, जागतिक पातळीवर भारतीय कलाकार आपलं अस्तित्व टिकवून राहील. अशी संकल्पना असावी असं वाटतं.

हे कलाबीज, या नवीन शैक्षणिक धोरणात, कला शिक्षणाच्या उदात्त विचाराला खतपाणी घालता आलं पाहिजे, येत्या १०वर्षात... भविष्यात स्थानिक कला परंपरा जोपासत, भारतीय कला, जगा समोर मांडता आली पाहिजे.. समकालीन कला, अधिक बळकट होण्यास आता पासून कलेतील... बाल मन संगोपन होणं.. गरजेचं वाटतं..
राज वसंत शिंगे

Top Features

 

Feature 1

बाबरी मशीद दंगल आणि आर्टिस्ट कॅम्प !

अधिक वाचा

Feature 2

મારું નામ ચંદ્રશેખર પાટીલ છે !

अधिक वाचा

Feature 3

स्वायत्तता की कला विद्यापीठ ?

अधिक वाचा

Feature 4

बाल मन...कला धोरण...आणि कला अभ्यासक्रम !

अधिक वाचा

Feature 5

एक हट्टी मुलगी !

अधिक वाचा
12345678910...