Enquire Now

Request A Quote

एक हट्टी मुलगी !

१९८७-८८ सालची गोष्ट असेल, अंधेरीला राहायचो तेव्हा आम्ही. 'चिन्ह'च्या पहिल्या पर्वातल्या अंकाचं काम चालू होतं आणि अचानक एक जेजेत शिकलेली मुलगी भेटायला आली. बहुदा अनिल नाईकने तिला पाठवलं असणार. अनिल तिचा जेजेतला मास्तर. बारीक, किडकिडीतशी. नाव विचारलं तर म्हणाली, आपटे... विशाखा आपटे. नावाला साजेसाच रंग होता तिचा. आमचं अंकाचं काम चालू होतं त्यात ती सहभागी देखील झाली.  

मी म्हटलं, काही काम होतं का ? तर म्हणाली, जेजेतलं शिक्षण पूर्ण होत आलंय, पुढं काय करायचं ते कळत नाही. मी म्हटलं, त्यात काय अवघड आहे ? सोपंय ! एखादा छानसा मुलगा बघून टाक आणि लग्न कर की झालं ! तर म्हणाली, नाही, मला पेंटिंग करायचंय. तीच ते कणखर उत्तर ऐकून मी चाट पडलो. मग मी तिला काही टिप्स दिल्या. उदाहरणार्थ तू नॅशनल स्कॉलरशिपसाठी प्रयत्न कर किंवा झालंच तर दिल्ली, अहमदाबाद किंवा भोपाळला जाऊन काम कर. आपलं राज्य हे दळिद्री आहे, इथं थांबशील तर तुला लग्न केल्याशिवाय गत्यंतर नसेल. 

आता आहे त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती होती तेव्हा. त्यामुळे मी काहीशा कडवटपणे तिला सांगितलं होतं. तिने बहुदा त्यातला आशय मनावर घेतला असावा. नंतर काही लगेच तिची भेट झाली नाही, पण ती भारतात कुठे कुठे गेल्याचं कळलं. मग मुंबईत परत आली का घरी येत असे. केलेलं काम किंवा कामाचे फोटो दाखवत असे. एकूण तिचं बरं चाललं असावं. पण खूप स्ट्रगल केला असणार तिनं. तिच्या बोलण्यातून ते पटकन येत नसे, पण तिला थोडंसं बोलकं केलं का ती सारं सांगत असे. खूप जिद्दी आहे ती आणि महत्त्वाकांक्षी. चित्रकलेसारख्या एकांडी शिलेदारी करायला लावणाऱ्या क्षेत्रात एखाद्या मुलीने उठावं, थेट मुंबई सोडावी आणि इतर राज्यात जाऊन काम करावं, स्थायिक व्हावं ही गोष्ट तेव्हाही सोपी नव्हती आणि आज तर नाहीच नाही. म्हणूनच तिच्या या जिद्दीचं कौतुक करायला हवं. 

नंतर केव्हातरी ती भोपाळला गेली. भोपाळचं भारत भवन तिला अतिशय आवडलं असावं. आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांनी ती वास्तू उभी केली आहेच तशी. कुणीही कलावंत ती पाहिल्यावर तिच्या प्रेमातच पडतो. तिचंही तसंच झालं असणार. कुठल्या ग्राफिक स्टुडियोत ती काम करू लागली. हळूहळू तिथंच रुळली, तिथंच तिला तिचा जीवनसाथी भेटला, तो ही चित्रकार. दोघांनी ठरवलं की आता भोपाळच आपली कर्मभूमी. तिथंच ती स्थायिक झाली. सोपं नाही गेलं ते तिला आणि त्यालाही. 

आपण मुंबईकर सर्वांनाच मदत करतो, बाहेरून आलेल्याला तर सारं काही उघडूनच देतो. म्हणून भारतातल्या साऱ्याच राज्यातून लोकं रोजच मुंबईत घुसताहेत. मुंबईकरांना मात्र तशी सूट इतर राज्यात नसते. त्यांना सहसा सामावून घेतलं जात नाही. विशाखाला याबाबतीत अतिशय कडवट अनुभव आले असतील तर त्यात नवल नाही. हे आणि तिचं सगळं आजवरचं आयुष्य, कलाक्षेत्रातला प्रवास या सगळ्याविषयीच बोलण्यासाठी 'चिन्ह'नं तिला 'गच्चीवरील गप्पां'मध्ये आमंत्रित केलं आहे. शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ऐकायला पाहायला विसरू नका. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

बाबरी मशीद दंगल आणि आर्टिस्ट कॅम्प !

अधिक वाचा

Feature 2

મારું નામ ચંદ્રશેખર પાટીલ છે !

अधिक वाचा

Feature 3

स्वायत्तता की कला विद्यापीठ ?

अधिक वाचा

Feature 4

बाल मन...कला धोरण...आणि कला अभ्यासक्रम !

अधिक वाचा

Feature 5

एक हट्टी मुलगी !

अधिक वाचा
12345678910...