Enquire Now

Request A Quote

आमिरखान, किरण राव, धोबी घाट आणि रवी !

'चिन्ह'च्या आजवरच्या सर्वच वाचक, चाहते आणि हितचिंतकांना दिवाळीच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. गेल्या दोन वर्षात दिवाळी सण आपण पूर्णार्थाने साजरा करू शकलो नव्हतो. पण यंदा मात्र ती कसर अगदी सहज भरून काढता येईल. अर्थात सभोवतालची परिस्थिती पूर्णार्थाने प्रतिकूल आहे यात शंकाच नाही. सण साजरा करावा अशी परिस्थिती निश्चितच नाही. आर्थिक मंदी, तशातच नोट बंदी, त्यातच कोरोनाचा कहर हे सारं अपुरं पडलं म्हणनू की काय राजकारण्यांची सुंदोपसुंदी आणि त्यात भरीस भर म्हणून त्यांचं टोळी युद्ध अथवा गॅंगवॉर (त्यांचं खरं स्वरूप उघडं झालं म्हणून आनंद साजरा करायचा का असल्या नररत्नांना आपण मत देऊन निवडून आणतो या बद्दल दुःख व्यक्त करायचं असा प्रश्न पडतो.) या साऱ्यातच तुमच्या आमच्या सारखा सर्वसामान्य माणूस अक्षरशः भरडला गेला आहे. पण दिवाळी हा एकमेव सण असा आहे की, तो सभोवतालचं वातावरण असं उल्हसित करून टाकतो की, दिवाळीचे ते चार दिवस आपण सारं काही विसरतो. म्हणूनच या निमित्तानं सर्वांनाच अगदी मनापासून शुभेच्छा. 

येत्या शनिवारी म्हणजे भाऊबिजेच्याच दिवशी आपण भेटणार आहोत नामवंत अमूर्त चित्रकार रवी मंडलिक यांना. कदाचित रवी मंडलिक असं म्हटलं तर, कला क्षेत्राशी संबंधित नसलेल्याना पटकन त्यांचं कर्तृत्व आठवणार नाही. पण किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धोबी घाट' या हिंदी चित्रपटात आमिरखान यानं जो चित्रकार अभिनित केला होता त्या चित्रपटातली आपल्याला दिसलेली  सर्वच चित्रं रवी मंडलिक यांचीच होती. असं जर मी सांगितलं तर तुम्हाला त्याची ओळख लगेच पटेल याची मला खात्री आहे. 

रवी मूळचा अमरावती जवळच्या अचलपूरचा. तिथंच त्यानं चित्रकलेचं प्राथमिक शिक्षण घेतलं. पण त्याला तिथं शांत बसवेना मुंबईचं चित्रकला विश्व त्याला खुणावू लागलं. कलेतल्या उच्च शिक्षणासाठी त्याने मुंबई गाठली. जेजेत प्रवेश घेतला. सुंदर व्यक्तीचित्रण करायचा तो तेव्हा. विद्यार्थीदशेत आणि नंतरही खूप बक्षिसं मिळवली त्याने. शिक्षण संपताच त्याला रहेजा कला महाविद्यालयामधून अध्यापनासाठी बोलावलं गेलं. कर्मधर्मसंयोगाने त्याच वेळी जेजेसाठी देखील त्याची निवड झाली आणि तो जेजेत अध्यापक म्हणून रुजू झाला. 

बाहेर गावावरून मुंबईत आलेल्या तरुण चित्रकाराला ज्येष्ठ कलावंतांविषयी खूप आदर असतो. अशा कलावंतांच्या सान्निध्यात आल्यावर मुंबईतील चित्रकारांच्या वर्तुळात त्यानं प्रवेश केला. ध्यानीमनी नसताना तो बॉम्बे आर्ट सोसायटीचा सचिव देखील झाला. लवकरच त्याला कळून चुकलं की, हे आपलं क्षेत्र नव्हे, तेव्हा तो त्यातून शांतपणे बाजूला देखील झाला. 

आणखीन काही वर्षांनंतर त्याला असं लक्षात आलं की,आपल्याला फक्त पेंटिंग करायचं आहे, शिकवणं बिकवणं आपलं काम नाही. त्याच क्षणी त्यानं जेजे स्कूल ऑफ आर्ट मधल्या आपल्या शिक्षकाच्या नोकरीला राम राम ठोकला. आणखीन दहा वर्ष थांबलो तर पेंशन मिळेल असा विचार देखील त्याच्या मनाला शिवला नाही. 

आज एक अमूर्त चित्रकार म्हणून त्यानं नाव कमावलं आहे. मुंबईत आधी तो स्थायिक झाला नालासोपाऱ्याला. तिथून मग कांदिवलीला आला. आता तो गोरेगावात स्थिरावलाय.  त्याचा स्टुडिओ मात्र अजूनही कांदिवलीतच आहे. एखाद्याने नोकरी करावी तसा तो स्टुडिओत नियमितपणे कार्यरत असतो. स्टुडिओत मोठं मोठाले कॅनव्हास त्याने रंगवले आहेत. देशात तसेच परदेशात त्याच्या चित्रांची प्रदर्शनं भरली आहेत, भरत आहेत. त्याचा हा आजवरचा अनोखा प्रवास, ज्यात आमिरखान-किरण राव एपिसोड सुद्धा असणार आहे, त्याच्याच शब्दातून ऐकण्यासाठी 'चिन्ह'नं त्याला ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या सायंकाळी 'गच्चीवरील गप्पा'या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. ऐकायला पाहायला विसरू नका. 
शनिवार दि. ६ नोव्हेंबर २०२१
सायं ५.३० वाजता. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

बाबरी मशीद दंगल आणि आर्टिस्ट कॅम्प !

अधिक वाचा

Feature 2

મારું નામ ચંદ્રશેખર પાટીલ છે !

अधिक वाचा

Feature 3

स्वायत्तता की कला विद्यापीठ ?

अधिक वाचा

Feature 4

बाल मन...कला धोरण...आणि कला अभ्यासक्रम !

अधिक वाचा

Feature 5

एक हट्टी मुलगी !

अधिक वाचा
12345678910...