Enquire Now

Request A Quote

असं जगणं असतं राजा !

आशुतोषची आणि माझी ओळख करून दिली ती नाशिकच्या सुनील धोपावकरने. जेजेत शिकत असताना बहुदा माझ्या शेवटच्या वर्षी आशुतोष जेजेत प्रवेशला. सुनीलच्या नात्यातला तो लागत असावा. बहुदा इगतपुरी का देवळालीवरून आला होता. जेजेत जम बसवायला त्याला थोडासा वेळ लागला, पण नंतर मात्र त्यांनी अख्ख जेजे आपलंसं केलं. नाटक काय, अभिनय काय, दिग्दर्शन काय, कविता लिहिणं काय काही काही म्हणून त्यानं बाकी ठेवलं नाही. अख्खा जेजेचा परिसर त्यानं त्या काळात गाजवला. 
तेव्हा तर तो जेजेमध्येच राहायचा. म्हणजे हॉस्टेलमध्ये नव्हे तर लक्ष्मणच्या कँटीनमध्ये. बाकड्यावरच झोपायचा. आंघोळ बिंघोळ सारं तिथंच. लक्ष्मण जणू काही त्याचा बापच झाला होता. इंटरकॉलेजिएट स्पर्धांमध्ये तर त्याने धमाल उडवून दिली होती. त्याच्या काळात कितीतरी बक्षीसं कॉलेजमध्ये आली. त्या काळात झालेल्या प्रत्येक संपात देखील तो आघाडीवर होता. जेजे अक्षरशः त्यानं दणाणून सोडलं होतं. 

जेजेत त्यानं काहीही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. 'चिन्ह'चं पुनर्प्रकाशन सुरु झाल्यावर पहिल्याच अंकासाठी मी त्याच्याकडून लेख मागितला होता. विषय होता 'कँटिनमधले दिवस'. आशूनं त्या विषयाचं चीज केलं. छोटेखानी लेख होता तो. पण त्यानं असा काही लिहिला होता की वाचक अक्षरशः वेडे झाले. काही कर्मठ लोकं वगळता चित्रकला क्षेत्रातल्या साऱ्यांनीच त्या लेखाचं प्रचंड स्वागत केलं. 

'जेजे जगी जगले' पुस्तक रूपानं प्रसिद्ध करायचं ठरल्यानंतर मात्र पहिला लेखक आठवला तो होता आशु. जेजे सोडल्यानंतर आजतागायत त्याच्या आयुष्यात काय झालं ? अशा स्वरूपात त्या लेखाचा विस्तार कर, म्हणून मी त्याला सुचवलं. भरपूर वेळ घेऊन आणि अनेकदा मी खनपटीला बसल्यावर त्यानं तो लेख दिला. तो 'जेजे जगी जगला' या ग्रंथाचं विशेष आकर्षण ठरला नाही तर मला नवल वाटेल. 

त्याची बायको म्हणजे राजश्री. राजू करकेरा. तिनं देखील त्याला छान साथ दिली. एके काळी तर त्यांच्या घरात मुक्कामाला १४-१५ कुत्री होती. ती दोघंही आजवर विलक्षण रसरशीतपणे आपलं आयुष्य जगली आहेत. खूप उतार चढाव आले त्या दोघांच्याही आयुष्यात. आशुचं आता बरं चाललंय, तो आता स्थिरावतोय असे म्हणे म्हणेपर्यंत तो अनेकवेळा सापशिडीतल्या खेळासारखा अनेक घरं खाली उतरला आहे. पण आशु आणि राजश्री दोघंही भयंकर जिद्दी आहेत. आपल्याला हवं तसंच ते जगत आहेत. राजश्री तर आशुच्या जगण्याशी इतकी एकरूप झाली आहे की विचारता सोय नाही. रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी उभयतांनी जे काही केलं आहे त्याला तोड नाही. राजश्री तर पेंटिंग करता करता कुत्र्यांवर वैद्यकीय उपचार करू लागली. आता तर त्यात तिनं अक्षरशः मास्टरी मिळवली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्तीचं ठरू नये. कुत्र्यांच्या कुठल्याही शस्त्रक्रिया ती अगदी लीलया करू शकते. 

दोघांच्या जगण्यावर असं खूप काही लिहिता येईल, पण सारंच लिहायचं म्हटलं तर एखादा जाडजूड ग्रंथ प्रकाशित करावा लागेल. आणि तो करणं आलं म्हणजे बोलणं आलं, लिहिणं आलं, सारखं सारखं वाचणं आलं, मुद्रितं तपासणं आलं, डिझायनिंग करणं आलं, कागद विकत घेणं आलं आणि सरतेशेवटी छपाई करणं आलं. एवढी झगझग करण्यापेक्षा (आयुष्यभर ती ही केली की !) म्हटलं त्यांनाच बोलतं केलं तर ! येत्या शनिवारच्या 'गच्चीवरील गप्पां'मध्ये म्हणूनच तर त्यांना बोलावलं आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका. 

शनिवार दि. १६ ऑक्टोबर २०२१
सायंकाळी ०५.३० वाजता 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...