Enquire Now

Request A Quote

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

फोन वाजला म्हणून उचलला. हॅलो म्हणून मी कोण बोलतंय ते नाव सांगितलं, तर समोरचा माणूस नाव सांगायला तयार होईना. म्हणाला, 'मी तुमच्या 'चिन्ह'चा आधीपासूनचा चाहता आहे. पण नाव काही विचारू नका. मला तुम्हाला काही सांगितल्याशिवाय राहवेना म्हणून हा फोन केला.' मी ही नावाविषयी आग्रह केला नाही. कारण अधनं मधनं असे फोन येतच असतात. 
ठीक आहे बोला, असं मी सांगताच त्याचा आवाज मला निर्धास्त झाल्यासारखा वाटला. तो बोलू लागला. म्हणाला, मी एक कलाशिक्षक आहे. काही कामानिमित्तानं काल कला संचालनालयात जाणं झालं. तास अर्धा तास होतो तिकडं. पण पाऊस पडत असून सुद्धा वातावरण जरा गरम वाटलं. म्हणून म्हटलं जरा चौकशी करूया. ती केली सुद्धा. त्यातून जे कानावर आलं ते सांगितल्यावाचून राहवेना म्हणून हा फोन. 

'सर, जेजेच्या परिसरातलं हवामान तापलंय. आमच्यासारख्या बाहेरच्या माणसांना देखील इतक्या थोड्या वेळात ते जाणवलं यावरून तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आणि मिठबावकर सर जे काही करताय याची दखल बहुदा सरकारला घ्यावी लागली आहे. कला संचालनालयवाल्यांना वरून बहुदा दट्ट्या आला असावा. कारण नेहमीसारखं ढिसाळ ( का रसाळ ?) वातावरण तिथं राहिलेलं नाही. कधी नव्हे ते बहुसंख्य लोकं कामात दिसत होते आणि थोडासा कानोसा घेतला असता असं लक्षात आलं की, वरून चौकश्या सुरु झाल्या आहेत. आता काही कारवाई केली नाही तर तुमच्या यु ट्यूब चॅनेलवरून दररोज वाभाडे काढले जाणार आहेत, हे देखील त्यांच्या चांगलंच लक्षात आलं आहे. त्यामुळे झक मारत का होईना, त्यांना सुधारणा कराव्या लागणार आहेत. 

या साऱ्याच श्रेय 'चिन्ह'ला द्यायलाच हवं. तुम्ही आणि मिठबावकर सर अत्यंत चिकाटीनं जे काही करत आहात त्याला सरकारी पक्षाला उत्तर द्यावं लागणार आहे आणि ते देताना त्यांची त्रेधा तिरपीट उडणार आहे. आधी जे शेण खाल्लं आहे त्यामुळे काहीच करता येणार नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि काही करू नये असं म्हटलं तर तुम्ही त्यांच्यामागे हात धुवून लागला आहात. आणि आता तुम्ही एकटे नाही आहात, आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत. सारं चित्रकला शिक्षण क्षेत्र थोड्याच वेळात तुम्हाला फॉलो करेल की नाही ते पहा ! 

सर, माझ्या तुम्हाला शुभेच्छा. आता नाव सांगितलं नाही याबद्दल तुमची माफी मागतो, पण योग्य वेळ येताच तुमच्यासमोर हजर होईन, असं म्हणून त्या गृहस्थानी लगबगीनं फोन ठेवला देखील. 

मलाच नाही, पण विशेष करून शिरीष मिठबावकरांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चित्रकला शिक्षकांचे फोन येत आहेत. संपूर्ण कलाशिक्षण क्षेत्रावर झालेल्या अन्यायाविरोधात उचललेल्या पावलांबद्दल साऱ्याच कलाशिक्षण क्षेत्राकडून स्वागत होतं आहे. ही खरोखरच मोठी समाधानाची गोष्ट आहे. 

येत्या गुरुवारचा कलाशिक्षण महाचर्चेचा दुसरा कार्यक्रम मात्र पाहायला विसरू नका. ज्यात ज्येष्ठ निवृत्त कलाशिक्षक सुधाकर चव्हाण ( राहणार अर्थातच पुणे ), ठाण्यात कलाशिक्षण महाविद्यालय सुरु करणाऱ्या नीलिमा कढे आणि रहेजा स्कूल ऑफ आर्ट बंद पडल्यानंतर खचून न जाता अत्यंत थोड्या वेळात नवं आर्ट स्कूल उभं करून रहेजा स्कूलला मिळणारं अनुदान नव्या आर्ट स्कूलकडे वळतं करून घेण्याची चपळाई दाखवून असंख्य कलाशिक्षकांच्या नोकऱ्या आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचवणारे सुरेंद्र जगताप असे या क्षेत्रातले दिग्गज आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांना बोलतं करणार आहेत शिरीष मिठबावकर सर. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक. ऐकायला पाहायला विसरू नका. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...