Enquire Now

Request A Quote

रॉबी डिसिल्वा : गप्पांच्या निमित्तानं !

येत्या शनिवारी म्हणजे ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात मराठी लेखिका वीणा गवाणकर 'गच्चीवरील गप्पा'मध्ये सहभागी होणार आहे. निमित्त आहे ते त्यांनी लिहिलेल्या 'रॉबी डिसिल्वा : एक मनस्वी कलाकाराचा प्रवास' हे पुस्तक. त्या निमित्तानं हा विशेष लेख. 

'भास्कर कुळकर्णी' अंकाची तयारी सुरु असताना प्रथम रॉबी डिसिल्वा यांचं नाव कानी आलं. ही गोष्ट २००२ सालातली. म्हणजे आता त्याला तब्बल दोन दशकं उलटली आहेत. कालमानपरत्वे स्मृती क्षीण होत जातात. त्या साऱ्या आठवणी स्मरताना हा अनुभव प्रकर्षाने येतो आहे. 

भास्कर कुळकर्णींचे जेजेमधले मित्र कोण ? तर रॉबी डिसिल्वा. रॉबी आपल्याला लेख देतील का ? रॉबींना फोन केला तर उचलतील का ? त्यांची भेट घेता येईल का ? असे अनेक प्रश्न मनात घोंगावत होते. तेव्हा देखील रॉबींचं नाव जाहिरात क्षेत्रात खूपच मोठं होतं आणि माझा जाहिरात क्षेत्राशी तसा संबंध नव्हता. त्यामुळे ओळख वगैरे काढणं दुरापास्तच. आता काय करायचं ? असा प्रश्न मला सतावू लागला. 

१४ सप्टेंबर हा भास्कर कुळकर्णींचा जन्मदिवस. 'चिन्ह'च्या 'भास्कर कुळकर्णी' या अंकाची जाहिरात व्हावी या हेतूनं ते निमित्त साधून मी वृत्तपत्रातील मित्र मंडळींना भास्कर कुळकर्णी यांच्याविषयी काहीतरी प्रसिद्ध करण्याची विनंती केली. आश्चर्य म्हणजे बहुसंख्य वृत्तपत्रांनी ती मानली आणि बातम्या किंवा लेख प्रकाशित केले. 

लेख प्रसिद्ध झाला त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता फोन खणखणला. उचलला तर पलीकडचा आवाज सांगत होता, मी रॉबी डिसिल्वा बोलतोय. कोण आनंद झाला. मी अक्षरशः ओरडलो, 'बोला रॉबी बोला, कसे आहात? मी तुम्हालाच फोन करायचा विचार करतोय आणि तुम्हीच मला फोन केलात ?' म्हणाले, हो ! भास्कर कुळकर्णींच्यासंदर्भात जो 'चिन्ह'चा अंक प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दल मी नुकतंच वाचलं आणि मला राहवेना म्हणून मी फोन केला. खूप मोठं काम करताय तुम्ही. भास्कर कुळकर्णी खूप मोठा कलावंत होता, पण त्याचं मोठेपण आपल्याला कधी कळलंच नाही. 

आणि ते आठवणीत हरवून गेले. म्हणाले, जेजेमध्ये माझ्या वर्गातच होता तो. वसईहून मी ज्या ट्रेनने जेजेला जात असे त्याच ट्रेनमध्ये मालाडला तो चढत असे. रॉबी एका पाठोपाठ एक आठवणी सांगत होते. काही काळानंतर ते भानावर आले, तेव्हा मी संधी साधली आणि त्यांना म्हणालो, यासाठीच मी तुम्हाला भेटू इच्छित होतो. मला तुमच्याकडून भास्कर कुळकर्णी यांच्यावरचा एक लेख हवा आहे. रॉबी म्हणाले, नक्की, जरूर लिहीन, आवडेल मला. आणि मग त्यांनी स्वतः तो लेख लिहून माझ्याकडे पाठवला. 'भास्कर कुळकर्णी' अंकातला त्यांचा तो लेख खूपच गाजला. 

हार्निमन सर्कल जवळच्या कॉफी हाऊसमध्ये मी त्या काळात बसत असे. प्रायोगिक नाटकवाल्यांचा अड्डा होता तो. त्या काळात प्रायोगिक रंगभूमी जोरात होती. आणि मी जेजेमध्ये शिकत असतानाच त्या अड्ड्यात बसू लागलो होतो. सत्यदेव दुबे,अमोल पालेकरांपासून यच्चयावत सारेच्या सारे नाटकवाले तिथे भेटत असत. कधी तेंडुलकर यायचे, दुर्गाबाई भागवत तर एशियाटिकमधून कॉफी प्यायला तिथेच यायच्या. तिथं एक जाहिरात क्षेत्रातला मित्र देखील येत असे. भास्कर कुळकर्णी' अंक प्रसिद्ध झाल्यावर त्या मित्राचा मला फोन आला. त्याचं नाव मी आता पार विसरून गेलो आहे. तो जिवंत आहे किंवा नाही हेही मला आता ठाऊक नाही. कारण ते सारेच संपर्क मी नंतर तोडून टाकले. तर तो मित्र फोनवर विचारत होता, 'रॉबींनी तुला ओळखलं कसं ?' मी म्हटलं, नाही त्यांनी वृत्तपत्रातले लेख वाचून मला फोन केला. तेव्हा तो मित्र मला म्हणाला, 'कॉफी हाऊसमध्ये बसत असताना ( ही गोष्ट १९७६ ते १९७९ या काळातली ) आपण रॉबींकडे वरचेवर जात असू. तुला आठवत नाही का ?' मी म्हटलं, अरे हो, बापरे ! आता सारं आठवलं मला. हार्निमन सर्कलमधल्या एका जुन्या इमारतीत त्यांचा स्टुडियो कम ऑफिस होतं आणि प्रभाकर पेंढारकर आणि हा ज्याचं नाव विसरलं गेलोय तो मित्र, यांच्यासोबत मी अनेकदा तिथं जात असे. त्यावेळी मी अगदीच लहान होतो. नुकताच जेजेत शिकायला आलेला असा. साहजिकच, त्यांना मी आठवणं किंवा मला ते आठवणं दुरापास्त होतं. त्या वयात त्यांचं मोठेपण कदाचित लक्षात देखील आलं नसावं. 

'भास्कर कुळकर्णी' या अंकाचा प्रकाशन समारंभ विजय तेंडुलकर यांच्या हस्ते झाला. भवन्सच्या सभागृहात त्यावेळी भास्कर कुळकर्णी यांचे सारेच्या सारे दोस्त जमले होते, ज्यात दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अशोक शहाणे, वृंदावन आणि रघु दंडवते अशी किती नावं सांगू ? साक्षात अरुण कोलटकर देखील त्या समारंभात आवर्जून उपस्थित होते. रॉबी देखील आले होते. खूप भारावून गेले होते रॉबी. खूप बोलत होते. अरुण कोलटकरांना तर पहिल्यांना त्या दिवशी इतकं बोलताना अनेकांनी पाहिलं. 

नंतर रॉबींशी अनेकवेळा फोनवरच बोलणं व्हायचं. भेट अशी कधी झालीच नाही. वसईत त्यांनी आर्ट स्कूल उभं केलं, त्यासंदर्भात देखील त्यांचा एक दोनदा फोन आला. पण पुढं काही फारसं बोलणं झालं नाही. मी 'चिन्ह'च्या या उपदव्यापामधून स्वतःला कधीच वेगळं काढू शकलो नाही. उलट प्रत्येक अंकानंतर आत आत गुंतत गेलो आणि स्वतःलाच हरवून बसलो इतके त्याचे भयंकर ताणेबाणे होते. कलाक्षेत्रातील साऱ्याच दिग्गजांशी माझा परिचय होता, पण या साऱ्या प्रकारामुळे मला काही तो वाढवता आला नाही. त्याचं आता खूप वाईट वाटतं, खंतही वाटते. पण त्यालाही आता उशीर झाला आहे. 

यु ट्यूबवरील 'गच्चीवरील गप्पां'ना अभूतपूर्व यश मिळाल्यावर मात्र मी ५० कार्यक्रमांनंतर कार्यक्रमाचं स्वरूप बदलायचं ठरवलं आहे. रॉबींसारख्या कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांचं नानाविध प्रकाराने दस्तावेजीकरण कसं करता येईल याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यातला पहिला प्रयत्न येत्या शनिवारी प्रख्यात लेखिका वीणा गवाणकर यांच्या सोबतच्या 'गप्पां'नी साकार होणार आहे. वीणाताईंनी रॉबी डिसिल्वा यांच्यावर अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाची सारी कहाणी वीणाताईंकडून मी वदवून घेणार आहे. दस्तावेजीकरणाचा हा एक माझा वेगळा प्रयत्न आहे. पाहूया कसा जमतो तो. 'एक होता कार्व्हर' हे माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. त्या लेखिकेनं एका फार मोठ्या भारतीय उपयोजित चित्रकारावर पुस्तक लिहावं ही मोठी घटना आहे. या निमित्तानं तिची सारी कहाणी यु ट्यूबवर कायमस्वरूपी ठेवण्याचा 'चिन्ह'चा हा प्रयत्न आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...