Enquire Now

Request A Quote

मिठबावकरांचा नवा गौप्यस्फोट !

'कलाशिक्षण महाचर्चे'चा दुसरा अध्याय येत्या गुरुवारपासून सुरु होईल. २००८-०९ साली जेव्हा 'कालाबाजार' अंक प्रकाशित केला तेव्हा पुसटशी कल्पना देखील नव्हती की फेसबुकवर किंवा यु ट्यूबवर आपण अशी एखादी चळवळ उभी करू शकू. पण कलाशिक्षण महाचर्चेच्या निमित्तानं ती संधी अलगद चालून आली. त्यात कोणतीही व्यक्तिगत महत्वाकांक्षा किंवा स्वार्थ नसल्यानं आणि संपूर्णतः सामाजिक चळवळीचा तो भाग असल्याचं सिद्ध झाल्यानं 'कलाशिक्षण महाचर्चे'ला हा असा चहूकडून उदंड प्रतिसाद लाभला असावा. प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी देखील या महाचर्चेला उचलून धरलं. इतकंच नाही तर त्याच्या समारोपाच्या सत्रात ते सहभागी देखील झाले आणि त्यांनी यासंदर्भात निश्चित काहीतरी ठोस असे करण्याचे आश्वासन देखील दिले. त्यामुळेच 'कलाशिक्षण महाचर्चे'च्या साऱ्या व्यापाला एक सकारात्मक वळण लाभलं असं निश्चितपणे म्हणता येईल. 

कलाशिक्षण क्षेत्रातील अनेकांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. विशेषतः शिरीष मिठबावकर यांनी जे सहकार्य दिलं त्याला तोड नाही. त्यांच्याच सहकार्यामुळे एक मोठी चळवळ उभारण्याचं धाडस 'चिन्ह' करू शकतंय हे मान्य करावयास हवं. 

कलाशिक्षण महाचर्चेचे कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही 'गच्चीवरील गप्पां'च्या पन्नाशीत अडकून पडलो होतो. वर्षभर कार्यक्रम केल्यानंतर एका शनिवारी तरी विश्रांती घ्यायला हवी असं मनोमन वाटत होतं आणि ते आम्ही जमवून देखील आणलं. त्यामुळे आता पुढे काहीच होणार नाही की काय असा कुणाचा समज झाला असल्यास नवल नाही.  पण वस्तुस्थिती वेगळी होती. कलाशिक्षण महाचर्चेचा बॅनर पुढं वर्षभर इतकंच नाही तर हा प्रश्न संपेपर्यंत वापरायचा, हा महत्वाचा निर्णय आम्ही याच काळात घेतला. त्या निर्णयानुसार येत्या गुरुवारी किंबहुना इथून पुढं दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी 'कलाशिक्षण महाचर्चा' भाग दोन आम्ही आयोजित करीत आहोत. येत्या गुरुवारी म्हणजे २३ सप्टेंबर रोजी होणारा कार्यक्रम अर्थातच शिरीष मिटबावकर यांचा आहे. या कार्यक्रमात ते कलाशिक्षण का घ्यावे ? कोठे घ्यावे ? कसे घ्यावे ? कुठे घेऊ नये आणि घेतल्यास काय काय करावे ? यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. आम्हाला खात्री आहे की हा कार्यक्रम नव्याने कलाक्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निश्चितपणे मार्गदर्शक ठरावा. 

मधल्या काळात शिरीष मिठबावकर देखील गप्प बसले नव्हते. त्यांनी महाराष्ट्रातल्या कलाशिक्षणाशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधावयास सुरुवात केली. असंख्य कलाशिक्षण आणि कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांना या कार्यक्रमामागची संकल्पना समजावून सांगितली. मिठबावकर सर सांगत होते, ज्या ज्या कलाशिक्षक किंवा प्राचार्यांशी मी संपर्क साधला त्यांनी महाचर्चेचे सारे कार्यक्रम पाहिले होते, ऐकले होते. त्यांना ते आवडले देखील होते. त्यांनाही काही सांगायचं होतं, पण ते काही कारणास्तव सांगू शकले नाही. पण मिठबावकर सरांनी संपर्क साधताना बोलतं करताच ते भडाभडा बोलू लागले. हे सारं तुम्ही कार्यक्रमात जाहीरपणे का बोलत नाही ?, असा प्रश्न मिठबावकरांनी विचारताच ते सारेच्या सारे कार्यक्रमात सहभागी व्हायला तयार झाले. त्यामुळे इथून पुढं कलाशिक्षण महाचर्चेच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या बहुसंख्य कला महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा ज्येष्ठ शिक्षक बोलताना दिसले तर त्याचे तुम्हालाच आश्चर्य वाटू नये. 

प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी देखील महाचर्चेच्या अखेरच्या सत्रात कबुल केलेली सभा प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ संपताच आयोजित करण्यास होकार दिला आहे. त्यामुळे आणखीन महिन्याभरात किंवा दिवाळीच्या सुमारास ही सभा नक्की होईल असे चित्र दिसते आहे. मिठबावकरांच्या म्हणण्यानुसार 'चिन्ह' जे करतं आहे ते कलाशिक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत उपयोगाचं असल्यामुळं त्यामधनं जर एक मोठी चळवळ उभी राहिली तर कुणालाच त्याचं आश्चर्य वाटणार नाही. मिठबावकर म्हणतात तसे जर घडले तर महाराष्ट्राच्या कलाशिक्षणासंदर्भात काही तरी चांगले घडू शकेल असे निश्चितपणे म्हणता येईल. 

पाहूया येत्या गुरुवारी काय होतंय ते ! आपणही या क्षेत्राशी संबंधित असाल तर ही पोस्ट लाईक करून अवश्य शेयर करा. इतकंच नाही तर आपल्या परिचयातील कलाशिक्षक किंवा कला विद्यार्थ्यांना फॉरवर्ड देखील करा. तर येत्या गुरुवारी सायंकाळी ५ वाजता अवश्य भेटूया. शिरीष मिठबावकर या कार्यक्रमात आणखीन कोणता गौप्यस्फोट करणार याची आम्हाला देखील उत्सुकता आहेच. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...