Enquire Now

Request A Quote

"गच्चीवरील गप्पां"ची पन्नाशी !

आज दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता 'चिन्ह'च्या यु ट्यूब चॅनलवर 'गच्चीवरील गप्पां'चा ५०वा भाग प्रसारित होणार आहे. या भागात हा कार्यक्रम सादर करणाऱ्या 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक यांच्याशीच प्रा. डॉ. नीतिन आरेकर हे थेट बातचीत करणार आहेत. त्या निमित्तानं सुनीती देव यांचा हा विशेष लेख. आजवरच्या 'गप्पां'मधल्या त्यांना आवडलेल्या दोन मुलाखतींवरील विशेष लेख याच आठवड्यात प्रकाशित होतील. 

"गच्चीवरील गप्पा" ह्या उपक्रमाचा पाहता पाहता पन्नासावा भाग दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी सादर होणार आहे. पहिला भाग दि. १३ सप्टेंबर २०२० रोजी सादर झाला. "चित्रकारांशी गप्पा" ह्या स्वरुपाचा कार्यक्रम समाज माध्यमावर सादर करावा ही कल्पना ज्येष्ठ चित्रकार सतीश नाईक यांना सुचली. गीता कुळकर्णी, आकाश खेतावत या तरुण तंत्रस्नेही सहकार्‍यांच्या साह्याने त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. निर्मिती, स्वत: कमर्शियल आर्टिस्ट असलेल्या, नीता नाईक यांची आहे."गच्चीवरील गप्पा" ही एक सामुहिक निर्मिती आहे.

या उपक्रमाला प्रतिसाद कसा मिळेल यांची खात्री नव्हती. पण सुरुवात तर करु या, प्रतिसाद नाही मिळाला तर थांबून जाऊ, या विचाराने नाईक यांनी हा उपक्रम सुरु केला. परंतु सुरुवातीपासूनच प्रत्येक भागाला श्रोत्यांनी इतका भरभरुन प्रतिसाद दिला की प्रथम दर महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सादर होणारा हा कार्यक्रम तीन महिन्यातच साप्ताहिक झाला. दर शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता "चिन्ह"च्या यु ट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम होतो.एका क्लिकवर महाराष्ट्रातील/ बाहेरील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कलाकारांचे अनुभव ऎकायला मिळतात, त्यांचं काम पहायला मिळतं.  

उपक्रमाचं स्वरुप, तो सुरु करण्यामागील भूमिका, त्यात आत्तापर्यंत सहभागी झालेले कलाकार या विषयी लिहिण्यापूर्वी दोन शब्द खुद्द सूत्रधार सतीश नाईक यांच्याविषयी मला लिहायचे आहेत.                     

सतीश नाईक हे ज्येष्ठ चित्रकार आहेत.पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचा काही वर्षे निर्भिड वावर होता.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य जपणारे आहेत,अन्यायाची चीड आहे. ’गप्पां"च्या एका भागात त्यांनी एका चित्रकार दाम्पत्यावरील अन्यायाला वाचा फ़ोडली होती, या शिवाय त्यांची मौलिक ओळख म्हणजे "चिन्ह" या दर्जेदार कलाविषयक मासिकाचे ते संपादक होते.( आता 'www.chinha.co.in' या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अनियतकालिक स्वरूपात प्रकाशित केले जाते, लवकरच ते नव्या स्वरूपात आणि दररोज प्रकाशित होणार आहे ) "चिन्ह"चा आजवरचा प्रत्येक अंक, तसेच विशेषांक हे अप्रतिम आणि संग्राह्य आहेत. विशेषत: ज्येष्ठ चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील अंक आणि नंतर प्रसिद्ध केलेला ग्रंथ उत्कॄष्टच आहे. त्याचप्रमाणे " नग्नता: चित्रातील आणि मनातील" हा अंक वारंवार वाचावा असा आहे.आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नुकताच एक उपक्रम यशस्वीपणे राबविला. तो म्हणजे ’कलाशिक्षण : काल आज आणि उद्या" या विषयावर महाच्रर्चा घडवून आणली.कलेच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यात सहभागी झाले होते. जवळ जवळ एक महिना हा उपक्रम सुरु होता.त्याचे फ़लित म्हणजे तीस वर्षांपासून एकच अभ्यासक्रम राबविणार्‍या महाविद्यालयांनी तो बदलण्याची तयारी दर्शविली आहे.हा उपक्रम येत्या १७ सप्टेंबरपासून पाक्षिक स्वरूपात सुरु राहणार आहे.

"चिन्ह" आणि परिवाराशी जोडलेले लेखक, समीक्षक, चित्रकार आणि सर्वसामान्य वाचक यांच्याशी संवाद साधण्यासाठी "गच्चीवरील गप्पा" हा कार्यक्रम सुरु केला. शिवाय या "गप्पां"च्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समकालीन चित्रकलेचे दर्शन व्हावे, त्यांचे व्हिडिओजच्या स्वरुपात दस्ताऎवजीकरण व्हावे, तसेच वेगवेगळ्या प्रयोगशील कलाकारांची ओळख व्हावी हाही आणखी एक महत्त्वाचा हेतू या "गप्पां"च्या आयोजनामागे होता.
                         
साधारणपणे दीड ते दोन तास चालणार्‍या या कार्यक्रमाचे स्वरुप असे असते. सादरकर्ते स्वत: सतीश नाईक असतात. गीता कुळकर्णी अतिशय नेटके सूत्रसंचालन करते. कोणत्या कलाकाराला आमंत्रित केले आहे, त्याचा थोडक्यात परिचय करुन देते, पुढील कार्यक्रमाची घोषणा करते व सूत्र सतीश नाईक यांच्या हाती सोपवून रजा घेते."गप्पा"च असल्यामुळे कोणत्याही तर्‍हेची छापील प्रश्नावली ना नाईक यांच्याजवळ असते ना सहभागी कलाकाराजवळ ! पूर्ण कार्यक्रम उस्फ़ूर्त असतो. ( अर्थात तो भरकटणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जाते.) अनौपचारिकपणे मित्र/मैत्रीणी एकमेकांशी जशा गप्पा मारतील तितके सहज या "गप्पां"चे स्वरुप असते.कलाकाराशी असलेल्या पूर्वपरिचयाचा धागा पकडून नाईक हळूहळू चित्रकाराला बोलते करतात. त्यातून त्या चित्रकाराचा संघर्ष, त्याने घेतलेली मेहनत, त्याला आलेल्या अडचणी इ.प्रवास श्रोत्यांना कळतो. त्याचे कामही दाखविले जाते, त्यावर भाष्य करण्यातूनही तो अधिक उलगडत जातो. श्रोतेही अधूनमधून कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न पोस्ट करतात.त्यांची आवर्जून दखल घेतली जाते. त्यामुळे कार्यक्रम एकतर्फी होत नाही. श्रोत्यांनाही आपण कार्यक्रमाचा एक सक्रिय भाग आहोत असे वाटते.                  
                                            
"गप्पां"मध्ये मागील एकोणपन्नास भागात सहभागी झालेल्या कलाकारांचा धावता आढावा घ्यायचे म्हटले तरी सर्वच कलाकारांना न्याय देता येणे शक्य नाही. सहभागी कलाकार कोणत्या उंचीचे आहेत त्याची फ़क्त ही काही उदाहरणे आहेत.सर्वांची सविस्तर ओळख करुन घेण्यासाठी रसिकांनी 'चिन्ह'च्या यु ट्यूब चॅनलवर "गप्पां"चे सर्वच भाग आवर्जून ऎकावेत.                           
                                            
"गप्पां"चा ओपनिंग बॅटसमन होता शालेय शिक्षण पूर्ण केलेला प्रेम आवळे.रुढार्थाने तो चित्रकार नाही. चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण त्याने घेतलेले नाही. घरात कलेचा वारसा नाही.सर्वात आश्चर्य म्हणजे प्रेम रंगांधळा आहे. परंतु त्याची चित्रे थेट राजा रवी वर्मा यांच्या चित्रांशी साधर्म्य असणारी आहेत. सेल्फ़ न्यूड करणारी नाशिकची मानसी सागर एक बंडखोर चित्रकार आहे. तरुण पिढीची प्रतिनिधी असणारी भावना सोनवणे एक भन्नाट कलाकार आहे. पेंटिंग,सिरॅमिक, एनामलिंग इ. माध्यमे वापरुन ती कलानिर्मिती करते. मुळची पुण्याची, विवाहानंतर मुंबईकर झालेली स्वीटी जोशी एक धडपडी कलाकार आहे. छापील पुस्तके जाळून त्यातील शब्दांच्या अर्थाच्या पलीकडे जाऊ पाहणारी, अग्नि तत्त्वाशी नाते जोडू पाहणारी आहे.डॉ. मंजिरी ठाकूर ही कला इतिहासतज्ज्ञ, एक संशोधक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.आजाराशी दोन हात करीत तिचं लेखन, संशोधन सुरु आहे. कोकणातील रोह्यासारख्या सारख्या गावातून थेट मुंबई महानगरात केवळ चित्रकलेच्या ध्यासाने आलेले अमूर्त चित्रकार प्रकाश वाघमारे, केवळ कावळ्यांचीच चित्रे काढणारा अभिजित काळण, "एमटी आयवा मारु"चे लेखक, अनंत सामंत, चित्रकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,"तुझी आम्री" या नाटकाचे सर्वेसर्वा शेखर नाईक, सामाजिक भान असलेले नाशिककर चित्रकार बंधू प्रफ़ुल्ल, राजेश सावंत, सायकलने भारत भ्रमणाला निघालेला चित्रकार प्रतीक जाधव, वेगळ्याच प्रकारची मांडणी शिल्प करणारी शिल्पा जोगळेकर, उत्साहाने भरलेली, कला समीक्षक शर्मिला फ़डके व्यवसायाने डॉक्टर परंतु आता समुद्र किनारी मांडणी शिल्प करणारे गोव्याचे सुबोध केरकर, मूळचा चित्रकार पण आता शास्त्रीय संगीताला आयुष्य वेचलेला सुनील बोरगावकर  अशी किती नावे सांगावीत ? सर्वच वयोगटाचे, आपापल्या शैलीत काम करणारे चित्रकार या दिंडीत सहभागी झाले आहेत.सर्व कलाकार बहुआयामी आहेत. त्यांना चित्रकलेखेरीज संगीत, वाचन, प्रवास, लेखन वाद्यवादन यातही रुची आहे.
                        
बहुतेक सर्व ’गप्पा" या एकाच भागात घेतलेल्या आहेत. अपवाद फ़क्त डॉ. गिरीश चरवड यांचा ! त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके विलक्षण आहे की ’गप्पां"च्या एका भागात त्यांना न्याय देणे शक्यच झाले नसते. या "गप्पा" तीन शनिवारी झाल्यात. ते चित्रकार तर आहेतच परंतु सरोद, संतूर, सारंगी, तबला व पखवाज उत्तम वाजवितात. त्यांनी काढ्लेल्या रेखाटनांमुळे पुण्यात गाजलेले खून किंवा अन्य गुन्हे यातील आरोपी सापडले आहेत.सध्या ते भारती विद्यापीठ,पुणे येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
                         
हे सर्व व्हिडीओज "चिन्ह"च्या यु ट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेत. ज्यांनी आत्तापर्यंत ऎकले नसतील त्यांनी जरुर ऎकावेत.विषेशत: चित्रकलेच्या क्षेत्रात काही करु इच्छिणार्‍या युवा कलाकारांनी तर आवर्जून,काळजीपूर्वक ऎकाव्यात अशा या "गप्पा" आहेत. या "गप्पा" अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. त्यांचा गंभीरपणे अभ्यास करायला हवा.
              
या ५०व्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दि.११ सप्टेंबर रोजी 'चिन्ह' आणि 'चिन्ह'चा 'वाचता वाचता' व्हॉट्सअप ग्रुप यांच्या वतीनं प्रा.डॉ. नीतिन आरेकर हे सतीश नाईक यांची मुलाखत घेणार आहेत. डॉ  नीतिन आरेकर मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून श्रीमती चांदीबाई हिंमतमल मनसुखानी महाविद्यालय, उल्हासनगर येथे कार्यरत आहेत. "ये है मुंबई मेरी जान" व "शिवगंध" या लोकप्रिय पुस्तकांचे त्यांनी शब्दांकन केले आहे. अनेक कार्यक्रमांचे उत्कॄष्ट संचालन केले आहे. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असणार्‍या या दोन मित्रांच्या "गप्पा" ’चिन्ह"च्या यु ट्युब चॅनेलवर सायंकाळी ५.०० वाजता सादर होणार आहेत. आपणही त्यात सहभागी होऊ या. ऎकायला विसरु नका.
               
या "गप्पां"चे किमान शंभर भाग सादर करण्याची सतीश नाईक ह्यांची मनीषा आहे. त्यांना त्यात अजिबात अडचण येणार नाही. त्यांचा लोकसंग्रह अफ़ाट आहे. सर्व पिढीतील चित्रकारांशी त्यांचा संवाद आहे. त्यांना कलाकारांचा तुटवडा कधीच भासणार नाही. पन्नाशीचा उंबरठा ओलांडून शतकाकडे होणार्‍या वाटचालीसाठी सतीश नाईक व त्यांच्या चमूला मन:पूर्वक शुभेच्छा !

सुनीती देव

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...