Enquire Now

Request A Quote

गच्चीवरील गप्पांची पन्नाशी आणि मी !

कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांप्रमाणे माझे देखील हात पाय बांधले गेले होते. तो काळच अतिशय अस्वस्थ करणारा होता. अनेक मित्रमैत्रिणी, स्नेही, नातलग या काळात गमावले. निम्म्याहून अधिक आयुष्य पत्रकारितेत काढलं असल्यामुळं समाजातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा किंवा खरंतर कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिचय असल्यामुळं या काळात आलेल्या मृत्यूच्या सर्वच बातम्या अत्यंत अस्वस्थ करून टाकीत गेल्या. रोजच काहीना काहीतरी बातमी यायची आणि साऱ्या दिवसभराचा मूडच बिघडून टाकला जायचा. एक प्रकारची विलक्षण अशी कोंडी होती ती. वाचन किंवा संगीत ऐकण्यानं ती कमी होऊ शकली असती, पण ते ही हातून होत नव्हतं ही वस्तुस्थिती होती. 

एके दिवशी फेसबुकवर सहज सर्फिंग चालू असताना अचानक हात थबकला. पाहिलं तर विख्यात गायक हरिहरन यांचा ऑनलाईन संवाद चालू होता. मी ही त्यांच्या गझला अनेकदा ऐकल्या असल्यामुळं मी ही तो संवाद ऐकू लागलो. हरिहरन यांचं भारदस्त व्यक्तिमत्व, अनोख्या अशा केशरचनेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पडलेली लुभावणारी भर आणि त्यांची प्रत्यक्ष संवादाची मनमोकळी अशी पद्धत, हे सारं सारं मला अतिशय आवडून गेलं. जवळ जवळ तासभर तो कार्यक्रम चालू होता, पण हरिहरन यांच्या व्यक्तिमत्वाची अगदी वेगळी अशी बाजू त्यादिवशी समजून घेता आली हे मात्र खरं. 
तो सर्व कार्यक्रम पाहत असतानाच माझ्या मनात विचार आले की जर चित्रकलेच्या संदर्भात असा उपक्रम कुणी राबवला तर, काय मजा येईल ना ! मग मी एक चाळा म्हणून कुणाकुणाला या उपक्रमात सहभाग घेता येईल याची शॉर्टलिस्ट करू लागलो. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की हे भलतंच छान प्रकरण होईल. एक दोन मित्रांशी बोललो, त्यांनाही ती कल्पना आवडली. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, असा काहीसा तो प्रकार झाला. सगळे म्हणाले हे कुणीतरी करायलाच हवं, अर्थात आपण स्वतः सोडून हे त्यात आलंच. 

तोपर्यंत लॉकडाऊनच्याच काळात 'चिन्ह'चा 'वाचता वाचता' नावाचा जो ग्रुप आहे, ( ज्यात मराठीतील नामवंत साहित्यिक, चित्रकार, नाटककार, वाचक, विचारवंत अशांचा समावेश आहे आणि अतिशय सुविहितपणे त्या ग्रुपचं वाचन प्रसाराचं कार्य अष्टोप्रहर चाललेलं असतं ) त्या ग्रुपतर्फे 'संवाद' नावाचा ऑनलाईन कार्यक्रम सुरु झाला होता. प्रख्यात लेखक, नाट्य दिग्दर्शक, अभिनेते आणि विचारवंत दीपक करंजीकर यांच्या एका सूचनेवरून पहिला कार्यक्रम आम्ही त्यांच्याच 'घातसूत्र' या पुस्तकावर केला जो प्रचंड गाजला. यात माझ्यापेक्षा देखील प्रा.डॉ. नीतिन आरेकर यांचा सहभाग मोठा होता. त्यांना साथ लाभली होती ती 'मराठी सृष्टी डॉट कॉम'च्या निनाद प्रधान यांची. किंबहुना त्यांच्या पुढाकारामुळेच आमच्या दृष्टीने अवघड असलेलं प्रकरण अतिशय सोपं झालं होतं. पहिल्या कार्यक्रमाला मिळालेल्या अलोट अशा प्रतिसादामुळे पुढं दर आठवड्यालाच आम्ही एका पाठोपाठ एक कार्यक्रम सादर करायला लागलो. साहजिकच कोरोनाचा लॉकडाऊन नाही म्हटलं तरी सुसह्य होऊ लागला होता. 

अशातच एके दिवशी प्रा.डॉ. नीतिन आरेकरांनी प्रस्ताव मांडला. कार्यक्रम 'चिन्ह'चा आहे आणि त्यात चित्रकलेचा कार्यक्रम होऊ नये हे काही योग्य नाही. चित्रकलेवर महिन्यातून एक तरी कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. मलाही ती कल्पना आवडली आणि मी होकार दिला. पहिला कार्यक्रम विख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या मुलाखतीचा असायला हवा यावर आमचं एकमत झालं, पण ती मुलाखत घायची कुणी यावर मात्र चर्चा सुरु झाली. अनेक नावं आली आणि गळून गेली. कुठल्याच नावावर एकमत होईना. तेव्हा नीतिन आरेकरांनी सुचवलं की, ही मुलाखत सतीश नाईक यांनीच घ्यायला हवी. मी अक्षरशः ती कल्पना अंगावर पाल पडल्यासारखी क्षणार्धात झटकुन टाकली. 'छे छे... हे माझं काम नाहीच, मला नका खेचू यात ' वगैरे वगैरे. पण एक नाही ना दोन, नीतिन आरेकरांनी माझा सर्व विरोध एक हाती मोडून काढला. म्हणाले दुसऱ्याकडून नाही तुम्हीच हा कार्यक्रम करायचा. 

अशा तऱ्हेने मी अशा प्रकारच्या कार्यक्रमात ओढला गेलो. पहिल्याच कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. खूप प्रश्न आले, खूप प्रतिक्रिया आल्या, व्हॉट्सअप मेसेजही अनेक आले आणि फोन देखील अनेकांनी केले. एकापाठोपाठ एक घेतलेल्या कोलतेंच्या  मुलाखती गाजू लागल्या. याच काळात वर उल्लेख केलेला हरिहरन यांचा कार्यक्रम माझ्या पाहण्यात आला आणि त्यातूनच लॉकडाऊनच्या काळात चित्रकला विषयक कार्यक्रम ज्यात बहुतांशी तरुण कलावंतांचा समावेश असेल असा कार्यक्रम सादर करण्याची कल्पना माझ्या मनात हळूहळू रुजत गेली. तिला नावही आपोआप स्फुरलं, 'प्रश्न"चिन्ह"'. 

प्रश्न'चिन्ह'चा पहिला कार्यक्रम अतिशय धाडसी होता, ज्यात चित्रकलेचं ज्यानं प्राथमिक शिक्षण देखील घेतलेलं नाही, किंबहुना तो ते घेणार देखील नाही ( हे मला अर्थातच प्रत्यक्ष कार्यक्रमाच्याच वेळी कळलं ) इतकंच नाही तर नुकतीच त्याने दहावी की बारावी पूर्ण केली आहे, पण तरी देखील तो चित्रकार गणला जाऊ लागला आहे, अशा प्रेम आवळे या तरुण चित्रकारासोबत ती बातचीत होती. ती देखील विलक्षण गाजली. आणि तिथून मग एका पाठोपाठ एक धडाधड कार्यक्रम सुरूच झाले. पुढचं सारं तुम्हाला ठाऊकच आहे. 'चिन्ह'च्या यु ट्यूब चॅनलवर तर ते अष्टोप्रहर उपलब्ध देखील आहे. 

येत्या शनिवारी या प्रश्न'चिन्ह' ज्याचं नामकरण कालांतरानं 'गच्चीवरील गप्पा' असं झालं. त्याचा ५०वा भाग सादर होणार आहे. या ५०व्या भागात माझीच मुलाखत व्हावी अशी सूचना नागपूरच्या प्रा. सुनीती देव यांनी केली होती. त्यांनी हे 'गच्चीवरील गप्पां'चे पन्नासच्या पन्नास भाग पाहिले आहेत. त्या या कार्यक्रमानिमित्तानं 'चिन्ह' परिवाराशी छान पैकी जोडले गेले आहेत. मी मात्र त्यांची कल्पना धुडकावून लावली. आपल्याच कार्यक्रमात आपण आपलीच मुलाखत कशी काय घ्यायची वगैरे वगैरे. मी ठरवलं की हा कार्यक्रम ९२ साली ऐन दंगलीत मुरुड जंजिरा येथे जो आर्टिस्ट कॅम्प घेतला होता त्या यशस्वी कॅम्पमधील तेव्हाच्या तरुण पण आजच्या नामवंत चित्रकारांना बोलवायचं आणि त्यांच्याशी गप्पा मारायच्या. सर्वाना मेल मेसेजेस गेले, बहुतेकांचा होकार देखील आला, पण कार्यक्रमाची वेळ जशी जवळ आली तसं अनेकांच्या लक्षात आलं की त्यादिवशी नेमके दीड दिवसाचे गणपती जाणार आहेत. त्यामुळे अनेकांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला. आता काय करायचे ? आयत्यावेळी काही सुचेना. तेव्हा मग मात्र मी माझ्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला मान्यता दिली. प्रा. नीतिन आरेकर, ज्यांनी मला या क्षेत्रात ओढून आणलं तेच ही मुलाखत घेणार आहेत. 

खरंतर 'चिन्ह' आणि माझा आजवरचा प्रवास यासंदर्भात एक पुस्तकच प्रकाशित व्हावं अशी माझ्याच नव्हे तर अनेकांच्या मनात कल्पना आली आहे. पण काहीना काही कारणामुळं हे काम रेंगाळतंच चाललं आहे. आता मलाही त्यात फारसं स्वारस्य उरलेलं नाही, कारण यु ट्यूबवरचे व्हिडीओ हे माध्यम अतिशय प्रभावी ठरलं आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्याला हजारो लोकांपर्यंत क्षणार्धात पोहोचता येतं. त्यामुळे हे पुस्तक वगैरे कितपत होईल हे काही आता मला सांगता येत नाही, पण व्हिडीओ स्वरूपात मात्र सारं डॉक्युमेंटेशन नक्कीच होईल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. असो. तर येत्या शनिवारच्या ५०व्या 'गच्चीवरील गप्पां'च्या कार्यक्रमासाठी सर्वांना जाहीर निमंत्रण. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

सातासमुद्रा पलीकडून प्रतिक्रिया !

अधिक वाचा

Feature 2

येत्या गप्पा संजय सावंत यांच्याशी !

अधिक वाचा

Feature 3

जहांगीर कधी सुरु होणार ?

अधिक वाचा

Feature 4

असं जगणं असतं राजा !

अधिक वाचा

Feature 5

२०२२ नंतर काय ? आणि जे जे अस्तित्वात राहील ?

अधिक वाचा
12345678910...