Enquire Now

Request A Quote

एक पाऊल पुढं, पोतराज ते कलाकार !

तो पोतराजच व्हायचा म्हणजेच जटा वगैरे धारण केलेले प्रचंड लांब केस, तोंड चित्रविचित्र रंगानं रंगवलेलं. कंबरेपर्यंत उघडा, खाली रंगीबेरंगी कापडाने विणलेला झगा. हातात आसूड आणि त्या आसुडाचे सतत अंगाअंगाला बसणारे फटके. असंच काहीतरी त्याच्या नशिबी लिहिलं होतं. पण नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते गावात शिरले आणि त्यांनी याला उचललं.  केस-बीस कापून याला स्वच्छ केलं. 
इथं जणू त्याचं विधिलिखित फिरलं, तो चित्र काढू लागला. पुढं चित्रकला महाविद्यालयात शिकू लागला. मग पुण्याला आला, तिथं चित्रकलेचं उच्च शिक्षण घेतलं. आता मुंबई जवळच्या एका  उपनगरात राहतो. चित्र काढतो, चित्रपट बनवतो. मध्यंतरी जहांगीर मध्ये त्याचा शो झाला, चित्रविक्रीमधून आलेल्या पैश्यांतून त्यानं चक्क एक शॉर्ट फिल्म बनवली.  त्याची ती फिल्म 'कोंडवाडा' खूप गाजली. आता आणखीन मोठी फिल्म बनवतोय. इतकंच नाही तर फिचर फिल्म देखील बनवायची तयारी करतोय. त्याची ही भन्नाट जीवन कहाणी ऐकवण्यासाठीच तो 'गच्चीवरील गप्पां'मध्ये येतो आहे. 

मंडळी, असं म्हणतात की,'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही'. खरंच आहे म्हणा, आयुष्यातील कठीण काळाला यशस्वीपणे सामोरं गेलं की आपण आपल्या प्रगतीपथावर पुढं सरसावतो. ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनात न्यूनगंड असतो किंवा जी गोष्ट करण्याची आपल्याला भीती वाटत असते अशी गोष्ट एकदा केली की मग ती भीती नाहीशी होऊन जाते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. गरज असते ती फक्त सर्व धीर एकवटून एक पाऊल पुढं  टाकण्याची. पुढं काय होईल ? कसं होईल? आपलं चांगलंच होईल का? चार लोक काय म्हणतील? या सर्व विचारांनी गुरफटून जाऊन आपण आपला निर्णय बदलतो आणि तिथेच थांबून जातो, कारण 'पुढं काय?' या प्रश्नाचं उत्तर खरं आपल्याकडे नसतं. अरे पण पुढं काय? हे पाहण्यासाठी तरी आपल्यला पुढं जावंच लागणार ना ! हेच आपण लक्षात घेत नाही. हे सर्व इथं सांगायचं कारण... या सर्व प्रश्नांना समोरं जाऊन पुढं काय? याचं उत्तर मिळवलेला एक चित्रकार ज्याचं नाव आहे लक्ष्मण चव्हाण. जो शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे.   

या चित्रकार लक्ष्मण चव्हाण यांचं बालपण साधारण नव्हतं, पोतराजाच्या घरी थोरला मुलगा  म्हणून जन्माला आल्यानं त्यांच्या नशिबीही पोतराज बनणंच लिहिलं गेलं होतं. वडील साधे ऊसतोड कामगार असल्यानं या गावातून त्या गावात त्यांची वारी नेहमीच चालू असायची याचा सरळ सरळ परिणाम लक्ष्मण यांच्या शिक्षणावर होत होता. दर दोन-तीन वर्षांनी उपजीविकेसाठी गावं बदलत राहिल्यानं त्यांना एकाच शाळेत शिकणं शक्य नव्हतं. लक्ष्मण यांची शाळेची गोडी पाहून अखेर त्यांच्या वडिलांनी चौथीत त्यांचा प्रवेश बीड इथल्या पिंपळगावातील एका वसतिगृहात करून दिला. सालाना १२०रुपये एवढी फी असलेलं वसतिगृह १० वी पर्यंत लक्ष्मण यांचं घरचं बनलं होत. शाळेत असताना लक्ष्मण यांचं राहणीमान हे इतर मुलांपेक्षा वेगळं होत. पोतराज झालेले लक्ष्मण लांब मोठे केस घेऊन जेव्हा शाळेत जायचे, तेव्हा इतर मुलं त्यांना चिडवायची याचा परिणाम त्यांच्या बालमनावर होत होता. मीच का पोतराज झालो? हे कधी संपेल का? मीही कधी इतर मुलांसारखा वावरू शकेन का?  असे असंख्य प्रश्न लक्ष्मण यांना पडत. स्वतःच्या अशा अवतारामुळे त्यांना स्वतःबद्दलच न्यूनगंड निर्माण झाला होता. पण एके दिवशी बाजारात आपल्या वडिलांसोबत पोतराज बनून फिरत असताना लक्ष्मण यांना नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि त्यांचे लांब केस कात्रीने कापून टाकले. कापलेल्या केसांसोबतच गळुन पडला तो लक्ष्मण यांचा 'स्वतः बद्दलचा न्यूनगंड'. आणि सुरु झाला लक्ष्मण यांचा पोतराज ते कलाकार बनण्याचा नवा अध्याय. 

आता शाळेत इतर मुलांप्रमाणे वावरता येऊ लागण्याने लक्ष्मण यांच्या मनात आत्मविश्वासाची पालवी फुटू लागली. त्यांच्यातील विद्यार्थी जागा होऊ लागला आणि स्वतःचं अस्तित्व बनवू लागला. अगदी लहानपणापासूनच लक्ष्मण यांना चित्रकलेची फार आवड. हीच आवड पुढं शाळेत त्यांची ओळख बनली. शिक्षकांचाही पुरेपूर पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शन लक्ष्मण यांना वेळोवेळी मिळत होतं. त्यामुळे त्यांच्यातील कलाकार योग्यरीतीने आपल्या ध्येयाकडे अग्रेसर होत होता. आई वडील शिकलेले नसल्याने आपला मुलगा काय शिकतोय याची त्यांना काहीच कल्पना नव्हती, पण आपला मुलगा पास होतोय आणि पुढे सरसावतोय या गोष्टीचं  समाधान तेवढं होतं. आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच उचलायची असं लक्ष्मण यांनी ठरवलं होतं म्हणूनच महाविद्यालयात शिकता शिकता बॅनर बनवणं, साइन बोर्ड बनवणं, गणपती डेकोरेशन इत्यादी कामं ते करत होते. त्यातून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागेल इतकेच पैसे त्यांना मिळत होते. पण आपल्या मागच्या भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावरच होती, म्हणून ते दिवस रात्र मेहनत करायचे, वेळ प्रसंगी जास्तीचं  काम घेऊन कधी झोप तर कधी भूक यांचा त्याग करायचे. पण या सर्वातूनही वेळ काढून स्वतःची कला जोपासायचे. या बाबतीत त्यांनी कधीच कुचराई केली नाही. याचंच फळ म्हणून पुढील आयुष्यात चित्रकलाच त्यांची ओळख बनली.   

 कलाक्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याच्या इच्छेने त्यांनी २००५ साली मुंबईतील नामांकित कला महाविद्यालय जे जे स्कूल ऑफ आर्ट इथं प्रवेश अर्ज केला, तिथं त्यांची निवडही झाली. पण मुंबईत आलेल्या पुरामुळे त्यांचं ते स्वप्न अपुरंच राहीलं. 
तरीही हार न मानता त्यांनी पुण्यातील अभिनव महाविद्यालयात आपले शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जेव्हा लक्ष्मण यांनी शिल्पकला हा विषय घेऊन जे. जे. मध्ये प्रवेश घेतला तेव्हाही बहिणीच्या लग्नकार्यासाठी पैसे अपुरे पडत असल्यानं त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावं  लागलं. या गोष्टीनं खचून न जाता कालांतरानं लक्ष्मण यांनी आपलं ते शिक्षण परिचयातील एका शिल्पकारांकडून पूर्ण केलं. 
  
चित्रकला हेच त्यांनी अभिव्यक्तीचं साधन मानलं. प्रदर्शक आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, आर्ट प्लाझा, मुंबई ट्रायडेंट आर्ट वॉक गॅलरी, हॉटेल ओबेरॉय, जहांगीर आर्ट गॅलरी यांसारख्या गॅलरीजमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं झाली. लक्ष्मण यांच्या चित्रांना अनेक पुरस्कार आणि फेलोशीप मिळाल्या आहेत. एवढंच नाही तर २०२० मध्ये लक्ष्मण यांच्या चित्रांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारानं सुद्धा गौरवलं गेलं आहे. लक्ष्मण यांच्या चित्रांची सोलो अशी ७-८ तर ग्रुपमधील ५-६ प्रदर्शन झाली आहेत. या प्रदर्शनांतून जे काही पैसे त्यांना मिळाले, त्यामधून त्यांनी समाज प्रबोधन करणाऱ्या लघुपटांची निर्मिती केली. 'चित्र आणि चित्रपट दोन्हीही सारखेचं असतात बस, योग्य प्रकारे मांडता आले पाहिजेत' असं लक्ष्मण यांचं म्हणणं. 

'कोंडवाडा' आणि 'रंगा'  हे लक्ष्मण चव्हाण दिग्दर्शित लघुपट त्यांच्या स्वतःच्या जीवन कहाणीवर आधारित असून अनेक ठिकाणी यांना नामांकन देखील मिळालं आहे. सध्या ते एका पूर्ण लांबीच्या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिण्याच्या गडबडीत आहेत. लवकरच हा चित्रपट सुद्धा आपल्या भेटीला येईल.  खरंच कौतुक आहे. कोण्या एका घरात पोतराज म्हणून जन्माला आलेला हा मुलगा आज आपल्या कलेच्या सामर्थ्यानं कलाकार बनला. आपण काय म्हणून जन्माला येतो यापेक्षा आपण स्वतःला काय बनवतो यानं आपली ओळख घडते हे यातून सिद्ध होतं. आपल्यासारखंच पुढे काय होईल ? कसं होईल? चांगलं होईल का? चार लोक काय म्हणतील? असे विचार घेऊन लक्ष्मण मनातल्या मनात कुढत राहिले असते तर या पोतराजचा कलाकार कधीच झालाच नसता. समोर आलेल्या सर्व संधीमध्ये पुढचं पाऊल टाकून त्यांनी शेवटी आपलं ध्येय आणि पुढं काय? याचं उत्तर मिळवलंच . 
प्रीती पाटकर

Top Features

 

Feature 1

मिठबावकरांचा नवा गौप्यस्फोट !

अधिक वाचा

Feature 2

आगीशी खेळ !

अधिक वाचा

Feature 3

"गच्चीवरील गप्पां"ची पन्नाशी !

अधिक वाचा

Feature 4

गच्चीवरील गप्पांची पन्नाशी आणि मी !

अधिक वाचा

Feature 5

कोकणचो टायपोग्राफर !

अधिक वाचा
12345678910...