Enquire Now

Request A Quote

आता नाही तर कधीच नाही!

कोरोना लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राचं कलाशिक्षण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे. हे वेगळं वळण फारसं आशादायक नाहीये किंबहुना या वळणावरून जर ते घसरलं तर ते पुन्हा उठून कितपत उभं राहू शकेल याविषयी या क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांच्या मनात शंका आहे. बाबुराव सडवेलकर हे कलासंचालक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कलाशिक्षण परंपरेला जी उतरती कळा लागली ती कुणीच थांबवू शकलं नाही. ज्यांची ज्यांची बाबुराव सडवेलकर किंवा त्यांचे प्रभारी शांतीनाथ अरवाडे यांच्यानंतर कलासंचालक किंवा अन्य महत्त्वाच्या पदांवर नेमणूक झाली त्यांनी त्यात सुधारणा करण्याऐवजी तिचे लचके पाडण्यातच धन्यता मानली. या सगळ्याचा लेखाजोखा 'चिन्ह'च्या कालाबाजार अंकात नावानिशीवर घेण्यात आला आहे, ज्याचा प्रतिवाद आज १३ वर्षांनंतर देखील कुणीही करू शकलेलं नाही. याचाच अर्थ असा की 'चिन्ह'ने जे मांडलं ते सत्य होतं. 

गेल्या ३० - ३५ वर्षात महाराष्ट्राच्या कलाशिक्षण परंपरेचं केवळ आणि केवळ अधःपतनच झालं. जे कुणालाच थांबवता आलं नाही. किंबहुना ते त्यांना थांबवायचं नव्हतंच. जेव्हढे म्हणून लचके तोडता येतील तेव्हढे या कालखंडात तोडले गेले. आता उरलं आहे ते महाराष्ट्राच्या कलाशिक्षण परंपरेचं कलेवर. त्याबद्दल आक्रोश करायचा का जेजे स्कूल ऑफ आर्ट अजूनही जागेवर आहे म्हणून राजकारण्यांचे आभार मानायचे ? हा आमच्या सारख्यांसमोर यक्ष प्रश्न आहे. 

कोरोना लॉकडाऊनने तर महाराष्ट्राच्या कलाशिक्षण व्यवस्थेचं सारं परिमाणच बदलून टाकलं आहे. तिसरा किंवा कदाचित चौथा लॉकडाऊन उठल्यावर किती आर्ट स्कूल पुन्हा उघडली जातील याविषयी या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. बाकी अभ्यासक्रम, त्यात होणारे संभाव्य बदल, शिक्षण व्यवस्थेतील बदल याविषयी काही घडेल असे या क्षेत्रातली माणसं स्वप्नात देखील पाहायचं धाडस करणार नाही हे निश्चित. या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन 'चिन्ह'नं आपल्या यु ट्यूब चॅनलवर कलाशिक्षणासंदर्भात एक महाचर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची संपूर्ण माहिती. सोबतच्या पोस्टरवर आहेच. जो उल्लेख केलेला नाही पण जो अध्याहृत आहे तो असा की, या महाचर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या कलाशिक्षण परंपरेविषयी ज्यांना ज्यांना आस्था आहे त्या सर्वांनाच सहभागी होता येईल. महाचर्चेसाठी निवडलेल्या दहा मान्यवरांना आपल्याला पडलेले, आपल्याला सतावणारे प्रश्न अगदी मोकळेपणानं विचारता येतील अशी खास व्यवस्था आम्ही करतो आहोत. त्यासाठी आमचा व्हाट्सअप नंबर आहे 90040 34903 . या नंबरवर आपण ज्याला प्रश्न विचारायचे आहेत त्या मान्यवरांचा नामोल्लेख करून प्रश्न विचारावा, जो त्या मान्यवरांकडे कार्यक्रमाच्या आधीच पाठवला जाईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर लाईव्ह कार्यक्रमात प्रत्यक्ष दिलं जाईल. 

आणखीन एक व्यवस्था आम्ही करतो आहोत. या महाचर्चेतील कार्यक्रमाविषयीची नोटिफिकेशन्स आपल्याला यावी असं जर वाटत असेल तर, वर दिलेल्या आमच्या व्हाट्सअप नंबरवर ' #कलाशिक्षणवाचवा ' हा संदेश आपल्या नामोल्लेखासह पाठवावा, म्हणजे या कार्यक्रमासाठी आम्ही जे ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करतो आहोत त्यात आपल्या नावाचा समावेश आम्हाला करता येईल. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनीही यात सहभागी व्हावं असंही आम्हाला वाटतं. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आमचं आवाहन आहे. आम्ही अतिशय कळकळीनं हे आवाहन करतो आहोत कारण, भविष्यात काय काय होऊ शकेल याची अतिशय चांगलीच कल्पना आम्हाला आली आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या कलाशिक्षणाविषयी ज्यांना ज्यांना आस्था आहे आणि यात बदल घडवायला हवा असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी त्यांनी यात जास्तीत जास्त सहभागी व्हावं, सहभागी होताना ही पोस्ट समाजमाध्यमांवर ' #कलाशिक्षणवाचवा ' हा हॅशटॅग देऊन शेअर करावी असं 'चिन्ह'तर्फे आवाहन आहे. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

आगीशी खेळ !

अधिक वाचा

Feature 2

"गच्चीवरील गप्पां"ची पन्नाशी !

अधिक वाचा

Feature 3

गच्चीवरील गप्पांची पन्नाशी आणि मी !

अधिक वाचा

Feature 4

कोकणचो टायपोग्राफर !

अधिक वाचा

Feature 5

वऱ्हाडी माणसं आणि मानापमान !

अधिक वाचा
12345678910...