Enquire Now

Request A Quote

तिने चौकट ती मोडली !

"युद्ध उद्याच जरी,ती आजही लढत आहे
संसारासोबत स्वप्नांचा गाढा, ती अलगदच ओढत आहे 
समाजाने बांधली बेडी, जिद्दीने तिने तोडली 
लांघूनी उंबरा तिने चौकट ती मोडली !" 

मंडळी, जेव्हा मला अदिती वैद्य यांचा विषय लिखाणासाठी देण्यात आला तेव्हा त्यांचं नाव आणि त्या कमर्शिअल आर्टिस्ट आहेत या खेरीज मला बाकी काहीच ठाऊक नव्हतं. अदिती वैद्य कोण आहेत? काय करतात? कशा आहेत? या बद्दल मला पुसटशीही कल्पना नव्हती. पहिल्यांदाच नाव ऐकल्याने त्यांच्या बद्दल पूर्णपणे जाणून घेणं मला भागचं होत. म्हणून जी माहिती मिळेल, ती-ती वाचायला सुरवात केली. त्यांना समजून घ्यायला सुरवात केली. जसं-जसं त्यांना जाणत गेली तेव्हा मनात एक विचार डोकावून गेला की, 'अदिती वैद्य आणि माझी कार्यशैली जरी भिन्न असली तरीही आमच्या वाटेला आलेलं स्त्रीत्व सारखंच, कदाचित पुढे जाऊन जी चौकट मला बांधू पाहील त्या चौकटीला भेदण्याचा दृष्टिकोन मला अदिती यांच्याकडून मिळाला. कारण,आपण अशा समाजाचा भाग आहोत ज्यात स्त्रियांना त्यांच्या स्वप्नांपेक्षा जास्त महत्व त्यांच्या संसाराला द्यायचं असं शिकवलं जात. त्यांच्या भोवती एक अदृश्य अशी घर-संसार सांभाळण्याची चौकट आखली जाते. या चौकटीच्या बाहेर पडण्याची संधी जरी स्त्रियांना दिली जात असली तरीही चौकटीच्या आतला  भार सुद्धा त्यांनाच उचलावा लागतो. अशात अनेक जणी समाजाने आखलेल्या या फोल चौकटीत शोभून दिसण्यासाठी आपल्या  स्वप्नांचा त्याग करतात. पण आपला संसार सांभाळून, आपल्या स्वप्नांचा पाठपुरवठा करून त्या स्वप्नाला गाठून, त्या पलीकडचीही झेप घेणाऱ्या अदिती वैद्य खरंच स्त्रियांसाठी एक उत्तम आदर्श निर्माण करतात.' 

 'कमर्शिअल आर्टिस्ट' म्हणजे नक्की काय? याचा पूर्णपणे अर्थ ही उलगडला नव्हता, तेव्हा पासूनच 'कमर्शिअल आर्टिस्ट'  या नावाने अदिती यांच्या मनावर नकळतच आपली छाप पडण्यास सुरवात केली होती. अदिती लहान होत्या तेव्हा 'कमर्शिअल आर्टिस्ट' या शब्दाशी त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळेला हा कोर्स फक्त जे जे आर्ट कॉलेज मध्ये शिकवला जातो एवढंच काय ते त्यांना माहित होत. कला विषयातच आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करायचंय हे ठरल्यावर अदिती यांनी आपल्या परिचितांकडून माहिती मिळवण्यास सुरवात केली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षातच त्यांचं लग्न झालं. लवकर लग्न झाल्याने संसाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली, यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या स्वप्नांच्या मध्ये जणू एक चौकट उभी राहिली. ही चौकट मोडून अदिती यांनी अनेक दिग्गज मंडळी उदा. देवेन्द्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार यांसोबत काम केले. अदिती यांनी फक्त राजकीयच नाही तर सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांच्या ही कल्पनांना आपल्या कला कौशल्याच्या सामर्थ्याने एक वास्तववादी रूप देऊन त्यांना सत्यात उतरवले आहे. 

अदिती यांचे वडील शास्त्रज्ञ आणि आई शिक्षिका होत्या, या दोघांच्याही क्षेत्रात अदिती यांनी साधर्म्य साधलं. त्यांनी जे.जे. आर्ट कॉलेज मध्ये शिकवलं सुद्धा आहे आणि मेडिकल म्युझियम  डेव्हलपमेंट करण्याचं अवघड कामही केलं आहे. त्या सोबतच इतर म्युझियमच्या पुनर्रचनेचे काम सुद्धा त्यांनी अगदी उत्तम तऱ्हेने केलं आहे, तसेच अनेक शिल्पांचं रेस्टोरेशन सुद्धा त्यांनी केलं आहे. सोबतच हॉस्पिटलला साकारात्मतक रूप देण्यासाठी त्यांनी म्युरल्सचा वापर करत एक नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. अदिती यांनी स्वच्छ भारत अभियान योजनेत सुद्धा आपलं कलाकौशल्य दाखवलं आहे. तसंच तरुण व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या 'ट्विटबूक' या डिजिटल टूलचे डिझायनींग सुद्धा अदिती यांनीच केलं आहे. अदिती यांच्या या वेग वेगळ्या उपक्रमांवरून त्यांचं विलक्षण कर्तृत्व तर तुमच्या लक्षात आलंच असेल. 

अदिती वैद्य यांचा हा चौकटीत बांधल्या जाण्यापासून ते ती चौकट मोडण्या पर्यंतचा प्रवास अनुभवण्यासाठी पाहायला आणि ऐकायला विसरू नका 'चिन्ह' प्रस्तुत 'गच्चीवरील गप्पा'चा येत्या शनिवारचा भाग. 
प्रीती पाटकर 

Top Features

 

Feature 1

मिठबावकरांचा नवा गौप्यस्फोट !

अधिक वाचा

Feature 2

आगीशी खेळ !

अधिक वाचा

Feature 3

"गच्चीवरील गप्पां"ची पन्नाशी !

अधिक वाचा

Feature 4

गच्चीवरील गप्पांची पन्नाशी आणि मी !

अधिक वाचा

Feature 5

कोकणचो टायपोग्राफर !

अधिक वाचा
12345678910...