Enquire Now

Request A Quote

काळाच्या निकषावर...

'चिन्ह'चं डिझिटलायझेशनचं काम सध्या सुरु आहे. ते सुरु असतानाच अचानक एक कात्रण हाती आलं आणि मग 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक यांना काही लिहावंसं वाटलं, तोच हा लेख. 

'चिन्ह' संदर्भात आलेल्या बातम्या लेखांचं स्कॅनिंग करणं चालू आहे. हेतू हा की जेव्हा हवं तेव्हा ते हाती लागावं. दस्तावेजीकरण हा त्यातला मुख्य उद्देश आहेच. ते करत असताना अचानक एक कात्रण हाती आलं. २००६ सालच्या दिवाळीत 'गायतोंडेंच्या शोधात' हा 'चिन्ह'चा अंक जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा एका मुंबईच्या वृत्तपत्रात आलेलं.  त्या काळात दिवाळी अंकांची परीक्षणं वृत्तपत्रातून सविस्तर प्रसिद्ध होत. आताही होतात म्हणा, पण त्यात पोच देण्याचाच भाग अधिक असतो. 

त्या वर्षी देखील प्रथेप्रमाणे अनेक दैनिकांकडे अंक पाठवले होते, पण एखाद दुसऱ्या अंकानंच त्याची दखल घेतली होती. बाकीच्या साऱ्यांनीच पोच देण्यातच भागवलं होतं. या दैनिकानं मात्र १०० - १२५ शब्दांमध्ये या अंकाविषयी लिहिलं होतं. अर्थात लिहिलं काय होतं, तर लेखकांची नामावलीच त्यात जास्त दिसत होती. बाकी संपूर्ण अंकाचं वैशिष्ठ्य मात्र एकाच ओळीत दिलं होतं. अन्य दैनिकांनी मात्र तेवढंही सौजन्य दाखवलं नव्हतं . त्यांनी फक्त त्या अंकाची साभार पोच देण्यावर भागवलं होतं. पण गमतीची गोष्ट म्हणजे, या साऱ्यानं अंकाच्या विक्रीवर कोणताच परिणाम झाला नाही. त्या अंकाचं एकूणच रूप इतकं जमून आलं होतं, की तो अंक हातोहात संपून गेला. 

तब्बल १५ वर्ष झाली त्याला. त्या अंकातल्या साहित्यात भर घालून नंतर आम्ही 'गायतोंडे' ग्रंथ प्रकाशित केला. त्याचंही स्वागत मोठ्या प्रमाणावर झालं. 'गायतोंडे' याच्या लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वानं मराठी जनमानसावर अक्षरशः गारुड केलं. समाज माध्यमांवर तर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. त्यावेळच्या प्रतिक्रिया आणि कुणी कुणी अत्यंत उत्स्फूर्तपणे त्या ग्रंथावर जे लिहिलं त्याचं जर संकलन कुणी केलं, तर त्यातून गायतोंडे यांच्या संदर्भात आणखी एक छान पुस्तक तयार होईल. 

मूळ मराठी पुस्तक आता अनेक भाषांत प्रसिद्ध होणार आहे ही गायतोंडे यांच्या चाहत्यांना आनंद देणारी बातमी ठरावी. आणखीनही या पुस्तकासंदर्भात बरेच काही घडू पाहते आहे. पण मागील अनुभव पाहता त्याविषयी इतक्यात काही बोलणे योग्य नव्हे. हे सारे आठवले ते अवचित ते इवलेसे कात्रण हाती आले आणि. असंच काहीसं घडलं होतं ते २००१ साली. गायतोंडे यांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा. एवढ्या मोठ्या चित्रकाराच्या निधनाची आलेली केवळ सहा ओळीची ती बातमी मला अत्यंत अस्वस्थ करून गेली आणि त्यातूनच पुढं गायतोंडे यांच्यासंदर्भात माझ्याकडून काम झालं. जे नंतर खूपच मोठं मोठं होत गेलं. जागतिक लिलावांमधून गायतोंडे यांच्या चित्रांच्या विक्रीचे जे काही विक्रम होत गेले, ते सारेच आता आपल्या समोर आहेत. पण, १५ - २० वर्षांपूर्वी हे सारं असं उदासीन करणारं चित्र होतं. 

अंकाच्या या परीक्षणावरून एक अतिशय गमतीदार गोष्ट आठवली. २००२ सालातली. 'चिन्ह'चा भास्कर कुलकर्णी विशेषांक प्रसिद्ध झाला होता. तेंडुलकरांच्या हस्ते अरुण कोलटकर, अशोक शहाणे, वृन्दावन दंडवते, दिलीप पुरुषोत्तम चित्रे अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ पार पडला होता. पण, मुंबईच्या एका मोठ्या वृत्तपत्रानं त्या अंकाचं परीक्षण अवघ्या पाच ओळीत दिलं होतं. त्यातलं एक वाक्य भलतंच विनोदी होतं ते आजही आठवतं. त्यात परीक्षणकर्त्यानं म्हटलं होतं, ' भास्कर कुलकर्णी नावाच्या एका वारली कलावंतांवर 'चिन्ह'ने यंदा आपला अंक काढला आहे ' वगैरे. हे वाचल्यावर त्यावर रडावं की हसावं हे मला कळेना. पण ते असो. 

शेवटी काळ हाच या साऱ्यावर जालीम उपाय असतो. काळाच्या निकषावर टिकणं अत्यंत अवघड असतं आणि मुख्य म्हणजे त्या त्या वेळी त्यांचं महत्व जाणून त्यावर लिहिणं किंवा बोलणं त्याहूनही अवघड असतं हेच यातून सिद्ध व्हावं, असो. 
 
गायतोंडे यांच्या संदर्भातलं आमचं काम देखील आता संपलंय. इतर माध्यमातनं आता गायतोंडे बघायला मिळतील की नाही हे देखील आता काळच ठरवेल. 'चिन्ह'नं भविष्यात संपूर्ण डिजिटल स्वरूप धारण केलं असल्यामुळं 'गायतोंडे' ग्रंथासारखा ग्रंथ देखील 'चिन्ह'तर्फे प्रकाशित होणार नाही हे उघड आहे. म्हणूनच ज्यांच्या संग्रही अद्यापही हा ग्रंथ नाही त्यांनी 'चिन्ह'ने उपलब्ध करून दिलेल्या या ग्रंथाच्या उपलब्ध प्रतींवरील सवलत योजनेचा फायदा करून घ्यावा असं आवाहन आहे. या संदर्भातील सर्व माहिती फेसबुकवरील 'गायतोंडे' या पेजवर मिळू शकेल. किंवा 90040 34903 या नंबरवर 'GAI' हा मेसेज व्हाट्सअप करून देखील ती माहिती मिळवता येईल.
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

आगीशी खेळ !

अधिक वाचा

Feature 2

"गच्चीवरील गप्पां"ची पन्नाशी !

अधिक वाचा

Feature 3

गच्चीवरील गप्पांची पन्नाशी आणि मी !

अधिक वाचा

Feature 4

कोकणचो टायपोग्राफर !

अधिक वाचा

Feature 5

वऱ्हाडी माणसं आणि मानापमान !

अधिक वाचा
12345678910...