Enquire Now

Request A Quote

काव काव काव काव...!

काल याच वेळेस किंवा कदाचित दोन तास आधीच कावळे काढणाऱ्या चित्रकाराची म्हणजे अभिजित काळण याची जी पोस्ट प्रसारित केली तिला गेल्या फक्त २२ तासात तिचा रिच २१,७४७ इतका विक्रमी झाला आहे. 'चिन्ह'चे आजवरचे सारेच विक्रम या पोस्टने तोडले. बहुदा यालाच व्हायरल की काय ते म्हणत असावेत. या पोस्टनं अभिजित मात्र हैराण झाला. तो सांगत होता की पोस्ट प्रसारित झाल्यापासून सतत मेसेजेस येताहेत सतत कॉल्स येताहेत. अगदी अमेरिकेतून देखील मेसेज आणि फोन आले. आणि इथल्या फोनचं तर काही विचारूच नका. 

अभिजित जरा तिरका असावा असा माझा कयास आहे. तो सांगत होता, त्या पोस्टमुळे माझ्या आईला पहिल्यांदा पटलं की मी काहीतरी बरं करतोय. (कलाशिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची हीच तक्रार असते) आणखीन एक महत्त्वाचं म्हणाला ते म्हणजे, आज मला वाटतंय की आता मी खरा खुरा चित्रकार झालो. त्याला पोस्टला मिळणार रिचचे स्क्रीनशॉट कळवले तर तो बिचारा म्हणाला हे जरा अतीच होतंय ! पण काल पासून एकूण जी धमाल चालली आहे ते पाहून तो खुश आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप साऱ्यावरच अभिजित आणि त्याच्या कावळ्यांची चर्चा आहे. 

अभिजितनं काही वर्षांपूर्वी मला सांगितलं होतं की मी कावळेच काढतो म्हणून. तेव्हा त्यानं जे कावळे पाठवले होते ते मला आवडले देखील होते. पण, त्याच्यावर काहीतरी करायचं सारखं राहून जात होतं हे मात्र खरं. 'गच्चीवरील गप्पा' सुरु झाल्या तेव्हा मात्र त्याच्या नावाचा समावेश मी आगामी यादीत करून ठेवला होता. त्याला फोन केला तर म्हणाला, 'सर, कार्यक्रम होईल की नाही हे माहित नाही, पण तुम्ही मला विचारलंत यातच सारं आलं.' 

कार्यक्रमाचं नक्की करताना माझ्याही मनात काही शंका उभ्या राहिल्या. म्हणजे उदाहरणार्थ, फाईन आर्टवाले अभिजीतच्या निवडीवर टीका करतील की काय ?, या कमर्शियल आर्टिस्टला कशाला अभिजात कलेमध्ये घेतलं ? पण अभिजितच्या कामानं मात्र मला त्याच्या निवडीचा निर्णय घेणं भाग पाडलं. त्याच्या पहिल्याच पोस्टवर जो काही प्रतिक्रियांचा पाऊस पडला तो केवळ अवर्णनीय होता. कुठून कुठून कोणी कोणी त्याच्या कामावर व्यक्त झालं आहे याची गणतीच नाही. आता हा कार्यक्रम कसा होतो ते पाहायचंय. पण अभिजित ज्या प्रांजळपणे बोलतो ते पाहता हा कार्यक्रम यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. 

अभिजीतच्या या पोस्टविषयी आणखीन थोडंसं सांगावंसं वाटतंय. त्यातला अभिजीतचा आपण त्या गावचेच नाही असा जिन्यावर बसलेला फोटो, त्याची कावळ्यांची चित्रविचित्र चित्रं, त्या पोस्टला दिलेलं शीर्षक, त्या पोस्टला दिलेला आणि उत्सुकता वाढवणारा इंट्रो आणि मुख्य म्हणजे ती पोस्ट किंवा तो लेख याविषयी आणखीन थोडं सांगायलाच हवं. 'चिन्ह'च्या कार्यालयात कालच पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेली एक तरुण मुलगी रुजू झाली. तिचं नाव प्रीती पाटकर. तिला पहिली असाइनमेंट म्हणून अभिजितवरचा लेख लिहायला दिला होता. तो तिने कसा लिहिला हे आता वेगळं सांगायला हवं का ? हे सारं जाळून आल्यामुळेच ती पोस्ट व्हायरल झाली असा आमचा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं ? तर भेटूया येत्या शनिवारी सायंकाळी ०५.३० वाजता, 'चिन्ह'च्या यु ट्यूब चॅनलवर, अभिजितशी 'गप्पा' मारायला. 
सतीश नाईक

Top Features

 

Feature 1

मिठबावकरांचा नवा गौप्यस्फोट !

अधिक वाचा

Feature 2

आगीशी खेळ !

अधिक वाचा

Feature 3

"गच्चीवरील गप्पां"ची पन्नाशी !

अधिक वाचा

Feature 4

गच्चीवरील गप्पांची पन्नाशी आणि मी !

अधिक वाचा

Feature 5

कोकणचो टायपोग्राफर !

अधिक वाचा
12345678910...