Enquire Now

Request A Quote

गायतोंडे ते गायतोंडे : एक प्रवास

२००१ साली चित्रकार गायतोंडे गेले तेव्हा मी चिन्हचं पुनरुज्जीवन केलं आणि लगेच गायतोंडेंवरची विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. मग २००५ साली गायतोंडेंच्या चित्रकलेच्या किमती आकाशाला भिडू लागल्यावर मी एक गायतोंडे विशेषांकच काढला. हा प्रवास चालू असतानाच अनेक चित्रकार मंडळी किंवा साहित्यावर प्रेम असणारी मंडळी मला गायतोंडे यांच्यावरचं हे वाचलं का ? ते वाचलं का ? असं विचारात होती. मी ते अर्थातच सारं वाचलेलं असायचं. 

पण एकदा मात्र मी चकलो. माझा कवी आणि नंतर चित्रकार झालेला मित्र नितीन दादरावाला याने निसर्गदत्त महाराजांविषयी सांगितलं आणि म्हणाला निसर्गदत्त महाराजांचा 'सुखसंवाद' किंवा इंग्रजी ग्रंथ 'आय एम दॅट' वाच म्हणजे तुला गायतोंडे ज्यांना गुरु मानत त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. 

शोध घेता घेता मी ठाण्यात येऊन पोहोचलो. सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेले मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड यांच्या वडिलांचा म्हणजे सतीश आव्हाड यांचा पत्ता मला मिळाला. ते म्हणे निसर्गदत्त महाराजांचे साधक होते आणि त्यांनी नव्याने महाराजांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. एवढी माहिती पुरेशी होती. मग मी आव्हाडांकडून त्यांनी प्रसिद्ध केलेली सारीच्या सारी पुस्तकं मागवली. 

अशा तऱ्हेनं गायतोंडेंच्या शोधात असलेल्या मला निसर्गदत्त महाराजांचा शोध लागला. शोध घेता घेता मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी होती. उदाहरणार्थ हे निसर्गदत्त महाराज गिरगावच्या खेतवाडीतल्या १०व्या गल्लीत एका चाळीत राहत होते. तळमजल्यावरच्या त्यांच्या घराला पोटमाळा होता. तो पोटमाळा म्हणजे त्यांचा आश्रम. त्यांचं पानविडीचं दुकान होतं. या दुकानात बसूनच ते जगण्याविषयी चिंतन, मनन करत असत. संध्याकाळी मग त्यांच्या आश्रमात प्रवचन असे वगैरे. 

शोध घेता घेता ते महाराज चक्क माझ्या गावचे म्हणजे मालवणचे निघाले. शिवकालापासून प्रसिद्धीस आलेल्या कांदळगावात त्यांचा जन्म झाला ही देखील माहिती मिळाली. आता कुतूहल अधिकच जागृत झालं होतं. इंटरनेट सुरु झाल्यावर नेटवरून मी त्यांची माहिती शोधू लागलो. या साऱ्या प्रवासात पुण्याचे महाराजांचे साधक सचिन क्षीरसागर यांच्याशी माझी गाठ पडली. त्यांच्याकडून मात्र खूप माहिती मिळाली आणि मग मी थेट त्यांना फॉलो करता करता रणजित महाराज वगैरे पर्यंत येऊन ठेपलो. निसर्गदत्त महाराजांचे गुरु सिद्ध रामेश्वर महाराज ते रणजित महाराज असा हा अनोखा प्रवास होता. या प्रवासात देखील मी सातत्याने गायतोंडे यांचाच शोध घेत होतो. 

चित्रकार गायतोंडे यांच्यासारखा अत्यंत आधुनिक विचारांचा माणूस अध्यात्मापर्यंत येऊन पोहोचतो कसा याविषयीचे माझे कुतूहल जागृत झाले. गायतोंडे यांच्या काही मुलाखतीतून त्याचं किंचित प्रमाणात निराकरण झालं. पण संपूर्ण निराकरण व्हायला चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांची मुलाखत हाती यावी लागली. गायतोंडे ग्रंथ प्रकाशित करीत असताना त्या ग्रंथासाठी लक्ष्मण यांनी जी प्रदीर्घ मुलाखत दिली आहे त्यातून मला निसर्गदत्त महाराज, गायतोंडे आणि लक्ष्मण श्रेष्ठ या नातेसंबंधांचे काही धागे उलगडले. 

निसर्गदत्त महाराजांना गायतोंडे गुरु मानत तर चित्रकार लक्ष्मण गायतोंडेंना गुरु मानत. गायतोंडेंशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे लक्ष्मण यांना निसर्गदत्त महाराजांकडे जाण्याची संधी मिळाली आणि एके दिवशी तर निसर्गदत्त महाराजांनी त्यांना शिष्यत्व देखील बहाल केलं. लक्ष्मण यांनी गायतोंडे यांना ही गोष्ट सांगताच गायतोंडे यांनी चक्क लक्ष्मण यांचे पाय धरले. लक्ष्मण यांनी कथन केलेला गायतोंडे ग्रंथातला हा सर्वात थक्क करणारा भाग. हा वाचल्यावर तर निसर्गदत्त महाराजांविषयी अधिकच कुतूहल दाटून आलं. 

मालवणी मॉल सुरु झाल्यानंतर व्हय म्हाराजा हा लाईव्ह कार्यक्रम आम्ही करावयास घेतला. त्यामध्ये मालवणमधील एखाद्या संतांचा समावेश असावा असं मला वाटत होतं आणि मग अधिक वेळ न दवडता मी निसर्गदत्त महाराजांची निवड केली. तिथं सचिन क्षीरसागर हे माझ्या मदतीला धावून आले. ते म्हणाले, तुम्ही जयश्री आणि मोहन गायतोंडे दाम्पत्याची भेट घ्या, दोघांनाही निसर्गदत्त महाराजांचा शेवटच्या पाच वर्षाचा सहवास लाभला आहे. दोघांनीही महाराजांचे शब्दच्या शब्द नोंदवून ठेवले आहेत. इतकंच नाही तर अनुवादाचं देखील काम केलं आहे. त्यांच्याशी जर तुम्ही लाईव्ह बोललात तर खूप नवी माहिती तुम्हाला समाजापर्यंत नेता येईल. फक्त ते लोणावळ्यात एका वृद्धाश्रमात असतात. लोकडाऊनच्या काळात तिथवर पोहोचायचं आणि कार्यक्रम कसा सादर करायचा हे तुम्हीच पहा. मी लागेल ती मदत करेनच. 

इथं चिन्हचे खंदे चाहते रमेश बोन्द्रे मदतीला धावून आले. ते लोणावळ्यातच राहतात. म्हणाले मी जबाबदारी घेतो. ते आणि त्यांचे शिक्षक मित्र दीपक मावकर मदतीला आले आणि तांत्रिक बाजूंची जबाबदारी त्यांनी उचलली देखील. येत्या रविवारी सायंकाळी ०५.३० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. चित्रकार गायतोंडे यांच्या गुरूंचा आणखीन एका गायतोंडे यांच्या साहाय्यानं घेतलेला हा शोध तिथंच संपणार आहे की तिथून पुढं चालू होणार आहे हे आता पाहायचंय. 
सतीश नाईक 

Top Features

 

Feature 1

एक नवं विश्व तुमच्यासमोर साकारणारेय...

अधिक वाचा

Feature 2

गायतोंडे पेंटिंग १०० कोटीच्या घरात कधीही जाईल

अधिक वाचा

Feature 3

पुनर्जन्म

अधिक वाचा

Feature 4

गायतोंडे आयुष्यभरच होम क्वारंटाईन होते !

अधिक वाचा

Feature 5

गायतोंडे, अध्यात्म, होम क्वारंटाईन, डॉ. दिग्विजय वैद्य आणि मी

अधिक वाचा
12345678910...